गटशेतीतून साधली संकटांवर मात

पीकपद्धती बदलाच्या वळणावर फैजलापूर भागात सोयाबीन प्रमुख पीक अाहे. गटातील शेतकरी या पिकासह तूर, मूग, उडीद, हरभरा, गहू घेतातच. काळानुरूप कांदा, लसूण, हळद, भुईमूग, दुधाळ जनावरांसाठी चारापिकेही ते घेऊ लागले अाहेत. दोन धरणे परिसरात असून या भागात पाण्याची मोठी समस्या आहे. मात्र सध्या बोअरवर सिंचन सुरू अाहे. बाजूने वाहणाऱ्या नदीवर बंधारा झाल्यास जलस्रोत अाणखी वाढणार असल्याने या बंधाऱ्याची तसेच शेतरस्त्यांची गरज या शेतकऱ्यांना अाहे.
कृषी अधिकाऱ्यांसमवेत ‘सारंगधर’ गटातील शेतकरी
कृषी अधिकाऱ्यांसमवेत ‘सारंगधर’ गटातील शेतकरी

पीक उत्पादन असो की मालाचे मार्केटिंग-विक्री असो, एकीचे बळ असेल तरच आजच्या खर्चिक शेतीतील बाबी सुलभ होतात. बुलडाणा जिल्ह्यात मेहकर- फैजलापूर शिवारात असंख्य प्रतिकूल बाबींवर मात करीत सारंगधर शेतकरी स्वयंसाह्यता गटातील सुमारे पंधरा शेतकऱ्यांनी त्याच हेतूने गटशेती सुरू केली आहे. पीकबदलासह कडधान्यांचे बीजोत्पादन व दुग्ध व्यवसायावर भर देत उत्पन्नवाढीबरोबर शेतीतील अडचणींवर मात केली आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, तुम्ही फक्‍त लढ म्हणा कवी कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ या कवितेतील या अोळी आहेत. कितीही संकटे अाली तरी लढण्याची हार मानली नाही. तुम्ही फक्त पाठबळ द्या, अाम्ही लढतो असा संदेश या अोळी देतात. शेतकरी तर कायम विविध समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला अाहे. सगळी प्रतिकूलताच बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील फैजलापूर शिवारात शेती असलेले शेतकरी एकत्र अाले ते शेतीतील एकमेकांच्या अडचणी सोडविण्यासाठीच. तालुका मुख्यालय असलेल्या मेहकरपासून फैजलापूर गाव अवघे चार ते पाच किलोमीटरवर आहे. या गावात अाजही एसटी बस जात नाही. पक्का रस्ता गावकऱ्यांना मिळालेला नाही. या गावातील पिढ्या वर्षानुवर्षे पांदण रस्त्यानेच ये-जा करीत वाढल्या. शेती काळी, कसदार अाहे. पण ना रस्ता होता ना वीज मिळत होती. एकीचे बळ सर्व प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी मेहकरमधील तरुण पिढी एकत्र अाली. त्यांनी सारंगधर शेतकरी स्वयंसाह्यता गटाची स्थापना काही वर्षांपूर्वी केली. त्याद्वारे गट कायम सक्रिय राहिला अाहे. गटातील सदस्यांनी दोन वर्षांपूर्वी तालुका मुख्यालयी संपूर्ण कुटुंब व जनावरांसह उपोषण केले. त्याची दखल घेत तब्बल दहा वर्षांच्या पुराव्यानंतर या शिवारासाठी स्वतंत्र वीज रोहित्र मिळाले. पांदण रस्त्यामुळे पावसाळ्यात शेतातही जाता येत नव्हते. अशा परिस्थितीत फैजलापूरला जोडणारा रस्ता व्हावा म्हणून ग्रामस्थ पाठपुरावा करीत अाहेत. सध्या हा मार्ग कच्चा अाहे. तो पक्का झाला तर असंख्य समस्या सुटू शकतात. गटशेतीचे स्वरूप

  • फैजलापूर शिवारात शेती असलेल्या १५ जणांचा गट. योगेश म्हस्के अध्यक्ष तर लक्ष्मीकांत खंडागळे सचिव
  • गटातील शेतकरी सोयाबीन, तूर, उडीद आदींचे बीजोत्पादन खासगी कंपन्यांसाठी घेतात.
  • गटातील सदस्यांची दरमहा बैठक
  • गटाच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून त्यात दरमहा प्रत्येक सदस्याककडून ३०० रुपये बचत
  • अातापर्यंत सुमारे तीन लाख ८८ हजार रुपये रकमेचे संककलन
  • गटातील तीन सदस्यांना एकूण एक लाख ८८ हजार रुपये रकमेची मदत
  • गटातील प्रत्येकाकडे दुधाळ जनावरे
  • दररोज सुमारे ४०० ते ५०० लिटर दूध संकलन. मेहकर येथील डेअरीला दूधपुरवठा
  • आजूबाजूच्या काही गावांतील सुमारे दोनशे शेतकऱ्यांचे गटासोबत ‘नेटवर्क’
  • मार्गदर्शनातून बदलली शेतीची दिशा फैजलापूर या दुर्लक्षित भागातील शेतकऱ्यांना सुधारित शेतीसाठी चालना देण्याचे काम मेहकरचे कृषी सहायक टी. व्ही. मेहेत्रे व जे. अार. विधाते यांनी केले. त्या दृष्टीने ‘वाल्मी’ संस्थेतील प्रशिक्षण, दूध व्यवसायासाठी गुजरात दौरा आदींमध्ये गटातील सदस्य सहभागी झाले. बीजोत्पादनावर भर -बाजारातील दरांपेक्षा बियाण्याला क्विंटलला पाचशे रुपये जास्त मिळतात. त्यातील काही खर्च वगळल्यास नफा चांगला मिळतो. -सोयाबीनचे एकरी १२ क्विंटल, तुरीचे ८ ते१० क्विंटल तर उडदाचेहे साधारण तेवढेच उत्पादन हाती येते. गटशेतीने काय साधले?

  • अापापल्या समस्या एकाच व्यासपीठावर मांडल्या जातात. सर्वांच्या विचारविनिमयातून त्यांची सोडवणूक
  • पीक उत्पादनासाठीच्या विविध निविष्ठा एकत्रित रीत्या खरेदी. त्यामुळे खर्चात मोठी बचत
  • फवारणी, मळणी किंवा अन्य कामांसाठी गटातील शेतकरीच एकमेकांना साह्य करतात. त्यातून मजूरबळाचीही मोठी बचत. एकमेकांकडील साहित्याची देवणाघेवाण
  • दरवर्षी माती परीक्षण करूनच खत व्यवस्थापन
  • कोणा सदस्याला आर्थिक गरज असेल, तर सर्वजण एकत्र येऊन निर्णय घेतात. त्यातून तातडीने रक्कम उपलब्ध.
  • कौटुंबिक, अारोग्यविषयक अडचणींमध्ये सर्वजण सुख-दुःखात धावून जातात. यामुळे एकटेपणाची भावना नाही. गट कायम अापल्यासोबत अाहे हे मोठे पाठबळ.
  • एखादा शेतकरी बाहेरगावी गेल्यास त्याच्या शेतीकामासाठी सहकारी धावून जातात.
  • जनावरांचे चारा-पाणी, दूध काढून डेअरीला देणे, शेत अोलित करणे अशी तातडीची कामे पार पाडतात.
  • एखाद्यावेळेस बियाण्याला अपेक्षित दर मिळत नसल्यास सर्वजण एकत्र येऊन त्याविषयी निर्णय घेतात. चर्चेतून मार्ग निघतो व दरात समाधानकारक वाढ शक्य होते.
  • गटशेतीमुळे पीक उत्पादन, त्याचा दर्जा वाढण्यास मदत झालीच. शिवाय वार्षिक एकरी साधारण एक लाख रुपये नफा हाती येत आहे.
  • योगेश म्हस्के- ९९२१३०३२९७ अध्यक्ष, सारंगधर शेतकरी स्वयंसाह्यता गट

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com