‘खडकपूर्णा’मुळे समृद्ध झाले सिनगाव जहाँगीर

अाखीव-रेखीव पद्धतीने वसलेले सिनगाव जहाँगीर गाव.
अाखीव-रेखीव पद्धतीने वसलेले सिनगाव जहाँगीर गाव.

काळानुसार गावेही कात टाकत अाहेत. लोकसहभागातून विविध विकासकामांना चालना मिळत आहे. बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा तालुक्यातील सिनगाव जहाँगीर या गावात गेल्यावर त्याची प्रचिती येते. विश्वास बसणार नाही अशी टुमदार घरे, गावची सुसूत्र रचना, अवतीभवती दिसणारी हिरवळ नजरेत भरते. ही श्रीमंती गावच्या सिमेपासून दिसायला लागते. खडकपूर्णा प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या या गावाला पाण्याची श्रीमंती लाभली. अनेक सुविधा प्राप्त झाल्या. गेल्या काही वर्षांत गाव वेगाने बदलत अाहे. 

बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा तालुक्यातील वरबुडी हे नदीच्या पश्चिमेस वसलेले गाव. गावचे आज पुनर्वसन झाले आहे. मात्र जुन्या गावात पारंपरिक जहाँगीरदारांच्या दोन गढ्या होत्या. त्यांची उंची जवळपास ६० ते ७० फूट उंच तर व्यास २५० फुटांपर्यंत होता. गावची जमीन नदीकिनारी असल्याने सुपीक व काळी कसदार आहे. गावच्या पश्चिमेला जालना जिल्हा व जाफराबाद तालुक्याची सीमा लागते. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या सुमारे ४०२७ पर्यंत आहे.   

'खडकपूर्णा’मुळे अाली समृद्धी सिनगाव जहाँगीर गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच अाहे. गावाच्या शेजारीच खडकपूर्णा नदीवर प्रकल्प साकारल्याने पाणी समस्या कायमची मिटली अाहे. गावशिवारात उसासारखे पीक शेता-शेतात बहरलेले दिसते. दरवर्षी गावातील उसाचे क्षेत्र वाढते अाहे. यावर्षी सुमारे सहाशे ते सातशे एकरांत ऊस पीक अाहे. केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता कापूस, सोयाबीन आदी पिकांचे चांगले उत्पादनही येथील शेतकरी घेतात. पाचशे एकरापेक्षा अधिक क्षेत्र कापूस व इतर पिकांखाली अाहे. काही शेतकरी फळशेतीसह शेडनेटमधील नियंत्रित पीकपद्धतीकडे वळत अाहेत. प्रयोगशीलता जोपासतानाच एकमेकांना सहकार्य करून नवनवीन अवजारांची देवाणघेवाणही होते. साहजिकच यांत्रिकीकरणाचा वापर होत अाहे.

शैक्षणिक सुविधा सिनगावमध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळाही अाहे. गावचा भाग १९५६ मध्ये मध्यप्रदेशात होता. त्या काळातच ही शाळा सुरू झाली. त्यावेळी मध्यप्रदेश सरकारमध्ये उपअारोग्यमंत्री असलेले शंकरराव कुळकर्णी यांच्या हस्ते शाळेचे उद्‍घाटन झाले अाहे. त्यामुळे शिक्षणाची सुविधा अनेक वर्षांपासून झाली असल्याने शेजारील गावातील विद्यार्थी या ठिकाणी येऊन शिक्षण घ्यायचे. अाजही अनेक विद्यार्थी इथे येऊन शिक्षण घेतात. यातील बरेच विद्यार्थी आज मोठे होऊन चांगल्या पदांवर कार्यरत झाले अाहेत. काहींनी शेती, व्यवसायात जम बसविला आहे. राजकीयदृष्ट्या गावातील व्यक्तींचा विविध राजकीय पक्षांत वावर अाहे. खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, पंचायत समिती अशा संस्थांमध्ये गावातील अनेकांनी पदे भूषविली आहेत. ही परंपरा आजही सुरू आहे.       

पायाभूत सुविधा गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत पाइपलाइन टाकण्यात अाली. घरोघरी नळ जोडणी झाली आहे. हे गाव खडकपूर्णा प्रकल्पबाधित झाल्याने त्याचे २०१० मध्ये पुनर्वसन करण्यात अाले. त्यानंतर व्यवस्थित व अाखीव रेखीव पद्धतीने ते सुमारे १२० एकरांवर वसविण्यात अाले अाहे. चांगले रस्ते व दिव्यांची सोय करण्यात अाली अाहे. शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा उदा. खते, कीडनाशके व अन्य साहित्य गावातच मिळते. दर शुक्रवारी अाठवडी बाजार भरतो. गावात सर्व अाधुनिक सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या. यात प्रामुख्याने ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, सर्व धर्मांची मंदिरे, बस स्थानक, स्मशानभूमी, कब्रस्थान अादींचा समावेश अाहे. विशेष म्हणजे पुनर्वसन करताना कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार भूखंड देण्यात अाला. त्यामुळे कुटुंबातील संख्येनुसार एेसपैस घरे व जागा मिळाली. अाता शहरांसारखी टुमदार व अाकर्षक घरे हे गावचे वैशिष्ट्य पाहायला मिळते. 

सामाजिक उपक्रमात अग्रेसर गावात सर्वच समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गावात प्रत्येक जाती-धर्माचे सण हे गाव एकत्र येऊन साजरा करीत असतात. चैत्र महिन्यात येणारा गुढीपाडवा हा उत्सव या गावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तशाच पद्धतीने अन्य सण, उत्सव शांततेत साजरे केले जातात. वर्षानुवर्षे गावातील तंटे गावातच सोडविले जात अाहेत. पूर्वी या कामासाठी पंचांची समिती असायची. अाजही गावातील छोटे-मोठे वाद गावात तंटामुक्त समितीच्या माध्यमातून मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. एक गाव- एक गणपती उपक्रम राबविण्यात येतो. लोकवर्गणी गोळा करून गावकऱ्यांनी हनुमानाच्या टुमदार मंदिर उभारणीचे काम हाती घेतले अाहे. याच पद्धतीने देविदास महाराज यांच्या मंदिराचाही विकास केला जात अाहे. 

संपर्कः  गजानन पवार, ९०११९२९५३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com