उसापेक्षा किफातशीर ठरले रताळे

किफायतशीर अर्थकारण एकरी १० टन उत्पादन, किलोला दहा रुपये दर व ३० हजार रुपये खर्च जमेत धरला तरी ७० हजार रुपये वा त्या आसपासचे उत्पन्न रताळे पिकातून बाभूळगावचे शेतकरी मिळवितात.
चांगला दर मिळण्यासाठी रताळी स्वच्छ करून प्रतवारी करावी लागते.
चांगला दर मिळण्यासाठी रताळी स्वच्छ करून प्रतवारी करावी लागते.

सोलापूर जिल्ह्यातील बाभूळगावाने रताळे पिकात आपली अोळख तयार केली आहे. नुकताच होऊन गेलेला महाशिवरात्रीचा सण हेच या रताळ्याचे वर्षभरासाठीचे मुख्य मार्केट असते. त्यादृष्टीने लागवडीचे नियोजन होते. पाण्याची चांगली सोय असेल तर उसापेक्षा याच पिकाला येथील शेतकरी प्राधान्य देतात. सुमारे सहा महिन्यांच्या काळात हे पीक एकरी ५० हजारांच्या पुढे उत्पन्न देऊन जाते. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्‍यातील बाभूळगाव परिसरातील मुख्य पीक म्हणजे ऊस. मात्र या पिकाचा दीर्घ कालावधी व त्यातून मिळणारे उत्पन्न यांचा हिशेब पाहताना शेतकरी अन्य पीक पर्याय शोधतात. येथील शेतकऱ्यांना त्यादृष्टीने रताळे पीक महत्त्वाचे वाटते. अर्थात, हे पीक या गावाला काही नवे नाही. मात्र मिळणारे दर व पाण्याच्या उपलब्धतेनुसार त्याचे नियोजन केले जाते.

गावात रुजले रताळे पीक बाभूळगावातील अौदुंबर माळी यांनी २००७ मध्ये अर्धा एकरात रताळ्याची लागवड केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागल्यावर पुढील वर्षी क्षेत्र साडेतीन एकरांवर नेले. त्यांच्या प्रयोगाचा अभ्यास करून इतर शेतकरीही या पिकाकडे वळले. इथले शेतकरी उसाबरोबरच रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा, मका अशी पिके घेतात. पंढरपूरपासून अवघ्या १२ किलोमीटरवर वसलेले बाभूळगाव उजनी धरणाच्या पाण्याने समृद्ध बनले आहे. त्यातच गावाला बरडी, भुसभुशीत व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीचे वरदान लाभले आहे. अशा प्रकारच्या जमिनीत रताळ्याची चांगली वाढ होऊन फुगवण (वजनदार) चांगली होते. रताळे पीक पद्धतीवर दृष्टिक्षेप

  • बाभूळगावात सुमारे ५० ते ५५ एकर क्षेत्र रताळे पिकाखाली असल्याचा अंदाज
  • हस्तनक्षत्रात किंवा आॅक्टोबरमध्ये लागवड
  • साधारण साडेपाच ते सहा महिने कालावधीचे पीक
  • पाण्याची सोय चांगली असणे गरजेचे. पाण्याचा निचरा चांगली होणारी जमीनही असणे गरजेचे.
  • पाणी साधारण १० ते १२ दिवसांनी द्यावे लागते. पाण्यासाठी संवेदनक्षील पीक. पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन गरजेचे.
  • रताळे काढणीनंतर उन्हाळ्याचे दिवस सुरू होतात. त्यामुळे अनेक शेतकरी पाणी पाहून खरिपासाठीच पुढची तयारी करतात.
  • रताळ्याचे बेणे घरचेच वापरले जात असल्याने विकत आणण्याच्या खर्चात बचत
  • महाशिवरात्रीचा सण हीच मुख्य संधी काढणी साधारण महाशिवरात्रीच्या अाधी आठ ते दहा दिवस सुरू होते. पहिले चार ते पाच दिवस वेल काढण्याचे काम चालते. वेल वाळवून जनावरांसाठी चाऱ्यासाठी उपयोगात आणले जातात. महाशिवरात्रीनंतर मात्र रताळ्यांना दरच मिळत नाही. त्यामुळे महाशिवरात्रीच्या अाधीच माल काढून तो बाजारपेठेत पाठवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे या काळात रताळे काढणीची कामे युद्धपातळीवर चालू असतात. सगळीकडे काढणीची कामे एकाचवेळी असल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवतो. रोपळे, मेंढापूर, नारायण चिंचोली, फुल चिंचोली, आढीव, खरातवाडी, गुरसाळे व शेटफळ (ता. मोहोळ) येथून मजूर मोठ्या संख्येने आणावे लागतात. अर्थकारण व मार्केट यंदा लागवड वाढल्यामुळे एकाच बाजारपेठेत सर्वांचा माल जाणे शक्‍य नव्हते. त्यामुळे पुणे, मुंबई, वाशी, कल्याण, धुळे, नंदूरबार, जालना, लातूर, परळी, परभणी, सातारा, बारामती आदी ठिकाणच्या बाजारपेठेतही जमेल त्या पद्धतीने अनेकांनी आपला माल पाठविला. जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी, करमाळा, मंगळवेढा व अकलूज या स्थानिक बाजारपेठाही मदतीला होत्याच. ए ग्रेडच्या मालाला प्रति किलो ९ रुपयांपासून १४ रुपयांपर्यंत दर मिळाला. बारीक रताळे स्थानिक बाजारपेठेत पाच चे सहा रुपये दराने विकली गेली. काहींनी जागेवरच १३ रुपये दर मिळवला. एकरी १० टन उत्पादन, किलोला दहा रुपये दर व ३० हजार रुपये खर्च जमेत धरला तरी ७० हजार रुपये वा त्या आसपासचे उत्पन्न या पिकातून इथले शेतकरी मिळवितात. पवन चव्हाण यांचा अनुभव गावातील पवन चव्हाण पाच वर्षांपासून रताळे घेतात. ते म्हणाले, की दरवर्षी माझे या पिकाचे दोन-तीन एकर क्षेत्र असते. मला यंदा दोन एकरांत ६३० पोती (प्रति पोते सुमारे ४५ किलो) तर मागील वर्षी पावणेदोन एकरात ७४५ पोती एवढे उत्पादन मिळाले होते. मागील वर्षी परिसरात लागवडीचे क्षेत्र कमी होते. साहजिकच दरही किलोला १० रुपयांपासून १८ रुपयांपर्यंत होते. यंदा मात्र लागवडीचे क्षेत्र वाढले. दरही १० ते १५ रुपयांपर्यंत होते. दोन एकरांत साधारण ७२ हजार रुपये खर्च आला आहे. दर, हवामान व उत्पादन या बाबी जुळून आल्या तर या पिकातून एकरी ५० ते ७५ हजार रुपयांचे उत्पन्न साधारण सहा महिने कालावधीपर्यंत मिळू शकते. मार्केट जागेवर कराड भागातील तसेच स्थानिक व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात हा मोठा फायदा असल्याचे चव्हाण सांगतात. पुणे व सोलापूर यादेखील बाजारपेठा असल्या तरी पंढरपूर हे तुलनेने जवळचे फायदेशीर मार्केट असल्याचे त्यांना वाटते. मजुरीवर अधिक खर्च या पिकात मजुरीवर अधिक खर्च होत असल्याचा चव्हाण यांचा अनुभव आहे. दहा दिवसांसाठी दोन एकरांत सुमारे १२० मजुरांची गरज भासली. मजुरी, निंदणीसाठी बैल व अन्य असा केवळ मजुरी खर्चच दोन एकरांत ३८ हजार रूपयांपर्यंत गेल्याचे ते सांगतात. अन्य शेतकऱ्यांचे अनुभव उसाचे बिल मिळण्यासाठी खूप दिवस लागतात. तोपर्यंत शेतातील खोळंबलेली कामे मार्गी लावण्यासाठी रताळ्याचा चांगला आधार मिळतो. मात्र यंदा सगळीकडेच लागवड वाढून भरपूर आवक झाल्यामुळे अपेक्षित दर मिळाला नाही. -शंकर कोरके यंदा भरपूर पाऊस पडल्यामुळे उत्पादनात घट झाली. मात्र दरवर्षी या पिकातून उसापेक्षा चांगले उत्पन्न मिळाले आहे. -संतोष चव्हाण, पवन चव्हाण यंदा पहिल्यांदाच लागवड केली. ए ग्रेडचा माल निघाला. दर चांगला मिळाल्यामुळे अर्ध्या एकरातून समाधानकारक उत्पन्न मिळाल्याचे समाधान वाटले. -लिंगदेव माळी संपर्क- पवन चव्हाण- ९०९६०९३१८७ औदुंबर माळी -९९२२२१२७४३ शंकर कोरके - ९६२३६४७१२२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com