agricultural success story in marathi, agrowon, guava production, kelvad, buldana | Agrowon

दोन एकरांतील पेरू बागेने आणली समृद्धी
गोपाल हागे
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल आणि त्या दिशेने प्रयत्न केले तर यश मिळण्यास अडचण येत नाही. निवृत्ती पांडुरंग पवार (केळवद, जि. बुलडाणा) यांच्याबाबत हेच म्हणता येते. दोन एकरांत पेरू बागेचे चांगेल नियोजन करून केले. उत्पादन व गुणवत्ता यात सातत्य ठेवत प्रयोगशीलता जपली.
त्यातून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिलेच. शिवाय मुलामुलींना उच्चशिक्षित बनविण्यात कुठेही कसर ठेवली नाही.

इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल आणि त्या दिशेने प्रयत्न केले तर यश मिळण्यास अडचण येत नाही. निवृत्ती पांडुरंग पवार (केळवद, जि. बुलडाणा) यांच्याबाबत हेच म्हणता येते. दोन एकरांत पेरू बागेचे चांगेल नियोजन करून केले. उत्पादन व गुणवत्ता यात सातत्य ठेवत प्रयोगशीलता जपली.
त्यातून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिलेच. शिवाय मुलामुलींना उच्चशिक्षित बनविण्यात कुठेही कसर ठेवली नाही.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात केळवद येथील पांडुरंग पवार यांची चार एकर शेती असून त्यांनी चार मुलांना विभाजीत करून दिली आहे. पैकी निवृत्ती हे स्वतःच्या वाट्याला आलेली एक एकर आणि भावाची एक एकर अशा शेतीची जबाबदारी सांभाळतात.

पेरू झाले मुख्य पीक

पवार यांचे पेरू हे मुख्य पीक आहे. स्वतःचे व भावाचे असे दोन एकर क्षेत्र त्यांनी पेरूला दिले आहे. साधारण १४ वर्षांपूर्वी लागवडीचा श्रीगणेशा केला. लखनऊ ४९, सरदार व जी विलास अशा तीन जाती त्यांच्याकडे पाहण्यास मिळतात. निवड पद्धतीने काही रोपे विकसित केल्याचा दावाही पवार करतात. हा पेरू अाकाराने मोठा असून त्याचा टिकाऊपणा चांगला आहे. बियाही नरम आहेत. त्यामुळे ग्राहकांची त्यास पसंती मिळत असल्याचे ते सांगतात.

पेरूचे व्यवस्थापन

जुन्या बागेत सुमारे २०० झाडे आहेत. ही लागवड २० बाय २० फूट अंतरावरील आहे. जसजसा पेरू शेतीतील आत्मविश्‍वास, कौशल्य वाढत गेले. बाजारपेठेत चांगले नाव मिळवता आले तसतसे पवार यांनी पेरू व्यवस्थापनात सुधारणा सुरू केल्या. आज त्यांच्याकडे १० बाय १० फूट अंतरावरील झाडेही पाहण्यास मिळतात. नवी व जुनी मिळून सुमारे ५२० झाडांचे संगोपन होते. मृग व हस्त असे बहर घेतले जातात. दिवाळीपासून ते फेब्रुवारीपर्यंत विक्रीचा मुख्य हंगाम आटोपतो.

उत्पादन

जुनी झाडे अधिक उत्पादन देतात. सध्या प्रतिझाड १०० ते १२५ किलोपर्यंत उत्पादन मिळते. एका बहरात सुमारे ७०० ते ८०० क्रेट पेरू मिळतात.

पेरूने दिली ओळख; ‘मार्केटिंग’मध्ये पुढाकार

बुलडाणा जिल्ह्याचे वातावरण पेरूसाठी अत्यंत अनुकूल समजले जाते. त्यातही चिखली तालुका हा प्रामुख्याने पेरूचे माहेरघर झालेला आहे. या जिल्ह्यात उत्पादित होणारा पेरू जिल्ह्याच्या नावाने बाजारपेठांमध्ये विकला जातो. व्यापाऱ्यांना बांधावर माल देण्यापेक्षा विविध बाजारपेठांमध्ये जाऊन मार्केटिंग करण्यावर पवार यांचा भर असतो. स्थानिकमध्ये अकोला व खामगाव या त्यांच्यासाठी हक्काच्या बाजारपेठा आहेतच. मात्र आपल्या दर्जेदार पेरूची नागपूर, सुरत, अहमदाबाद आदी बाजारपेठांतही त्यांनी ओळख तयार केली आहे. पेरूचा एकसारखा आकार, चमक, गोडी यात त्यांनी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नोटाबंदी होण्यापूर्वी दर चांगले मिळायचे. पण आता ते किलोला २० ते २५ रुपयांपर्यंत मिळतात. कमाल दर सुरत येथे किलोला ५५ रुपयांपर्यंत मिळवल्याचे त्यांनी सांगितले. सर्व खर्च जाऊन एकरी ७५ हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो असे ते सांगतात.

सेंद्रिय पद्धतीवर भर

बागेचे व्यवस्थापन करताना प्रामुख्याने सेंद्रीय, जैविक निविष्ठांचा वापर करण्यावर भर असतो. शेतातील काडी कचरा, गवत कुजवून त्याचे खत झाडांना दिले जाते. निंबोळी पेंड विकत घेतली जाते. साधारण प्रतिझाड दोन किलो याप्रमाणे त्याचा वापर होतो. साधारणतः १५ मे दरम्यान छाटणी केली जाते. त्यानंतर जुन्या झाडांना प्रतिझाड ३० किलो शेणखत तर नव्या झाडाला १५ किलोपर्यंत शेणखत दिले जाते. ते शेजारील शेतकऱ्याकडून विकत घेण्यात येते. रोगांना प्रतिबंध म्हणून बोर्डो मिश्रणाची फवारणी केली जाते. दर १५ दिवसांतून दोन वेळा जीवामृत देण्यात येते. सेंद्रिय पद्धतीच्या वापरामुळे रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी झालाच शिवाय फळांची प्रतही सुधारली असे पवार यांनी सांगितले.

मुलांना उच्च शिक्षण दिले

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले निवृत्ती यांना काही कारणांमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. मात्र आपली मुले शिक्षणात मागे राहू नयेत अशी पवार यांची तीव्र इच्छा होती. त्यांना दोन मुली व एक मुलगा अाहे. मोठ्या मुलीने बीएस्सी व डीएमएलटीचे शिक्षण पूर्ण केले आहे. दुसरी मुलगी ‘बीएसएस्सी मायक्रो बॉयोलॉजी’ चे शिक्षण घेत अाहे. मुलगा बारावीला असून विज्ञान हा त्याचा विषय अाहे.

पूरक व्यवसायाची जोड

पेरू बागेत अांतरपिके घेण्याचा प्रयत्न असतो. त्यातून पूरक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न असतो. शेतीला उत्पन्नाची जोड म्हणून मिनी डाळमील व्यवसायही पवार चालवतात. त्याद्वारे तूर, उडीद, मूग, हरभरा डाळी बनवून देण्याचे काम ते करतात.

अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन

चिकित्सक बुद्धी व अभ्यासूवृत्ती यातून पवार यांनी पेरू शेतीत हातखंडा मिळवला. छाटणी तंत्र, लागवड अंतर, फूलगळ, कीड नियंत्रण आदी विविध बाबींसंदर्भात त्यांचा १४ वर्षांचा मोठा अनुभव तयार झाल्याने पेरूतील ते जणू मास्टरच झाले आहेत. या भागात नव्याने पेरू लागवड करणारे किंवा जुन्या बागांमध्येही काहीही समस्या असेल तर पवार त्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रेरणेतून परिसरात सुमारे १२ ते १५ एकरांपर्यंत पेरूची लागवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना रोपनिर्मितीपासून सर्व तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले जाते.

निवृत्ती पवार, ९७६५६८७६९०

 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
मातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...
स्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
कमी कालावधीच्या हळदीची शेती; काबुली...महागाव (जि. यवतमाळ) येथील ‘एमबीए’ झालेले जयंत...
कमी पाणी, अल्प खर्चातील ज्वारी ठरतेय...जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा नदीच्या काठावरील...
पेरू फळबागेने दिली शेतीला दिशाठाणे शहरात महावितरणमधील नोकरी सांभाळून तुषार वसंत...
शेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मातआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश...
थोरातांची राजगिऱ्याची व्यावसायिक शेतीपरभणी जिल्ह्यातील खानापूर (ता. परभणी) येथील तरुण...
दुष्काळी परिस्थितीत नैसर्गिक शेती...शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा...
हुरड्यातून साधला हमखास उत्पन्नाचा मार्गदरवर्षी खास हुरड्याची ज्वारी करायची आणि तीन...
संघर्ष, चिकाटीतून साकारलेला ...जालना जिल्ह्यात कायम दुष्काळी शिरनेर येथील देवराव...
अंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याचे `...कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्त...
अभ्यास, योग्य नियोजनातून प्रक्रिया...शेतीमाल प्रक्रियेतून अधिक नफा मिळविता येऊ शकतो,...
तंत्रज्ञानातून शेती केली समृद्धरोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील अविनाश बबनराव...
प्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...
शिक्षण, ग्रामविकासाला `श्रमजीवी'ची साथसातारा जिल्ह्यातील श्रमजीवी जनता सहायक मंडळ ही...
उत्कृष्ट रेशीम कोष उत्पादनासह चॉकी...शेती केवळ चार एकर. पैकी साडेतीन एकरांत केवळ तुती...