agricultural success story in marathi, agrowon, karanjad, satana. nasik | Agrowon

कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची आगाप द्राक्षशेती
दीपक खैरनार
मंगळवार, 23 जानेवारी 2018

संयुक्त कुटुंब हेच शेतीतील बळ
संजय यांचे बंधू प्रकाश सिव्हिल इंजिनिअर आहेत. आज तेही संजय यांच्यासमवेत पूर्णवेळ शेतीच पाहतात. आई- वडिलांसह दोन्ही भावांचे संयुक्त कुटुंब आहे. घरचे सुमारे अकरा सदस्य आहेत.
एकत्र असल्यानेच शेतीत नवा हुरूप येतो, काही करण्याचे बळ मिळते, असे संजय सांगतात.
संजय यांची पुढची पिढी म्हणजे त्यांची दोन मुले बीएस्सी अॅग्रीच्या शेवटच्या वर्षाला शिकताहेत.
संपूर्ण परिवारात शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली असल्याचे संजय यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर आगाप द्राक्षांच्या शेतीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील करंजाड येथील संजय देवरेदेखील अनेक वर्षांपासून द्राक्ष व डाळिंबाची शेती करतात. अलीकडील काळात सुमारे ६० ते ७० टक्के सेंद्रिय व उर्वरित रासायनिक पद्धतीने शेती करताना दर्जेदार द्राक्षांची निर्मिती करण्यात त्यांनी हातखंडा मिळवला आहे. सुमारे ११ सदस्यांचे एकत्रित कुटुंब हेच शेतीतील मोठे बळ असल्याचे देवरे सांगतात.
 
नाशिक जिल्ह्यात निताणे- करंजाड रस्त्यावर करंजाड (ता. सटाणा) येथे संजय रतन देवरे यांची पंधरा एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यांचे वडील रतन हिराजी देवरे निवाणे (ता. कळवण) येथे १९८१-८२ मध्ये ग्रामसेवकपदी कार्यरत होते. त्या वेळी तेथील शेतकरी द्राक्षे पिकवून ती लाकडी पेटी पॅकिंगद्वारे विकताना देवरे पाहात. त्यातूनच प्रेरणा घेत आपणही द्राक्षबाग उभी करावी अशी मनाशी गाठ बांधली. त्याप्रमाणे १९९० च्या सुमारास मालेगाव तालुक्यातील नर्सरीतून रोपे आणून ४७ गुंठ्यांत लागवड केली.

द्राक्षशेतीचा अनुभव
त्या वेळी द्राक्षाच्या सुमारे ८५० झाडांची जोपासना होत होती. तब्बल बारा वर्षे या बागेतून उत्पन्न घेतले. बाग जुनी झाल्याने, तसेच नैसर्गिक आपत्तीच्या कवेत सापडल्याने २००२ मध्ये ती काढावी लागली. त्या जागेवर भगवा डाळिंबाची लागवड केली.

सोनाकानंतर थॉमसनचा प्रयोग
डाळिंबाची बाग असली तरी द्राक्षाशिवाय देवरे यांना चैन पडत नसे. पुन्हा २००३ मध्ये दोन एकरांत सोनाका जातीच्या द्राक्षांची लागवड केली. तब्बल चौदा वर्षे या आगाप बागेतून उत्पन्न घेतले. ही बागही जुनी झाली होती. मात्र, यात एक प्रयोग केला. रूटस्टॉकवरील या बागेचे अडीच वर्षांपूर्वी रिकटिंग केले. त्याला थाॅमसन सीडलेस जातीचे कलम केले. अर्थात, संजय यांच्यासाठी नवाच प्रयोग होता. यंदा मात्र या प्रयोगाने चांगलीच फळे धरली आहेत. तालुक्यातील शेतकरी देखील हा प्रयोग पाहण्यासाठी
त्यांच्या बागेला भेटी देत आहेत. नुकतीच काढणीला सुरवात झाली आहे.

देवरे यांची आगाप द्राक्षांची व अन्य शेती 

 • गेल्या अनेक वर्षांपासून आगाप द्राक्षांचे नियोजन. छाटणी साधारण आॅगस्टमध्ये.
 • डिसेंबर काळात द्राक्षे विक्रीला. कोलकता भागातील व्यापारी जागेवरच येऊन खरेदी करतात.
 • त्यास किलोला ८०, ९० ते ११० रुपयांपर्यंत दर मिळतो. यंदा मात्र दर अत्यंत कोसळल्याचे संजय म्हणाले.
 • मागील वर्षी कलम प्रयोगातील बाग असल्याने उत्पादन घेता आले नाही. मात्र, त्यात पावसाळी हंगामात
 • कारल्याचे आंतरपीक घेतले. त्यास सुरवातीला किलोला ४० ते ४५ रुपये दर मिळाला. मात्र, पुढे तो २० ते २५ रुपयांपर्यंत घसरला. मात्र या पिकाने एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले.
 • मागील काही वर्षांत एकरी १२ टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते. यंदा या बागेतून एकरी पाच ते सहा टन उत्पादन अपेक्षित आहे.
 • आगाप अर्थात ‘अर्ली’च्या द्राक्षांना दर चांगले मिळतात. साहजिकच ही द्राक्षे दोन पैसे जास्त मिळवून देतात. मात्र या बागांना निसर्गाच्या लहरीपणाचा जास्त धोकाही पत्करावा लागतो.
 • सुमारे ३३ गुंठ्यांत एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहे, त्यामुळे उन्हाळ्यात हे शेततळे पिकांसाठी वरदान ठरते आहे. पावसाळ्यात संपूर्ण शेततळ्यात ओसंडून पाणी भरले जाते.
 • चौदा गुंठ्यांत जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था केली आहे. पाच एकरांत उन्हाळी कांदा आहे.

रासायनिक विषमुक्त द्राक्षे पिकवण्याकडे कल

 • अलीकडील काळात संजय यांनी रासायनिक अवशेषमुक्त द्राक्षे पिकवण्याकडे कल ठेवला आहे. ग्राहकांना आरोग्यदायी फळे खाऊ घालण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने बागेचे व्यवस्थापन ६० ते ७० टक्के सेंद्रिय व उर्वरित रासायनिक पद्धत असे स्वरूप ठेवले आहे.
 • दोन देशी गायी आहेत. शेणखत, गोमूत्र, डाळीचे पीठ आदींच्या मिश्रणाची स्लरी हौदात तयार केली जाते. ही स्लरी झाडांना देण्यासाठी ट्रॅक्टरचलित गाड्याचा वापर केला जातो. यात ड्रायव्हरसहित तीन व्यक्ती आवश्यक असतात. सुमारे अडीच तासांत एक हजार झाडांना या पद्धतीद्वारे स्लरी देण्यात येते.  किडी-रोग नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काची व प्रसंगी रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी होते.

सेंद्रिय शेतीने केला खर्च कमी
द्राक्षशेतीत एकरी किमान ७५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र सेंद्रिय पद्धतीचा अधिक वापर सुरू केल्याने हा खर्च ३० ते ४० टक्क्याने कमी करणे शक्य झाल्याचे संजय म्हणाले.  स्लरीचा वापर द्राक्षासोबत डाळिंबालाही केला जातो. डाळिंबाची वेगवेगळ्या वर्षांची ६००, ४०० व १३०० झाडे आहेत. जुन्या बागेतून (४७ गुंठे) २५० झाडांमधून मागील वर्षी आठ टन उत्पादन मिळाले. डाळिंबाचेही जागेवरच मार्केट मिळवले आहे.

 संपर्क- संजय देवरे - ९४०३१५३८१९
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
‘सह्याद्री’ च्या शिवारात हवामान अाधारित...अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल या प्रणाली...
द्राक्षपट्ट्याला दुष्काळाचे ग्रहणसांगली ः गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झालाय......
पर्यावरण संवर्धन, ग्राम पर्यटनाला चालनापर्यावरण संवर्धन, अभ्यासाच्या बरोबरीने ‘मलबार...
पीक नियोजन, पशुपालनातून शेती केली...चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील रूपाली नितीन...
पीक वृद्धीकारक कंपन्या कारवाईमुळे...पुणे: कृषी विभागाकडून अलीकडेच पीक वृद्धीकारके (...
ऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा...मुंबई  : केंद्र शासनाच्या असंघटित कामगार...
गुलाबी बोंड अळी नुकसानभरपाईस...पुणे : गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या दहा...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात आठवडाभर सुरू...
दूध खरेदी अनुदानाचा तिढा सुटता सुटेनामुंबई : दूध खरेदी अनुदानाचा गुंता काही केल्या...
सेक्‍सेल सिमेन तंत्राने रेडीचा जन्मभिलवडी, जि. सांगली :  येथील चितळे आणि जिनस...
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...