agricultural success story in marathi, agrowon, bhortek budruk, bhadgaon, jalgaon | Agrowon

विनानांगरणी तंत्र, देशी कपाशीने खर्चात केली बचत
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 26 जून 2018

जमिनीच्या सुपिकतेला चालना
मशागत वा नांगरणी, बैलजोडी किंवा ट्रॅक्‍टरद्वारे सऱ्या पाडणे आदींवरील सुमारे सात ते आठ हजार रुपयांच्या खर्चात महाजन यांनी बचत केली आहे. त्यातून श्रम आणि महत्त्वाचे म्हणजे वेळेची बचत ते साधत आहेत. पिकांचे अवशेष जमिनीला दिल्याने जमीनही सुपीक होण्याला चालना मिळाली आहे.

विनानांगरणी शेती आणि देशी वाण या दोन बाबींवर भर देत भोरटेक बुद्रुक (जि. जळगाव) येथील संजय बळीराम महाजन यांनी कपाशीची अभ्यासपूर्ण व फायदेशीर शेती करण्यास सुरुवात केली आहे. एकरी १८ क्विंटलपर्यंत उत्पादनक्षमता मिळवत संकरित वाण व मशागत, निंदणीवरील खर्चात त्यांनी महत्त्वाची बचत केली आहे. जमिनीची सुपिकता टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.

जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्‍याच्या अखेरच्या टोकाला चाळीसगाव तालुक्‍याच्या सीमेनजीक भोरटेक बुद्रुक गाव आहे. जमीन काळी कसदार, पण विहिरी, कूपनलिकांना पुरेसे पाणी नाही. अशा प्रतिकूल स्थितीत संजय महाजन प्रयोगशील शेती करीत आहेत.
त्यांच्याकडे दोन विहिरी असून, १७ एकर जमीन आहे. सन २००७ मध्ये कुटुंब विभक्त झाले.
सुरुवातीला त्यांचे वडील बळीराम शेतीचे संपूर्ण व्यवस्थापन पाहायचे. संजय यांना शेती व्यवस्थापनाचा फारसा अनुभव नव्हता. मात्र, शेतीत उतरल्यानंतर ते अधिक अभ्यासू झाले. तांत्रिक बाबी त्यांनी आत्मसात करण्यास सुरुवात केली.

यशकथांनी दिली स्फूर्ती
महाजन ॲग्रोवनचे सुरवातीपासूनचे वाचक आहेत. जरंडी (जि. औरंगाबाद) येथील अनंत जगताप यांनी कमी लागवडीच्या अंतरात लागवड करून कापसाचे चांगले उत्पादन साधल्याची यशोगाथा त्यांनी वाचली. त्यांच्या शेताला भेटही दिली. चर्चा करून आपणही तशी फुलविण्याचे ठरवले. त्या वेळी कापूस हेच त्यांचे प्रमुख पीक होते. अनेक वर्षे पाच ते सात एकरांत बीटी कापूस घ्यायचे. विहिरीला पाणी कमी असल्याने पावसाचा अंदाज घेऊन, ठिबकचा वापर करून चार बाय दीड किंवा दोन फूट अंतरात लागवड व्हायची. सन २००८ मध्ये जुलैमध्ये घेतलेल्या कापसाचे एकरी २० क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांनी घेतले. तेव्हापासून आत्मविश्‍वास वाढला.

ॲग्रोवन व चिपळूणकरांचे तंत्र आले कामाला
कृषी प्रदर्शनांना भेटी देणे, ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध यशोगाथांमधील शेतकऱ्यांच्या संपर्कात राहणे, नवनव्या कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा शोध घेणे अशी वृत्ती संजय यांनी कायमच जोपासली. सन २०१० मध्ये पुण्यातील ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला भेट दिली. तेथे जमीन सुपीकता, विनानांगराची शेती, तण देई धन ही पुस्तके घेतली. त्यांचा अभ्यास केला. पुस्तके वाचन व प्रदर्शनाच्या निमित्ताने या पुस्तकाचे लेखक व कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांच्या संपर्कात ते आले. यातूनच विनानांगरणीची शेतीबाबत उत्सुकता वाढली. कपाशीत अशी शेती होऊ शकते का याचे कुतूहल वाढले.

लग्नाच्या प्रसंगाने घडला प्रयोग
मनातल्या शंकांना एक दिवस खरोखरच वाट मिळाली. सन २०१४ चा मे-जूनचा काळ होता. बाजरी व मक्याचे पीक घेतल्यानंतर या तीन एकरांत मशागत करून कापूस लावण्याचे नियोजन होते. दरम्यान, पुतण्याच्या लग्नात संजय व्यस्त होते. मॉन्सूनचा पाऊस येऊन गेला. आता पुढे काय करायचे हा प्रश्न पडला. अचानक विनानांगरणी तंत्राची संजय यांना आठवण झाली. त्यांनी चिपळणूकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. चिपळूणकर यांनीही कपाशीत हा प्रयोग निश्चित यशस्वी होऊ शकतो असा धीर दिला; मग त्यांच्याच सल्ल्यानुसार तीन एकरांत विनानांगरणीने कापूस लावण केली. त्यात बाजरी व मका यांची खोडकीस अवशेष तसेच होते. ते कुजले. पुढे चांगला परिणाम दिसू लागला. त्या वर्षी बीटी कपाशीचे एकरी १० क्विंटल उत्पादन आले.

आता विनानांगरणीच होते शेती

 • महाजन आता विनानांगरणीच कपाशी घेतात.
 • पूर्वी बीटी वाण घ्यायचे. अलीकडील दोन-तीन वर्षांत देशी वाणांचा वापर सुरू केला आहे.
 • मशागत, निंदणी खर्चात त्यांनी बचत साधली आहे.
 • तणनाशकांचा वापर ते करतात. मात्र, प्लॅस्टिक व पत्र्याच्या लहान डब्याने झाडे झाकून केवळ तणांवर फवारणी होते. तीन मजुरांकरवी दोन एकर शेतात हे काम सुकर होते. पुढे मजूर झाडे झाकण्याचे काम करतात, तर मागे फवारणी सुरू असते. वाफसा मिळाल्यास तण नियंत्रण मजुरांकरवी करण्यात येते.
 • अलीकडील काळात कापसाखालील क्षेत्र कमी केले आहे.

झालेले फायदे

 • मशागत वा नांगरणी, बैलजोडी किंवा ट्रॅक्‍टरद्वारे सऱ्या पाडणे आदींवरील सुमारे सात ते आठ हजार रुपयांच्या खर्चात त्यांनी बचत केली आहे. त्यातून श्रम आणि महत्त्वाचे म्हणजे वेळेची बचत ते साधत आहेत. पिकांचे अवशेष जमिनीला दिल्याने जमीनही सुपीक होण्याला चालना मिळाली आहे.
 • रासायनिक खतांचा वापर व पर्यायाने त्यावरील खर्चही कमी केला आहे.
 • देशी वाण असल्याने बीटी बियाण्यांवर होणारा खर्चही टाळला आहे.

उत्पादन
अलीकडील काळात त्यांना फरदडीसह एकरी १७ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. उत्पादनापेक्षाही खर्चात बचत होत असल्याचे महाजन यांना समाधान आहे. आपल्या भागात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव फारसा जाणवत नसल्याचे महाजन सांगतात.

कापूस व्यवस्थापनातील ठळक बाबी

 • मेमध्ये कापूस लावण न करता ठिबक पसरून घेतात. पावसाने ताण दिल्यास सिंचन सुकर होते.
 • त्यांनी रासायनिक खतांचे एक मिश्रण स्वअनुभवातून तयार केले आहे.
 • यात २०० लिटर पाण्यात एक किलो १९-१९-१९, एक किलो ०-५२-३४, दीड किलो मॅग्नेशियम सल्फेट व अर्धा किलो सल्फर यांचे द्रावण तयार केले जाते. एकरी एक ते दीड किलो याप्रमाणे साधारण चार फवारण्या त्याच्या फायदेशीर ठरतात असा त्यांचा दावा आहे.
 • शेणखतासाठी एक बैलजोडी, पाच गायी व वासरू यांचे संगोपन. बाहेरून शेणखत घेत नाहीत. -पशुधनाला बारमाही हिरवा चारा मिळावा, यासाठी संकरित गवताची गोठ्यालगतच लागवड
 • हळद, ऊस व भाजीपाला पिकेही घेतात. कमी खर्चाची शेती म्हणून तीन एकरांत सुबाभूळ. हळदीसोबत मोसंबीही यंदा घेतली. पावसाच्या पाण्यावर ऊस रोपांची लागवड करून ती वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
 • कापसाची विक्री गावातच व्यापाऱ्यांना होते. भाजीपाला, हळदीची विक्री बाजार समितीत होते.
 • संजय यांचे मोठे बंधू भिकन चाळीसगाव येथील ए. बी. हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. त्यांचा मोठा आधार आहे. संजय यांना रितेश, वल्लभ व व्यंकटेश ही मुले आहेत. नोकरी व शिक्षण यात ती व्यस्त आहेत. मुलांना मोठा बॅंक बॅलेंस देण्यापेक्षा प्रत्येक बापाने कमीत कमी खर्चाची सुपीक जमीन आपल्या, कुटुंबाला, मुलांना वारसा म्हणून सोपविली पाहिजे, असा विचार संजय सांगतात.

संपर्क- संजय महाजन-९५१८७६४२९३

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...