मजूर झाला प्रगतशील शेतकरी

पाच एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन शेतीचा विस्तार साधला आहे.
पाच एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन शेतीचा विस्तार साधला आहे.

सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी (ता. वाळवा) येथील अमोल दिलीप धेंडे हा एकेकाळी शेतमजुरी करणारा तरुण जिद्द व कष्टाच्या जोरावर भाजीपाला उत्पादक शेतकरी बनला आहे. आपल्या कुटुंबालाही त्याने या रोजंदारीच्या चक्रातून बाहेर काढले आहे. परिस्थितीत सुधारणा करीत आज त्यानेच सुमारे सात मजुरांना आपल्या शेतीत रोजगार मिळवून दिला आहे. सांगली जिल्ह्यात पेठ-सांगली रस्त्यावर इस्लामपूर शहरापासून पुढे १२ किलोमीटरवर गोटखिंडी फाटा लागतो. ग्रामस्वच्छता अभियानामध्ये उठावदार काम केल्याने हे गाव चर्चेत आले होते. गावचा तसा बागायती उसाचा पट्टा. या गावात अमोल धेंडे हे भाऊ अमित, आई, वडील व चुलते यांच्यासह एकत्र राहतात. वडिलांच्या वाटणीची जमीन १८ ते २० गुंठे. तीही कोरडवाहू. पूर्वी आई- वडील मजुरी करायचे. त्यातून घरचा संसार चालायचा. अमोल आणि अमित या दोघा बंधूनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, पुढे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावे लागले. आई-वडिलांना ते शेतमजुरीत मदत करू लागले. शेतात लावण करणे, भांगलण, काढणी मळणी अशी सारी कामे धेंडे कुटुंब करायचे. परंतु, मिळकतीतून फार काही शिल्लक राहायचे नाही. मिळणारी मजुरी रोजच्या तेला-मिठासाठीच खर्च होत होती. वेगळे काही तरी करण्याचा विचार अमोलच्या मनात येत होता. परंतु मार्ग सापडत नव्हता. मार्ग सापडला अमोल आपल्या कुटुंबासह राबतो हे गावातील मित्रांना माहीत होते. गावातील एक शेतकऱ्याची १५ गुंठे जमीन मुदत खरेदीसाठी निघाली होती. अमोलच्या कुटुंबाने रोजगारातून काही रक्कम गाठीला ठेवली होती. मित्रांनी काही रक्कम दिली आणि ते १५ गुंठे क्षेत्र मुदत खरेदी केले. त्या ठिकाणी पाण्याची सोय होती. पहिल्याच वर्षी हळदीचे पीक घेतले. संपूर्ण कुटुंबाने राबून ते चांगले आणले. पहिल्याच वर्षी सव्वा लाखापर्यंत उत्पन्न मिळाले. याच प्रयोगानंतर धेंडे कुटुंबाचा इतरांच्या शेतातला रोजगार संपला. शेतीत आणखी काही करण्याची उमेद वाढली. भाजीपाला पिकांची शेती

  • गोटखिंडी परिसरात शेतजमीन निचऱ्याची आहे. अनेकजण उसाबरोबर भाजीपाला पिके करतात.
  • अमोल त्यांच्या संपर्कात आले. त्यांनी वार्षिक भाडेपट्टा तत्त्वावर भाजीपाला करण्यास सुरवात केली.
  • गेल्या ८ ते १० वर्षांपासून या शेतीत सातत्य जोपासले आहे, यामध्ये ढोबळी मिरची, कारले, फ्लॉवर व कोबी ही मुख्य पिके आहेत. अमोल यांची शेती केवळ २० गुंठे, पण आज पाच एकर जमीन त्याने वार्षिक ३५ ते ४० हजार रुपयांच्या भाडेपट्टीवर कसायला घेत शेतीत विस्तार साधला आहे.
  • भाजीपाला शेतीतील काही बाबी वर्षभरातील अधिकाधिक महिन्यांत कोणते ना कोणते पीक शेतात उभे राहते. त्यामुळे वर्षभर उत्पन्न मिळण्याची सोय तयार झाली आहे. मेच्या दरम्यान कारली बियांची टोकण होते. सुमारे दोन महिन्यांनंतर उत्पादनास सुरवात होते. उभा आडवा तारकाठीचा मांडव घालून त्यावर वेल वाढवले जातात. सरासरी २५ ते ३० रुपये प्रति किलो दर मिळतो. एकरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळते. प्रामुख्याने सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर या मार्केटमध्ये चालणारी ढोबळी मिरची दरवर्षी २५ मेच्या दरम्यान लावण्यात येते. पाच फुटांच्या बेडवर दोन्ही बाजूस झिगझॅग पद्धतीने प्रत्येकी सव्वा फुटावर एक रोप अशी पद्धत असते. नोव्हेंबरअखेर पर्यंत हा प्लॉट चालतो. साधारणपणे एकरी २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. सरासरी २५ ते ३० रुपये प्रति किलो दर मिळतो. दोन हंगामांत कोबी वा फ्लॉवरचे पीक घेतले जाते. पंधरा एप्रिल व त्यानंतर ऑगस्टमध्ये असा हा कालखंड असतो. याचे कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असल्याने भाजीपाला कमी असतो. तर ऑगस्टमध्ये खरीप पिकांचा हंगाम असल्याने शेत रिकामे नसते. त्यामुळे भाजीपाला कमी असतो. याचा चांगला फायदा अमोल घेतात. सात ते दहा रुपये प्रति किलो दर मिळतो. एकरी दोन ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.

    विक्रीव्यवस्था  गोटखिंडी गावातून भाजीपाला घेऊन वाहनधारक इस्लामपूर, कोल्हापूर या मार्केटला जातात. साधारणपणे ४० ते ५० किलो वजनाच्या नगाला ३० रुपये प्रमाणे त्याचे भाडे असते, संबधित व्यापाऱ्यांकडे वाहनधारक माल घेऊन जातो. वजन व दरानुसार शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा केली जाते. वाहनाबरोबर स्वतः जावे लागत नाही. अन्य ठिकाणच्या मार्केटची माहिती घेऊन दर जादा असेल तर त्या ठिकाणीही माल पाठविला जातो. संपूर्ण कुटुंब राबते शेतीत अमोल सांगतात की, उद्याच्या कामाचे आदल्या दिवशी नियोजन होते. सकाळी सातला आम्ही कुटुंबातील सर्वजण शेतात हजर असतो. गरजेनुसार मजुरांची मदत घेतली जाते. हे मजूर जवळच्या नात्यातीलच आहेत. त्यामुळे एकदिलाने काम होते. त्यांना अडीअडचणीच्या वेळी मदत करतो. त्यामुळे ते देखील वेळेत कामासांठी उपयोगी पडतात. आर्थिक प्रगती कष्टाच्या जोरावर स्वतःची व भाडेपट्ट्याने घेतलेली भाजीपाला शेती धेंडे यांनी फुलवली आहे. वडील व चुलते यांचे एकत्रीत कुटुंब आहे. कुटुंबाच्या कष्टाची तयारी पाहून कृषी अधिकारी धनंजय थोरात यांनी शासकीय योजनेतून विहीरीचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे स्वतःजवळचे दोन लाख रुपये घालून अमोल यांनी विहीरीचे बांधकाम व उर्वरित कामही पूर्ण केले. संपुर्ण क्षेत्राला ठिबक केले आहे. घराची डागडुजी करून छोटेखानी घर बांधले. शेतीतील उत्पन्नातूनच तीन बहिणींची लग्नेही केली. धेंडे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • वडिलोपार्जित केवळ २० गुंठे जमीन, मात्र वार्षिक भाडेतत्त्वावर पाच एकर जमीन घेतली.
  • भाजीपाला शेतीवर सर्व लक्ष
  • शेतीची बहुतांशी कामे घरातील सदस्यांच्या माध्यमातून
  • भविष्यात वडिलोपार्जित शेतीत पॉलिहाउस उभारण्याचा मानस
  • अमोल यांना बंधू अमित यांना शेती कामात वडील दिलीप, आई छाया तसेच खलीप धेंडे, नंदकुमार धेंडे, शामराव धेंडे या घरातील सदस्यांबरोबर दादासो पाटील, अविराज शिंगटे, अमोल बावचीकर यांचे सहकार्य मिळते. संपर्क : अमोल धेंडे - ९६९८६०१८३७
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com