पळसकर यांच्या ‘ए’ ग्रेड कांद्याने बाजारात मिळवली अोळख

रोपवाटिका तयार करून कांद्याची दोन हंगामात टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते.
रोपवाटिका तयार करून कांद्याची दोन हंगामात टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते.

शेतीत उत्पादनाएवढेच महत्त्व प्रतवारीला आहे. बाजारपेठेचा चांगला अभ्यास, दोन हंगाम साधून टप्प्याटप्प्याने लागवड आणि प्रतवारी ही वैशिष्ट्ये जपत करडे (जि. पुणे ) येथील भाऊसाहेब पळसकर यांनी कांदा शेती यशस्वी केली आहे. सुमारे दहा वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर बाजारपेठेत आपल्या दर्जेदार कांद्याला पळसकर यांनी अोळख तयार केली आहे. पुणे जिल्ह्यात शिरूर या तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ११ किलोमीटरवर चार हजार लोकसंख्येचे करडे गाव आहे. येथे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. बहुतांशी भाग कोरडवाहू आहे. दरवर्षी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर बहुतांशी शेतकरी कमी कालावधीची पिके घेतात. कांदा व ज्वारी अशी पिके होतात. पळसकर यांची शेती गावात भाऊसाहेब आणि अशोक बाळकू पळसकर या दोघा भावांचे एकत्रित कुटूंब आहे. त्यांची वडिलोपार्जित २१ एकर शेती आहे. दरवर्षी हंगामनिहाय कांदा, कलिंगड, मिरची, कांदा अशी पिके ते घेतात. चिंचेची एक हेक्टरवर फळबागही आहे. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत भाऊसाहेब कृषिमित्र म्हणून कार्यरत आहेत. त्याअंतर्गत गावातील शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात. प्रकल्प संचालक अनिल देशमुख, तालुका कृषी अधिकारी संजय पिंगट, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अविनाश निर्मळ यांची मदत त्यांना होते. कांद्याची अनुभवसिद्ध शेती कांदा हेच पळसकर यांचे मुख्य पीक झाले आहे. सुमारे दहा वर्षांपासून त्यांना या पिकाचा अनुभव आहे. दरवर्षी ते कांद्याची खरीप आणि रब्बीत लागवड करतात. त्यासाठी एकूण क्षेत्र १० एकरांपर्यंत असते. मात्र टप्प्याटप्प्याने दोन-दोन एकर क्षेत्र वापरले जाते. खरिपात लागवड करण्यासाठी अर्धा एकरावर तर रब्बीत लागवड करण्यासाठी एक एकरावर रोपवाटिकेचे नियोजन केले जाते. कांदा शेतीतील नियोजन- ठळक बाबी

  • लागवडीसाठी सरी पद्धत आणि गादीवाफा अशा दोन्ही पद्धतीचा अवलंब होतो.
  • त्यासाठी घरीच तयार केलेले कोंबडीखत वापरले जाते. ट्रॅक्टरच्या सहाय्याने चांगली पूर्वमशागत केली जाते.
  • पाऊस कमी असल्यामुळे शेतात दहा बोअर घेतले. पैकी चार बोअरवेल्सना पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता अाहे. हे पाणी एकत्रित करून विहिरीत साठवले जाते. त्यानंतर वाफे पद्धतीने लागवड केलेल्या कांद्याला तुषार आणि ठिबक सिंचन पद्धतीने ते दिले जाते. त्यामुळे पाण्याच्या काटेकोर नियोजनात कांदा घेणे सोपे होऊन जाते.
  • लागवडीवेळेस सिंगल सुपर फाॅस्फेट, आठ दिवसांनी १९-१९-१९ आणि पहिल्या खुरपणीनंतर १०-२६-२६ ही खते देतात. त्यामुळे कांद्याची वाढ चांगली होण्यास मदत होते.
  • प्रतवारी काढणी केलेल्या कांद्याची प्रतवारी मोठा, मध्यम आणि लहान अशा प्रकारात केली जाते. त्यानंतर लहान आणि मध्यम कांद्याची जागेवरच व्यापाऱ्यांना विक्री केली जाते. मोठ्या आकाराच्या कांद्याची साठवणूक केली जाते. त्यासाठी शेतात सुमारे पंचवीस टन क्षमतेची चाळ उभी केली आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून सुमारे साडे ८७ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. बाजारातील दरांची स्थिती पाहून विक्री केली जाते. उत्पादन व दर सारा पद्धतीच्या कांद्याचे एकरी १० टन तर सुधारित लागवड पद्धतीत व ठिबक-तुषार सिंचन पद्धतीत ते १५ टनांपर्यंत होते. एकरी सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येतो. गेल्या वर्षी बाजारपेठेत उपलब्धता व आवक यांचा प्रश्न उभा राहिला होता. त्या वेळी प्रति किलो २५ ते २७ रुपये दर मिळाला. मात्र ए ग्रेडचा माल अधिक असल्याने बाजारातील अन्य कांद्यापेक्षा किलोला तीन ते चार रुपये दर चढाच मिळत असल्याचे पळसकर सांगतात. बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये आपल्या कांद्याची अोळख तयार झाल्याचे ते सांगतात. बीजोत्पादनातून उत्पन्न गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अर्धा ते एक एकरावर गावरान कांद्याचे बीजोत्पादन घेण्यात येते. त्यासाठी आॅक्टोबरमध्ये लागवड केली जाते. मळणी करून बियाणे तयार केले जाते. आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांना बियाण्याची प्रति किलो पंधराशे रुपये दराने विक्री केली जाते. रोपांचीही विक्री दरवर्षी कांदा लागवडीचे क्षेत्र निश्चित केलेले असते. त्यानुसार रोपांचीही निर्मिती केली जाते. शिल्लक रोपांचीदेखील जागेवरच आठशे ते एक हजार रुपये प्रति साऱ्याप्रमाणे विक्री केली जाते. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते. कुक्कुटपालनाची जोड पळसकर १९९८ पासून कुक्कुटपालन व्यवसाय करतात. त्यासाठी शेड बांधले आहे. त्यात टप्प्याटप्प्याने सातशेच्या संख्येने बाॅयलर कोंबडीचे संगोपन होते. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांना न देता स्वतः सुरू केलेल्या चिकन सेंटरद्वारे थेट विक्री करून नफ्याचे मार्जिन वाढवले जाते. कोंबडी खताचा शेतीलाही चांगला उपयोग होतो. त्यामुळे उत्पादन व मालाच्या दर्जात चांगली वाढ होत असल्याचे ते सांगतात. चिंच बागेतून उत्पन दहा वर्षांपूर्वी तीन एकरांत चिंचेच्या १४० झाडांची लागवड केली होती. सध्या ही झाडे चांगली बहरली आहे. यंदा पहिल्यांदाच एक ते दीड क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा मिळालेले उत्पन्न कमी असले तरी पुढील काळात ही बाग चांगले उत्पन्न देऊन जाईल अशी पळसकर यांना अपेक्षा आहे. भाऊसाहेब पळसकर - ९८२२५८०२४४, ९७३०८०७०८०    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com