विदर्भात सहकारातून यशस्वी केला पोल्ट्री व्यवसाय

तळेगाव येथील संस्थेचा पोल्ट्री प्रकल्प.
तळेगाव येथील संस्थेचा पोल्ट्री प्रकल्प.

विदर्भात सहकार रुजला नाही अशी नेहमी ओरड होते. मात्र तळेगाव (ता. आष्टी, जि. वर्धा) येथील वर्धा कुक्‍कुटपालन व कृषी उद्योग संशोधन सहकारी संस्थेने पारदर्शी कारभाराच्या बळावर सहकारातील आदर्श संस्थेचा बहुमान मिळविला आहे. सध्या तीन विविध शेडसच्या पायाभूत सुविधांतर्गत एक लाख २० हजार लेयर पक्ष्यांचे संगोपन संस्थेतर्फे केले जाते. अंड्यांच्या विक्रीसाठी सक्षम बाजारपेठ तयार करून व्यवसायाचे अर्थकारण भक्कम केले आहे.  

पोल्ट्री व्यवसायात पाऊल  तळेगाव (ता. आष्टी, जि. वर्धा) येथील वर्धा कुक्‍कुटपालन व कृषी उद्योग संशोधन सहकारी संस्था सध्या पोल्ट्री व्यवसायात भक्कम पाय रोवून उभी आहे. सन १९८९ साली संस्थेची स्थापना झाली. संस्थापक संचालक श्रीधरराव ठाकरे आहेत. तर प्रशासकीय मंडळात अध्यक्ष राहुल श्रीधरराव ठाकरे, उपाध्यक्ष विनायक घोंगडी यांच्यासह एकूण १६ संचालकांचा समावेश आहे. संस्थेचे ४३७ भागधारक आहेत. 

पोल्ट्री व्यवसायासंबंधी  संस्थेच्या मालकीची सुमारे २७ एकर जमीन आहे. त्यात साडेसात हजार पक्षी क्षमतेची तीन ब्रुडर, तीन ग्रोअर व १२ लेअर शेडस आहेत. पोल्ट्रीची एकूण क्षमता एक लाख ३५ हजार पक्ष्यांची आहे. सध्या सुमारे एक लाख २० हजार पक्ष्यांचे संगोपन होते.  

पक्षी खाद्यासाठी तरतूद  संस्थेच्या मालकीचे दोन टन प्रती तास क्षमतेचे दोन पक्षी खाद्यनिर्मिती कारखाने आहेत. सुमारे साडेतीनहजार मे. टन क्षमतेची गोदामे आहेत. मका, सोया केक, शिंपल्याचा चुरा, तांदूळ चुरी, धानाचा (भाता) भुसा व अन्य घटकांचा समावेश करुन पशुखाद्य तयार केले जाते. 

व्यवस्थापन व मार्केटिंग  एका दिवस कालावधीचे पक्षी हैदराबाद येथून या क्षेत्रातील नामवंत कंपन्यांकडून खरेदी केले जातात. सद्यस्थितीत पक्ष्यांचे दर २३ ते २४ रुपये प्रती नग आहेत. आठ आठवडे ‘ब्रुडर शेड’मध्ये पक्षी ठेवला जातो. या ठिकाणी पक्ष्यांची विशेष काळजी घेताना लसीकरण, तापमान नियंत्रीत ठेवणे अशी कामे होतात. त्यानंतर पुढील आठ आठवडे पक्षी ‘ग्रोअर शेड’मध्ये व त्यानंतर ‘लेयर शेड’मध्ये ठेवले जातात. या ठिकाणी प्रकाशाचे नियोजन योग्यरित्या करावे लागते. प्रकाश (ट्यूबलाईट) संध्याकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवावे लागतात. योग्य प्रकाश मिळाला तर अंडी उत्पादकता वाढीस लागते असा इथला अनुभव आहे. पक्षी सुमारे २० आठवड्यानंतर अंडी देण्यास सुरवात करतात. वर्षभरात सुमारे ३०० अंडी प्रति पक्षाकडून मिळणे अपेक्षित राहते. त्यानंतर पक्षी (कोंबडी) मांसलकामी विक्री केली जाते.  

शेडमधील तापमान नियंत्रण  शेडमधील तापमान पक्ष्यांसाठी पोषक राहावे यासाठी शेडच्या आतील बाजूस फॉगर्स बसविण्यात आले आहेत. शेडच्या आजूबाजूला असलेल्या जाळीच्या ठिकाणी उन्हाळ्यात पोत्यांचा वापर होतो. त्यावर  सातत्याने पाणी शिंपडले जाते. सोबतचच शेडच्या वरील बाजूस तणस टाकले जाते. त्या ठिकाणी देखील तुषार संच (स्प्रिंकलर) वापरले आहेत. ही काळजी उन्हाळ्यात तापमान नियंत्रित राहण्यासाठी घेण्यात येते. पशुखाद्य वाहतुकीसाठी ट्रॉलीचा वापर होतो. सर्व कामांसाठी प्रकल्पस्थळी सुमारे १२०  व्यक्‍तींची नेमणूक आहे. 

अंड्यांचे मार्केट  दर दिवशी ६० ते ६५ हजार अंड्यांची विक्री होते. व्यापारी जागेवरूनच अंड्यांची उचल करतात. या माध्यमातून परिसरातील गावांमध्येही रोजगार निर्मितीचा उद्देशही साधला आहे. आर्वी, आष्टी, कारंजा (घाडगे) या तीन तालुक्‍यातील गावांमध्ये असलेल्या युवकांना घाऊक दराने अंडी पुरविली जातात. पुढे हे युवक त्यांची किरकोळ विक्री करतात. सुमारे ३२० रुपये प्रति १०० नग म्हणजे तीन रुपये २० पैसे प्रती नग असा अलीकडील काळातील दर होता. अर्थात स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणारे तसेच राष्ट्रीय अंडी समन्वय समिती संस्थेच्या दरांचा आधार घेतला जातो. 

कर्जाची केली परतफेड  सुरवातीला प्रकल्पाची क्षमता ३० हजार पक्षी, त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ करून ती ६० हजार पक्ष्यांवर नेण्यात आली. त्यानंतर संस्थेने आपल्या बळावर ही क्षमता एक लाख २० हजारांवर नेली. प्रकल्प उभारणीसाठी ६० लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले. त्याची परतफेड उत्पन्नातून करण्यात आल्याचे राहूल ठाकरे सांगतात. सुरवातीला संस्थेकडे जेमतेम सात एकर जागा होती. उत्पन्न वाढत गेल्याने उत्पन्नाचा विनियोग प्रकल्प वाढीसाठी करण्यात आला. त्यानुसार हा प्रकल्प २७ एकरांवर विस्तारला आहे. पूर्वी कोंबडी विष्ठेवर प्रक्रिया करून खत तयार केले जायचे. विजेच्या समस्येमुळे हा प्रकल्प सध्या बंद अाहे. पोल्ट्री परिसरातील पाच एकरांत प्रायोगिक तत्त्वावर सघन लागवड पद्धतीने मोसंबी लागवड केली आहे.  

कृषी समृद्धी प्रकल्पातून शेती प्रसार  आर्वी, आष्टी, कारंजा या भागातील शेतकऱ्यांपर्यत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी देखील राहुल ठाकरे यांनी प्रयत्न केले. त्याकरीता केम (कृषी समृद्धी) प्रकल्पाची मदत घेण्यात आली. शेतकरी कंपनीची उभारणी त्यासाठी केली आहे. त्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांना बोलावत त्यांच्या विविध विषयावर कार्यशाळांचे आयोजन केले गेले. 

पुरस्कार व प्रसंशनीय 

  • २०१३ मध्ये सहकारभूषण
  • २०१७ मध्ये सहकारमहर्षी या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले. एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप. ‘वॉटर कप’ स्पर्धेत आर्वी तालुक्यातील एका गावाचा सहभाग होता. संस्थेने या पुरस्काराची एक लाख रुपये रक्कम व आपल्याकडील एक लाख रुपयांची भर टाकत या गावासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केली. 
  • संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना तज्ज्ञांकरवी मार्गदर्शन करण्यावरही भर देण्यात येतो. 
  • पोल्ट्रीतील उत्पन्नाची परतफेड सदस्यांना लाभांश स्वरुपात केली जाते. भेटवस्तूही दिल्या जातात.  
  • लेखापरीक्षणात १९९९ पासून संस्था ‘अ’ वर्गात 
  • संपर्क : राहुल ठाकरे - ९४२२१४०६३६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com