सुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली किफायतशीर

केळी लागवडीमध्ये संजय पाटील आणि विनायक पाटील.
केळी लागवडीमध्ये संजय पाटील आणि विनायक पाटील.

जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता. मुक्ताईनगर) येथील विनायक आणि संजय पाटील या बंधूंनी नोकरी सांभाळून वडिलोपार्जित शेतीचे उत्तम नियोजन केले आहे. सुधारित तंत्राने  केळी, पपईचे उत्पादन घेण्यावर त्यांचा भर आहे. याचबरोबरीने कलिंगडासारखे आंतरपिकातून  उत्पन्न वाढविण्याचा पाटील बंधूंचा सतत प्रयत्न असतो.

चांगदेव हे मुक्ताईनगरपासून सुमारे चौदा किलोमीटर अंतरावरील गाव. तापी काठ असलेल्या चांगदेव शिवारातील जमीन काळी कसदार आणि सुपीक आहे. विनायक आणि संजय पाटील हे दोघे बंधू नोकरी सांभाळून वडिलोपार्जित शेती करतात. सध्या विनायक पाटील हे जळगाव शहरात विक्रीकर विभागात निरीक्षक आहे. संजय पाटील हे जळगाव जिल्ह्यात कृषी विभागात पर्यवेक्षक आहे. शेतीसाठी विनायक पाटील हे अधिक वेळ देतात. दर रविवारी, तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी शेती नियोजन करतात. त्यांना लहान बंधू संजय पाटील यांचे चांगली मदत होते.    पाटील बंधूंची चांगदेव शिवारात वडिलोपार्जित वीस एकर शेती आहे. शाळेत असल्यापासून पाटील बंधू वडिलांच्या बरोबरीने शेती नियोजनात असायचे. त्यामुळे हंगामनिहाय पीक लागवड, पाणी व्यवस्थापनाची त्यांना माहिती होत गेली. शिक्षणानंतर शासकीय नोकरी मिळाली असली, तरी पाटील बंधूंनी वडिलोपार्जित शेती वाट्याने करण्यास न देता स्वतः कसण्यास सुरवात केली. दोघे बंधू नोकरीसाठी शेतीच्या गावापासून दूर असल्याने दैनंदिन नियोजनासाठी दोन सालगडी ठेवले आहेत. मशागतीला सोपे जाण्यासाठी एक ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर आणि बैलजोडी आहे. शेतीतील उत्पन्नातून गेल्या वर्षी त्यांनी चांगदेव शिवारात पाच एकर शेती विकत घेतली.   सुधारित तंत्राने पीक नियोजन पाटील बंधूंच्या शेतीमध्ये तीन विहिरी आहेत. पूर्वी केळी, कापसाची लागवड जास्त प्रमाणात होती. सन २००८ मध्ये वडिलांचे निधन झाल्यामुळे शेतीची जबाबदारी विनायक यांच्याकडे आली. सध्या पाटील बंधूंचे सात एकरावर केळी, तीन एकर कपाशी, पाच एकर पपई आणि पाच एकर कलिंगड लागवडीचे नियोजन असते.

केळीचे दर्जेदार उत्पादन  जून, जुलैमध्ये सात एकरावर केळीच्या ऊतिसंवर्धित रोपांची लागवड केली जाते. लागवडीपूर्वी योग्य मशागत करून साडेपाच फुटांवर गादीवाफे करून पाच फुटांवर रोपांची लागवड असते. गादीवाफ्यात पुरेश्या प्रमाणात शेणखत मिसळले जाते. माती परीक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खतांची मात्रा दिल्याने वाढीच्या टप्प्यात रोपांची चांगली वाढ होते. गादीवाफ्यावर प्लॅस्टिक आच्छादन केल्याने ओलावा टिकून राहतो. तणांचा प्रादुर्भाव होत नाही. केळीच्या चांगल्या उत्पादनासाठी फर्टिगेशन आणि पाण्याचे वेळापत्रक तयार केले आहे. योग्य व्यवस्थापनामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. केळी घडाला स्कर्टिंग बॅग लावल्याने गुणवत्ता चांगली राहते. सरासरी २५ किलोची रास मिळते. गेल्या तीन वर्षांपासून पाटील बंधू  निर्यातक्षम केळी उत्पादन घेत आहेत. मागील वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान एका कंपनीच्या माध्यमातून त्यांनी केळीची आखातात निर्यात केली. त्यामुळे चांगला नफा मिळाला. सरासरी बारा महिन्यांत कापणी होत असल्याने मागील दोन वर्षांपासून पाटील बंधू केळीचा खोडवा घेत आहेत.

पपईमध्ये कलिंगडाचे आंतरपीक बाजारपेठेचा अंदाज घेत पाटील बंधूंनी गेल्या चार वर्षांपासून पपई लागवडीवर लक्ष केंद्रित केले आहे. दर वर्षी मार्चमध्ये सरासरी पाच एकर क्षेत्रांवर पपई लागवडीचे नियोजन असते. जमिनीची चांगली मशागत करून आठ फुटांवर दीड फूट रुंदीचा गादीवाफा करून त्यामध्ये शिफारशीत सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. प्लॅस्टिक आच्छादन करून सात फुटावर रोपांची लागवड केली जाते.       पपई लागवडीनंतर बारा दिवसांनी गादीवाफ्यावर कलिंगडाच्या बियांची टोकण केली जाते. आच्छादनामुळे वाफसा कायम असतो. कलिंगडाची वाढ जोमदार होते. पपई आणि कलिंगडाच्या वाढीच्या टप्प्यात ठिबक सिंचनाद्वारे खत, पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे फळांची चांगली वाढ होते. साधारणपणे मेमध्ये कलिंगडाची काढणी सुरू होते. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील व्यापारी थेट शेतात येऊन कलिंगडाची खरेदी करतात. सुरवातीला अधिक दर असतात. मग दर कमी होतात. दर कमी होईपर्यंत अधिकाधिक फळांची काढणी होईल, असे पाटील बंधूंचे नियोजन असते. कलिंगडाचे पीक  संपल्यानंतर लॅस्टिक आच्छादन काढून घेतले जाते. कलिंगडच्या वेलीचे अवशेष शेतातच कुजविले जातात.       साधारणपणे पपईची काढणी नोव्हेंबरमध्ये सुरू होते. फळांची विक्री बऱ्हाणपूर, रावेरमधील व्यापाऱ्यांना केली जाते.  पपईचे एकरी १५ टन उत्पादन मिळते. मागील वर्षी  पाटील यांना प्रतिकिलोस सुरवातीला १८ रुपये दर मिळाला. त्यानंतर दर कमी होतात. सरासरी ८ ते १० रुपये प्रतिकिलोस दर मिळतात.    कलिंगडाची स्वतंत्र लागवड  बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पाटील बंधूंनी गेल्या पाच वर्षांपासून कलिंगडाची चार एकरांवर स्वतंत्रपणे लागवड सुरू केली आहे. याबाबत संजय पाटील म्हणाले, की कलिंगडाची दोन टप्प्यात लागवड करतो. डिसेंबर महिन्यात लागवडीसाठी सात फुटांवर गादीवाफा करून सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा मिसळली जाते. त्यानंतर गादीवाफ्यावर ठिबक, आच्छादन पेपर अंथरून दर एक फुटावर कलिंगडाचे बी टोकले जाते. पीकवाढीच्या टप्प्यानुसार रासायनिक खताची मात्रा दिली जाते. कीड, रोग नियंत्रणासाठी शिफारशीनुसारच फवारणी केली जाते. शक्यतो सेंद्रिय कीडनाशकांच्या वापरावर भर आहे. डिसेंबरमध्ये लागवड केलेल्या क्षेत्रातून फळांचे उत्पादन मार्च महिन्यात सुरू होते. सरासरी एकरी १५ टन उत्पादन मिळते.      मार्च शेवटी हंगाम संपल्यावर वेली काढून शेत स्वच्छ केले जाते. त्यानंतर ठिबक सिंचनातून बुरशीनाशकांची मात्रा गादीवाफ्यात सोडली जाते. आठ दिवसांनंतर पुन्हा त्याच क्षेत्रात गादीवाफ्यावर कलिंगड बियांची टोकण केली जाते. योग्य पीक व्यवस्थापन ठेवले जाते. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी फळांचे उत्पादन सुरू होते. एकरी २० टन उत्पादन मिळते. मागील दोन वर्षे कलिंगडाला प्रतिकिलोस सरासरी १० रुपये दर मिळाला आहे. खर्च वजा जाता एकरी किमान एक लाख रुपये कलिंगडातून मिळतात. या क्षेत्रातील कलिंगडाची काढणी झाल्यानंतर पुढील हंगामात कापूस किंवा केळीची लागवडीचे नियोजन असते.  कपाशी लागवड दर वर्षी तीन एकरांवर बीटी कपाशीची लागवड असते. एकरी सरासरी १२ क्विंटल उत्पादन मिळते. कपाशी काढणी झाल्यानंतर त्या क्षेत्रात हरभरा, गव्हाची लागवड केली जाते.

व्यवस्थापनातील मुद्दे

  • बाजारपेठेनुसार पीक लागवड, सेंद्रिय खते, कीडनाशकांवर भर.
  • सर्व क्षेत्रावर ठिबक सिंचन, शिफारशीनुसार खतमात्रांचा वापर.
  • पीक फेरपालट, जमीन सुपिकतेवर भर.
  • आंतरपिकातून उत्पन्नवाढ. तज्ज्ञ, प्रयोगशील शेतकऱ्यांबरोबरीने चर्चा.
  • यांत्रिकीकरणातून मजूर टंचाईवर मात.
  • बाजारपेठेनुसार विक्रीचे नियोजन
  • - विनायक पाटील, ९४२३६९९७२१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com