agricultural success story in marathi, agrowon, Kondha, Nanded | Agrowon

रेशीम शेतीने दिली आर्थिक ताकद
डॉ. टी. एस. मोटे
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

कोंढा (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथील प्रयोगशील शेतकरी माधव कदम यांनी बाजारपेठेचा अभ्यास करत ऊस, केळी पिकांएेवजी रेशीम शेतीला सुरवात केली. काटेकोर व्यवस्थापन, प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत दर्जेदार रेशीम कोषांच्या उत्पादनावर त्यांचा भर आहे. गावातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा गट तयार करून पीक बदलाला नवीन दिशा दिली आहे.

कोंढा (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथील प्रयोगशील शेतकरी माधव कदम यांनी बाजारपेठेचा अभ्यास करत ऊस, केळी पिकांएेवजी रेशीम शेतीला सुरवात केली. काटेकोर व्यवस्थापन, प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत दर्जेदार रेशीम कोषांच्या उत्पादनावर त्यांचा भर आहे. गावातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा गट तयार करून पीक बदलाला नवीन दिशा दिली आहे.

अर्धापूर तालुक्‍यातील कोंढा (जि. नांदेड) गाव शिवाराला इसापूर धरणाचे पाणी असल्याने ऊस आणि केळी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होती. विहीर, कूपनलिकेला पाणीही चांगले असायचे. परंतु, गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे इसापूर धरणाचा पाणीसाठा कमी झाला. त्याचा परिणाम गाव शिवारातील पाणीपातळीवर झाल्याने ऊस, केळी लागवडीला मर्यादा आली. काही शेतकरी हंगामी पिकांच्या लागवडीकडे वळले. या गावातील माधव दादाराव कदम यांचीही ऊस लागवड असायची, परंतु पाणीटंचाईमुळे त्यांनी नियमित पैसा देणाऱ्या पिकांचा शोध सुरू केला. या शोधामध्ये त्यांना रेशीम शेतीची वाट दिसली.

धनगरवाडीने दिली प्रेरणा

माधव कदम यांची कोंढा गाव शिवारात पाच एकर शेती. परंतु, गेल्या काही वर्षांत पाण्याची पातळी खालावल्याने केळी, ऊस उत्पादनावर परिणाम झाला. बागायती पीक गेल्यामुळे घर चालवण्यासाठी त्यांना नियमित उत्पन्न देणाऱ्या पिकाची गरज होती. याच दरम्यान नांदेड आकाशवाणीवर रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव ते नियमित ऐकत होते. धनगरवाडी (जि. नांदेड) गावातील बहुतांश शेतकरी रेशीम कोषाचे दर्जेदार उत्पादन घेऊन चांगला आर्थिक नफा मिळवितात हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच धनगरवाडी गावातील रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेट देऊन पीक व्यवस्थापन आणि आर्थिक उत्पन्नाबाबत चर्चा केली. यातून पिकातील नफा समजला आणि त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय पक्का केला.

रेशीम शेतीला सुरवात

धनगरवाडीतील शेतकऱ्यांकडून रेशीम शेतीची माहिती घेतल्यानंतर माधव कदम यांनी नांदेड येथील रेशीम कार्यालय गाठले. तेथील तज्ज्ञांच्याकडून रेशीम शेतीच्या योजना, तांत्रिक माहिती घेतली. रेशीम विभागाकडून रेशीम कीटक संगोपनाचे प्रशिक्षणही घेतले. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी २०१४-१५ मध्ये साडेचार एकरांवर तुती लागवड केली. रेशीम शेतीच्या अनुभवाबद्दल कदम म्हणाले की, मी तुतीच्या व्ही-१ जातीची पट्टा पद्धतीने ५ फूट बाय ३ फूट बाय २ फूट अंतराने लागवड केली. तुतीला ठिबक सिंचन केले. त्यामुळे विहिरीतील पाणी पुरते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने पिकाचे योग्य व्यवस्थापन ठेवले. पहिल्या वर्षी तुती वाढीच्या अवस्थेत असल्याने पाला कमी मिळाला. त्यामुळे २०० अंडीपुंजाची दोन पिके घेता आली. पहिल्यावर्षी माझ्याकडे पक्के संगोपनगृह नव्हते. उपलब्ध साहित्यातून तात्पुरते रेशीम कीटक संगोपनगृह तयार केले. तरीदेखील कीटकांचे योग्य संगोपन केल्यामुळे दोन पिकातून दर्जेदार रेशीम कोष मिळाले. याची विक्री कर्नाटकातील रामनगर बाजारपेठेत केली. पहिल्या वर्षी  दर चांगला असल्याने खर्च वजा जाता १ लाख १० हजारांचे उत्पन्न मिळाले. उत्पादन वाढवायचे असेल तर शास्त्रीय पद्धतीने रेशीम कीटक संगोपनगृह उभारणीची गरज होती. त्यामुळे मी दुसऱ्यावर्षी ६० फूट लांब, २२ फूट रुंद आणि १२ फूट उंचीच्या कीटक संगोपनगृहाची उभारणी केली. यासाठी दीड लाख रुपये  खर्च आला. रेशीम विभागाने मला ९० हजारांचे अनुदान दिले. तसेच दहा हजार रुपयांच्या निविष्ठा दिल्या. त्यामुळे रेशीम कीटकांचे चांगल्या पद्धतीने संगोपन शक्य होऊ लागले.

दर्जेदार पाला, योग्य नियोजनावर भर
माधव कदम म्हणाले की, उत्तम प्रतीच्या तुती पाल्याचे उत्पादनावर माझे लक्ष असते. रेशीम कीटकांना उत्तम प्रतीचा लुसलुशीत पाला दिला जातो. त्यामुळे कीटकांची चांगली वाढ होऊन कोषाची प्रत सुधारते. रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये २७ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि ६० ते ७० टक्के आर्द्रता ठेवली जाते. उन्हाळ्यात संगोपनगृहाच्या चारी बाजूने बारदान बांधतो. संगोपन शेडच्या वरच्या बाजूने या बारदान्यावर ठिबक नळीमधून पाणी सारखे ठिपकत ठेवलेले असते. त्यामुळे योग्य तापमान व आर्द्रता राखण्यास मदत होते. कीटकांच्या बेडवर प्लॅस्टिकचा कागद अंथरल्यामुळे आर्द्रता टिकून रहाते, पाला लवकर सुकत नाही. रेशीम अळ्यांचे संगोपन करताना प्रत्येक अळीला पुरेसे खाद्य मिळण्यासाठी जागेचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते.
हवामानानुसार अळ्यांना तुतीचा पाला कधी खाऊ घालायचे याचे सूत्र मी बसविले आहे. हिवाळ्यामध्ये सकाळी ८ ते १० आणि दुपारी ४ ते ६ वाजता, पावसाळ्यात सकाळी ६ वाजता आणि दुपारी ५ वाजता आणि उन्हाळ्यात सकाळी ६ वाजता व दुपारी ४ ते ५ वाजता पाला देतो. उन्हाळ्यात सकाळी कमी पाला दिला जातो, दुपारी मात्र सकाळच्या वेळेपेक्षा दीडपट पाला देतो. यामुळे अळ्यांना वेळेवर पुरेसा पाला मिळून चांगली वाढ होते. अळ्यावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाकडे लक्ष असते. वातावरणात आर्द्रता जास्त असते, तेव्हा पाला टाकायच्या अगोदर अळ्याच्या अंगावर आणि बेडवर चुना पावडर टाकली जाते. चुन्यामुळे अळीच्या विष्टेतील पाणी शोषून ती कोरडी होते. तसेच रोग नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळेवर उपाययोजना केल्या जातात.

 रेशीम शेतीची वैशिष्ट्ये

  • शास्त्रीय पद्धतीने कीटक संगोपन गृहाची उभारणी.
  • प्रत्येक वर्षी रेशीम कोषाच्या आठ पिकांचे नियोजन. एक पीक सरासरी २०० अंडीपुजांचे.
  • कीटकांसाठी दर्जेदार तुती पाल्याचे उत्पादन. संगोपनगृहामध्ये योग्य तापमान, आर्द्रता आणि स्वच्छतेवर भर.
  • योग्य व्यवस्थापनामुळे रेशीम कोष उत्पादनाची सरासरी अत्यंत चांगली.
  • सरासरी १०० अंडीपुंजामागे ८० किलो रेशीम कोशांचे उत्पादन. एका हंगामात १०० अंडीपुंजामागे ९५ किलो कोषाचे उत्पादन.
  • प्रत्येक पिकासाठी लागणाऱ्या बाळ अळ्या धनगरवाडीतील चॉकी संगोपनगृहातून विकत घेतल्या जातात. अळ्यांमुळे २१ ते २५  दिवसांत एक पीक घेता येते. सध्या सातवे पीक संपले, या पिकामध्ये १५० अंडीपुंजापासून १२० किलो रेशीम कोषाचे उत्पादन. यंदा रामनगर मार्केटमध्ये प्रति किलोस ५५० रुपये दर. खर्च वजा जाता ६० हजारांचे उत्पन्न.

शेतकऱ्यांचा भरतो रेशीम कट्टा
माधव कदम यांनी पुढाकार घेऊन गेल्यावर्षी गावातील दहा रेशीम उत्पादकांचा गट तयार केला. या गटाची आत्माकडे बळिराजा रेशीम उद्योग शेतकरी मंडळ या नावाने नोंदणी केली. या गटातील दहा शेतकऱ्यांनी पंधरा एकर तुतीची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांचे तुती लागवडीचे दुसरे वर्षे असून रेशीम कीटक संगोपनास त्यांनी सुरवात केली आहे. दर शुक्रवारी गटातील शेतकऱ्यांचा रेशीम कट्टा आयोजित केला जातो. यामध्ये पीक व्यवस्थापन, बाजारपेठ, नवीन तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली जाते.
 
संपर्क : माधव कदम : ९८८१७०८७५२
(लेखक नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
सणासुदीत अर्थकारण उंचावणारे पेरीडकरांचे...गणपती उत्सवापासून ते अगदी दसरा, दिवाळीस तुळशीच्या...
दुष्काळ, मजूरटंचाई समस्येवर सीताफळ,...अौरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ येथील श्रीराम शेळके...
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...