agricultural success story in marathi, agrowon, anandvadi, chakur, latur | Agrowon

सूक्ष्मसिंचन तंत्र आत्मसात करीत शेतकरी झाले प्रगत
डॉ. रवींद्र भताने
शनिवार, 13 जानेवारी 2018

तुषार सिंचनामुळे जमीन आरोग्यदायी
आनंदवाडीचे सतीश तिरुके म्हणाले, की गावातील किमान ८० टक्के शेतकरी सूक्ष्मसिंचन वापरतात. मी २००२ पासून तुषार सिंचनाचा वापर हरभरा, भुईमूग या पिकांत करतो. पाण्याबरोबर वेळेची व मजूरबळाचीही बचत होते. तुषार सिंचनाचा वापर केल्याने जमीन अोलावा धरून राहते. जमीन भुसभुशीत राहते. बियाण्याची उगवणीशक्तीही चांगली राहते. पिकाला वेळेत पाणी देणे शक्य होते. एकूण व्यवस्थापनातून काबुली हरभऱ्याचे उत्पादन एकरी ४ ते ५ क्विंटलपर्यंत; तर नेहमीच्या हरभऱ्याचे १० क्विंटलपर्यंत मिळते. उसाला ठिबक वापरतो. माळरानाच्या हलकी जमिनी असून, एकरी ४० ते ५० टन उत्पादन होते. एका एकराला एक तास दांडाने पाणी दिले असते तर अर्धा एकरच भिजले असते. ठिबकच्या वापरामुळे सर्व क्षेत्राला एकसमान पाणी देणे शक्य होते.

लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी हे सूक्ष्म सिंचनाचे गाव म्हणून पंचक्रोशीत नावारूपाला आले आहे. पाण्याचे महत्त्व ओळखून गावातील शेतकऱ्यांनी सूक्ष्मसिंचनाचे पर्याय आत्मसात केले आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करून येथील शेतकरी ठिबक व तुषार सिंचन व जोडीला व्यवस्थापन यांच्या मदतीने चांगले उत्पादन घेऊ लागला आहे.
 
लातूर जिल्ह्यात आनंदवाडी (ता. चाकूर) हे अवघी १५०० च्या जवळपास लोकसंख्या व ३४१ उंबरे असलेले गाव. गावशिवारातील जमीन तशी हलकी, तुरळक मध्यम स्वरूपाची आहे. सन २००० च्या पूर्वी गावाची स्थिती फारशी चांगली नव्हती. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे विविध पिके घेण्यावर व उत्पादनावरही मर्यादा यायच्या. याच कालावधीत गावच्या पूर्व दिशेला तलाव बांधून तयार झाला. सिंचनाची सोय होण्याची आशा निर्माण झाली. तलावामुळे शेतातील विहिरी व विंधनविहिरींना मुबलक प्रमाणात पाणी राहू लागले.

सूक्ष्मसिंचनावर भर
आनंदवाडीत सुमारे ८६३ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे. त्यातील ६२० हेक्टर बागायती आहे. या क्षेत्राला ठिबक व तुषार सिंचनाच्या सहााय्याने पाणी दिले जाते. उर्वरित २४३ हेक्टर क्षेत्र खरिपावरच अवलंबून असते. आता आनंदवाडीतील शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोर वापर करताना सूक्ष्मसिंचनाचा वापर सुरू केला आहे. खरिपात पावसाने दीर्घ दडी मारली अथवा पर्जन्यमान कमी झाले तर शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेनुसार तुषार सिंचनाचा वापर करतात.

शेळके यांनी केली गावात ठिबकला सुरवात
सन १९९२ च्या अाधी गावातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने पिकाला पाणी देत. यात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर व्हायचा. गावातील प्रयोगशील शेतकरी माधव शेळके यांनी १९९१ मध्ये जळगावला भेट देऊन तेथील ठिबक सिंचन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली. सन १९९२ मध्ये १५ एकरांत
गावातील पहिला ठिबक संच बसवला. पाण्याचा जाणीवपूर्वक वापर होऊ लागल्यावर लागवड व्यवस्थापनातही त्यांनी सुधारणा केल्या. पूर्वी एकरी ३० ते ३२ टन असलेले त्यांचे ऊस उत्पादन
आज ७० टनांवर पोचले आहे. हा परिणाम दृश्‍यरूपात असल्याने गावातील अन्य शेतकरीही हळूहळू ठिबककडे वळू लागले.

मोबाईलद्वारे संचाचा वापर
गावातील प्रशांत तिरुकेदेखील ठिबकचा वापर करतात. अन्य गावी असले तरी मोबाईल फोन तंत्राच्या वापरातून त्यांना शेतातील मोटार सुरू करता येते. खंडित झालेला विद्युत पुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर मोटार सुरू होते. या तंत्रामुळे तिरुके यांनी पाण्याबरोबरच वेळेचीही बचत साधली आहे. ठिबकद्वारे गावातील शेतकऱ्यांना खतांचेही व्यवस्थापन करणे सोपे जात आहे.

आंतरपिकांचे साह्य
गावातील शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल असून, त्यात हरभऱ्याचे आंतरपीक घेतले जाते. सुभाष पासमे यांनी मागील वर्षी उसातील काबुली हरभऱ्याचे चांगले उत्पन्न घेतले. अशा प्रयोगासाठी पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन ही बाब महत्त्वाची ठरली आहे.

पीकपद्धतीत विविधता
पारंपरिक शेतीला बगल देत आनंदवाडीतील शेतकरी नवनवीन प्रयोग करतात. ऊस, डाळिंब, आंबा, द्राक्ष, आले, टोमॅटो, मिरची, काकडी व अन्य भाजीपाला लागवड केली जात आहे. बहुतेक सर्व पिकांना ठिबक व तुषार सिंचनाद्वारेच पाणी दिले जाते. गावात सुमारे ६२० हेक्टरवर बागायती केली जाते.

शेतकऱ्यांचे अनुभव
ठिबक बसवण्यापूर्वी पाण्याचा काहीच ताळमेळ बसत नव्हता. उत्पादनावरही त्याचा परिणाम व्हायचा.
आज पाण्याची सुमारे ५० ते ६० टक्के बचत होऊ लागल्याने कमी पाण्यात भरघोस उत्पादन घेता येत आहे. भूमिगत ठिबकचा (सबसरफेस ड्रीप) प्रयोगही केला आहे.
-माधव शेळके, ९४०३८६४९९९

वीज भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी उभे राहून पाणी देणे शक्य होत नव्हते. मात्र ठिबकमुळे ते शक्य झाले. कमी मनुष्यबळाचा वापर करून जास्त क्षेत्र ओलिताखाली आणता आले. माझ्या कोरडवाहू क्षेत्रालाही खरिपात पावसाचा खंड पडल्यावर तुषार सिंचनाद्वारे पाणी देतो.
-सतीष तिरुके, ९९२२५६७५२३

चार एकर डोंगराळ, माळरान जमीन आहे. तेथे पारंपरिक पद्धतीने पाणी देणे शक्य नव्हते. म्हणून ठिबकचा पर्याय निवडला. आज प्रत्येक झाडाच्या गरजेनुसार पाणी देता येत असल्याने आंब्याची बाग फुलली आहे.
-जगन्नाथ आवस्कर, ९७६३७४५१८८

पाण्याचा काटकसरीने वापर करण्यात आनंदवाडी गाव अग्रेसर आहे. सूक्ष्मसिंचन काळाची गरज असल्याचे येथील शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. सूक्ष्म सिंचनासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन दिले जाते.
-बिभीषण काळदाते, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, चाकूर. (जि. लातूर)

आनंदवाडी सूक्ष्मसिंचन दृष्टिक्षेपात

  • पेरणीयोग्य क्षेत्-८६३ हेक्टर
  • बागायती क्षेत्र- ६२० हेक्टर
  • सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र- ६२० हेक्टर
  • कोरडवाहू क्षेत्र- २४३ हेक्टर

आल्याचे चांगले उत्पादन
प्रयोगशील शेतकरी सतीश तिरुके यांनी २०१४ मध्ये आपल्या दीड एकरावरील आले पिकात ठिबक सिंचनाच वापर केला. एकूण व्यवस्थापनाची जोड व पाण्याचा योग्य वापर यातून १७० क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यापर्यंत त्यांनी मजर मारली आहे. ठिबकमुळे कमी मनुष्यबळ व पाण्यावर आश्वासक शेती करणे त्यांना शक्य झाले. यंदा त्यांनी सहा एकरांवर ठिबक केले असून, तुषारचेही दोन संच आहेत. सूक्ष्मसिंचनाचा वापर करीत ऊस, हरभरा, भाजीपाला आदी पिके ते चांगल्या प्रकारे घेत आहेत.

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
भारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...
माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...
जॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...
छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...
चला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...
विशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...
मोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...
विवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...
माॅन्सून अंदमानात दाखल !!!पुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...