नेटके व्यवस्थापन करून १२० जनावरांचे संगोपन

शेतीतील उत्पन्नातूनच व्यवसायाची वाढ सुरवातीला पाच म्हशींपासून दुग्धव्यवसाय सुरू झाला. टप्प्याटप्प्याने तो ११० म्हशींच्या संख्येपर्यंत पोचला आहे. यात सुमारे २५ म्हशींची पैदास ही गोठ्यातच केलेली आहे. शेती व दुग्धव्यवसायातील भांडवलाचा वापर करूनच म्हशी विकत घेणे शक्य झाल्याचे अमरसिंह म्हणाले. प्रामुख्याने मुऱ्हा जाती आहेत.
अमरसिंह सूर्यवंशी यांचा म्हशींचा गोठा
अमरसिंह सूर्यवंशी यांचा म्हशींचा गोठा

आजच्या काळात शेतीत संकटे आणि खर्च अधिक. त्या तुलनेत नफा अगदी नगण्य अशी स्थिती असताना अगदी १० जनावरे सांभाळणेदेखील कठीण गोष्ट असते. अशा वेळी सांगली जिल्ह्यातील आष्टा (ता. वाळवा) येथील अमरसिंह राजाराम सूर्यवंशी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून १२० म्हशींचे संगोपन चिकाटीने करीत आहेत. दररोज सुमारे ३०० लिटरपर्यंत दूध संकलन व विक्रीबरोबरच शेणखताच्या विक्रीतूनही त्यांनी आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत. सांगली जिल्ह्यात पेठ-सांगली रस्त्यावर आष्टा हे गाव लागते. मोठे महसुली क्षेत्र असणाऱ्या या गावाचा सव्वालाखी आष्टा असाही उल्लेख केला जातो. ऊस, भाजीपाला यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात अमरसिंह सूर्यवंशी यांची सुमारे १९ एकर शेती आहे. त्यांचे वडील मुंबई पोलिस दलात नोकरीस होते. सेवानिवृत्तीनंतर ते आष्टा येथे आले व शेती कसू लागले. साधारण १९८४ मध्ये त्यांनी दुग्धव्यवसायास सुरवात केली. आज हाच व्यवसाय अमरसिंह नेटाने चालवतात. बी.ए.एल.एल.बी पर्यंत शिक्षण घेतलेले अमरसिंह सांगली येथे राहतात. त्यांचा ‘आॅप्टिकल’ साहित्याचा व्यवसाय आहे. आष्टा येथे दररोज ये-जा करून ते शेती व गोठा व्यवस्थापनही पाहतात.

असे आहे गोठा व्यवस्थापन गोठ्यात पैदास करण्यावर अधिक भर दिल्याने जनावरांच्या गुणदोषांची माहिती आपसूक होते. जनावरांचा वंश शुद्ध ठेवणे शक्य होते अशी अमरसिंह यांची धारणा आहे.  म्हशींची संख्या जास्त असल्याने चाऱ्याची उपलब्धता तेवढी होणे गरजेचे होते. त्या दृष्टीने चारानिर्मितीवर भर दिला. आज सुमारे सात एकर क्षेत्र त्यासाठी राखीव ठेवले आहे. बेबीकॉर्नचे उत्पादन घेतले जाते. हे पीक सुमारे ५० ते ५५ दिवसांत निघते. नंतर ताटांचा चाऱ्यासाठी चांगला वापर होतो. दोन एकर क्षेत्रात हे पीक आलटून-पालटून घेतले जाते. बेबीकॉर्नचे एकरी पाच टनांपर्यंत उत्पादन मिळते. सुमारे सहा हजार रुपये प्रति टनाने त्याची विक्री होते. पुढे महिना-दोन महिने हिरवीगार वैरण मिळते. वैरणीचा व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करता कणसांपासूनच्या उत्पादनाएवढे चाऱ्याचे पैसे होतात असा अनुभव आल्याचे अमरसिंह म्हणाले. काही वेळा चारा विकतही घ्यावा लागतो.

खाद्य गोठा व्यवस्थापनासाठी चार मजूर ठेवले आहेत. सकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत धारा काढण्याचे काम केले जाते. त्यानंतर ओला चारा व कडबाकुट्टी असे मिसळून प्रत्येक जनावराला अंदाजे पाच किलो याप्रमाणे खाद्य दिले जातो. सरकी पेंड (भिजवून), गोळी पेंड व पूरक खाद्य प्रत्येक जनावरास तीन ते पाच किलो या प्रमाणात दिले जाते.

गव्हाण व अंतर्गत रचना गव्हाण उभट आहे. गोठा शेपटी ते शेपटी (टेल टू टेल) या पद्धतीचा अाहे. जनावरांच्या जागेमागे तीन फूट लांबीचा व सहा इंच खोलीचा पट्टा आहे. यामध्ये सर्व शेण ओढले जाते. त्यात गोठा स्वच्छ केलेले पाणी सोडले जाते. सातारा येथून हायड्राॅलिक मशीन आणले आहे. ते ‘इलेक्ट्रिक’ पद्धतीने चालते. त्याद्वारे शेण गोठ्याबाहेर एका पाटात दाबले जाते. तेथून ते पाटाने बाहेर काढले जाते. त्यामुळे मनुष्यबळाकरवी शेण काढण्याचे श्रम कमी झाले आहेत. दररोज जनावरांना धुतले जाते. वेळोवेळी गोठा निर्जंतुक केला जातो. आष्टा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची वेळोवेळी तपासणी केली जाते. घटसर्प, लाळ्या खुरकत यासाठी लसीकरण केले जाते. जंतुनाशके दिली जातात. प्रत्येक जनावराच्या क्रमांकाचे टॅग तयार करून नोंदवहीत ‘अपडेट’ नोंदवले जातात. दुधाचे संकलन अनेक वर्षापूर्वी उभारलेला गोठा आज चांगली निगराणी व व्यवस्थापन यामुळे टिकून आहे. गरजेनुसार सूर्यवंशी यांनी त्यात बदलही केले. गोठ्यातील म्हशींची दूध देण्याची दररोजची सरासरी क्षमता १० लिटरची आहे. काही म्हशी १८ लिटरपर्यंतही दूध देतात. दररोज एकूण ३०० ते ३२५ लिटर दूध संकलन होते. वार्षिक सरासरी तेवढी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

दुधाची विक्री पूर्वी सूर्यवंशी यांनी अनेक दूध संस्थांना दूध पुरवले. परंतु म्हणावा तसा नफा होत नव्हता. पुढे त्यांनी दोन खासगी विक्रेत्यांना प्रति लिटर ४५ रुपयांप्रमाणे विक्री सुरू केली. आज जागेवर येऊन ते दूध घेऊन जातात. पुढे हे विक्रेते त्याचे रतीब घालतात. सूर्यवंशी यांचे दूध अशा रितीने ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. अतिरिक्त उत्पन्न गोठा व्यवस्थापन, चारा, खाद्य आदी सर्व धरून एकूण २० टक्क्यापर्यंत नफा मिळतो. शिवाय वर्षाला तीनशे ट्रॉलीपर्यंत शेणखत मिळते. त्यातील सुमारे शंभर ट्रॉली खत प्रति चारहजार रूपये याप्रमाणे विकले जाते. त्यातून चांगला नफा मिळतो.

शेणखताचा शेतीला फायदा वर्षाला सुमारे २०० ट्रॉली शेणखत आलटून-पालटून वेगवेगळ्या क्षेत्रात पडते. त्याचा पीक उत्पादनावर चांगला परिणाम झाला आहे. जमीन सुपीक बनली आहे. हळद व केळी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. हळदीचे एकरी 30 ते 35 क्विंटलपर्यंत तर केळीचे एकरी ३५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. जमीन सुपीक बनली हा मोठा फायदा झाला. सूर्यवंशी यांच्या ८३ वर्षे वयाच्या आई श्रीमती कुसुमताई शेतातील घरात राहतात. अमरसिंह यांच्या अनुपस्थितीत शेतीची व अन्य कामे कुसुमताई यांच्या मार्गदर्शनाखाली होतात. संपर्क- अमरसिंह सूर्यवंशी -९८२२९७७७७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com