agricultural success story in marathi, agrowon, deepak kadam | Agrowon

दीपकने सावरली शेती अन् मोडलेल्या घराचा कणाही
रमेश चिल्ले
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

लातूर जिल्ह्यातील वानवडा येथील कदम यांच्या घरात नापिकी, कर्जाबाजारीतून आत्महत्या झाली. पण शेतीतूनच कर्ज फेडून दाखवितोच शिवाय दोन-चार एकर विकत घेऊन दाखवितो, अशी शपथ घेऊनच घरातील तरुण दीपक कामाला लागला. घरच्यांनीही मोलाची साथ दिली. कष्ट, एकी, धडाडी, विविध पिकांचे उत्कृष्ट नियोजन, विक्री व्यवस्था आदी विविध बाबींच्या जोरावर त्याने आपल्या घराचा मोडलेला कणा सावरला. शेतीही सावरली. आज तो पंचक्रोशीत आदर्श तरुण म्हणून अोळखला जातो.

लातूर जिल्ह्यातील वानवडा येथील कदम यांच्या घरात नापिकी, कर्जाबाजारीतून आत्महत्या झाली. पण शेतीतूनच कर्ज फेडून दाखवितोच शिवाय दोन-चार एकर विकत घेऊन दाखवितो, अशी शपथ घेऊनच घरातील तरुण दीपक कामाला लागला. घरच्यांनीही मोलाची साथ दिली. कष्ट, एकी, धडाडी, विविध पिकांचे उत्कृष्ट नियोजन, विक्री व्यवस्था आदी विविध बाबींच्या जोरावर त्याने आपल्या घराचा मोडलेला कणा सावरला. शेतीही सावरली. आज तो पंचक्रोशीत आदर्श तरुण म्हणून अोळखला जातो.

शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या टाळून पुढील बातमी वाचण्यातच काही जण रमतात. एवढे असंवेदनशील झालो आहोत का आपण? ज्याच्या घरातला कर्ता पुरुष भरल्या संसारातून अचानक निघून जातो, त्याच्या कुटुंबात किती मोठी पोकळी निर्माण होत असेल? काही कालावधीनंतर त्या घरची साधी चौकशीही कोणी करण्याच्या भानगडीत पडत नाही. मुलाबाळांचे शिक्षण, लग्न, वृद्ध सासू-सासऱ्यांचा दवाखाना, देणेकऱ्यांचे देणे, शेतीसाठीची लागवड, रोजच्या पोटापाण्याचा प्रश्‍न या सगळ्या गोष्टी मागे राहणाऱ्या कुटुंबातील कर्त्या महिलेस सारे दुःख पचवून कराव्या लागतात. तिच्यासमोर फार मोठ्या प्रश्‍नांचे व जबाबदारीचे डोंगर उभे असतात. तरीही ती कंबर कसून व्यवहार करायच्या अध्यायाला सामोरी जाते.

कदम यांची कथा
लातूर जिल्ह्यात औसा तालुक्‍यातील दुष्काळी पट्ट्यातील वानवडा गावातील विश्‍वंभर कदम यांची दहा एकर शेती. सन २०१३ ते २०१५ या सततच्या तीन वर्षांच्या दुष्काळात फारसे काही पिकलेले नव्हते. डोक्‍यावर शेती, संसार, लग्न, घरातील आजारपणासाठी काढलेले चार लाख रुपयांचे कर्ज, सावकाराचे नऊ लाख रुपये असे एकूण तेरा लाखांचे कर्ज होते. त्या मोबदल्यात चार एकर पोटच्या लेकरागत असलेल्या काळ्या जमिनीचा तुकडा सावकाराला लिहून दिलेला होता. त्यापूर्वी म्हणजे २०११ मध्ये लहान मुलगा अपघातात वारला. मग थोरला दीपक भावाच्या मृत्युपश्‍चात बारावीनंतर शिक्षण सोडून वडिलांना मदत करू लागला. त्याचे एक-दोन वर्षांत हात पिवळे केले गेले. शेतीतला अनुभव नसल्याने जमेल तसे तो वडिलांना मदत करे. मधल्या काळात विश्‍वंभर तुटक वागत. एकलकोंड्यागत राहत. अशातच वयाच्या सेहेचाळीस वर्षातच २०१५ मध्ये त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. सगळे सुन्न झाले. गावाच्या चुली एक दिवस बंद झाल्या.

पोरसवद्या तरुणावर जबाबदारी
बावीस वर्षांच्या पोरसवद्या दीपकवर आकाश कोसळले. तरणाताठा मुलगा व नवरा अर्ध्या संसारातून डोळ्यांदेखत सोडून गेला, अशी बेबीताईंची अवस्था झालेली. पण त्या पोलादी मनाच्या माऊउलीनं धीर सोडला नाही. तिनं आणि सत्तर वर्षांच्या आजोबांनी धीर दिला. आजोबा नातवास म्हणाले तू खंबीरपणे उभा नाही राहिलास तर सारं घर मोडून पडेल. डोक्‍यावर कर्जाचा डोंगर, वडिलांनी घेतलेले तीन बोअर कोरडे. दोन एकर ऊस पाण्याअभावी डोळ्यादेखत वाळलेला. सगळ्या आशा करपून गेलेल्या. मग मासुर्डीची मावशी व तिच्या कुटुंबातील सर्वांनी मानसिक व आर्थिक आधार दिला. दीपकचे लग्न होऊन चारेक वर्षं झालेली. सासरची मंडळी मुद्दामच मदतीला आली नाहीत. मदत केली तर जावई परावलंबी होईल, म्हणून नुसता धीर देत राहिले. त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती.

शेतीतून सावरले
दीपकने मोठ्या हिमतीने १० एकर शेती कसायला घेतली. सुरवातीला फारसे समाधानकारक घडत नव्हते. सन २०१५ मध्ये एक एकर भाजीपाला, मूग, उडीद, सोयाबीन पेरले. शेततळे स्वखर्चाने घेत त्यात प्लॅस्टिक अंथरले. बोअर व विहिरीतले पाणी साठवून ते भाजीपाला पिकांना दिले. रब्बीत एक एकर ज्वारी केली. ती बरी झाली. सोयाबीन, मूग, उडीदही चांगले झाले. ऊस बावीस टन झाला. बोअरच्या कामासाठी पाइप, मोटर व वायरींसाठी पैसे नव्हते. मित्रांनी व मावसभावाने मदत केली. मग भाजीपाला वाढविला. पाण्याच्या काटकसरीसाठी जमविलेल्या पैशांतून ठिबक, तुषार बसवले. थोड्या थोड्या क्षेत्रात भेंडी, कारली, चवळी अशी पिके सुरू झाली.

स्वतः विक्री केली
मोटारसायकलवर चार क्रेट माल बांधून स्वतः औसा, किल्लारी, लामजना, सास्तूर, निलंग्याच्या आठवडी बाजारात जाऊन दीपक थेट विक्री करू लागला. त्यातून हमाली, अडत वाचून पैसे हाती राहू लागले. रब्बीत दोन एकर वाटाणा केला. तो लाखांवर पैसे देऊन गेला. पुढे भेंडी, कारले वाढविले. टोमॅटो केला. मागील वर्षी आठ एकरांत ५० क्विंटल सोयाबीन निघाले. उसाचे एक लाख, हरभरा, तुरीचेही पन्नासएक हजार रुपये मिळाले. वर्षभर वेगवेगळा भाजीपाला घेत स्वतः विक्री केल्याने चांगला जम बसला.

घरच्यांची मोलाची साथ

  • आजोबा, आई, पत्नी सौ. जयश्री हे सगळे जण शेतातील सर्व कामे करीत दीपक यांचे कष्ट हलके करीत.
  • आजोबा सत्तरीच्या वयातही तरुणांना लाजवील अशी पेरणी बैलांद्वारे करतात. मजुरांची गरज कुटुंबाने कमी केली.

कर्ज परतफेडीला सुरवात
मित्रांमध्ये सुरू केलेल्या भिशीतून दीड लाख उचल घेतली. शेतातील उत्पन्नातून सावकाराचे पैसे काही प्रमाणात फेडले. चार एकरांपैकी एक एकर शेती सोडवून घेतली. सरकारी मदत एक लाख रुपयांची, त्यात सत्तर हजार नगदी व ३० हजार रुपये किमतीची ‘मुदत ठेव’ केली. सगळे घर एकजुटीने दीपक यांच्यामागे उभे राहिल्याने हत्तीचे बळ आले. पत्नीने सहा महिन्यांचे बाळ घरी आजी, सासूपाशी ठेवून शेतात राबण्याची हिंमत दाखवली. सन २०१६ च्या रब्बीत ज्वारी दीड एकर केली. तीस क्विंटल उत्पादन निघाले. हरभरा १० क्विंटल, तूर ५ क्विंटल व वाटाणा, ऊस अशा पिकांतून तिनेक लाखांचा माल निघाला. भाजीपाला दीड ते दोन लाखांचा झाला. यंदाच्या उन्हाळ्यात १० गुंठ्यांत कोथिंबीर ३५ हजार रुपयांची घेतली. कारली अर्धा एकर एक लाखांची झाली. दिवस-रात्र दीपकने एकच ध्यास घेतला. कर्ज फेडायचे व शेती फायद्यात आणायची.

स्थिर झालेली शेती
आज दीपक शेतीत स्थिर झाला आहे. नियमित उत्पन्न देणारी शेती करू लागला आहे. घर- संसार नेटाने सुरू आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त घर पुन्हा दीपकच्या प्रयोगशील शेतीतून सावरले आहे.शेतीतील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीकडे दीपक वळला आहे. शेतकरी गटांच्या माध्यमातून ज्ञानाची देवाणघेवाण करू लागला आहे. प्रगतीचा मार्ग त्याने स्वबळावर व कुटुंबाच्या आधारावर शोधला आहे. आजोबांच्या काळातील ७० फूट विहीर आहे. तिला पाणी नाही. औसा तालुका भीषण अवर्षणाचा भाग आहे. पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे. छोट्या शेततळ्यातल्या पाण्याचा थेंबन्‌ थेंब वापर करून दीपक भाजीपाला जगवतो आहे.

एक गुंठाही शेती विकणार नाही
वडिलांनी आत्महत्या केली तेव्हा अंगावर तेरा-चौदा लाखांचे कर्ज होते. कोवळा पोरगा त्याखाली अडकून शेती विकायला काढणार म्हणून अनेक जण शेती कधी विकतो याबद्दल टपून होते. पण आजोबांनी हिंमत दिली. एक गुंठाही शेती विकणार नाही. शेतीतूनच कर्ज फेडून दाखवितो, उलटे दोन-चार एकर शेती विकत घेऊन दाखवतो, अशी शपथ घेऊनच दीपक कामाला लागला. दररोज किमान एक हजार रुपये शिल्लक राहावेत असे वेगवेगळ्या भाज्यांचे नियोजन त्याने केले आहे. पायाला भिंगरी लागल्यागत शेती, आठवडी बाजार, घर अशा त्याच्या चकरा पहाटेपासून सुरू असतात. आज गावात एक होतकरू तरुण म्हणून दीपककडे अभिमानाने पाहिले जाते. तरुण शेतकरी मुलांचे तो श्रद्धास्थान झाला आहे.

संपर्क : दीपक विश्‍वंभर कदम, ८८०५०६२१६१

इतर अॅग्रो विशेष
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...
चौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनकमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व...
बदलत्या काळात बनली कलिंगड शेती...पाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला)...
संघर्ष, चिकाटी, एकोप्यातूनच लाभले...बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम...
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
‘सह्याद्री’ च्या शिवारात हवामान अाधारित...अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल या प्रणाली...