कपाशीसाठी नाव कमावलेली अकोटची बाजारपेठ

शेतकऱ्यांचे हीत जोपासतो कापूस खरेदी-विक्रीतून बाजार समितीला सेस मिळतो. विश्‍वसनीय बाजारपेठ म्हणून ओळख झाल्याने विदर्भ- मराठवाड्यातून या ठिकाणी आवक होते. शेतकऱ्यांचे हीत जोपासत व्यापाऱ्यांनाही बाजार समिती सहकार्य करते. यामुळे खरेदी विक्री चांगल्या पद्धतीने होऊन कापसाला अधिकाधिक दर मिळतात. - राजकुमार माळवे - ८८८८४५१८०८ सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट
 अकोट बाजार समिती यार्डात विक्रीसाठी उभी असलेली वाहने
अकोट बाजार समिती यार्डात विक्रीसाठी उभी असलेली वाहने

अलीकडील काही वर्षांत अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीने कापूस खरेदी-विक्रीत अग्रस्थान मिळवले आहे. साहजिकच या भागात जिनिंग व्यवसाय वाढण्यासही मदत झाली आहे. विदर्भासह मराठवाड्यातूनही या भागात कपाशीची आवक होते आहे. कापसाला चांगला दर देणारी बाजारपेठ म्हणून या बाजारपेठेचे नाव झाले आहे.    वऱ्हाड आणि सोन्याची कऱ्हाड अशी एक म्हण प्रचलीत आहे. ‘सोन्याची कऱ्हाड’ हा शब्दप्रयोग कापसाबाबत केला जातो. कापूस उत्पादनात हा भाग सुरवातीपासूनच अग्रेसर आहे. यामुळेच वऱ्हाडात अकोला, मलकापूर, अकोट, खामगाव, देऊळगावराजा आदी भाग कापसाच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध झाले. मागील काही वर्षांत कपाशीचे क्षेत्र घटून सोयाबीन वाढले. त्यामुळे साहजिकच बाजारपेठांमधील उलाढालीची दिशा बदलली. मात्र सध्याही मलकापूर, खामगाव, अकोट या बाजारपेठांमध्ये कापसाची खरेदी-विक्री अधिक होते. मागील काही वर्षांत अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीने या खरेदी-विक्रीत अग्रस्थान मिळवले आहे. यामुळे जिनिंग व्यवसाय वाढण्यासही येथे मदत झाली. कापसाला चांगला भाव देणारी बाजारपेठ अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देखरेखीखाली येथील कापूस बाजार चालतो. बाजार समितीच्या आवारातच वाहने उभी राहतात आणि तेथे व्यापारी खरेदी करतात. गेल्या काही वर्षांत ही बाजारपेठ कापसाला चांगला भाव मिळवून देणारी म्हणून अोळखली जात आहे. खुल्या लिलावाची पद्धत खुल्या बाजारपेठेचे वेगळेपण म्हणजे खुली लिलाव पद्धती. शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाची पाहणी करून खरेदीदार बोली लावतात. सुमारे आठ ते दहा जण या बोली प्रक्रियेत सहभागी होतात. कापसाची आंतरराष्ट्रीय बाजारातील घोडदौड, सरकी, ढेपीचे दर या सर्व बाबी लक्षात घेत व्यापारी कापसाचे दर ठरवितात. यंदाच्या हंगामात अकोट बाजारात कापसाला उच्चांकी ५६६५ रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला. दररोजची आवक नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत अकोटचा बाजार चालतो. साधारणतः फेब्रुवारीपर्यंत आवक जोरात असते. सरासरी दररोज साडेचार ते पाच हजार क्विंटल कापूस याठिकाणी विक्रीला येत असतो. या बाजारात केवळ अकोला जिल्ह्यातीलच नव्हे, तर विदर्भातील अन्य जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही भागांतूनही कापूस येतो. म्हणजे सुमारे २५० ते ३०० किलोमीटर परिघातील कापूस अकोट येथे येऊ लागला आहे. दररोज मोजमाप व रोख चुकारे हंगाम सुरू झाला की बाजारपेठ वाहनांनी फुलून जाते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापसाच्या गाड्यांची मोठी रांगच पाहायला मिळते. जो व्यापारी सर्वाधिक दर देईल त्याचा त्यादिवशी कापूस होतो. कापूस कोणी घेतला हे एकदा निश्‍चित झाले की बाजार समितीचा कर्मचारी व्यापाऱ्याच्या नावाची चिठ्ठी फाडतो. येथून कापसाचे वाहन व्यापाऱ्याच्या जिनिंगमध्ये जाते. तेथे बाजार समितीचा कर्मचारी उपस्थित असतो. त्याच्या समोरच कापसाचे मोजमाप रोजच्या रोज होते. त्यानंतर शेतकऱ्याला त्वरित पावती दिली जाते. इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्यावर प्रत्येक बोंडाचे वजन होते. शेतकऱ्याचा कापूस वाहनातून खाली झाल्याबरोबर व्यापाऱ्यांकडून धनादेश दिला जातो. मार्केट-प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन कापसाच्या बाजारपेठेबरोबर येथे जिनिंग व्यवसाय, सरकीचे तेल तसेच ढेप बनविणारी यंत्रणा उभी राहिली आहे. खरेदी केलेल्या कापसावर प्रक्रिया करून रुई बनविली जाते. रुईच्या गाठी येथून देशभरात जातात. शिवाय मुंबईतील काही निर्यातदारांकडूवन त्या परदेशातही पाठवल्या जातात. अकोट येथे चांगल्या दर्जाचा कापूस येत असल्याने रुईचा दर्जाही चांगला राहतो. परिणामी त्याला मागणीही चांगली आहे. सध्या अकोटमध्ये पंधराहून अधिक जिनिंग मील्स उभ्या राहिल्या आहेत. याद्वारे रोजगार निर्मितीलाही चालना मिळाली आहे. अकोट बाजारपेठेविषयी ठळक बाबी अकोट बाजार समिती इंग्रज काळात स्थापन झाली. त्यानंतर १९६५ मध्ये बाजार समितीचे नामकरण झाले. सुमारे ३४ एकर जागेवर मुख्य बाजार तर चोहोट्टा बाजार येथे उपबाजार आहे. या ठिकाणी शेतमालाची विक्री खुल्या लिलाव पद्धतीने केली जाते. शेतमालाचे वजन इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर होते. त्यासाठी यार्डात ५० व १० टन तसेच तीन क्विंटल क्षमता असलेले इलेक्‍ट्रॉनिक काटे आहेत. दरांची माहिती देण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक फलक लावण्यात आले आहेत.

कापूस आवक- दृष्टिक्षेपात- लाख क्विंटलमध्ये                     

वर्ष         आवक
२००२-०३- २.४९
२००६-०७  २.०३
२०१०-११  २.७७
२०१३-१४ ४.२०
२०१५-१६  ६.४१
२०१६-१७ १.८२
अकोट बाजारातील कापसाचे दर (सरासरी प्रति क्विंटल)
  वर्ष          सरासरी दर
 २०१४-१५   ४२४०
 २०१५-१६   ४४७९
 २०१६-१७     ५२६५

बाजार समितीतील सुविधा

  • शेतकऱ्यांच्या सोयीसाठी धान्य बाजाराच्या आवारात ‘प्रोजेक्‍शन टीव्ही’
  • लिलाव शेड
  • ऑक्‍शन हॉल
  • डांबरी रस्ते
  • पिण्याच्या पाण्यासाठी ‘आरओ’ यंत्रणा
  • शेतमाल तारण योजनेची अंमलबजावणी
  • शेतकऱ्यांना जेवणासाठी शिदोरीगृह
  • शेतकऱ्यांना निवास तसेच अन्य कामांसाठी सभागृह
  • शेतमालाची विक्री न झाल्यास शेतकऱ्यांचा माल सुरक्षित ठेवण्यासाठी विनामूल्य गोदाम व्यवस्था
  • व्यापाऱ्यांना व्यापार सुरळीत करण्याच्या दृष्टीने मुख्य यार्डवर ४० दुकानांचे संकुल
  • शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यांसाठी अत्यल्प दरात कास्तकार भवन सुविधा
  • बाजारात दर कमी झाल्यास शेतमाल अन्य बाजारपेठेत पाठविण्याची व्यवस्था
  • बाजार समिती क्षेत्रातील शेतकरी व मजुरांना दुर्धर आजारांसाठी आर्थिक मदत
  • प्रतिक्रिया अकोट बाजारात कापूस पिकाला दर्जानुसार व अत्युच्चही दर मिळतो. अन्य ठिकाणापेक्षा तो निश्‍चितच अधिक राहतो. - राहुल पोटे, शेतकरी, अकोट गेल्या सहा-सात वर्षांपासून कापूस व्यापारी म्हणून येथे कार्यरत आहे. या ठिकाणच्या कापसात आर्द्रता आढळत नाही. लांब धाग्याचा कापूस मिळतो. त्यामुळे साहजिकच अन्य ठिकाणांपेक्षा क्विंटलला १०० ते १५० रुपये दर जास्त मिळतो. शिवाय २४ तासांत चुकारे होतात. शेतकऱ्यांना चेकद्वारे तर गरजूंना ‘आरटीजीएस’ द्वारे पेमेंट केले जाते. या ठिकाणी सुमारे १५ व्यापारी कापूस खरेदी-विक्री करतात. - किशोर लखोटीया, व्यापारी येथील खुली लिलाव पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या कापसाला अधिकाधिक दर मिळण्यास मदत होते. कापसाच्या गाड्या यार्डात लागल्यानंतर सर्व व्यापारी एकत्र येतात व बोली लावली जाते. कापसाचा दर्जा पाहून दर ठरतात. येथील बाजाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कुठलीही कटती पद्धत नाही. शेतकऱ्याचा कापूस जेवढा असेल तेवढाच नोंदून त्याचा चुकारा केला जातो. एक किलोही कापूस वजनात कमी धरला जात नाही. - मनीष अग्रवाल, व्यापारी  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com