सेंद्रिय निविष्ठांमुळे उत्पादन खर्चात कपात

५०० ते ६०० ग्रॅम वजनाची सीताफळे दाखवताना संजय कुटे.
५०० ते ६०० ग्रॅम वजनाची सीताफळे दाखवताना संजय कुटे.

कोरडवाहू शेती, उत्पादनाची अशाश्वता, त्यातच आलेले आजारपण अशा कारणांने पिंपरी पेंढार (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील शेतकरी संजय मुरलीधर कुटे यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला. गावातील पत गेली. त्यातून सावरण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा खर्च घरगुती सेंद्रिय निविष्ठांच्या साह्याने ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत कमी केला. जमिनीच्या सुपीकतेसोबतच उत्पादनात वाढ मिळवितानाच रेसिड्यू फ्री शेतीमाल उत्पादनातून गेलेली पत आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवली.   बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर संजय कुटे यांनी पूर्णवेळ शेतीत लक्ष घातले. सहा एकर शेती. मात्र पावसावर अवलंबून असल्याने उत्पादनात शाश्वतता नव्हती. त्यातही चार रानातून काहीच उत्पादन हाती येत नसे. पेरणी केली तरी जनावरांची वैरणही धड होत नसे. १९९५ मध्ये ही जमीन विकसित करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅक्टरच्या साह्याने सुरवातीची दहा वर्षे मी केवळ नांगरट करून माती वर-खाली करत होतो. चढ-उताराची चार एकर जमीन सपाटीकरणासाठी सुमारे लाखभर रुपये खर्च झाले. परिसरात भुईमुगाचे पीक जोरदार असे. बाजूच्या शेतकऱ्यांकडून बियाणे घेत भुईमुगाचे पीक घेतले. यात सुमारे सव्वाशे पोती शेंग निघाली. सर्व शेतकऱ्यांना त्यांचा हिस्सा देऊन मला सत्तर पोती शेंग मिळाली. या काळात वाटा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांची शेते करण्यास घेई. भुईमूग आणि वाट्याच्या पैशातून विहीर खोदकाम सुरू केले. त्यातून किमान सहा महिन्यांच्या पाण्याची सोय झाली.

सहा एकर जमीन कसण्यासाठी दरवर्षी सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये खर्च होई. त्यात उत्पादनाची शाश्वती नाही. बाजारदरातही चढ- उताराने एखाद्या पिकात पैसे मिळाले, तर दुसऱ्यात जायचे, ही स्थिती. त्यातच या भागामध्ये व्यापाऱ्याकडून पैसे उचल घेऊन रासायनिक खते- कीटकनाशके आणण्याची प्रथा आहे. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ लागत नसे. उत्पादित माल त्याच व्यापाऱ्याला द्यावा लागे. व्यापारी स्वत:चे पैसे आधी कापून घेऊन, दरामध्येही कुचंबणा करत. उरलेल्या पैशात कसाबसा उदरनिर्वाह चालायचा. याच काळात घरातील आजारपण वाढले. खर्च वाढत गेला. सुमारे १५ लाखांचे कर्ज झाले. घर गहाण ठेवावे लागले. बाजारातील पत खराब झाली. अगदी गोठ्यातील गाई विकण्यापर्यंत पोचले.

सेंद्रिय पद्धतीची नवसंजीवनी आर्थिक विवंचनेतून रडतखडत शेती सुरू असतानाच कृषी विभागाच्या आत्मा उपक्रमाशी जोडले गेले. त्यातून मिळालेले प्रशिक्षण हे नव संजीवनी ठरले. प्रशिक्षणातून अधिकारी, मार्गदर्शकांनी उत्साह वाढविला. गाई विकण्याचा निर्णय रद्द केला. शेणखताचा अधिक वापरातून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. रासायनिक घटकांचा वापर कमी करून दशपर्णी, व्हर्मीवॉश वाढवला. पिकांचा दर्जा सुधारला. सेंद्रिय शेतीकडील ओढा वाढला. यातूनच उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढला आहे. शेतीमालाच्या उत्पन्नावर निम्मे कर्ज फेडता आले.

सेंद्रिय पद्धतींमुळे खर्च वाचला शेतामध्ये पिकांसाठी पूर्वी रासायनिक खतांचा वापर करत असे. त्यातून खर्च वाढत होते. अलीकडे सेंद्रिय खतांचा वापर वाढवला आहे. केवळ बेसल डोस रासायनिक खतांचा दिला जातो. पुढे केवळ स्लरी, जिवामृत गांडूळ खत यांचा वापर करतो. यातून रासायनिक खतांचा वापर ७५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर अजिबात करत नाही. कीडनियंत्रणासाठी निमतेल, करंज तेल, दशपर्णी अर्क यांचा वापर करतो. यातून रेसिड्यू फ्री (कीडनाशक अवशेषमुक्त) शेतीमाल निर्मितीकडे वळलो. आता सहा एकर क्षेत्रासाठीचा दोन लाखांपासून खर्च ५० हजारांपर्यंत कमी करण्यात यश आले.

पुरस्कार आणि बहुमान यंदाच्या वर्षी जिल्हा पातळीवरील ‘उत्कृष्ट शेतकरी’ पुरस्कार, राज्य स्तरावरील ‘कृषिरत्न’ पुरस्कार मिळाला. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडूनही चांगले सहकार्य मिळाले. तेथील प्रदर्शनामध्ये स्टाॅल लावत सेंद्रिय शेतीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पाेचविण्याचे काम करतो. आतापर्यंत जिल्ह्यातील बहुतांश वरिष्ठ कृषी अधिकारी येऊन गेले. दरमहा राज्य परराज्यांतील १०० शेतकरी शेती पाहायला येतात. अगदी परदेशातील फिलिपिन्स, इस्राईल या देशांतील शेतकरी भेटीला येऊन गेले. पत गेलेल्या माणसाला या शेतीनेच पुन्हा ‘बहुमान’ दिला. आत्मविश्‍वास वाढवला आहे. असे आहे पिकांचे नियोजन दरवर्षी सहा एकर क्षेत्राचे चार भाग करतो.

  • जनावरांसाठी २ एकर क्षेत्र ः कुटे यांच्या १० जनावरे आहेत. त्यात सात जर्शी आणि गावरान गाई, दोन शेळ्या आहेत. त्यांच्यासाठी हत्तीगवत, बेंदरी, मका पिके घेतली जातात.
  • फळबाग सीताफळ एक एकर क्षेत्र - विहिरीचे पाणी ८-९ महिने पुरत असले, तरी उन्हाळ्यात अडचण येते. यासाठी काटक म्हणून सीताफळाची निवड केली आहे. सेंद्रिय खते, स्लरी, जिवामृत यांच्या वापरामुळे पीक ताण सहन करू शकते. उन्हाळ्यात गावातील उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळते. वर्षभरात त्यातून एक ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळते.
  • घरच्या धान्याचे नियोजन एक एकर क्षेत्र - घरगुती खाण्यासाठी बाजारी, गहू अशी धान्ये, हरभऱ्यासारखी कडधान्ये केली जातात. गेल्या वर्षी प्रत्येकी एक एकर क्षेत्रात बाजरी आणि हरभऱ्याचे उत्पन्न घेतले. त्यांना आठ क्विंटल बाजरी, सात क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन मिळाले. बाजरीतून १६ हजार रुपये उत्पन्न मिळाले. हरभऱ्याच्या नव्या ‘फुले विक्रम’ या जातीची लागवड कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली केली होती. बाजरी आणि हरभऱ्यासाठी प्रतिएकरी साडेतीन हजार रुपये खर्च आला.
  • नगदी पिके - भाजीपाला दोन एकर क्षेत्र - उपलब्ध पाण्याच्या नियोजनानुसार भाजीपाल्यामध्ये प्राधान्याने टोमॅटो, चवळी व झेंडू उत्पादन घेतात.
  • दुधाच्या उत्पन्नातून भागतो घरखर्च गोठ्यातील दहा गाईपैकी चार गाई दुभत्या आहेत. चाऱ्यासह पशूआहार दिले जाते. वर्षभरात दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ४० ते ५० टक्के खर्च हा खाद्य आणि जनावरांच्या लसीकरण, आजारपणावर येतो. त्यातून उरलेल्या उत्पन्नावर घर खर्च भागतो. त्यामुळे इतर पिकांमधून मिळणारे उत्पन्नातून शेतीसाठी काही रक्कम बाजूला ठेवली जाते. सध्या उर्वरित रक्कम ही कर्ज फेडीसाठी वापरतो.   सीताफळ बागेतून सव्वा लाखाचे उत्पादन बागेत हिरवळीच्या खतासाठी ताग पेरून गाडला जातो. सेंद्रिय खते, सेंद्रिय कीडनाशकांचा वापर करतो. आजही अन्य शेतकऱ्यांच्या शेतात मिलीबगचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असताना कुटे यांच्या शेतात केवळ पाच टक्क्यांपर्यंत मिलीबग आहे. त्यांना रोखण्यासाठी चिकट टेप, सेंद्रिय पेस्ट (हिंग, कापूर, गेरू, करंज तेल किंवा निम तेल यांपासून बनवलेली) यांचा वापर करत असल्याचे कुटे यांनी सांगितले. प्रति झाड किमान चार क्रेट (८० किलो) उत्पादन मिळालेच पाहिजे, हे ध्येय ठेवले आहे. सीताफळापासून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सीताफळाच्या छाटणीसाठी चार हजार रुपये, अांतरमशागतीसाठी १२ ते १५ हजार रुपये, सेंद्रिय खतासाठी वर्षभर २५ हजार रुपये येतो. तीन महिने तोडणी आणि पॅकेजिंगसाठी १५ ते २० हजार रुपये असा सुमारे ७० हजार रुपये खर्च वजा केला, तरी सीताफळातून सव्वा लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.   उत्पादनात समाधानी तरी फायदा नाही एक एकर क्षेत्रात टोमॅटो पीक घेतले होते. रोपासाठी १४ हजार रुपये, मल्चिंग पेपर साडेचार हजार रुपये, मजुरी मिळून सुमारे ३० ते ३५ हजार रुपये खर्च आला. सुमारे ८०० क्रेट (१६ टन) टाेमॅटो उत्पादन मिळाले असले, तरी बाजारभाव मिळाला नाही. (२० ते ३० रु. प्रति क्रेट). परिणामी केलेला खर्च कसाबसा वसूल झाला असला तरी फायदा हाती आला नाही. काळा कांदा, बकेट व्हाइटसारख्या नवीन पिकांचे प्रयोग करून पाहत आहेत. सध्या तरी सेंद्रिय काळ्या कांद्याला चांगली मागणी आहे.

    संपर्क ः संजय कुटे, ९९७५८३६९७०, ९९२१८०३३२८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com