जीवनदाता यंत्रासह राजेंद्र फुफाटे.
जीवनदाता यंत्रासह राजेंद्र फुफाटे.

संपूर्ण स्वयंचलित नियंत्रित शेतीचे उभारले प्रारूप

संपूर्ण नियंत्रित पद्धतीने पिकाची वाढ करण्याच्या उद्देशाने औरंगाबाद येथील राजेंद्र फुफाटे यांनी प्रारूप सयंत्र तयार केले आहे. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान, स्वयंचलित सिंचन, तापमान व आर्द्रता नियंत्रण व्यवस्था, कृत्रिम प्रकाशाने प्रकाश संश्लेषणात वाढ करणे, अशा अनेक तत्त्वांचा एकत्रित वापर त्यांनी त्यात केला आहे.   शेती यशस्वी करण्यामध्ये मानवी व्यवस्थापनासह वातावरणातील अनेक घटकांचा समावेश असतो. या बहुतांश सर्व घटकांना नियंत्रित केल्यास शेती शाश्वत होऊ शकेल, या विश्वासाने औरंगाबाद येथील राजेंद्र फुफाटे गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. त्यांनी उपलब्ध अत्याधुनिक तंत्राचा वापर एकत्रितरीत्या एका सयंत्रातच बसवण्याचा प्रयत्न केला. त्यातून पाण्याचा कार्यक्षम वापर साधला असून, स्वयंचलित तापमान नियंत्रण केले आहे. कृत्रिम प्रकाशाची सोय केल्याने इनडोअरही पिकांची वाढ करता येईल. पिकाचे चोरी व जनावरांपासूनचे नुकसान टाळण्यासाठी व संरक्षणासाठी विविध सेन्सर, सायरन, फ्लॅशर यांचा उपयोग केला. या यंत्राला त्यांनी ‘जीवनदाता’ असे नाव दिले आहे. सध्या या प्रारूप यंत्राचा आकार अत्यंत लहान असला तरी, त्यामागील कल्पकता लक्षणीय आहे. अशी आहे यंत्राची रचना

  • प्रारूप यंत्राची लांबी १३५ सेंमी, रुंदी ७५ सेंमी, तर उंची २१० सेंमी आहे. त्यात ३० सेंटिमीटर आकाराचा ॲल्युमिनीअमचा चौरस बॉक्‍स बसवला. त्यावर जमिनीपासून ३ फूट उंचीवर ३० सें.मी. आकाराची कुंडी बसवली आहे. कोकोपीटचा वापर केल्याने योग्य निचरा होतो.
  • ३ फूट उंचीपर्यंत रोपांच्या निर्मितीसाठी स्टॅंडसह प्लॅस्टिक ट्रे बसवला असून, त्यात कोकोपीट वापरले.
  • पाणी संचयासाठी १०० लिटर क्षमतेच्या दोन टाक्‍या बसवल्या आहेत.
  • वातावरणातील आर्द्रता आणि तापमान मोजणारे सेन्सर बसवले असून, त्याच्या नोंदी इलेक्‍ट्रॉनिक डिस्प्लेवर दिसतात.
  • अंतर्गत पिकांवर किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी इन्सेक्टनेट लावल्या आहेत.
  • जाळीच्या बाहेरील बाजूस १५ सेंमी अंतरावर ८८ सेंमी बाय ६५ सेंमी रुंदीचे पारदर्शक प्लॅस्टिक पत्रे चारही बाजूने बसविले आहेत. यापैकी एक फ्रेम बाहेरील बाजूस उघडते.
  • मालाच्या साठवणुकीसाठी ४५ सेंमी लांब, ३० सेंमी रुंद आणि ३० सेंमी उंचीच्या ॲल्युमिनीअमच्या बॉक्‍सची सोय केली आहे. त्याचे तापमान थंड ठेवले जाते. त्यात सोलर ड्रायरही वापरता येईल.
  • चाचण्या ः या छोट्या सयंत्रामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये पालक, गहू, ज्वारी आणि गवती चहाची वाढ केली. पालकाच्या चार बीजांपासून १२६ ग्रॅम बीजोत्पादन झाले. गव्हाच्या ३३ दाण्यांपासून ७५ ग्रॅम उत्पादन झाले. ज्वारीच्या तीन दाण्यांपासून १८० ग्रॅम उत्पादन झाले. गवती चहाच्या १० कंदापासून ४१० ग्रॅम उत्पादन मिळाले. सयंत्राचा आकार लहान असून, चाचण्याही अल्प प्रमाणात असल्या तरी त्यातील यशाने हुरूप मिळाल्याचे राजेंद्र फुफाटे सांगतात.   सयंत्रातील सुविधा

  • पाण्याचा कार्यक्षम वापर ः सयंत्रामध्ये पिकांसाठी ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करता येतो. त्यासाठी १२ व्होल्ट क्षमतेचा वॉटर पंप आहे.
  • अ) यंत्रामध्ये पाण्यासाठी दोन टाक्या आहेत. प्रतिदिवस एक लिटरप्रमाणे पाणी वापर गृहित धरल्यास १०० दिवस पाणी पुरते. कुंड्यातून झिरपणारे पाणी त्यात जमा केल्यास १२५ दिवसांपर्यंत पुरू शकते. ब) दुसऱ्या टाकीतील पाणी तुषार यंत्रणा, फॉगर आणि गरज पडल्यास फवारणीसाठी राखीव असते. क) यावर पडणारे पावसाचे पाणी गोळा करण्याची सोय केली. ते योग्य रितीने कार्यरत राहण्यासाठी खास सेन्सर बसवले आहेत. टाकी भरल्यानंतर अतिरिक्त पाणी विहिरीमध्ये सोडता येते.

  • तापमान नियंत्रणासाठी आतमध्ये पंखा, कूलिंग पंप व फॉगर यंत्रणा आहे. तापमानात वाढ झाली किंवा आर्द्रता कमी झाल्यानंतर थर्मोस्टॅटद्वारे या यंत्रणा आपोआप सुरू होतात.
  • इनडोअर उत्पादनात प्रकाश संश्लेषण वाढवण्यासाठी लाल, निळ्या व पांढऱ्या रंगाच्या एलईडी पट्ट्यांचा वापर केला आहे.
  • यंत्राची सुरक्षितता आणि संरक्षणासाठी मोशन सेन्सर, सायरन बसवले आहेत. जनावरांना दूर ठेवण्यासाठी रात्री फ्लॅशरद्वारे प्रखर प्रकाश आणि दिवसा आवाज (स्पीकर) वापरले आहेत.
  • या साऱ्या यंत्रणा सौरऊर्जेवर चालवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी १२ व्होल्टचे सोलर पॅनल व १२ व्होल्टची बॅटरी बसवली आहे.
  • संपर्क ः राजेंद्र फुफाटे, ८६००९५४६३१, ९७६६७९६४०६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com