बारमाही उत्पन्नासाठी फुलशेतीचा अंगीकार

फूल शेतीतून प्रगती फुलांच्या विक्रीतून सोळंके कुटूंबाला दररोज ताजे उत्पन्न मिळते. महिन्याला सुमारे ४० हजार रुपयांचे उत्पन्न त्यातून येते. याच फूल शेतीतील उत्पन्नातून घरखर्च चालतो. अन्य पिकांतील उत्पन्न शिल्लक राहते. त्यातून सोळंके कुटुंबीयांनी गावात नवीन घराचे बांधकाम केले आहे. शेतीकामासाठी ट्रॅक्टर खरेदी केला आहे.
काशिनाथ आणि रामचंद्र सोळंके
काशिनाथ आणि रामचंद्र सोळंके

बारमाही उत्पन्न देणाऱ्या व मुख्य पारंपरिक पिकांपेक्षाही परवडणाऱ्या अशा फूल शेतीचा अंगीकार हयातनगर (जि. हिंगोली) येथील काशिनाथ अप्पाराव सोळंके कुटुंबीयांनी केला. एकीचे बळ, कष्ट, सातत्य, चिकाटी यांच्या जोरावर सुमारे सोळा वर्षांपासून सुरू ठेवलेल्या फूल शेतीतील समृद्धीचा सुगंध आज सोळंके कुटुंबात दरवळत आहे. वसमत- परभणी राष्ट्रीय महामार्गापासून दक्षिणेकडे सात किलोमीटरवर हिंगोली जिल्ह्यातील हयातनगर गाव आहे. गावच्या शिवारातून जाणाऱ्या सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याला लागून काशिनाथ सोळंके यांची हलक्या ते मध्यम स्वरूपाची १२ एकर जमीन आहे. सिंचनासाठी विहीर, बोअरची व्यवस्था आहे. काशिनाथ यांना बाबाराव (थोरले) आणि रामचंद्र (धाकटे) अशी दोन मुले आहेत. एकत्रित कुटुंबपद्धती आहे. पारंपरिक पिकांपेक्षा परवडते फूल शेती खरिपात कापूस, हळद, सोयाबीन, मूग; तर रब्बीत गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके घेतली जातात. कपाशीत उडदाचे आंतरपीक घेतले जाते. मात्र हवामान, दर, मार्केट यांचा विचार करता ही पिके बेभरवशाची ठरतात. त्यामुळे नियमित उत्पन्न देणारे पीक असावे, अशी सोळंके यांची धारणा होती. त्यादृष्टीने शोध घेऊन फूल शेतीचा पर्याय त्यांनी निवडला. सन २००० पासून फूल शेतीत त्यांचे सातत्य आहे. फूल शेतीचा प्रवास चार गुंठ्यांत गलांडा फुलाची लागवड करून सोळंके बंधूंनी फूल शेतीला सुरवात केली. चांगले उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे फूल शेतीवरच अधिक लक्ष केंद्रित केले. टप्प्याटप्प्याने गुलाब, निशिगंध घेऊ लागले. बाजारभाव, फुलांची मागणी आदी बाबींचा अभ्यास झाला होता. पीक व्यवस्थापनातील बारकावे देखील अनुभवातून समजू लागले होते. मग बारमाही उत्पादन देऊ शकणाऱ्या गुलाबांची व त्यातही शिर्डी गुलाब नावाने प्रसिद्ध वाणाची २०१० मध्ये लागवड केली. सध्याची फूल शेती

  • एकूण सुमारे तीन एकरांवर
  • यात गुलाब- दीड एकर, निशिंगध १० गुंठे, लिली २० गुंठे, तर गलांडा, शेवंती प्रत्येकी पाच गुंठे अशी वर्गवारी
  • दसरा-दिवाळी सणासाठी दरवर्षी सुमारे १० गुंठ्यांत झेंडू
  • असे करतात व्यवस्थापन

  • काशिनाथ, रामचंद्र आणि बाबासाहेब यांच्यासह कुटुंबातील महिला सदस्य आदी मिळून सुमारे आठ ते नऊजण शेतीचे व्यवस्थापन, फूल तोडणी आदी कामे करतात. प्रसंगी एखाददुसऱ्या मजुराला बोलवावे लागते.
  • बाबासाहेब यांच्यावर नांदेड येथील मार्केटमध्ये फूल विक्रीची जबाबदारी
  • ठिबक, तुषार संचाद्वारे पाणी. ठिबकद्वारे द्रवरूप खतांचा वापर
  • दोन म्हशी आहेत, त्यामुळे शेणखत उपलब्ध होते.
  • आर्थिक नुकसान पातळी ओळखून कीड नियंत्रण
  • उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फूल बागेभोवती चारा पिकांची लागवड
  • जमिनीची फेरपालट, त्यामुळे चांगले उत्पादन मिळते.
  • सकाळी लिलीची फुले तोडल्यावर दिवसा पाण्यात ठेवली जातात. शिर्डी गुलाबाचा तोडा संध्याकाळी, तर दांडी गुलाब तसेच निशिगंधाची तोडणी पहाटे चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत.
  • नांदेड मार्केटमध्ये विक्री सुरवातीच्या काळात जवळच्या वसमत शहरात विक्री केली जायची; परंतु तेथे मर्यादित मागणी असते. नांदेड येथे मोठे फूल मार्केट आहे, तेथे फुले नेली जातात. दररोज तोडणीनंतर गुलाब, लिली फुलांच्या गड्ड्या तयार केल्या जातात. मोकळी फुले पिशव्यांमध्ये भरली जातात. फुलांच्या पिशव्या दुचाकीवर बांधून सकाळी सहाच्या सुमारास पंधरा किलोमीटरवरील पूर्णा रेल्वे स्टेशन गाठावे लागते. सकाळी आठ वाजेपर्यंत नांदेड येथे पोचवली जातात. रोजचे उत्पादन, रोजची विक्री

  • ताज्या फुलांना चांगले दर मिळतात. मात्र त्यासाठी ऊन, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता तोडणीचे वेळापत्रक काटेकोर पाळावे लागते.
  • दांडीच्या गुलाबाचे बारमाही उत्पादन मिळते. चांगला बहर असताना दररोज ८० ते १०० गड्ड्या फुले मिळतात. एरवी मात्र ४० ते ५० गड्ड्या मिळतात. दांडीच्या गुलाबाच्या प्रतिगड्डीस (१० फुले) सरासरी १० रुपये दर मिळतो. शिर्डी गुलाबाची दररोज २० ते २५ किलो फुले तोडणीस येतात. त्यांची वजनावर विक्री होते.
  • निशिगंधाची दररोज १० ते १२ किलो फुले तोडली जातात. त्यास ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दर मिळतो.
  • गलांडाची दररोज सुमारे १५ किलो फुले उपलब्ध होतात.
  • लिलीच्या फुलांचा ४० कांड्याचा नग. दररोज असे सरासरी १०० नग विक्रीसाठी तयार केले जातात. एप्रिल ते सप्टेंबर हा कालावधी लिली फुलांना मानवतो.
  • दरवर्षी जूनमध्ये शेवंतीची लागवड. आॅक्टोबरमध्ये फुलांचा हंगाम सुरू होतो, तो हिवाळ्यामध्ये जोरदार असतो.
  • दसरा, दिवाळी, तुलसी विवाहापर्यंत झेंडूचा हंगाम. यंदा सरासरी ४० रुपये प्रतिकिलो दर.
  • लग्नसमारंभांतील सजावटीतून उत्पन्नवाढ बाबाराव यांचा मुलगा ज्ञानेश्वर वसमत येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतो. तोही विक्रीत मदत करतो. लग्न, सत्कार, धार्मिक समारंभ आदी कार्यक्रमांसाठी कुटुंबातील महिला सदस्य हार तयार करतात. ज्ञानेश्वर कार्यक्रमांमधील स्टेज, वाहनांची फूल सजावट अादी कामे करतात, त्यामुळे व्यवसायाचे मूल्यवर्धन होऊन अधिक फायदा होतो. लग्नकाळात एका वाहनामागे आठशे ते नऊशे रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. ‘अॅग्रोवन’ मार्गदर्शक सोळंके सुरवातीपासून ‘अॅग्रोवन’चे वाचक आहेत. दर आठवड्याला दिल्या जाणाऱ्या विभागनिहाय हवामान अंदाजानुसार कामांचे नियोजन केल्यामुळे त्यांना फायदा झाला आहे. राज्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांच्या यशकथा त्यांना प्रेरणादायी ठरतात. तज्ज्ञांचे तांत्रिक लेखही उपयुक्त ठरतात. स्थानिक वर्तमानपत्र विक्रेत्यास फुले देऊन अॅग्रोवनचा अंक घेत असतो, असे रामचंद्र सोळंके यांनी सांगितले. संपर्क- बाबाराव सोळंके - ९८५०८६०८५२ रामचंद्र सोळंके - ९७६३११६१७९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com