फायदेशीर व शाश्‍वत शेतीसाठी गावपातळीवर एकत्र या !

 ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत ‘शेतकरी उत्पादक कंपन्या : ग्रामविकासाच्या शिलेदार’ या मुलाखत कार्यक्रमात बोलताना विलास शिंदे, शेजारी अंकुश पडवळे, योगेश थोरात
ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत ‘शेतकरी उत्पादक कंपन्या : ग्रामविकासाच्या शिलेदार’ या मुलाखत कार्यक्रमात बोलताना विलास शिंदे, शेजारी अंकुश पडवळे, योगेश थोरात

 आळंदी, जि. पुणे -केवळ गावठाणाचा विकास म्हणजे गावाचा विकास हा गैरसमज डोक्‍यातून काढून टाका. ग्रामपंचायत व सोसायटी या संस्थांना फक्त निवडणुका आणि कर्जवाटपापुरते मर्यादित ठेवू नका. गावांचे अर्थशास्त्र हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. ही शेती फायदेशीर आणि शाश्‍वत करणे हेच ध्येय ठेवा. त्यासाठी एकत्र या. गावपातळीवर शेतकरी उत्पादक कंपन्या उभारा. असा सूर ‘शेतकरी उत्पादक कंपन्या : ग्रामविकासाच्या नव्या शिलेदार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात उमटला. राज्यभरातील सरपंच आणि प्रमुख मार्गदर्शक वक्‍त्यांमधील सवाल जवाब यामुुळे मुलाखतीत रंगत भरली. नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, कृषिक्रांती फार्मर्स क्‍लबचे अध्यक्ष अंकुश पडवळे, ‘महाएफपीसी’चे कार्यकारी संचालक योगेश थोरात हे प्रमुख मार्गदर्शक होते. ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, सरव्यवस्थापक राजेभोसले यांनी विचारलेल्या प्रश्‍नांमधून शेतकरी उत्पादक कंपनी क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेल्या शिंदे, पडवळे, थोरात यांच्या कार्याचा प्रवास उलगडला. शेतातच मार्केट शोधले अंकुश पडवळे म्हणाले, की सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा परिसर हा अवघे साडेचारशे मिलिमीटर पर्जन्यमान असलेला दुष्काळी पट्टा आहे. मागील वर्षी तर अवघा २५० मिलिमीटर पाऊस झाला. शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही हे लहानपणापासून पाहत आलोय. पदवी घेतल्यानंतर शेतीतच काम करण्याचा निर्णय घेतला. आपण काही तरी वेगळं ‘मॉडेल’ उभं केलं पाहिजे हे मनात होतं. त्यातून परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेडनेटची चळवळ सुरू केली. सुरवातीला २० शेतकरी एकत्र आले. आता त्यांची संख्या दोनशेपर्यंत झाली आहेत. कृषिक्रांती फार्मर्स क्‍लब आकाराला आला आहे. ढोबळी, काकडी या शेडनेटमधील मालाला जागेवरच मार्केट मिळविले. त्यानंतर निर्यातक्षम डाळिंब उत्पादन सुरू केले. आता सगळे मिळून सेंद्रिय शेती या विषयावर काम करतो आहे. चुकीच्या पद्धतीमुळे जमीन अडचणीत सापडली आहे. ती वाचवणं गरजेचं आहे. राज्यातील सेंद्रिय शेतीमालाचा एकच ब्रँड तयार करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ताकदीने एकत्र या; बदल निश्‍चित घडेल विलास शिंदे म्हणाले, की जागतिकीकरणाने शेतीचे प्रश्‍न जटील केले आहेत. देशाचा विकासदर साडेसात टक्के होत असताना गावाचा विकासदर एक टक्काही नाही, हे दुर्दैवी वास्तव आहे. गावात कुणीच थांबायला तयार नाही. बदल तर व्हायला पाहिजे. पण हे बदलायचं कुणी? आम्ही सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून गाव व शहरातील दरी दूर करण्याचे काम करायचे ठरविले. नाशिक, दिंडोरी तालुक्‍यांतील आम्ही शेतकऱ्यांनी मिळून २०११ मध्ये शेतकऱ्यांची कंपनी स्थापन केली. आठ वर्षांमध्ये देशातील पहिल्या क्रमांकाचे द्राक्ष निर्यातदार आम्ही त्यातून बनलो आहोत. अमूल कंपनीने गुजरातमध्ये २७ हजार कोटींची यंत्रणा लोकसहभागातून उभी केली आहे. त्या धर्तीवर आम्हाला फळे व भाजीपाला क्षेत्रात यंत्रणा उभी करायची आहे. भारतातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत १४ टक्के वाटा एकट्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचा आहे. आतापर्यंत या शेतकरी कंपनीची वार्षिक उलाढाल २५० कोटींपर्यंत पोचली आहे. एकूण सात हजार शेतकऱ्यांची यंत्रणा तयार झाली आहे. भारतातील सर्वांत मोठा ग्लोबलगॅप प्रमाणपत्र असलेला शेतकऱ्यांचा गट म्हणूनही ‘सह्याद्री’कडे पाहिले जाते. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय आम्ही उभे राहिलो आहे. ताकदीने एकत्र आलो तर बदल घडू शकतो हेच यातून दिसत आहे. एकत्र येण्यात संधी अमाप योगेश थोरात म्हणाले, की भांडवलापासून ते विक्रीपर्यंतच्या सर्व प्रश्‍नांवर मात करण्याचे सामर्थ्य एकत्र येण्यात आहे. आपापल्या भागातील पीक पद्धतीचा अभ्यास करून शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या करणे हा महत्त्वाचा पर्याय आहे. देशभरात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून होणाऱ्या चळवळीने आता वेग घेतला आहे. आम्ही महा एफपीसीच्या माध्यमातून या चळवळीला गती देण्याचे काम करतो आहोत. तसेच गावपातळीवरही काम करतो आहोत. सन २०१४ मध्ये महाएफपीसी कंपनी आकाराला आली. आतापर्यंत १९ जिल्ह्यांत १४९ संस्थांना सोबत घेऊन काम सुरू केले आहे. मागील वर्षी शासकीय तूर खरेदी केंद्रे सुरू करून आमच्या कंपनीने ३३ हजार टनांची १७० कोटींची तूर खरेदी केली. सरपंच आणि वक्‍त्यांमध्ये रंगला सवाल- जवाब प्रश्‍न : नुकतीच विदर्भ, मराठवाड्यात गारपीट झाली. नैसर्गिक आपत्तीला कसे सामोरे जावे? उत्तर : निसर्गापुढे मर्यादा आहेत. मात्र भक्कम विमा संरक्षण हा एक चांगला पर्याय आहे. या शिवाय नुकसान झालेल्या मालाचा वापर प्रक्रियेसाठी होऊ शकतो. प्रक्रिया उद्योगाची व्यवस्था उभी करता येईल. प्रश्‍न : आमच्या सांगली जिल्ह्यातील मिरज भागात बेदाणा जास्त होतो. त्यासाठी गाव पातळीवर मार्केटिंग कसे करता येईल? उत्तर : गाव पातळीवर मार्केटिंग करण्यापेक्षा जागतिक पातळीवर मार्केटिंग कसे होईल हे पाहा. पिकते तिथे विकण्यापेक्षा जिथे विकते तिथे माल कसा पोचेल याकडे लक्ष द्या. प्रश्‍न : आमच्या भागात जास्त पाण्याचे जमिनी खारवट झाल्या आहेत. इथे आम्ही कापूस हे पीक घेतो. त्याची उत्पादकता आणि मार्केटिंगसाठी काय करावे? उत्तर : खारवट जमिनीत कापसाचे पीक घेणे हे खरंच परवडणारे आहे का याचा विचार करावा. कापसापेक्षा बांबू पिकाचे अर्थशास्त्र हे तुलनेने चांगले आहे. पीक पद्धती बदलण्याचा विचार जास्त योग्य राहील.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com