दुष्काळात द्राक्ष पट्ट्यात फुलवले सीताफळ

भानुदास मोहिते यांनी परिसरातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केल्याने सुमारे १२ एकरांपर्यंत गाव परिसरात लागवड झाली आहे. मुंबईला किलोला २०० रुपयांपर्यंत दर मिळतात. येत्या काळात गटाच्या माध्यमातून मार्केटिंग व वेगवेगळ्या बाजारपेठा शोधण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहिते यांची सीताफळाची नवी बाग
मोहिते यांची सीताफळाची नवी बाग

मांजर्डे (जि. सांगली) येथील भानुदास मोहिते अनेक वर्षांपासून दुष्काळाशी झगडत आहेत. भागात प्रसिद्ध असलेल्या द्राक्षाची बागही त्यांनी कमी केली. मात्र खचून न जाता हिमतीने त्यांनी द्राक्षापेक्षा कमी पाणी लागणाऱ्या सीताफळ पिकाचा पर्याय शोधला. गेल्या आठ वर्षांपासून त्यांनी हे पीक उत्पादन व मार्केटिंग अशा दोन्ही आघाड्यांवर यशस्वी केले आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांना या पिकाची नवी दिशाही दिली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनाचे माहेरघरच. गेल्या काही वर्षांपासून हा संपूर्ण भाग दुष्काळाशी झगडतो आहे. तालुक्‍यातील मांजर्डे येथील भानुदास रघुनाथ मोहिते यांची परिस्थिती वेगळी नाही. या गावात पूर्वी ६० टक्के द्राक्षाच्या बागा होत्या. आज पाण्याअभावी त्या १० ते २० टक्क्यांवर येऊन पोचल्याचे मोहिते सांगतात. द्राक्षाला पर्याय शोधणारे मोहिते

  • घरची आर्थिक परिस्थिती बेताची.
  • पाणीटंचाईमुळे द्राक्षबाग काढावी लागली.
  • त्यानंतर ऊस लावला. कालांतराने त्यालाही पाणी कमी पडू लागले.
  • काय करावे बरे? दुष्काळ काही पाठ सोडत नाही... पण मी काही हिंमत हरणार नाही. पाणी कितीही कमी असू द्या, तेवढ्यातदेखील उत्पादन देईल असे पीक शोधावे लागेल. मग घेतले डाळिंब पण नैसर्गिक आपत्ती आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे त्याचेही उत्पादनही कमी अधिक प्रमाणात होऊ लागले. सीताफळाचा हुकमी पर्याय सन साधारण २००७-०८ मोहिते व त्यांचे मित्र डॉ. मनोहर कांबळे दोघेही एकत्रित बसून उपाय शोधत होते. मोहिते ः मला वाटतंय सीताफळाचा प्रयोग करून पाहावा. कांबळे ः होय, मलाही तसंच वाटतं. पण हे पीक आपल्या भागात कुणी लावत नाही. आपल्याला कोणीतरी गुरू शोधावे लागतील. मोठे गुरू शोधले

  • सांगली ते पळसखेड (जि. अौरंगाबाद)
  • कवी आणि प्रगतिशील शेतकरी ना. धों. महानोर यांची सुमारे दीडशे एकर सीताफळ बाग
  • मोहिते ः पाहिलं का, एवढे मोठे कवी असलेले महानोरसाहेब शेतकरी म्हणूनही किती मोठे आहेत!
  • त्यांच्याकडून सीताफळाचं सगळं शास्त्र शिकून घेऊया... त्यांनी दिलेली रोपं आपण चांगल्या प्रकारे वाढवू...
  • होय, या बागेनं शेतीची वेगळी दृष्टीच दिली आपल्याला
  • मोहिते यांची आजची शेती

  • क्षेत्र - २ एकर १० गुंठे.
  • त्यातील प्रत्येकी ३० गुंठे खडकाळ माळरानात सीताफळ व डाळिंब,
  • सीताफळ मुख्य पीक. एकूण झाडे - सुमारे २७५.
  • जुनी - आठ वर्षांची - १०५, उर्वरित नवी.
  • लागवड अंतर - सध्याचे - ७.५ बाय ७.५ फूट
  • मन उदास झालेलं... मोहिते - २००८ ला सीताफळाची लागवड झाली. पण परिसरात नवं पीक असल्यानं गावातील काही लोक चेष्टा करू लागले. चांगल्या जमिनीची वाट लागेल, मार्केटचा प्रॉब्लेम होईल असं म्हणू लागले. मग उत्साहावर थोडं पाणी पडलं. निराश झालो. लागवड करून मोठी चूक झाली असं सातत्यानं वाटत होतं. बागेत यायचचं टाळू लागलो. पण बहर पाहिला की मनाला छान वाटायचं. पण सातत्याने लोकांनी केलेली निंदा आठवली की मन पुन्हा उदास होऊन जायचं. तीन वर्षे याच अवस्थेत गेली. आशेचा किरण एक दिवस आला आशेचा किरण घेऊनच. मेहनतीला फळ आलं. बागेत लगडलेली सीताफळं पाहून मनाची उदासी कुठल्याकुठे पळून गेली. पुन्हा एकदा पळसखेड सन २०११ च्या दरम्यान पुन्हा एकदा कवीवर्य महानोर यांच्याकडे जाऊन छाटणीचे तंत्र, हंगाम, ताण कधी द्यायचा असे सगळे सूक्ष्म बारकावे शिकून घेतले. मार्केट मिळवण्यातला संघर्ष सुरवातीला या भागात सीताफळाला मार्केटच नव्हतं. मग जागेवर विक्री सुरू केली. त्या वेळी १० रुपयाला एक फळ असा दर मिळायचा. झाडाचं वय वाढत गेलं तसं उत्पादन वाढू लागलं. आठवडी बाजारात बसून थोडीफार विक्री व्हायची. त्यानंतर सांगली बाजार समितीत जाऊन सौद्याला फळ दिलं. पहिली पट्टी १४ हजार रुपयांची आली. त्या वेळी झालेला आनंद खूपच वेगळा होता. आजचं मार्केट - कऱ्हाड, जि. सातारा फायदे - सांगली मार्केटला डझनावर खरेदी होत असल्याने दोन पैसे कमी मिळतात हे कळल्यावर कऱ्हाडचं मार्केट शोधलं. इथं वजनावर खरेदी होते. मिळणारे दर - किलोला ६०, ७० रुपयांपासून ते १००, १०५ रुपये सीताफळ का फायदेशीर ठरले?

  • मागणी भरपूर आहे. दरही आश्वासक
  • उन्हाळ्यात जानेवारी ते मे - अत्यंत कमी पाण्यात येते.
  • खते, कीडनाशके यांची गरज तुलनेने कमी
  • उत्पादन खर्च कमी
  • ठळक बाबी

  • मेच्या १० ते १५ तारखेला छाटणी
  • सेंद्रिय पद्धतीने नियोजन. दरवर्षी प्रतिझाड २० किलो शेणखत.
  •  प्रतिझाड सुमारे ४० किलो उत्पादन (जुन्या झाडांचे)
  • पूर्व-पश्‍चिम लागवडीमुळे मोसमी वाऱ्यांचा त्रास जाणवत नाही. त्यामुळे फूल, कळीगळ होत नाही
  • दरवर्षीचा खर्च - एकूण बागेतून सुमारे २५ ते ३० हजार रुपये एवढाच. गेल्यावर्षी नोटाबंदीचा फठका बसला. तरीही ७० रुपये निव्वळ नफा मिळाला.
  • मुलगा पुणे येथे पोलिस खात्यात. मोहिते व त्यांची सौभाग्यवती सौ. लता असे दोघेच शेतीत राबतात.
  • शेती हेच त्यांचे विश्‍व झाले आहे.
  • संपर्क- भानुदास मोहिते - ९९७०३८७०४५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com