राजापुरी हळदीची नैसर्गिक शेती विषमुक्त हळद पावडर निर्मिती

राजापुरी हळदीची शेती.
राजापुरी हळदीची शेती.

गव्हाण (जि. सांगली) येथील नानासाहेब पाटील अनेक वर्षांपासून देशी राजापुरी हळदीची शेती करतात. आता संपूर्ण १०० टक्के नैसर्गिक पद्धतीने हळदीची शेती करून नैसर्गिक पद्धतीची हळद त्यांनी तयार केली आहे. ग्राहकांना विषमुक्त व सकस अन्न देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. ‘सोशल मीडियासह शेतकरी गटांच्या माध्यमातून त्यांनी या हळदीला मार्केट मिळवण्यास सुरवात केली आहे.   सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका द्राक्षाचा पट्टा म्हणून प्रचलित आहे. दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन आणि बेदाणा निर्मितीत इथल्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. तालुक्यातील गव्हाण येथील नानासाहेब भीमराव पाटील यांची सुमारे अडीच एकर बागायती तर चार एकर जिरायती शेती आहे.

आर्थिक सक्षमतेची शेती पद्धती नानासाहेबांच्या एकत्रित कुटुंबात सुमारे दोन ते अडीच एकरांवर हळदीचे क्षेत्र पूर्वीपासून असायचे. आजोबांपासून राजापुरी हळदीची लागवड व्हायची. पानमळाही होता. हळदीतून वर्षातून तर पानमळ्यातून वर्षभर पैसा मिळत राहायचा. द्राक्षबागही होती. या शेती पद्धतीमुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सक्षम होण्यास मदत व्हायची. जोडीला कुक्कुटपालनही केले जायचे. घरातील प्रत्येक सदस्याला विभागून जबाबदारी देण्यात आली होती.

पोल्ट्री व्यवसायात फटका नानासाहेबांकडे पोल्ट्रीची जबाबदारी होती. सुमारे १० हजार पक्षी होते. व्यवस्थापन नेटकेपणाने सुरू होते. सन २००५-०६ च्या दरम्यान राज्यात बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव झाला. दरम्यानच्या काळात अंड्याची विक्री कमी झाली. मागणीही कमी झाली. व्यवसाय तोट्यात जाऊ लागला. तो सावरणे कठीण झाल्याने बंद करावा लागला. सन २०१४ पर्यंत एकत्र कुटुंब पद्धतीनेच शेती केली जायची. त्यानंतर वाटण्या झाल्या.

कमी अनुभवामुळे नुकसानही शेतीच्या विभागणीनंतर हळदीचे क्षेत्र कमी झाले. मग १० गुंठे ते अर्धा एकरांपर्यंतच हळदीचे क्षेत्र ठेवण्यास सुरवात केली. यापूर्वी शेतीपेक्षा पोल्ट्री व्यवसायातीलच मुख्य अनुभव असल्याने धोका पत्करण्यापेक्षा कमी क्षेत्रात पिकांचे नियोजन सुरू केले. पिकांचा व बाजारपेठेचा अभ्यास केला. काहीवेळा हळदीला अपेक्षित दर मिळाले नाहीत. त्यात नुकसानही आले. पण न खचता मार्ग काढणे सुरूच ठेवले.

नैसर्गिक शेतीकडे मोर्चा मधल्या काळात नैसर्गिक शेतीची माहिती मिळाली. तसे पूर्वीही हळदीला रासायनिक निविष्ठांचा वापर कमीच व्हायचा. त्यातच मित्रांनी नैसर्गिक शेती करण्याचा सल्ला दिला. या पद्धतीने उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ व दर कसे राहतात याची माहिती घेण्यास सुरवात केली. त्यानुसार कवठेमहांकाळ तालुक्‍यातील (जि. सांगली) नैसर्गिक शेती करणाऱ्या गटांशी संपर्क केला. नानासाहेबांनी त्यानंतर हळदीच्या नैसर्गिक शेतीला सुरवात केली. पुढचे पाऊल म्हणून हळकुंड बाजारपेठेत विक्री न करता त्याची पावडर तयार केली तर उत्पन्नात किती वाढ होऊन याची चाचपणी सुरू केली. मित्र, नातेवाईक यांच्यासोबत चर्चा केली. बाजारपेठेत सेंद्रिय मालाला मागणी आहे असे समजले. त्यादृष्टीने शेतीतील व्यवस्थापन ठेवले.

हळद व्यवस्थापनातील बाबी

  • सुमारे वीस गुंठ्यात हळदीची लागवड
  • उत्पादन- सुमारे ५०० किलो (सुकवलेले)
  • देशी राजापुरी हळद बेण्याचा वापर
  • घरच्याच बियाण्याचा होतो वापर
  • बीजामृतामध्ये बुडवून अक्षय तृतीयेच्या दरम्यान लागवड
  • दशपर्णी अर्क, जीवामृत यांचा वापर
  • प्रक्रिया

  • शेतातून हळद काढणी केल्यानंतर न शिजवता काप केले जातात.
  • ते सावलीत सुकवण्यात येतात.
  • सांगली येथील हळद मिलमधून सहा रुपये प्रति किलो दराप्रमाणे त्याची पावडर तयार करून घेतली जाते.
  • उभारली विक्री व्यवस्था हळद पावडर तयार झाली. आता विक्री व्यवस्था उभारणे मोठे आव्हानात्मक होते. सुरवातीला मित्र, पाहुणे यांना विक्री सुरू केली. त्यांच्याकडून पावडरीच्या गुणवत्तेविषयी उत्तम प्रतिक्रिया आल्या. आत्मविश्वास वाढला. त्यानंतर परिसरातील लहान- मोठी कृषी प्रदर्शने पाहून त्याठिकाणी विक्री सुरू केली. आज ‘सोशल मीडिया’ हे प्रभावी माध्यम झाले आहे. त्यामुळे ‘फेसबुक’, ‘व्हॉटसअॅप’ यांचा आधार घेत हळद पावडरीचा प्रसार सुरू केला.

    गटाच्या व्यासपीठाचा फायदा नानासाहेब गावातील श्री सेवा नैसर्गिक शेती समूहाचे सचिव आहेत. हा गट नैसर्गिक शेतीत सक्रिय आहे. त्याचबरोबर कवठेमहांकाळ येथील श्री स्वामी समर्थ बचत गटाशीही तो जोडला आहे. त्यामुळे त्यांचाही हळद पावडर विक्रीसाठी उपयोग झाला. कवठेमहांकाळ येथेही समूहाने भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहे. याठिकाणी हळद पावडर विक्रीस ठेवली आहे. परिसरातील हॉटेल व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांनाही हळद पुरवण्यात येत आहे.

    पावडर विक्री, दर व पॅकिंग

  • मागील वर्षी- उत्पादन- ५०० किलो
  • यंदाचे उत्पादन- आत्तापर्यंत- ३०० किलो
  • मागील वर्षी १५० रुपये प्रति किलो दर ठेवला होता. यंदा तो २५० रुपये निश्चित केला आहे.
  • यंदा या दराने ८० किलो विक्री झाली आहे.
  • इस्लामपूर येथील प्रदर्शनात मागील वर्षी ५० किलो हळदीची २०० रुपये दराने विक्री केली.
  • पॅकिंग

  • १०० व २०० ग्रॅम- बरणी पॅकिंग
  • २५० ग्रॅम ते अर्धा किलो- प्लॅस्टिक पाऊच
  • सहकार्य हळदीव्यतिरिक्त नानासाहेबांची एक एकर द्राक्षबागही आहे. त्यांना शेतीसह हळदीचे काप करणे, पारवड पॅकिंग आदी कामांत पत्नी सौ. संगीता यांची मोठी मदत होते. रसायनांच्या अतिवापराने मानवी आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. प्रतिकार शक्ती घटू लागली आहे. ग्राहकांना सकस, आरोग्यदायी अन्न पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीनेच शेती करतो आहे. कृषी विभागाच्या सेंद्रिय शेती योजनेचा फायदाही मिळत आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीकडे वळणे महत्त्वाचे आहे. संपकर् ः नानासाहेब पाटील, ९२८४६९५९६९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com