...तिच्या कर्तृत्वापुढं शब्दही झाले मुके ! video

ज्योतीताईंच्या करुण कहाणीनं उपस्थितांचं मन हेलावलं अन् भावविवश झालेल्या सभागृहानं उभा राहून ज्योतीताईंच्या कर्तृत्वाला सलाम केला. अॅग्रोवन स्मार्ट अॅवॉर्ड पुरस्कारातील हे एक वेगळं नाव, वेगळं कर्तृत्व, ज्यानं सगळं संपलं म्हणता म्हणता... जगायला, लढायला पुन्हा उभं राहायला त्यांना प्रेरणा दिली.
श्रीमती ज्योती देशमुख यांना स्मार्टकेम टेक्नाॅलाॅजीचे उपाध्यक्ष (मार्केटिंग व स्ट्रॅटेजीज) नरेश देशमुख यांच्या हस्ते अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
श्रीमती ज्योती देशमुख यांना स्मार्टकेम टेक्नाॅलाॅजीचे उपाध्यक्ष (मार्केटिंग व स्ट्रॅटेजीज) नरेश देशमुख यांच्या हस्ते अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

अॅग्रोवन प्रेरणा अॅवॉर्ड :  श्रीमती ज्योती देशमुख, कट्यार, ता. जि. अकोला ----------------------------------------- कुटुंबातल्या तीन कर्त्या पुरुषांना हिरावून घेणाऱ्या नियतीला तिने आज हरवलं होतं... तिच्या कर्तृत्वापुढं नियतीही ठेंगणी झाली... जस जसा तिच्या धैर्याचा, जिद्दीचा पट उलगडला गेला, तसतसा तिच्या संघर्षाच्या कहाणीनं उपस्थितांचं मन हेलावलं अन्‌ शब्दही काहीसे मुके झाले. अॅग्रोवन प्रेरणा पुरस्काराने सन्मानित झालेल्या अकोला जिल्ह्यातील कट्यार येथील श्रीमती ज्योती देशमुख यांच्या या कर्तृत्वाला उपस्थितांनी मग थेट उभं राहूनच सलाम केला.  अॅग्रोवन स्मार्ट अॅवॉर्डच्या दिमाखदार सोहळ्यात ज्योती यांना मिळालेल्या प्रेरणा पुरस्काराने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजीचे उपाध्यक्ष नरेंद्र देशमुख आणि सहयोगी उपाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. नापिकी, शेतमालाचे कोसळलेले दर आणि भरून न निघणारा शेतीतला तोटा, या परिस्थितीसमोर हात टेकलेल्या कुटुंबातल्या तीन कर्त्या पुरुषांनी एकापाठोपाठ एक करत जीवनयात्रा संपवली असताना ती डगमगली नाही, उमेद हरली नाही, मोठ्या जिद्दीनं, हिमतीनं उभी राहिली, जगण्याचा संघर्ष केला. जवळपास २९ एकर शेतीचा पसारा स्वतः हातात घेतला. यापूर्वी कधीही शेतीत न गेलेल्या ज्योती यांनी मोठ्या धाडसाने शेती कसण्यास सुरवात केली. लोकांनी नावं ठेवली; पण त्याकडं दुर्लक्ष करत सोयाबीन, कापूस, हरभरा या पिकांच्या उत्पादनवाढीत आघाडी घेतली. त्यातून सावरत त्यांनी कुटुंबाला स्थिरस्थावर केलं. ज्योती यांच्या या कर्तृत्वाची माहिती एका चित्रफितीतून सांगितली जात होती, तेव्हाच त्यांच्याकडं पाहून खऱ्या अर्थानं प्रेरणादायी अशा त्यांच्या कामगिरीचं सगळ्यांनाच अप्रूप वाटलं. पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या जेव्हा मंचावर आल्या, तेव्हा दोन शब्द बोलण्यासाठी आग्रह झाला. त्या म्हणाल्या, ‘‘लोकांनी नावं ठेवली, बाईनं कधी शेती केली का? लोकांच्या बोलण्याकडं दुर्लक्ष केलं. घर चालवायचं, मुलाचं शिक्षण करायचं, थांबून चालणार नव्हतं. निर्णय घेतला, रात्री अपरात्री शेतात जावं लागे, पिकाची राखण करणं, पाणी देणं, अशी सगळी कामं केली, स्वतःच्या शेतात काम करायला लाज आणि भीती कसली, अन माझ्यासमोर दुसरा पर्यायही नव्हता. त्या सांगत होत्या, तेव्हा क्षणभर त्यांचे डोळे भरले, शब्दही मुके झाले. त्यांच्या करुण कहाणीनं उपस्थितांचं मन हेलावलं अन् भावविवश झालेल्या सभागृहानं उभा राहून त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला. अॅग्रोवन स्मार्ट अॅवॉर्ड पुरस्कारातील हे एक वेगळं नाव, वेगळं कर्तृत्व, ज्यानं सगळं संपलं म्हणता म्हणता... जगायला, लढायला पुन्हा उभं राहायला प्रेरणा दिली.   स्मार्टकेमकडून २१ हजारांचे साह्य ‘स्मार्टकेम’चे उपाध्यक्ष नरेंद्र देशमुख यांनी पुरस्कार प्रदान केला, तेव्हा त्यांनीही ज्योतीताईंच्या धैर्याला, जिद्दीला दाद देत त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं आणि कंपनीकडून २१ हजार रुपयांचे साह्य खतांच्या रूपाने देत असल्याचे जाहीर केले. यशोगाथेसाठी क्लिक करा पुढील लिंक.... http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-lady-farmer-jyoti-deshmukh-inspirational-success-story-4450

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com