agricultural success story in marathi, agrowon, gavshivar, Rohada, Pusad, Yavatmal | Agrowon

शेतीसह विकासकामांमध्येही उल्लेखनीय रोहडा
विनोद इंगोले
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

भाजीपाला, कापूस बीजोत्पादनाच्या माध्यमातून रोहडा (ता. पुसद, जि. यवतमाळ) गावाने विदर्भात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. पीकपद्धतीबरोबरच शेततळ्यांची उभारणी, जलसंधारणाची कामे, शोषखड्डे, स्वच्छतागृहांची उभारणी आदी विविध उपक्रमांतूनही गावाने विकासकामांमध्ये आघाडी घेतली आहे.

भाजीपाला, कापूस बीजोत्पादनाच्या माध्यमातून रोहडा (ता. पुसद, जि. यवतमाळ) गावाने विदर्भात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. पीकपद्धतीबरोबरच शेततळ्यांची उभारणी, जलसंधारणाची कामे, शोषखड्डे, स्वच्छतागृहांची उभारणी आदी विविध उपक्रमांतूनही गावाने विकासकामांमध्ये आघाडी घेतली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पुसदपासून सुमारे २९ किलोमीटरवर असलेल्या माळपठारावरील रोहडा गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजारांपर्यंत आहे. संरक्षित सिंचनाचे पर्याय नाहीत. गावातील शेतकऱ्यांद्वारे सोयाबीन, कापूस या पारंपरिक पिकांवरच भर दिला जातो. तरीही आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी कापूस बीजोत्पादनासारखा वेगळा पर्याय वापरण्याचे प्रयत्न गावातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून केले आहेत. सुमारे ८० टक्‍के शेतकरी भाजीपाला लागवड करतात. अर्धा ते दहा एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र ठेवणारे शेतकरी पाहण्यास मिळतात.

भाजीपाला शेतीतून स्वावलंबन
तालुक्‍याच्या ठिकाणापासून अवघ्या काही किलोमीटरवर रोहडा आहे. त्याचे सुमारे १२४५ हेक्‍टर भौगोलिक क्षेत्र असून, एकूण वहितीखाली क्षेत्र ११३४ हेक्‍टर आहे. यातील बहुतांश क्षेत्रावर भाजीपाला लागवड होते, असे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक यांनी सांगितले. पुसद, यवतमाळ, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात भाजीपाला पाठविला जातो. खुल्या शेतीला शेडनेट, पॉलिहाउस शेतीसाठीही कृषी विभागातर्फे प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषी विभागाच्या सहकार्याने गावात २८ शेततळी झाली आहेत.

कापूस बीजोत्पादकांचे गाव
सन १९८४- ८५ मध्ये पहिल्यांदा एका बियाणे कंपनीद्वारे गावात कापूस बीजोत्पादनाला प्रोत्साहन देण्यात आले. आज विविध कंपन्यांसाठी इथले शेतकरी बीजोत्पादन कुशलपणे घेतात.गावच्या अनुकरणातून सत्तरमाळ, बेलोरा, मारवाडी या लगतच्या गावांमध्येही बीजोत्पादनाला चालना मिळाली आहे. या गावांसाठी ही परिवर्तनाची जणू नांदीच ठरली आहे.

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका
गावात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा आहेत. परंतु उच्च शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूरक सुविधा गावात नव्हत्या. पुसद येथे तालुक्‍याच्या ठिकाणी राहून किंवा दररोज ८० किलोमीटर ये-जा करून शिक्षणाच्या सोयी विद्यार्थ्यांना मिळवाव्या लागतात. ही अडचण लक्षात घेऊन एका खासगी बॅंकेच्या सहकार्याने गावात अभ्यासिकेची उभारणी करण्यात आली. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ पुस्तक उपलब्ध करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अभ्यासिकेसाठी लागणाऱ्या विजेसाठी सौरऊर्जेचा आधार घेतला आहे.

सौरऊर्जेने उजाळली शाळा, अंगणवाडी
गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी ग्रामस्थांच्या पुढाकाराने ‘डिजिटल’ करण्यात आली. परंतु या ठिकाणी विजेची उपलब्धता होण्यात अनेक अडचणी आल्याने ‘डिजिटल’ शाळेचा उद्देश साध्य होत नव्हता. यावर सौरऊर्जेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात यश आले. सौरऊर्जा उपकरणांमुळे शाळेचा विजेवर होणारा खर्च वाचला आहे.

दिलासा संस्थेचे डोह मॉडेल
माळपठारावर असलेल्या या गावात सिंचनाच्या अपेक्षित सोयी नाहीत. त्याची दखल घेत मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची अनेक कामे प्रस्तावित आहेत. भूगर्भातील जलस्रोतांचे बळकटीकरण हा त्यामागील उद्देश आहे. त्यानुसार दिलासा संस्थेचे डोह मॉडेल येथे साकारण्यात आले आहे. नाला खोलीकरण करून बंधारा घेतला जातो. या माध्यमातून पाणी अडविण्यात येऊन सिंचनासाठी त्याचा उपयोग होतो.

गावात झाली २८ शेततळी
शेततळेसंदर्भात व्यापक जागृती करण्यात आल्यानंतर त्याचे महत्त्व ग्रामस्थांना पटले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला. परिणामी, एकही शेततळे नसलेल्या या गावात टप्प्याटप्प्याने तब्बल २८ शेततळी पूर्णत्वास गेली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या या शेततळ्यांमध्ये मत्स्यव्यवसाय करणार असल्याची इच्छा काही शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली.
शेततळ्यांमुळे विहिरीच्या पाण्याची पातळीही वाढीस लागली आहे.

सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे
घर तिथे शोषखड्डा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. सुमारे १०० शोषखड्ड्यांचे काम पूर्णत्वास गेले अाहे. या माध्यमातून सांडपाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनाचा उद्देश साधला जाणार असल्याचे मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानाचे प्रवर्तक बाळू राठोड यांनी सांगितले.

स्वच्छतागृहांची उभारणी
गावात एकूण ६५० घरे आहेत. यातील केवळ २५० कुटुंबीयांकडेच स्वच्छतागृहे होती.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गावातील सर्व कुटुंबीयांना स्वच्छतागृहांसाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्या माध्यमातून ३७५ पेक्षा अधिक स्वच्छतागृहे पूर्णत्वास गेली असून त्यांचा वापर केला जात आहे.

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड
तीन हजारांवर लोकसंख्येच्या या गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची निवड पहिल्यांदाच बिनविरोध झाली. येथे नऊ सदस्यीय ग्रामपंचायत अाहे. गावात विरोधाला थारा नसावा यासाठी सामूहिक निर्णय घेत ग्रामस्थांनी सर्व सदस्यांच्या बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला. सरपंचनिवडीसाठीही हीच पद्धत वापरण्यात आली. त्याआधारे सरपंचपदी संजय डोईफोडे यांची निवड करण्यात आली.
 
असे आहे रोहडा

 • एकूण भौगोलिक क्षेत्र- १२४५. ८१ हेक्‍टर
 • एकूण वहितीखालील क्षेत्र- ११३४ हेक्‍टर
 • अल्पभूधारक शेतकरी संख्या- १२६
 • अत्यल्पभूधारक शेतकरी संख्या- २६३
 • पाच एकरांपेक्षा अधिक क्षेत्र असलेले शेतकरी- १६१
 • भूमिहीन शेतमजूर- ३०५
 • विहिरी- ४५
 • शेततळी- २८
 • फळबाग लागवड- ३ हेक्‍टर
 • शेतकरी बचतगट- १४
 • प्रक्रिया उद्योग- १
 • विहीर पुर्नभरण- १

पारंपरिक पिकांसोबत रोहडा गावात कापूस बीजोत्पादन, भाजीपाला यांसारखी व्यावसायिक पिके घेतली जातात. गावातील ८० टक्‍के शेतकरी भाजीपाला घेत असल्याने दररोज खेळता पैसा राहतो.
आर्थिक शाश्वती आलेल्या या गावात जलसंधारण व अन्य स्रोतांच्या उभारणीचे व्यापक प्रकल्प राबविण्यात आले आहेत. एक प्रकारे परिवर्तनवादी गाव असेच रोहडाला म्हणता येईल.
- डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, यवतमाळ

‘‘आम्हा दोघा भावंडांचे एकत्रित कुटुंब आहे. बावीस एकर शेती असून अडीच एकरांवर भाजीपाला घेतला जातो. या पिकांमधून आम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर झालो आहोत.
मारोती टोम्पे, ७७९८६७३८४४
रोहडा, जि. यवतमाळ

 
गावात राबविणार विविध उपक्रम
गावशिवारात सिंचन सुविधांच्या बळकटीकरणाच्या हेतूने लघुसिंचन प्रकल्प असावा अशी इच्छा आहे. त्याकरिता यवतमाळ जिल्हा परिषद सिंचन विभागाला प्रस्ताव दिला आहे. सौरऊर्जानिर्मिती केंद्राची उभारणीही प्रस्तावित आहे. त्याआधारे गावाला लागणारी वीज गावातच उत्पादित केली जाईल.
संजय डोईफोडे, सरपंच

शेतीपूरक व्यवसायातून समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या रोहडा गावाचा ग्रामविकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये स्वतंत्र व आदर्श ग्रामपंचायत उभारणे, क्रीडांगण सपाटीकरण, व्यायामशाळा, दलितवस्ती योजनेतून पाणीपुरवठा, पाइपलाइन, शाळेला आवारभिंत, जनावरांचे हौद बांधकाम, महिला स्वयंसहाय्यता समूहांची बांधणी, शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा, गटशेती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन आदी विकास कामे पूर्ण केली जातील.
- बाळू राठोड
मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान प्रवर्तक, रोहडा

 
माझी ३० एकर शेती असून आठ एकरांवर भाजीपाला घेतो. यवतमाळ, पुसद, चंद्रपूर, नागपूर येथे विक्री करतो. त्यातून खेळता पैसा उपलब्ध होतो.
- मदन पोपळघट

‘‘अर्धा एकरावर भाजीपाला, तर दोन एकरांवर कपाशी बीजोत्पादन घेतो. दैनंदिन गरजांची पूर्तता त्यातून होते.’’
- गोविंद वानखडे

संपर्क ः संजय डोईफोडे, ९८५०७००००९ (सरपंच)
बाळू राठोड - ९८८१३२३५४३

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
वासंतीकरणाच्या प्रक्रियेतील तापमानाचे...वसंताच्या आगमनामुळे प्रत्येक वनस्पती किंवा...
मराठवाड्यात ‘रेशीम’ला रिक्त पदांचे...औरंगाबाद ः राज्याला रेशीम उद्योगात उदयोन्मुख...
खानदेशात पपई लागवडीत होणार निम्म्याने...जळगाव : खानदेशात आगाप पपई लागवडीला सुरवात झाली...
रशियाला द्राक्ष निर्यातीत ‘क्लिअरिंग’चा...नाशिक : भारतीय द्राक्षाचा रशिया मोठा आयातदार आहे...
वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखापुणे ः अकोला जिल्ह्यातील देवरी (ता. अकोट),...
लाल वादळ मुंबईकडे झेपावलेनाशिक : गेल्या वर्षभरापासून आश्‍वासन देऊनही...
शेतकरी प्रतिनिधींची ऊस दर नियंत्रण मंडळ...पुणे: ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत शेतकरी...
जलसंधारण विभागाच्या आकृतिबंधास मान्यतामुंबई: नागपूर व पुणे येथे अपर आयुक्त तथा मुख्य...
नाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द करणारः...मुंबई: नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी...
सुपीक जमीन, नियोजनातून वाढविली...हणमंतवडिये (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील राहुल...
शेडनेट, रेशीमशेती, भाजीपाला लागवडीतून...विडूळ (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील सदानंद...
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...