फुलशेतीतून शून्यातून उभारले वैभव

घराची उभारणी, मुलांचे शिक्षण, दोन दुचाकी, ठिबक, गायी, भाडेपट्ट्याने शेती हे सर्व मोतळकर यांनी फुलशेतीतूनच शून्यातून उभे केले आहे. त्याचा त्यांचा अभिमानही आहे. सामाजिक प्रतिष्ठाही वाढली आहे. पंचक्रोशीत त्यांना ‘फुलवाले मोतळकर महाराज’ असे आदराने ओळखले जाते. शेती अभ्यासपूर्ण केली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. यासाठी विविध प्रशिक्षणे घेतली. तळेगाव दाभाडे (पुणे) येथे नुकतेच प्रशिक्षण घेतले अाहे.
मोताळकर यांनी फुलवलेली फूलशेती
मोताळकर यांनी फुलवलेली फूलशेती

व्यवसायात सातत्य व चिकाटी असेल तर तो यशस्वी होतोच, याचे आदर्श उदाहरण बुलडाणा जिल्ह्यातील कोथळी येथील ज्ञानेश्‍वर मोतळकर या अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे. सुमारे वीस वर्षांहून अधिक काळ विविध फुलांची शेती करताना त्यासाठी निश्चित बाजारपेठही तयार केली आहे. याच फुलांनी मोतळकर यांच्या कुटुंबात वैभवाचे रंग भरले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात कोथळी नावाचे गाव आहे. येथील ज्ञानेश्‍वर नारायण मोतळकर यांनी शेतीत आपली वेगळीच अोळख तयार केली आहे. त्यांना एक भाऊ असून, दोघे कालानुरूप विभक्त राहतात. कुटुंबाची वडिलोपार्जित चार एकर शेती होती. पैकी दोन एकर शेती ज्ञानेश्‍वर यांच्या वाट्याला आली. मोतळकर यांचे सुरवातीचे प्रयत्न

  • काळाची पावले ओळखून १९९४ मध्ये काही गुंठ्यात नवरंग (गॅलार्डिया) फुलांची शेती सुरू केली.
  •  या काळात स्थानिक बाजारपेठ तयार नव्हती. अशावेळी मार्केट तयार करण्याचे काम मोतळकर यांनी केले.
  • गावातील तसेच जवळच्या मोताळा गावातील व्यावसायिकांसाठी तसेच वाहनांसाठी दररोज घरी हार बनवून ते पुरवायचे. या काळात वाहतुकीची फारशी साधने नसल्याने डोक्‍यावरून फुलांची पोती वाहून न्यायचे. तीन ते चार हजार रुपये महिन्याचे उत्पन्न व्हायचे.
  • टप्प्याटप्प्याने ही फुलशेती विकसित केली. व्यवसायही वाढला.
  • आजची शेती

  • स्वतःची एकूण शेती- ७७ गुंठे-त्यात पूर्णपणे फुलशेती
  • दुसऱ्यांची दोन एकर शेती कसायला घेऊन त्यातही फुलशेती
  • सन १९९४ पासून फुलशेतीतील अनुभव
  • साधारण असे असते पीक वर्गीकरण
  • २४ गुंठे गुलाब, दहा गुंठे निशिगंध, १० गुंठे गोल्डन रॉड (पिवळी डेझी), १० गुंठे नवरंग,
  • कसायला घेतलेल्या दीड एकरातही नवरंग, अर्धा एकर झेंडू
  • दहा गुंठे बिजली
  • दोन एकरांपैकी उर्वरित जागेत गायींचा गोठा, चाऱ्यासाठी हिरवे गवत, शेतातच टुमदार घर, विहीर, फळझाडे
  • हंगाम, उत्पादन व उत्पन्न

  • -गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आदी सण हेच मुख्य हंगाम असतात.
  • -दररोज ८० किलो नवरंग, गुलाब सरासरी एक हजार फुले, गोल्डन रॉड १० जुड्या, निशिगंध पाच किलो अशी विविध फुले विक्रीसाठी निघतात. प्रमाण कमी-अधिक होते.
  • -मुख्य हंगामात महिन्याची उलाढाल ६०, ७० ते कमाल ९० हजार रुपयांपर्यंतही पोचते.
  • एरवी हे प्रमाण ५० हजार रुपयांच्या आसपास असते.
  • तयार केलेले मार्केट

  • अौरंगाबाद, अकोला, जळगाव ही महत्त्वाची शहरे असली तरी कोथळी गावापासून ती किमान १५० किलोमीटरच्या आत नाहीत. त्यापेक्षा जवळच्या मार्केटमध्ये मोतळकर यांनी आपल्या फुलांसाठी मार्केट तयार केले आहे. ते असे.
  • मलकापूर- फूल व्यावसायिक- दोन ते तीन -३५ किलोमीटर- एसटीद्वारे पार्सल
  • नांदुरा- १ - ३५ किमी- ॲाटो
  • मोताळा-२ -सात किमी
  • वर्षाचा बांधीव दर - त्यामुळे साध्य काय झाले?

  • बाजारात फुलांचे दर पडले तरी मोतळकर यांना त्याहून अधिक दर मिळतात.
  • वर्षभर विक्रीचे टेंशन राहिले नाही.
  • अतिरिक्त उत्पन्न - फुलविक्रीव्यतिरिक्त मागणीनुसार हार बनवून त्यांची विक्री केली जाते. त्यातून अतिरिक्त उत्पन्न पदरात पडते. कटू अनुभव, संकटे

  • मार्केट उभे करताना मोतळकर यांना काही कटू अनुभवांनाही सामोरे जावे लागले. सुरवातीला क्षेत्र कमी असल्याने फुलांची संख्या कमी असायची. व्यापाऱ्यांना जास्त माल लागायचा. अनेक वेळा व्यापाऱ्यांनी पैसेही बुडवले. नुकसानही सोसावे लागले.
  • पाण्यासाठी एक विहीर आहे. ठिबकद्वारे सिंचन केले जाते. मात्र मुळातच पाणी कमी झाल्याने प्रसंगी ते विकतही आणावे लागते. मावसभावाच्या शेतातून ते आणूनही पिकांची गरज भागवली आहे.
  • फुलांची मागणी जास्त आहे; पण अनेक वेळा ‘व्हायरस’मुळे फुलांचे मोठे नुकसान होते. येत्या काळात संरक्षित शेतीचा विचार आहे; पण पुरेसे भांडवल नसल्याचे जाणवते.
  • दूधसंकलनाचा पूरक मार्ग फुलशेतीला उत्पन्नाची जोड लागेल म्हणून दुग्धव्यवसायही सुरू केला आहे. घरी तीन जर्सी गायी असून, रोजचे सुमारे २० लिटर दूध मिळते. त्यांचा मुलगा एका प्रसिद्ध डेअरी कंपनीसाठी दूधसंकलनाची जबाबदारी सांभाळतो. कोथळी गावातून सुमारे ६० ते ८० लिटर दूध या डेअरीला दिले जाते. यातून कुटुंबाला मिळकत सुरू झाली आहे. फळझाडांचा छंद-

  • मोतळकर शेतातच राहतात. अवतीभोवती बिनबियांचे लिंबू, सीताफळ, चिकू, आंबा, पेरू, ऊस, शोभेची झाडे, विशिष्ट कंदही वाढविले आहेत.
  • गुळासाठी घेतलेला ऊस अाहे.
  • मुलांना उच्चशिक्षण

  • ज्ञानेश्‍वर यांचे अवघे चौथीपर्यंत शिक्षण झाले. मात्र मुलांना त्यांनी शिक्षण देण्यात कुचराई केली नाही.
  • मोठा मुलगा शेती, दुग्धव्यवसाय सांभाळतो. धाकटा बारावी विज्ञान शाखेत; तर मुलगी ‘डीफार्म’चे शिक्षण घेत आहे.
  • -  ज्ञानेश्‍वर मोतळकर ः ९८५०६१०११४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com