करार शेतीसोबत दुग्धोत्पादनातही जपली प्रयोगशीलता

दिपक कापगते यांनी जर्सी गाईंचे चांगले व्यवस्थापन ठेवले आहे.
दिपक कापगते यांनी जर्सी गाईंचे चांगले व्यवस्थापन ठेवले आहे.

भंडारा हा भात उत्पादक जिल्हा. भात हे हंगामी पीक, त्यामुळे पुढील काळात उत्पन्नाची सोय होण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. बोदरा (ता. साकोली, जि. भंडारा) येथील दिलीप कापगते हे प्रयोगशील शेतकरी आणि पशुपालक. कापगते यांनी स्वतःची, तसेच कराराने शेती कसत दुग्धोत्पादनातही स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.

बोदरा (ता. साकोली, जि. भंडारा) येथील दिलीप चंद्रभान कापगते यांची स्वतःची आठ एकर शेती आहे. त्यासोबतच त्यांनी कराराने बारा एकर शेती घेतली. एका हंगामी पिकासाठी पाच हजार रुपये प्रतिएकराप्रमाणे त्यांनी करार केला आहे. या सर्व शेतीमध्ये ते भाताची लागवड करतात. पाणी व्यवस्थापनासाठी चार कूपनलिका आहेत. हे पाणी सर्व क्षेत्रावर फिरवले आहे. भात पिकाचे लागवडीपासून ते काढणीपर्यंत योग्य नियोजन असल्यामुळे त्यांना संकरित भात जातीचे एकरी २८ क्विंटल, तर सुधारित जातींचे एकरी २० क्विंटल उत्पादन मिळते. भात पिकानंतर कापगते चार एकरांवर लाखोरी आणि चार एकरांवर हरभरा लागवड करतात. अशाप्रकारे भात, लाखोरी आणि हरभरा पिकांतून त्यांनी स्वतःचे आर्थिक गणित बसविले आहे. भाताला प्रतिक्विटंल १८०० रुपये दर मिळाला. दरवर्षी एकरी तीन क्‍विंटल लाखोरीचे उत्पादन मिळते. लाखोरीस सरासरी २५०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. हरभऱ्याचे एकरी तीन क्विटंल उत्पादन मिळते. हरभऱ्याला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये दर मिळाला आहे. व्यापारी शेतीवर येऊन भात, लाखोरी आणि हरभऱ्याची खरेदी करतात. काहीवेळा लाखनी किंवा तुमसर बाजार समितीत शेतमालाची विक्री करावी लागते. लाखोरी लागवडीबाबत कापगते म्हणाले, की हे डाळवर्गीय पीक आहे. भात कापणीच्या पंधरा दिवस आधी याचे बियाणे फेकून दिले जाते. जमिनीतील ओलाव्यावर हे पीक येते. या पिकास खत किंवा फवारणीची गरज लागत नाही. लाखोरीचे घरचेच बियाणे वापरतो. साकोली येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार यांचे पीक व्यवस्थापन आणि पशुपालनाबाबत मार्गदर्शन मिळते.

पशुपालनास सुरवात

दिलीप कापगते यांनी दहा वर्षांपूर्वी दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी जर्सी गाय खरेदी केली. पुढे टप्प्याटप्प्याने एका गाईपासून दोन, दोनाच्या चार याप्रमाणे त्यांच्याकडे गाईंची संख्या वाढत गेली. सुरवातीला गाईंची संख्या कमी असल्याने उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून त्यांनी गोठा तयार केला. त्यानंतर गाईंची संख्या वाढली आणि दूध विक्रीतून पैसाही हाती आल्याने चांगला गोठा त्यांनी बांधला आहे.

  • ५० फूट बाय २० फूट आकाराचा गोठा, गोठ्याजवळ तेवढीच मोकळी जागा.
  • सध्या गोठ्यात आठ जर्सी गाई, दोन होल्स्टिन फ्रिजियन गाई.
  • सध्या दोन जर्सी गाईंपासून दररोज २२ लिटर दुग्धोत्पादन. आठ गाई गाभण असल्याने एप्रिल-मे महिन्यांत दररोज दुधाचे संकलन १०० लिटरपर्यंत जाणार.
  •  जर्सी गाय दररोज १२ ते १५ लिटर, तर होल्स्टिन फ्रिजियन गाय १५ ते १७ लिटर दूध देते.
  • शिफारशीनुसार प्रतिगाईस दररोज दहा किलो हिरवा आणि पाच किलो सुका चारा. दहा लिटर दूध देणाऱ्या गाईला दररोज सहा किलो पशुखाद्य, भाकड गाईस दीड किलो पशुखाद्य. पशुखाद्यामध्ये भाताचा कोंडा, खनिज मिश्रण, पेंढीचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर.
  • ठरावीक महिन्यांनी पशुतज्ज्ञांकडून आरोग्य तपासणी, लसीकरण.
  • दूध काढणीसाठी दोन बकेट असलेल्या दूध काढणी यंत्राचा वापर. यंत्राच्या वापरामुळे अर्धा-पाऊण तासात दहा गाईंचे दूध काढणे शक्य.
  • सरासरी ३.८ ते ४ फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला प्रतिलिटर २२.६० रुपये दर. गावामधून सहकारी दूध संस्था, तसेच खासगी संघाकडून दुधाची खरेदी. दरमहा सरासरी पंधरा हजारांचे उत्पन्न.
  • दरवर्षी किमान चार ते पाच गाभण गाईंची विक्री. गाभण गाईला सरासरी ४० हजार रुपये दर. बारा महिन्यांच्या नर वासरास तीन ते चार हजार रुपये मिळतात. दरवर्षी गाईंच्या विक्रीतून दीड लाखाचे उत्पन्न.
  • उपलब्ध शेण- गोमूत्राचा वापर करून कंपोस्ट खताची निर्मिती. कंपोस्ट खताचा स्वतःच्या शेतीमध्ये वापर केल्याने जमिनीची सुपीकता टिकून आहे, तसेच पिकांचेही चांगले उत्पादन मिळते.
  • पशुपालन ठरले फायद्याचे... भंडारा जिल्ह्यात प्रामुख्याने भात लागवड जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे वर्षभर आर्थिक उत्पन्नासाठी प्रयोगशील शेतकरी पशुपालनाकडे वळले आहेत. बोदरा परिसरातील शेतकऱ्यांनी एक-दोन गाईंच्या संगोपनावर भर दिला. यामुळे दूध विक्रीतून आठवड्याच्या खरेदीसाठी लागणाऱ्या पैशांची सोय करणे शक्‍य होते. बोदरा गावात चार दूध संकलन केंद्रांमध्ये सरासरी दररोज ५०० लिटर दुधाचे संकलन होते. मध्यंतरी पशुखाद्याचे दर वाढले होते, त्यामुळे गाईंच्या व्यवस्थापन खर्चात वाढ झाली. परंतु शेतीला पशुपालनाने चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांना वर्षभर चांगला आर्थिक स्रोत तयार झाला आहे. दुसऱ्या बाजुला पुरेशा प्रमाणात शेणखताची उपलब्धता होत असल्यामुळे जमिनीची सुपीकता टिकण्यास मदत होत आहे.   वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता गाईंना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी कापगते यांनी चारापिकांच्या लागवडीचे चक्र बसविले आहे. अर्ध्या एकरावर जयवंत आणि यशवंत या चारा पिकांची लागवड आहे. त्यापासून बारा महिने हिरवा चारा मिळतो. अर्ध्या एकरावर उन्हाळी ज्वारी लावली जाते. हा चारा मार्च ते जूनपर्यंत उपलब्ध होतो. बरसीमची उपलब्धता जानेवारी ते मार्च या कालावधी होते.

    संपर्क ः दिलीप कापगते,  ९७६४०४०१०१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com