ज्वारी पिकावर श्रद्धा ठेऊन केली नेटकी शेती; घरूनच मिळवले मार्केट

पट्टणशेट्टी यांच्या शेतात बहरलेले ज्वारीचे पीक.
पट्टणशेट्टी यांच्या शेतात बहरलेले ज्वारीचे पीक.

अनेक शेतकरी नफा वाढवण्यासाठी फळपिके किंवा अन्य नगदी पिकांकडे वळतात. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरापासून सुमारे २५ किलोमीटरवरील मंगसुळी (जि. बेळगाव, राज्य कर्नाटक) येथील युवा शेतकरी मनीष प्रकाश पट्टणशेट्टी यांनी मात्र ज्वारी याच पिकावर मुख्य भिस्त ठेवली आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनातून चांगले उत्पादन घेताना आपल्या दर्जेदार ज्वारीला घरूनच बाजारपेठ तयार करण्यात त्यांना यश आले आहे.

कर्नाटक राज्यात पिकांची विविधता दिसून येते. महाराष्ट्राप्रमाणेच तेथील पीक पद्धतीतही साधर्म्य दिसून येते. याच राज्यातील बेळगाव जिल्ह्यात येणारा मंगसुळी, अथणी हा परिसर मिश्र पिकांसाठी प्रसिद्ध आहे. तसा हा भाग महाराष्ट्र राज्याच्या सिमेपासून फार दूर नाही. सांगली जिल्ह्यातील मिरजपासून सुमारे २५ किलोमीटरवर मंगसुळी आहे. ऊस, द्राक्ष, मका आदी पिके या भागात घेतली जातात. नगदी पिके घेवून शेतीचे फायदेशीर अर्थकारण करणारे अनेक शेतकरी या भागात आहेत. रब्बी हंगामात ज्वारी देखील सुमारे चाळीस टक्के क्षेत्रावर घेतले जाते. पावसाच्या अनियमिततेनुसार ज्वारीचे क्षेत्र कमी जास्त प्रमाणात होत राहते.

ज्वारी पिकावर संपूर्ण भिस्त

कोणत्याही प्रतिकूल परिस्थित प्रत्येक वर्षी ज्वारीचे पीक घेण्याचे सातत्य मंगसुळी येथील मनीष पट्टणशेट्टी यांनी घेतले आहे. मनीष (वय ३५) हे कला शाखेचे पदवीधर. त्यांची वडिलोपार्जित सुमारे साडेसात एकर शेती आहे. ते इतरांचीही शेतीही भाडेतत्त्वावर करतात. त्यांचे गावात स्टेशनरीचे दुकानही आहे. शेतीकडे लक्ष देऊन ते हा व्यवसायही पाहतात. सुमारे चार एकरांत ऊस तर अडीच एकर क्षेत्रात ज्वारी असते. गेल्या पंधरा वर्षांपासून ज्वारीचे पीक घेणे त्यांनी शक्यतो चुकविलेले नाही. जमीन सुधारणेला प्राधान्य

  • ज्वारीची कापणी झाल्यानंतर पावसाळ्यापर्यंत रान तापवले जाते.
  •  कापणीनंतरचे सड तसेच जमिनीत ठेवले जातात. नांगरणीच्या वेळी ते जमिनीत गाडले जातात
  •  जमिनीला अधिक काळ विश्रांती दिल्याने जमिनीची प्रत सुधारण्यास मदत
  • घरूनच मिळविली बाजारपेठ

    कापणीनंतर तातडीने मळणी केली जाते. याच वेळी वजन काटा शेतात नेऊन प्रत्येक पोत्याचे वजन केले जाते. मार्करने संबंधित पोत्यावर वजन लिहिले जाते. अनेक वर्षांपासून उत्पादन सातत्य व त्याचा दर्जाही चांगला असल्याने ग्राहकांकडून मनीष यांच्या ज्वारीला चांगली मागणी असते. कुणी एक क्विंटल, कुणी चार ते पाच क्विंटल अशी ज्वारी घरूनच नेतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना विक्री करण्याची शक्यतो गरज भासत नाही. ज्या वेळी बाजारात क्विंटलला २२०० रुपये दर असतो, त्या वेळी मनीष ती ग्राहकांना २५०० रुपये दराने विकतात. म्हणजेच क्विंटलला तीनशे रुपये अधिक दर मिळवणे व वाहतूक, हमाली, तोलाई आदी खर्च वाचवणे त्यांना शक्य झाले                                                                                 आहे.     कडब्यातून होतो उत्पादन खर्च कमी

    धान्यासोबत ज्वारीचा कडबाही मुबलक म्हणजे एकरी १२०० ते १४०० पेंढ्यांपर्यंत मिळतो. दोन हजार रुपये प्रतिशेकडा दराने त्याची विक्री सद्यःस्थितीत केली जाते. पाणी व खतांचे व्यवस्थापन चांगले केल्याने कडब्याचाही दर्जा चांगला राहतो. अलीकडील काही वर्षांत कडब्याच्या दरात वाढच होत असल्याने मिळणाऱ्या रकमेतही वाढ झाली आहे. कडबा विक्रीतून उत्पादन खर्च कमी होतो.

    उसापेक्षा फायदेशीर ठरतेय ज्वारी

    मनीष यांची उसाचीही शेती आहे. मात्र ज्वारीचे उत्पादन उसापेक्षा नेहमीच फायदेशीर ठरत असल्याचा त्यांना अनुभव आहे. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवूनच ते ज्वारी घेतात. कोणत्याही परिस्थितीत ज्वारीची प्रत खराब होऊ नये यासाठी खते, कीडनाशकांचा वापर हे त्यांच्या व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ते सांगतात की उसाचे एकरी ४० ते ५० टनांच्या दरम्यानच उत्पादन होते. साखर कारखाना दरही अपेक्षेप्रमाणे देतोच असे नाही. त्या तुलनेत ज्वारीचे एकरी १० क्विंटल किंवा त्याही पुढे उत्पादन मिळाले तरी एकरी २० हजार रुपये खर्च वजा जाता सुमारे साडेचार ते पाच महिन्यांमध्ये चांगली रक्कम हाती पडते. शिवाय कडब्यातून मिळणारे पैसे बोनसच असते. पुढील काळात ज्वारीचे उत्पादन वाढवण्याचे ध्येय ठेवले आहे. मक्‍याचेही एकरी ४० क्विंटल उत्पादन ते घेतात.  

    ज्वारीची नेटकी शेती - ठळक बाबी

  • सुरवातीची काही वर्षे उपलब्ध होईल ते बियाणे वापरले. त्या वेळी पुरेसे पाणी नसल्याने जिरायती क्षेत्र होते. त्या वेळी एकरी चार ते पाच क्विंटल एवढेच उत्पादन मिळायचे. आज टप्प्याटप्प्याने वाढ करताना एकरी सुमारे १० ते १५ क्विंटलपर्यंत मजल मारण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.   
  • रब्बी ज्वारी घेण्याआधी मका, उडदाचे पीक
  • ज्वारीची काढणी झाल्यानंतर तीन महिने रान वाळविले जाते. त्यानंतर मशागत केली जाते.
  • अडीच फुटी सरीत लागवड
  • एकरी साधारण सात ते नऊ किलो बियाण्यांचा वापर
  • जास्त दाट उगवणी झाल्यास विरळणी
  •  रानातील तुटाळी भरून काढण्यासाठी जादा उगवून आलेल्या रोपांची तुटाळीच्या ठिकाणी पुनर्लागवड
  • पेरणीच्या वेळेपासून रासायनिक खतांच्या मात्रा
  • पेरणीनंतर पंचविसाव्या दिवशी व चाळीसाव्या दिवशी दुसरी कीडनाशक फवारणी
  • सुमारे १३० दिवसांच्या कालावधीत सहा वेळा पाणी. यातील उगवणीच्या वेळी पहिले तर शेवटचे पाणी १०० दिवसांनी.
  • सध्या पाटपाण्याचे नियोजन असले तरी भविष्यात ठिबक सिंचनाकडे वळण्याचा प्रयत्न आहे.  
  •   संपकर् : मनीष पट्टणशेट्टी, ०९९४५०२७९८२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com