कृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा ध्यास

कृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा ध्यास
कृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा ध्यास

सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे ही बी. एस्सी (कृषी) चे शिक्षण घेणारी तरुणी असून, कुटुंबाच्या  दुग्ध व्यवसायात रस घेऊन तो यशस्वी करण्यासाठी धडपडत आहे. अगदी गोठ्यातील शेण काढण्यापासून दूध विक्रीपर्यंतची सर्व कामे करते. उत्पादनाबरोबरच भविष्यात दुग्ध प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची  इच्छा अाहे.   

सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरण उभारणीत अनेक गावांचे जिल्ह्याच्या इतर भागात पुनर्वसन झाले. या गावापैकी जांभगाव हे छोटसे गाव. काशीळपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर पुणे-बंगळूरू महामार्गालगत वसलेले आहे. शेतीचे क्षेत्र कमी असल्याने अनेक तरुण आजही मुंबईत नोकरीच्या निमित्ताने असतात. येथील महिला आणि ज्येष्ठ मंडळी शेती आणि दैनंदिन खर्चासाठी दुग्ध व्यवसाय करतात. जांभगावातील नीता शंकर जांभळे ही तरुणी बी. एस्सी (कृषी)च्या शेवटच्या वर्षाला आहे. वडील शंकर आणि चुलते सुरेश यांचे संयुक्त कुटुंब. या कुटुंबाची एकूण ८ एकर शेती असून वडील आणि चुलते शेती पाहतात. गावाचे पुनर्वसन झाले तेव्हा त्याच्याकडे दोन गाई होत्या. शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय केला जात होता. शेती बागायत होऊ लागल्याने वडील आणि चुलत्यांनी शेतीवर जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली, त्यामुळे गाईची जबाबदारी घरातील महिलांवर अाली. नीता यांना अगोदरपासून जनावरांचा लळा असल्याने शिक्षण घेत त्या या व्यवसायास मदत करत होत्या. दुग्ध व्यवसायातील सर्व गोष्टी जमू लागल्यावर नीता यांनी हा व्यवसाय वाढविण्याबाबत कुटुंबातील वरिष्ठांशी चर्चा केली. चुलते सुरेश आणि वडिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. व्यवसायात दूध काढण्यासाठी मिल्किंग मशिन, गोठ्यामध्ये रबर मॅटचा वापर इ. बदल केले. वाढीव दुग्ध उत्पादन करून भविष्यात दुग्ध प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची इच्छा असल्याचे नीताताई सांगतात. दैनिक अॅग्रोवनची मी नियमित वाचक असून, गोसंगोपनात ॲग्रोवन मार्गदर्शक ठरत असल्याचे त्या सांगतात.

व्यवसायात वृद्धी

सुरवातीच्या काळात साध्या पत्र्याच्या शेडमध्ये गाईचे संगोपन केले जात होते. २०११ मध्ये घराच्या मागील बाजूस २६ बाय २५ फूट आकाराचा एक गुंठे क्षेत्रात गोठा बांधला. गोठ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बाजूस पाच फूट उंचीच्या भिंती व त्यावर खेळती हवा राहावी यासाठी तारेची जाळी बसवण्यात आली आहे. छोट्या वासरांसाठी २० बाय १२ फूट अाकाराचा स्वतंत्र गोठा करण्यात आला आहे. घरातील पूर्वीच्या गाई पासून होणाऱ्या कालवडीपासून गाईची संख्या वाढवत नेली. सध्या नीताताईच्या गोठ्यात एच एफ व जर्शी या जातीच्या दहा मोठ्या व चार लहान कालवडी आहेत. गोठ्यासाठी प्रकल्पग्रस्त निधीतून ३५ हजारांचे अनुदान मिळाले आहे. सकाळी सहा वाजल्यापासून गोठ्यातील कामाला सुरुवात होते. शेण काढल्यानंतर मिल्किंग मशिनद्वारे दूध काढले जाते. त्यानंतर गाईंना चारा देणे, गोठा स्वच्छ करणे ही कामे केली जातात. सकाळप्रमाणे संध्याकाळी पाच ते सात या वेळेत कामे केली जातात. सर्व दूध बोरगाव येथील खासगी डेअरीला घातले जाते.   

गोठ्यातील बदल

गाईची संख्या वाढत जाईल तसतसे नीताताईंनी गोठ्यात बदल करत नेले आहेत. गाईच्या चाऱ्यासाठी अर्धा एकर क्षेत्र राखून ठेवले आहे. यामध्ये यशवंत, जयवंत, मका इ. चारापिकाची लागवड केली आहे. चाऱ्याचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी चारा कुट्टी करून दिला जातो. त्यासाठी चाराकुट्टी यंत्र खरेदी केले अाहे. गाईची संख्या वाढल्याने सर्व गाईंची धार मिल्किंग मशिनने काढली जाते. या मशिनद्वारे सात ते आठ गाईंचे अर्ध्या तासात दूध काढले जात आहे. गाईच्या शेणाचा वापर गोबरगॅस निर्मितीसाठी केला जातो. या गॅसवर सर्व स्वयंपाक केला जात असल्यामुळे इंधनाच्या खर्चात बचत झाली आहे. घरच्या शेतीसाठी गांडूळ खताचे युनिट तयार केले आहे. शेणखत व गांडूळ खतामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला आहे.

 व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी

  • चार दिवसांतून एकवेळ गाई धुतल्या जातात, तसेच दररोज पाणी शिंपडले जाते.
  • गोठ्यामध्ये गाई घसरून पडू नये, यासाठी रबरी मॅटचा वापर करण्यात आला आहे.
  • गाईंना ४० टक्के कोरडा व ६० टक्के ओला चारा दिला जातो.
  • शेणखताचा वापर घरच्या शेतीमध्ये केला जातो.  
  • प्रतिदिन ४० ते ५० लिटर दुधाचे उत्पादन मिळते.
  • निरीक्षण ठेवून वेळोवेळी उपचार केले जातात.
  •  उत्पादन प्रतिदिन ४० ते ५० लिटर दुधाचे उत्पादन मिळते. डिसेंबर महिन्यापासून दूधदरामध्ये घसरण होत अाहे. सध्या लिटर मागे दुधाला २१ रु. भाव मिळतो. दुधासोबत शेणखतापासूनही अतिरिक्त उत्पादन मिळते. खर्च वजा जाता साधारणपणे ४० टक्के नफा मिळतो.  

    मागील पाच ते सहा वर्षांपासून गोठ्यातील व्यवस्थापन पूर्णपणे मी पाहत आहे. सध्या दुधाला मिळणारा दर हा न परवडणारा असून, येणारे सर्व पैसे जनावरांचे खाद्य व अन्य बाबींमध्येच खर्च होत अाहेत. दुधाला दर वाढवून मिळावा, हीच अपेक्षा अाहे.

    नीता जांभळे, : ८८८८९७२९५५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com