पाषाण फोडून कष्टाने फुलवले पाॅलीहाऊसमध्ये गुलाबाचे नंदनवन

एकत्रित काम केल्यानेच यश कुटुंब एकत्रित असल्यामुळेच शेतीत यश मिळवणे मोहोळ यांना शक्य झाले आहे. आज शेतीची संपूर्ण जबाबदारी नव्या पिढीतील सतीश सांभाळतात. त्यांचे मोठे बंधू संतोष वाहन उद्योगातील आघाडीच्या कंपनीत तर धाकटे बंधू सचिन खत उद्योगातील कंपनीत कार्यरत आहेत. दोघे बंधू वेळ मिळेल त्यानुसार शेतीत हातभार उचलतात. वडील वाघू शेतीसह आर्थिक बाबतीत मुलांना मार्गदर्शन करतात. शेतीतील उत्पन्नातूनच मुलांची शिक्षणे व पुढील प्रगती करणे शक्य झाल्याचे समाधान असल्याचे वाघू सांगतात.
पाॅलीहाऊसमधील गुलाब शेतीत हुकमी अोळख तयार केलेले मोहोळ कुटुंब.
पाॅलीहाऊसमधील गुलाब शेतीत हुकमी अोळख तयार केलेले मोहोळ कुटुंब.

पुणे जिल्ह्यातील कडधे (ता. मावळ) येथील वाघू मोहोळ कुटुंबाने एक तपाहून अधिक काळ पॉलिहाउसमधील गुलाब शेतीत सातत्य ठेवत त्यात हुकमी अोळख तयार केली आहे. अत्यंत कष्टाऊ वृत्ती, उत्कृष्ट शेती व्यवस्थापन, प्रयोगशीलता, कुटुंबातील सर्वांची साथ, दूरदृष्टी आदी विविध गुणांच्या जोरावर या शेतीचा विस्तार त्यांनी केला. सुमारे एकरा वर्षांपासून व्हॅलेंटाइन डेसाठी गुलाबाच्या निर्यातीत सातत्य हेदेखील त्यांच्या शेतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पुणे जिल्ह्यातील तळेगाव, मावळ हा परिसर फुलशेतीसाठी व त्यातही गुलाबाच्या शेतीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान व उत्कृष्ट व्यवस्थापनातून फुलवलेल्या या भागातील गुलाब युरोपला निर्यातही होतो. मावळ तालुक्याचे अांदर मावळ, नाणे मावळ व पवन मावळ असे तीन भाग पडतात. निसर्गाने भरभरून कृपादृष्टी बहाल केलेला असा हा संपूर्ण परिसर म्हणता येईल. पहा थेट व्हीडिअो.... निसर्गाने समृद्ध कडधे गाव पुणे-मुंबई महामार्गावर पुण्यापासून सुमारे ५० ते ५५ किलोमीटर अंतरावर बाह्यवळण घेऊन मिळणाऱ्या कच्च्या रस्त्याने काही मिनिटांच्या कालावधीतच कडधे गावात पोचता येते. पवन मावळ भागात येणाऱ्या या छोट्याशा गावाला लोहगड, विसापूर या प्रसिद्ध डोंगरांनी आपल्या कुशीत घेतले आहे. तर पवना नदीचा प्रेमाचा पाझर या गावाला लाभला आहे. पावसाळा संपल्यानंतर इथल्या डोंगरदऱ्यांमधून लुभावणारी हिरवीगार सृष्टी वेड लावल्याशिवाय राहत नाही. अशा या निसर्गरम्य परिसरात दूरवर कटाक्ष टाकल्यास नजरेत भरून येतात ती थोड्या थोड्या अंतरावर पसरलेली मोहोळ कुटुंबाची अडीच एकरांत विसावलेली हरितगृहे अर्थात पॉलिहाउसेस. गेल्या कित्येक वर्षांपासून अखंडपणे निर्यातक्षम गुलाब फुलवण्याची परंपराच जणू या कुटुंबाने जोपासली आहे. कष्टातून घडवलेली जमीन गावातील वाघू शंकर मोहोळ यांची एकूण पंधरा एकर शेती. खरे तर त्याला शेती अाताच्या काळात म्हणता येईल. पूर्वी हा केवळ अखंड खडकच होता. असंख्य चढ-उतार, खाचखळग्यांनी भरलेल्या या जमिनीला लागवडयोग्य बनवणे म्हणजे कष्टाची परिसीमाच होती. पण वाघू मोहोळ यांनी हे आव्हान लिलया पेलले. पोकलॅंड, जेसीबी, डंपर अशा सर्व साधनांचा वापर केला. ब्लास्टिंग केले. जमिनीचे ‘लेव्हलिंग’ ही महत्त्वाची बाब होती. अन्य शेतकऱ्यांकडून मुरूम आणून तो शेतात टाकण्याची प्रक्रिया सुमारे ३६ दिवस सुरू होती. उसाचा पहिला प्रयोग अथक प्रयत्नांनंतर तयार केलेल्या शेतजमिनीत वाघू यांनी पहिले पीक घेतले ते उसाचे. वास्तविक भरपूर पर्जन्यमान असलेल्या या भागात उसाकडे कोणाचाच अोढा नसतो; पण प्रयोगशील व धाडसी वृत्तीच्या वाघू यांनी हा प्रयत्न केला. नीटनेटकी शेती करीत उसाचे चांगले उत्पादन आणि उत्पन्नही घेतले. फुलशेतीतून प्रगतीची वाट केवळ ऊसशेतीतून प्रगतीच्या वाटा उजळ करता येणार नाहीत हे जाणलेल्या वाघू यांनी २००५-०६ मध्ये आधुनिक शेतीची व त्यातही वेगळ्या पिकाची वाट चोखाळायची ठरवले. त्यासाठी पर्याय होता पॉलिहाउसमधील गुलाब शेतीचा. या फुलपिकाचे शास्त्र, बाजारपेठ, दर या अनुषंगाने अभ्यास झाला व हेच पीक घ्यायचे निश्चित करण्यात आले. पूर्वी ही ‘हायटेक’ शेती अधिक करून ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांकडूनच केली जायची. कालांतराने अनेक शेतकरी हिमतीच्या जोरावर वैयक्तिकरीत्या या शेतीत उतरले. वाघूदेखील त्याच वाटेवरचे शेतकरी होते. सुरवातीला पाण्याचे स्रोत बळकट करण्यावर भर दिला. त्यासाठी पवना नदीवरून दोन किलोमीटरवरून पाइपलाइन केली. साधारण २००६ मध्ये २० गुंठ्यात पॉलिहाउसधील गुलाब शेती सुरू केली. बॅंकेकडे कर्जासाठी प्रस्ताव ठेवला, पण तेथील अधिकाऱ्यांनी अनुभव व प्रशस्तिपत्र याबाबत विचारणा केली. वाघू यांनी तळेगाव येथे ११ दिवसांचे हरितगृहातील शेतीविषयीचे प्रशिक्षण घेतले. शेतीत जम बसल्यानंतर २०१५ च्या सुमारास दोन एकरांत विस्तार केला. आज एकूण अडीच एकरांपर्यंत विस्तार करीत गुलाब शेतीत एक तप पूर्ण केल्याचे मोहोळ कुटुंबाला मोठे समाधान आहे. पॉलिहाउसमधील गुलाब शेती दृष्टिक्षेपात

  • मार्केटचे सर्वेक्षण करून कोणत्या रंगांना किती मागणी असते हे अभ्यासले. त्यानुसार लाल रंगाला अधिक प्राधान्य दिले. त्यानंतर पिवळा, गुलाबी, पांढरा असे रंग निवडले.
  • सध्या तीन प्रकारच्या गुलाबांवर (डच व्हरायटी) भर
  • यात टॅाप सिक्रेट - लाल
  • गोल्ड स्ट्राइक- पिवळा
  • रिव्हायव्हल - गुलाबी
  • - येत्या काळात मार्केटच्या मागणीनुसार तीन प्रकार वाढवणार.
  • अव्हॅलोन (पांढरा), ट्रॉपिकल (आॅरेंज), जुमेलिया (मिक्स कलर)
  • सुमारे ३८ गुंठ्यांत लाल गुलाब,
  • सुमारे २० गुंठ्यांत पिवळा व गुलाबी असे संयुक्त प्लॅंटेशन
  • सुमारे ८० गुंठ्यांतील ३२ गुंठ्यांत लाल, तर १० गुंठ्यांत गुलाबी
  • निर्यातीत सातत्य मोहोळ म्हणाले, की सुरवातीला पुणे मार्केटला फुले पाठवत होतो. त्या वेळी प्रतिफूल दोन ते अडीच रुपये किंवा त्यापेक्षाही कमी मिळायचा. त्यानंतर मार्केटिंग पद्धतीत सुधारणा केली. गुलाबाची क्वालिटीही सुरवातीपासूनच अत्यंत चांगली ठेवली. साहजिकच काही व्यावसायिकांनी व्हॅलेंटाइन डेसाठी युरोपीय निर्यातीसाठी मागणी सुरू केली. साधारण २००७ चा हा काळ असेल. तेव्हापासून ते आजतागायत म्हणजे सुमारे ११ वर्षे निर्यातीत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आत्तापर्यंत खासगी कंपनीमार्फत युरोपला (नेदरलँडला) निर्यात होत आहे. मात्र येत्या काळात कोणत्याही मध्यस्थाशिवाय स्वतः निर्यातीत उतरण्याचा प्रयत्न असल्याचे मोहोळ यांनी बोलून दाखवले. सुरवातीच्या काळातील निर्यात - (व्हॅलेंटाइनसाठी)

  • २० गुंठ्यांत सुमारे १० हजार फुले
  • त्यानंतर विस्तार (२०१५) अडीच एकर
  • यंदाची निर्यात - एक लाख फुले
  • मागील वर्षीची निर्यात - ५० ते ६० हजार फुले
  • निर्यातीसाठी मिळणारे दर (प्रतिफूल) यंदाचे स्टेम लेंग्थ ५० सेंमी -  ११ रुपये ७५ पैसै ६० सेंमी -  १२ रुपये ७५ पैसे मागील वर्षी हेच दर ८ ते १० रुपये होते. मागील वर्षीपेक्षा यंदा दर चांगले आहेत. येत्या काळात केवळ व्हॅलेंटाइनसाठी निर्यात होण्यापेक्षा वर्षभर निर्यात कशी साधता येईल, यावर भर दिला जाणार आहे. व्हॅलेंटाइन व्यतिरिक्त नियोजन युरोपीय निर्यातीव्यतिरिक्त राज्यात पुणे, मुंबई, अौरंगाबाद, नागपूर या चार शहरांमध्ये तर परराज्यांत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आदी व्यापाऱ्यांना मागणीनुसार गुलाबांचा पुरवठा ट्रेन, बस किंवा विमान यापैकी एका मार्गे केला जातो. मागील तीन वर्षांचा आढावा घेतल्यास व्हॅलेंटाइन व्यतिरिक्त अन्य कालावधीत साडेतीन ते चार रुपये दर फुलाला मिळाला. व्हॅलेंटाइनच्या काळासाठी १० ते १४ फेब्रुवारी कालावधीपर्यंत हे दर जवळपास दुप्पट झालेले असतात. उत्पादकता

  • अडीच एकर क्षेत्रात सुमारे ८० हजार झाडे
  • प्रतिझाड वार्षिक उत्पादन - २५ फुले
  • एका वर्षात एकूण क्षेत्रातून २० लाख फुलांचे उत्पादन अपेक्षित
  • व्यवस्थापनातील बाबी

  • सुमारे एक फूट उंचीचे बेड, प्रतिबेड रुंदी - १०० सेंमी
  • दोन बेडमधील अंतर वा पाथवे - ५० सेंमी.
  • बेडमध्ये बेसला लाल माती, त्यानंतर शेणखत, तूस असे टप्पे.
  • झिगझॅग पद्धतीने रोप लागवड
  • फुलांचा दर्जा चांगला ठेवल्याने निर्यातीत मालाचे ‘रिजेक्शन’ शक्यतो येत नाही.
  • फटिर्गेशन, फवारणी, तापमान नियंत्रण, रॅकिंग या बाबींबाबत काटेकोरपणा
  • प्री-कूलिंग (तापमान ८ ते ९ अंश सेल्सिअस), ३० बाय १२ बाय १० फूट
  • येथे काढणीनंतर सुमारे अडीच तास फुले ठेवली जातात.
  • त्यानंतर ३ ते ४ अंश से. तापमानाला ती कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली जातात. (प्री-कूलिंग चेंबरप्रमाणेच आकारमान)
  • एकूण उत्पादनात ६० टक्के वाटा निर्यातक्षम, तर ४० टक्के वाटा लोकल मार्केटचा असतो.
  • फुलाच्या गुणवत्तेसाठी रसायनांचा वापर कमी ठेऊन सेंद्रिय निविष्ठांचा अधिकाधिक वापर
  • एखाद्या वर्षी फुलांचे दर कमी असले म्हणून व्यवस्थापन, गुणवत्ता या बाबींमध्ये कसलीही तडजोड केली जात नाही किंवा निविष्ठांचा वापर व खर्चातही कुठे कमतरता ठेवली जात नाही.
  • मध्यवर्ती म्हणजे ‘सेंट्रलाइज्ड पंप हाउस’ची व्यवस्था. यामुळे वेळेचीही बचत साधली आहे.
  • सर्व पाॅलिहाउसेसमध्ये डबल लॅटरल ठिबक पद्धतीचा वापर
  • जमीन चढ-उताराची असते त्या वेळी पाण्याचा डिस्जार्च कमी अधिक राहू शकतो. त्यामुळे सर्व रोपांना एकसारखे पाणी मिळत नाही. यावर उपाय म्हणून ठिबकमधील अत्याधुनिक तंत्राचा वापर केला आहे. यात हा डिस्चार्ज एकसमान राहतो. त्यामुळे एकसमान पाणी व खते मिळून झाडांची वाढ एकसमान होते. फुलांची गुणवत्ताही सुधारते.
  • ठिबक यंत्रणेजवळच सहा ते सात गुंठ्यांत शेततळे उभारून संरक्षित पाण्याची सुविधा तयार केली आहे.
  • यात रोहू व कटला मासे सोडले आहेत. त्यांच्यापासून व्यावसायिक उत्पन्न घेण्याचा येत्या काळात मानस आहे.
  • रोपांचे आयुष्य साधारण तीन वर्षे (वाणांच्या प्रकारानुसार बदल) असते. मात्र काटेकोर देखभालीतून ते चार ते पाच वर्षांपर्यंत टिकवण्यात यशस्वी झाल्याचे मोहोळ सांगतात.
  •  फुलांची गुणवत्ता
  •  बड साइज - साडेचार ते पाच सेंमी
  • स्टेम लेंग्थ - ४०, ५०, ६० ते ७० सेंमी
  • एकूण उत्पन्नात ५० ते ६० टक्के किंवा प्रतिफूल दोन ते सव्वादोन रुपये खर्च येतो. अलीकडील काळात शेतीतील सर्वच बाबी महाग झाल्याने फुलाला किमान चार रुपये किंबहुना त्याहून अधिक दर मिळणे अपेक्षित असल्याचे मोहोळ सांगतात.
  • मजुरांचे व्यवस्थापन मावळ भागात बरेच पॅालिहाउसेस असल्याने मजुरांबाबत एकमेकांना सपोर्ट केला जातो. काहीवेळा मजुरांसाठी शोधमोहीमही घ्यावी लागते. मात्र त्यावर थोडा फार शाश्वत उपाय म्हणून सुमारे २२ मजूर वर्षभर तैनात केले आहेत. त्यांच्यासाठी निवास, वीज व अन्य आवश्यक सुविधाही देऊ केल्या आहेत. बॅंकेत तयार केली पत सुरवातीच्या काळात खडक फोडून जमीन तयार करायची म्हणजे पैसाही भरपूर लागणार होता. उसाचे उत्पन्न हाताशी होते. त्याचबरोबर बॅंक आॅफ महाराष्ट्राच्या स्थानिक शाखेतूनही वेळोवेळी कर्ज घेतले. त्याची परतफेडही त्या त्या वेळेत करीत गेल्याने बॅंकेत स्वतःची पत तयार करता आली. सुरवातीला २० गुंठ्यांसाठी २० लाख रुपये भांडवलाची गरज होती. त्यातील ७५ टक्के रक्कम कर्जातून उभी केली. एका विस्तारित प्रकल्पात एक कोटी तीस लाख रुपये जरुरी भांडवलापैकी ८० लाख रुपयांचे कर्जही घेणे केवळ पत तयार करण्यामुळे शक्य झाल्याचे मोहोळ यांनी सांगितले.   वातावरणाचीही मिळाली साथ मावळ तालुक्याच्या तीन भागांपैकी आमचा भाग पवन मावळात येतो. आजूबाजूला असलेल्या डोंगरांच्या सान्निध्यात आमची शेती खुलते. अन्य भागांपेक्षा साधारण दोन अंशांनी येथील तापमानही कमी राहते. त्याचा फायदा फुलांची गुणवत्ता वाढण्यामध्ये होतो. त्यामुळे व्यापारीही या भागातील गुलाबांना प्राधान्य देतात, असे मोहोळ यांनी सांगितले.

    संपर्क- वाघू मोहोळ- ९२२६५५९५२३ सतीश मोहोळ-९९२२९८७७९२ सचिन मोहोळ- ९८६०७१२७७९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com