विकासाच्या वाटेवरील माहूली जहाॅंगीर

तंटामुक्‍त गावाचा आदर्श शांततेतून समृद्धीकडे हा विचारहीमाहूली जहाॅंगीर गावात रुजला आहे. गावपातळीवरील तंटे गावातच मिटविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्याचाच परिपाक म्हणून २०१४-१५ मध्ये गावाला साडेसात लाख रुपयांचा तंटामुक्‍तीचा पुरस्कार मिळाला.
स्वच्छ भारत अभियान असो की  अंगणवाड्यांना धान्य कोठ्यांचे वाटप असो उपक्रमशीलतेच्या बाबतीत माहुली गाव अग्रेसर राहिले आहे.
स्वच्छ भारत अभियान असो की अंगणवाड्यांना धान्य कोठ्यांचे वाटप असो उपक्रमशीलतेच्या बाबतीत माहुली गाव अग्रेसर राहिले आहे.

जेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फळे ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावी - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा...राष्ट्रसंतांच्या याच विचारांचा वारसा जपत सामूहिक प्रयत्नांतून माहूली जहाॅंगीर (ता. जि. अमरावती) गावाने विकासकामांच्या बळकटीकरणावर भर देत विकासाची वाट चोखाळली आहे. जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत गावाला एक कोटी ८० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला अाहे. जलसंधारणाच्या कामांबरोबर पिण्याच्या पाण्याचीही चांगली सुविधा करण्यात येत आहे.   अमरावती जिल्ह्यातील सात हजार लोकसंख्येच्या माहूली जहाॅंगीर गावच्या रहिवाशांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. संत्रा, कपाशी, तूर, सोयाबीन, गहू, हरभरा यांसारखी पिके गाव परिसरात घेतली जातात. संत्रा लागवड सुमारे शंभर ते दीडशे हेक्‍टरवर अाहे. सिंचनासाठी विहिरी व बोअरवेल्स यांचा पर्याय आहे. माहूली जहाॅंगीरनजीक वाघोली सिंचन प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. कालव्याचे काम झाले नसल्याने अद्याप त्याद्वारे शेतीसाठी पाणी उपलब्ध झालेले नाही. पाण्याचे दोन हौद गावात असून त्या माध्यमातून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. लवकरच आणखी एक हौद त्यांच्यासाठी बांधला जाणार आहे. विकासाच्या कक्षा रुंदावल्या संजय नागोणे यांनी अडीच वर्षांपूर्वी सरपंचपदाचा भार स्वीकारला. त्यावेळी गावात रस्ते, नाले याव्यतिरिक्‍त कोणतीही ठोस कामे झालेली नव्हती. विकासाच्या कक्षा अजून रूंद करण्यासाठी सरंपचांनी विविध कामांना सुरवात केली. त्याकरीता लोकसहभाग गरजेचा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामस्थांचा विश्‍वास संपादन करण्यास सुरवात केली. यात यश आले आणि पुढील वाट सुकर झाली. ग्रामपंचायत कार्यालय झाले सुसज पूर्वीचा सुमारे ३५ ते ४० लाख रुपये निधी अद्याप वापरलेला नव्हता. त्याचा उपयोग करीत सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यात आले. त्यामध्ये काही दुरुस्तीची कामे करण्यात आली. तर इमारतीचा काही भाग नव्याने बांधण्यात आला. तालुक्‍यात सर्वात सुसज्ज अशी माहुली ग्रामपंचायतीची इमारत आज उभी राहिली आहे. स्वच्छ, नियमित पाणीपुरवठा सन १९९५ मध्ये गावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. परंतु त्याच्या जलवाहिन्या जुन्या झाल्याने त्यातून चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा व्हायचा. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आता दीड कोटी रुपयांची योजना नव्याने प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यातून दोन लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीची टाकी दीड लाख लिटर क्षमतेची होती. संपूर्ण नवी पाइपलाइन तसेच नळांना मीटर्स बसविण्यात येणार आहेत. आता एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. पाण्याचे स्राेत बळकट करण्यासाठी विहीर घेण्यात आली असून त्यास मुबलक पाणी लागले आहे. उत्पन्नवाढीचे प्रयत्न अमरावती शहरापासून काही अंतरावरच असलेल्या माहूली जहॉंगीर ग्रामपंचायतीच्या हद्दीतच नवी एमआयडीसी वसली आहे. उद्योगांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडणार असून सोयीसुविधांच्या बळकटीकरणावर हा निधी खर्च केला जाईल, असे सरपंच नागोणे यांनी सांगितले. विकासकामे दृष्टिक्षेपात

  • गावात जागोजागी कचराकुंड्या ग्रामपंचायतीच्या वतीने लावण्यात आल्या आहेत. यातील कचरा उचलण्याकरीता हायड्राॅलिक पद्धतीचे वाहन ग्रामपंचायतीने खरेदी केले आहे. त्यामुळे गावाचा परिसर स्वच्छ राहण्यास मदत होत आहे.
  • ग्रामपंचायतीच्या आवारात खुल्या व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली आहे. विशेष करून युवावर्गाकडून त्यास चांगला प्रतिसाद लाभला आहे.
  • दरवर्षी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केला जातो. यात ७५ टक्‍के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गौरविले जाते. गावात जिल्हा परिषदेच्या उर्दू, मराठी आणि प्राथमिक अशा शाळा आहेत. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन या तीनही शाळा ‘डिजिटल’ केल्या. दर्जेदार शिक्षणाची सोय या माध्यमातून गावस्तरावरच उपलब्ध झाली आहे. चौदाव्या वित्त आयोगातून यासाठी निधीची उभारणी केली आहे. शाळेच्या परिसरात खेळण्याचे साहित्यही उपलब्ध केले आहे. आवारभिंत, वॉटरककूलर तसेच आरओ यंत्रणेद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध केले आहे. शाळेच्या परिसरात पेवर ब्लॉक बसविण्यात आले आहेत.
  • रुग्णांलयातही सोयीसुविधा-गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथील रुग्णांसाठीही आरओ. आणि वॉटरकुलरची सोय केली आहे.
  • दिव्यांग व्यक्‍तींच्या मदतीसाठीही पुढे येण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. चाळीस टक्‍के अपंगत्व असलेल्या व्यक्‍तींना कृत्रीम अवयवांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या कामांना येत्या काही दिवसांतच सुरवात होणार आहे.
  • संपूर्ण गावात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी लखलखाट राहतो.
  • सार्वजनीक सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे. कृषी विभागाचे मेळावे, शेतकरी प्रशिक्षण वर्ग, ग्रामसभा व अन्य सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हे सभागृह निशुल्क उपलब्ध करून दिले जाते. त्याची क्षमता दोनशे लोकांची आहे.
  •   ठळक वैशिष्ट्ये

    हागणदारीमुक्‍तीचे पेलले आव्हान सुमारे सात हजारांवर लोकसंख्या असलेल्या या गावात शौचालय घेण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्याचे आव्हान होते. जाणीवजागृती आणि ग्रामसभेत प्रत्येकाचा सहभाग नोंदविण्याच्या माध्यमातून ग्रामस्थांची मनं जिंकता आली. यातून हे आव्हान लीलया पेलता आले. आता आमचे गाव हागणदारीमुक्‍त म्हणून प्रशासनाकडून घोषित झाले. हा आमच्यासाठी मोठा पल्ला होता, असे सरपंच सांगतात. जलयुक्‍त शिवारमध्ये निवड परिसरात उजाड पंढरपूर, तुकपूर, तळखंडा गावांनजीक नाल्यांची संख्या मोठी आहे. त्यासोबतच माहूली व विठ्ठलापूर भागातून वाहणारे नाले आहेत. त्यांच्या परिसरात जलसंधारणाची कामे झाल्यास त्याचा थेट फायदा परिसरातील भूजल पातळी वाढण्यास होणार होता. जलयुक्‍त शिवार अभियानातून ही कामे व्हावीत यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्याचा आराखडा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. आता गावाला एक कोटी ८० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

    अंगणवाड्यांचा विकास अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहाराचे वितरण होते. माहूलीत सात अंगणवाड्या आहेत. सातही अंगणवाड्यांना धान्य कोठी वाटप झाले. अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना निशुल्क गणवेश वाटप योजनाही राबविली आहे. अडीच वर्षांपासून या उपक्रमात सातत्य अाहे. प्रस्तावित कामे पाच रुपयांत वीस लिटर पाणी या योजनेसाठी पाण्याचे ‘एटीएम’ सुरू केले जाणार आहे. वाचन चळवळ समृद्ध व्हावी, असाही प्रयत्न आहे. त्यासाठी वाचनालय आणि स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकादेखील उभारली जाणार आहे. चौदाव्या वित्त आयोगातून ही कामे प्रस्तावित अाहेत. संपर्क- संजय नागोणे - ९४२१८२०९५८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com