पारंपरिक शेतीपेक्षा रेशीम व्यवसायातून समाधानकारक वाटचाल

रेशीम शेतीत सुरवातीला शेडसाठी खर्च होत असला तरी त्यावरील गुंतवणूक दीर्घ काळासाठी असते. तसेच शेडसह अन्य खर्चासाठीही शासन अनुदान मिळते. प्रत्येक बॅचमधून ताजा पैसा हाती येत राहतो. - पांडूरंग येडे, अंजनवती, ता. जि. बीड.
रेशीम शेतीची गोडी लागलेले परिसरातील युवक शेतकरी पांडुरंग येडे यांचा रेशीम शेती प्रकल्प पाहण्यास येतात.
रेशीम शेतीची गोडी लागलेले परिसरातील युवक शेतकरी पांडुरंग येडे यांचा रेशीम शेती प्रकल्प पाहण्यास येतात.

अंजनवती (ता. जि. बीड) येथील येडे बंधूंनी भागातील रेशीम उत्पादकांचे प्रयोग व यश अभ्यासले. आपल्या सुमारे १९ एकरांतील पारंपरिक शेतीतून आर्थिक सक्षमता वाढत नाही. त्यासाठी रेशीम व्यवसाय चांगला पर्याय असल्याचे लक्षात आले. आज एक एकरवरील तुती लागवडीतून तीन बॅचेसमध्ये यशस्वी उत्पादन घेत त्यांनी समाधानकारक उत्पन्नाकडे वाटचाल केली आहे. तुती लागवडीतही वाढ केली आहे. बीड हा दुष्काळी जिल्हा. याच तालुक्यातील अंजनवती येथे पांडुरंग (त्र्यंबक) व धाकटे दत्ता हे येडे बंधू राहतात. वडील रामदास यांची वडिलोपार्जित सुमारे १९ एकर शेती अाहे. त्यातील १२ एकर बागायती आहे. घरची शेती पारंपरिक म्हणजे कपाशी, बाजरी, तूर, सोयाबीन हीच आहेत. मात्र पांडूरंग यांच्या मते या पिकांतून फारसे काही पदरात पडत नाही. त्यांचा ‘पीकअर्प वाहनाचाही व्यवसाय आहे. मात्र तो दररोजचा नसतो. दोघे बंधू शेतीच करतात. रेशीम शेतीची प्रेरणा बीड जिल्ह्यात उत्तम रेशीम उत्पादक आहेत. त्यापैकीच एका शेतकऱ्याकडून येडे यांना रेशीम शेतीची प्रेरणा मिळाली. उत्पन्नवाढीसाठी हा चांगला पर्याय असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मागील वर्षी त्याच शेतकऱ्याकडून तुतीचे बेणे आणले. एक एकरात तुतीची लागवड लागवड केली. यामध्ये तीन बाय दोन फूट, मधला पट्टा पाच फुटांचा व पुन्हा तीन बाय दोन फूट अशी लागवड पध्दत वापरली. एकरी सुमारे पाचहजार चारशे झाडे बसली. काही झाडांची मरतूक झाली. मात्र पुन्हा नांग्या भरल्या. रेशीम अळी संगोपन रेशीम अळी संगोपनासाठी ६० फूट लांब आणि २२ फूट रुंदीचे शेड उभारले आहे. मधल्या भागात व्यवस्थापसाठी जागेच्या उद्देशाने चार फुटांचे अंतर ठेवत दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सहा असे १२ रॅक्स उभारले आहेत. शेडच्या उभारणीसाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च आला आहे. तुतीसाठी ठिबक सिंचनाची सुविधा केली आहे. अळी संगोपनासाठी अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. पाण्यासाठी विहीर, बोअर आहे. तसेच गावाजवळील तलावाचेही पाणी उपलब्ध होते. अंबेजोगाई तालुक्यातील वडद येथील चॉकी सेंटरमधून दोन अवस्था पार केलेल्या रेशीम अळ्या पुढील संगोपनासाठी उपलब्ध होतात. उत्पादन, मार्केट व विक्री येडे यांनी आत्तापर्यंत तीन बॅचेसचे उत्पादन घेतले आहे. पहिल्या बॅचमध्ये शंभर अंडीपूंजापासून ६० किलो, दुसऱ्या बॅचमध्ये २२५ अंडीपूंजांपासून सुमारे दोन क्विंटल तर तिसऱ्या बॅचमध्ये २०० अंडीपूंजांपासून एक क्विंटल ६० किलो एवढे कोषउत्पादन मिळाले आहे. पहिल्या दोन बॅचमधील उत्पादनाची विक्री अंबेजोगाई येथे केली. त्यास किलोला ४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र तिसऱ्या बॅचमधील कोषांची विक्री कर्नाटकातील रामनगर येथे केली. त्यास मात्र किलोला ४९१ रुपये असा चांगला दर मिळाला.

रेशीम शेतीतील आश्वासक उत्पन्न पांडूरंग म्हणाले की, एरवी पारंपरिक शेतीतून वर्षाला पाच ते सहा लाख रुपयांपेक्षा काही जास्त उत्पन्न हाती येत नाही. त्या तुलनेत रेशीम शेतीतील तीन बॅचेसमधून किमान सव्वा ते दीड लाख रुपयांची कमाई झाली आहे. येत्या जानेवारीत चौथी बॅच घेणार आहे. आमच्या गावात सुमारे नऊ शेतकरी रेशीम शेती करतात. सगळे मिळून रामनगरला माल पाठवू लागलो आहोत. त्यामुळे वाहतुकीवरील खर्चात बचत झाली आहेत. किलोला केवळ २० रुपये त्यासाठी खर्च येतो. रेशीम शेतीत खर्चही कमी आहे. दोघे बंधू व दोघांच्या सौभाग्यवती असे चारजण या व्यवसायात राबतात. त्यामुळे मजुरांवरील खर्च कमी झाला आहे. पारंपरिक शेतीला रेशीम शेती हा चांगला पर्याय असल्याचे अनुभवास येत असल्याचे पांडूरंग म्हणाले. रोहयोतून अनुदान रेशीम उद्योगासाठी रेशीम विभागाकडून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून अनुदान देण्याची तरतूद आहे. पांडूरंग यांना आत्तापर्यंत सुमारे ३२ हजार रुपये अनुदानाचा लाभ मिळाला आहे. रेशीम उद्योगाच्या बळकटीकरणासाठी शासन स्तरावरुन ठोस उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सध्या रेशीम कोष विक्रीसाठी बंगळूरला जावे लागते. प्रत्येक जिल्हा स्तरावर शासनाचे हमी खरेदी केंद्र असण्याची गरज आहे. तसेच मिळणारे अनुदान संबंधित विभागाने तत्परतेने शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन कामे सोडून शासनाच्या कार्यालयात खेटे मारावे लागतात, अशी खंतही पांडूरंग यांनी बोलून दाखवली. संपर्क -पांडूरंग येडे-  ९९२२५३४८७४  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com