बुबनाळ ग्रामपंचायतीत सर्व ग्रामपंचायत सदस्य महिला आहेत. या सदस्यांच्या एकीनेच गावाचा कारभार सुरळीत होत आहे.
बुबनाळ ग्रामपंचायतीत सर्व ग्रामपंचायत सदस्य महिला आहेत. या सदस्यांच्या एकीनेच गावाचा कारभार सुरळीत होत आहे.

बुबनाळचे ‘महिलाराज’ आंतरराष्ट्रीय पातळीवर

कोल्हापूर जिल्ह्यातील बुबनाळ (ता. शिरोळ) गावातील पुरुषांनी सत्तेच्या महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम देत गावची पूर्ण सत्ता महिलांकडे बिनविरोध सोपविली. गावचे रुपडे पालटण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील महिलांची सदस्यपदी निवड करून महिलांच्या हाती सत्ता देण्याचा हा प्रयत्न गावासाठी विकासाची दारे सहज खुली करण्यास कारणीभूत ठरला. गावाच्या या क्रांतीकारी निर्णयाची दखल परदेशांतही घेतली गेली.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातील बुबनाळ हे तीन हजार लोकसंख्येच गाव. श्री क्षेत्र नृसिंहवाडीपासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे. उसासह अन्य नगदी पिकात पुढारलेल्या या  गावात मोठा राजकीय सत्तासंघर्ष होता. प्रत्येक गावात असणारे वाद या गावात होतेच; पण त्याची टोकाची परिसीमा गाठली होती. क्रांतिकारी निर्णयाचा जन्म गावातील राजकारण सगळ्या ग्रामस्थांच्या आयुष्यावर परिणाम करणारे ठरत असते. याच राजकारणाचा बळी बुबनाळ हे गाव ठरले होते. राजकीय संघर्षातून वैयक्तिक ईर्ष्या, वादावादी व पर्यायाने सर्वांचेच नुकसान याचा अनुभव या गावाने घेतला. यामुळे गावचे भवितव्यच अंधकारमय बनले. अखेर यातून काही गवसणार नाही याची कल्पना आल्याने काही लोकांनी एकत्र येऊन सुकाणू समिती बनविली. त्यातूनच गावच्या विकासाला चालना मिळाली.   गावाची सत्ता बिनविरोध महिलांच्या हाती सुकाणू समितीने समझोत्याचा निर्णय घेतल्यानंतर २०१० ला पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. हा कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर २०१५ च्या निवडणुकीवेळी सर्वच सत्ता महिलांच्या हाती देण्याच्या निर्णय घेण्यात अाला. अकरा जणांच्या सदस्यात ६ महिला जागा होत्या. यामुळे उर्वरित ५ जागाही महिलांनाच देऊया अशी कल्पना आली आणि अनपेक्षितपणे मंजूर झाली. यामध्ये इच्छुकांचा हिरमोड झाला असला तरी गावच्या इच्छेपुढे त्यांनी मोठेपणा दाखविला. सर्वसामान्य कुटुंबांतील महिलांना संधी उमेदवार निवडतानाही पारदर्शीपणा दाखवित प्रस्थापित राजकारणी किंवा वारसांना सदस्यपदी घ्यायचे नाही, असे ठरविण्यात आले. विशेष म्हणजे याला सगळ्यांनी पाठिंबा दिला. राजकीय वारसा नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना ग्रामपंचायतीत सदस्यपदी निवडण्यात अाले. अकरा जणांच्या यादीत सर्वधर्म समभाव जपत गावातील बहुतांशी समाजाला प्राधान्य देऊन समतोल साधण्यात आला आहे.   पुरुषांनाही घेतले कारभारात सामावून गावचा कारभार महिलांच्या हातात दिल्याने त्या काय करतील याची उत्सुकता होती. महिलांनी गावातील पुरुषांची वेळोवेळी मदत घेऊन त्यांनाही गावच्या कारभारात सामाऊन घेत एकत्रित काम करण्याला प्राधान्य दिले. यामुळे  जेवढी कामे शक्‍य आहेत तितकी कामे महिलांकडून होऊ लागली. महसूल व इतर किचकट कामासाठी पुरुषांचीही मदत घेण्यास महिलांना कमीपणा वाटत नसल्याने एकत्रित कामाचा सुरेख मेळ गावाने साधला. विविध प्रशिक्षणासाठी निधी आरक्षित करून महिलांना प्रशिक्षित करण्यास ग्रामपंचायतीने सुरवात केली. या अगोदर ग्रामसभाच होत नव्हत्या. झाल्या तर तंटा, वाद ठरलेलेच. परंतु अाता ग्रामसभाही शांततेत व्यवस्थीत होत आहेत. त्यामुळे गावात एकीचे वातावरण तयार झाले आहे. मोबाइल संदेशावरून ग्रामसभेची निमंत्रणे गावातील नागरिकांना ग्रामसभेचे निमंत्रण मॅसेजवरून दिले जाते. एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत याबाबतचे मॅसेज पोचविण्यची व्यवस्था ग्रामपंचायतीकडे आहे. याशिवाय ग्रामपंचायत सदस्यांचा बुबनाळ महिलाराज या नावाचा व्हॉटसअॅप ग्रुपही कार्यान्वित आहे. यामध्ये सभांचे निरोपांची देवाणघेवाण केली जाते. गावातील मराठी शाळेतील पटसंख्याही वाढली आहे.

गावाच्या विकासात विविध लोकप्रतिनिधींचा सहभागगावात महिलाराज आहे हीच मुळात कौतूकाची गोष्ट असल्याने गावाला निधी देण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळत अाहे. खासदार राजू शेट्टी यांनी हे गाव दत्तक घेतले. गावच्या विकासकामासाठी ५ कोटी ४३ लाखांचा विकास आराखडा मंजूर केला. आमदार उल्हास पाटील यांनी ७५ लाखांना निधी गावच्या विकासकामासाठी दिला. माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांनी पाच लाख रुपयांची शुद्ध पेयजल योजना मंजूर केली. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी गावच्या स्वच्छतेसाठी यंत्रसामुग्री पुरविली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुद्ध पेयजल योजनेसाठी १ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

विविध उपक्रमांत गाव बनले अग्रेसर

  • शाळेमध्ये डिजिटल क्‍लासरूमची सोय.
  • गावात लोकसहभागातून वृक्ष लागवड, बेटी बचाव उपक्रम.
  • गावाला निर्मलग्राम, तंटामुक्त ग्राम पुरस्कार.
  • २०१६-१७ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व स्मार्ट ग्राम योजनेतही बक्षीस.
  • गावात विकासकामे सुरू करताना कामाचा ठेका गावातील तरुणांनाच दिला जातो. मात्र यासाठी तो पात्र असेल याची खबरदारी घेतली जाते. यामुळे गावातील तरुणांना स्वत:च्या गावच्या विकासकामात सहभागी होण्याची संधीही या निमित्ताने मिळत आहे.
  • परदेशांतही गावाची दखल   महिलांकडे गावचा कारभार सोपविल्याने प्रभावित झालेले मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी गावाला भेट देऊन विकासकामाची पहाणी करून माहिती घेतली. युरोपमधील माल्टा या देशात नुकतीच राष्ट्रकुल स्वराज्य शासन मंचची परिषद झाली. यामध्ये सहारिया यांनी बुबनाळची माहिती उपस्थितांना सांगितली. यामुळे तेथे उपस्थित असणारे ५३ देशांचे प्रतिनिधी प्रभावित झाले. या गावच्या पहाणीसाठी संयुक्त राष्ट्र महिला महासंघ, यांच्याबरोबर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका मालदीव येथील प्रतिनिधीही भेट देणार आहेत.

    सरपंच होण्याअगोदर राजकारणाचा कसलाच गंध नव्हता; पण गावाने माझ्याबरोबरच माझ्याबरोबर काम करणाऱ्या इतर महिला सदस्यांनाही सन्मान देऊन विधायक निर्णय घेतला. यामुळे आमच्यात मोठा आत्मविश्‍वास निर्माण झाला. आता आम्ही स्वत: निर्णय घेवू शकतो. पण हे निर्णय घेताना पुरुष तज्ज्ञ मंडळींचाही सल्ला घेतो ,पण अंतिम निर्णय आमचा असतो. यामुळेच निवडून आल्यापासून आम्ही व्यवस्थित कारभार करत आहोत. - सौ. आसमा जमादार, सरपंच, ७५५८४४४६७४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com