शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथ

शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथ
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथ

अंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग शेडगे यांनी परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेत शेवया, पापड याचबरोबरीने बाहुल्या, तोरण, झुला, आकाशकंदील निर्मितीस सुरवात केली. शेतात उत्पादित होणारी वरी, नाचणीची ग्राहकांना थेट विक्री केली जाते. परिसरातील महिलांचा बचत गट तयार करून त्यांच्या उत्पादनांनादेखील सुरेखाताईंनी बाजारपेठ मिळवून दिली आहे.

सातारा शहारापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावरील कास पठाराजवळच अंबाणी हे दीडशे लोकवस्तीचे गाव. गाव शिवारात शेतीचे क्षेत्र आणि पाण्याची कमतरता असल्याने पावसाच्या पाण्यावरच हंगामी शेती केली जाते. त्यामुळे गावातील बहुतांश लोक रोजगाराच्या निमित्ताने मुंबई येथे असतात. याच गावातील सौ. सुरेखा पांडुरंग शेडगे या गृहउद्योजिका. सुरेखाताईंचे शिक्षण सातवी झाले आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम बघतात. सुरेखाताईंची घरची अडीच एकर जिरायती शेती. यामध्ये वरी, नाचणी, भात या पिकांची लागवड असते. सध्या त्यांचे पती मुंबई येथील खासगी कंपनीत नोकरी करीत आहेत. बचत गटाची उभारणी  अंगणवाडी मदतनीस म्हणून काम बघत असताना सुरेखाताईंनी २००४ मध्ये गावातील अकरा महिलांना एकत्र करून राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटाची सुरवात केली. आर्थिक बचत हा गटाचा मुख्य हेतू. सुरवातीच्या टप्यात गटातील महिलांनी पूरक उद्योग सुरू करावा यासाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले. यातील काही प्रशिक्षणास सुरेखाताईंसह गटातील महिलांनी सहभाग नोंदविला होता. नोकरी बरोबर व्यवसाय करता यावा यासाठी सुरेखाताईंनी २००७ मध्ये कर्जावर वीस हजार रुपयांचे शेवयानिर्मितीचे यंत्र खरेदी केले. यंत्राद्वारे शेवया निर्मितीस सुरवातदेखील केली. सन २०१५ मध्ये सुरेखाताईंची माणदेशी फाउंडेशनच्या अपर्णा सावंत, ज्योती जाधव यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेच्या माध्यमातून सुरेखाताईंना विविध गृहउद्योगांची माहिती मिळाली. त्यानुसार कुटुंबाच्या मदतीने शेवयानिर्मिती उद्योग वाढविण्याचा त्यांनी निर्णय घेतला.  शेवया, पापडनिर्मितीला सुरवात सुरेखाताईंनी शेवयानिर्मिती उद्योगास श्री घाटाईदेवी महिला गृहउद्योग असे नाव दिले. घरातील छोटी खोली बंदिस्त करून त्यामध्ये शेवयानिर्मिती यंत्र आणि शेवया सुकणवण्यासाठी स्टॅंड तयार केले. शेवयानिर्मितीच्या बरोबरीने त्यांनी स्वतःच्या शेतात उत्पादित होणाऱ्या नाचणीपासून पापडनिर्मितीस सुरवात केली. पहिल्या टप्प्यात सुरेखाताईंनी शेवया आणि पापड हे खासगी दुकानदाराकडे विक्रीस दिले. दुकानादाराच्या मागणीनुसार शेवया, पापडाचा पुरवठा केला जात होता. या दरम्यान सुरेखाताईंनी बाजारपेठेची गरज ओळखून विविध स्वादाच्या शेवयांच्या निर्मितीस सुरवात केली. यासदेखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला.   स्वयंसेवी संस्था, घरच्यांची मदत गृहउद्योग सुरू करण्यासाठी सुरेखाताईंना माणदेशी फाउंडेशन संस्थेच्या अपर्णा सावंत, ज्योती जाधव यांनी व्यवसायासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत तसेच विक्रीसाठी विविध प्रदर्शनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. वरी, नाचणी, तांदळाची विक्री आणि पॅकिंगसाठी अॅवॉर्ड या स्वयंसेवी संस्थेच्या सचिव नीलिमा कदम, किरण कदम यांची मोलाची मदत झाली. सुरेखाताईंचे पती पांडुरंग, मुलगा अजय, मुलगी शिवानी यांची विविध पदार्थांच्या निर्मितीसह विक्रीसाठी चांगली मदत होते. या व्यवसायातील मिळकतीमुळे सुरेखाताईंचा मुलगा अभियांत्रिकी तर मुलगी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. 

प्रदर्शनातून उत्पादनांना मागणी

सुरेखाताईंनी उत्पादनांची विक्री करण्यासाठी सातारा जिल्ह्यात होणाऱ्या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यास सुरवात केली. यासाठी त्यांना माणदेशी संस्थेच्या अपर्णा सावंत, ज्योती जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना नेमक्या कोणत्या प्रक्रिया पदार्थांची तसेच कोणत्या हस्तकलांना मागणी आहे हे लक्षात आले. प्रदर्शनातील विक्रीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. गेल्या दोन वर्षांत सातारा शहरात भरणाऱ्या मानिनी, जोतिर्मय, नक्षत्र आदी प्रदर्शनात सहभागी होऊन त्यांनी पापड, शेवईसह बाहुल्या, तोरण, झुला, आकाशकंदील यांच्या विक्रीस सुरवात केली. यातून ग्राहकांशी संवाद वाढला. कलाकुसरीच्या नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी त्या इंटरनेटचादेखील वापर करतात.

स्टॅालवरून थेट विक्री

आत्तापर्यंत सुरेखाताई तयार केलेली उत्पादने ही प्रदर्शन आणि खासगी दुकानदारांना विक्रीसाठी देत होत्या. या दरम्यान त्यांची अॅवॉर्ड संस्थेच्या नीलिमा कदम यांच्याशी चर्चा झाली. नीलिमा कदम यांनी त्यांना उत्पादनांच्या विक्रीसाठी सातारा-कास रस्त्यावर स्टॉल उभारण्याचा सल्ला दिला. तसेच विक्रीसाठी मदत करण्याचेही आश्वासन दिले. साधारणपणे कास पठारावर सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात देशभरातून पर्यटक येतात. या काळामध्ये अॅवॉर्ड संस्थेच्या मदतीने गेल्या दोन वर्षांपासून कास पठार रस्त्यावर सुरेखाताई उत्पादनांच्या विक्रीसाठी स्टॅाल उभारतात. या स्टॅालवर शेवई, पापड, विणकाम साहित्यासह वरी, नाचणी, तांदळाचे एक किलोचे पॅकिंग करून विक्री करण्यास सुरवात केली. त्या देशी तांदूळ, वरी, नाचणीची विक्री करत असल्याने ग्राहकांच्याकडून चांगली मागणी आहे. गरजेनुसार सुरेखाताईंनी बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

विविध प्रकारची उत्पादने

  • सहा प्रकारच्या शेवयांची निर्मिती. यामध्ये आंबा, अननस, स्ट्रॅाबेरी, सुजी लहान, सुजी मोठी या शेवयांना चांगली मागणी.
  •   नाचणी, पालक, तांदळाच्या पापडांची निर्मिती.
  •   मागणीनुसार पुरवठ्यावर भर.
  •   बचत गटातील महिलांनी गरजेनूसार रोजगाराची उपलब्धता.
  •   प्रत्येक उत्पादनासाठी दर्जेदार पॅकिंग.
  •   विणकाम केलेल्या उत्पादनाची थेट ग्राहकांना विक्री.
  •   विणकामाच्या नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी इंटरनेटची मदत.
  •   वर्षभरात एक ते दीड लाखाची उलाढाल. खर्च वजा जाता सरासरी ३० टक्के नफा.
  • -  सौ. सुरेखा शेडगे, ९०११४१५७६८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com