agricultural success story in marathi, agrowon, nhavi, yaval, jalgaon | Agrowon

सर्वांना सोबत घेऊन शेती, शैक्षणिक विकासात पुढारलेले न्हावी गाव
चंद्रकांत जाधव
गुरुवार, 11 जानेवारी 2018


पीक संरक्षण सहकारी सोसायटीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासूून गावातील पिके व विहिरींचे संरक्षण केले जाते. गावातील पुढारलेल्या, दूरदृष्टी असलेल्या लोकांनी चांगल्या संस्था स्थापन केल्या. शेतीतही विकास घडवून आणला.
- रवींद्र कोलते, ७७०९३४००५
अध्यक्ष, पीक संरक्षण सहकारी सोसायटी, न्हावी गाव

 सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जिल्ह्यातील न्हावी गावाने शिक्षण व शेती विकासात अत्यंत विधायक प्रगती केली आहे. शिक्षण व दूध सोसायटी, पीक संरक्षण सोसायटी, ग्रामसुधारक मंडळ आदींची स्थापना झाली. आज त्यांचा कारभार अत्यंत यशस्वी सुरू आहे. ग्रामविकासाचा नवा अध्यायच या गावाने सादर केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील न्हावी (ता. यावल) गाव सातपुडा पायथ्यानजीक वसले आहे. केळी व भाजीपाला ही पिके या भागात अधिक प्रमाणात दिसून येतात. दुग्ध व्यवसायातही अनेक शेतकरी उतरले आहेत. जळगावपासून भुसावळ व पुढे पाडळसा (ता. यावल) मार्गे न्हावी असा गावाला जाण्यासाठी सोईस्कर मार्ग आहे. लोकसंख्या सुमारे २१ हजार, तर गावशिवाराचे क्षेत्र सुमारे १३०० हेक्‍टरपर्यंत आहे. केळी पिकाखाली सुमारे ९० टक्के क्षेत्र व्यापलेले असते. सातपुडा पर्वतातून येणारी मोर नदी गावाच्या शिवारासाठी उपयुक्त मानली जाते.

शिक्षणाचे बळकटीकरण
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर न्हावी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन भारत विद्यालयाची १९४७ मध्ये स्थापना केली. येथे तंत्रशिक्षणही नववी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळते. तंत्रशिक्षण देणारी जळगाव जिल्ह्यातील ही पहिलीच संस्था आहे. अभियांत्रिकीच्या शिक्षणासंबंधी विद्यार्थ्यांना तोंडओळख या शिक्षणाच्या माध्यमातून होते. आज गावातील अनेक अभियंते युरोप, अमेरिका, आखाती देशांत स्थिरावले आहेत. इथले सुमारे शंभर विद्यार्थी परदेशांत आहेत. न्हावीचे जुने नाव नाईपूर असून, ते पूर्वी सातपुडा पर्वतात होते. तेथून ग्रामस्थ कुठल्याशा कारणाने जवळच विस्थापित झाल्याचे सांगितले जाते. सन १९६८ मध्ये तत्कालीन पूर्व खानदेश लोकल बोर्ड संचालित शाळाही गावात सुरू झाली होती. आज तीन उर्दू व दोन मराठी शाळा आहेत.

न्हावी गावच्या ठळक बाबी

 • केळीच्या खरेदीसाठी जे. टी. महाजन सहकारी फ्रूटसेल सोसायटी
 • दुधाच्या खरेदीसाठी सहकारी दूध सोसायटी
 • शिवारात केळीची अधिक लागवड.
 • केळीच्या जवळपास सर्व क्षेत्रांत सूक्ष्मसिंचन
 • कपाशी, धान्य खरेदीदारांकडून करवसुलीसाठी ग्रामसुधार मंडळ कार्यरत
 • विहिरींमधील विजेची उपकरणे, पंपांच्या संरक्षणासाठी सहकारी पीक संरक्षण सोसायटी
 • केळी लागवडीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांचा उतिसंवर्धित रोप लागवडीकडे कल
 • मोर नदीवर लोकसहभागातून तीन सिमेंट नालाबांधनिर्मिती
 • मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत ग्रामस्थांचे मोठे योगदान
 • गावच्या शिवारातील काही भागाला मोर धरणाच्या पाण्याच्या लाभ
 • अभियांत्रिकी व अन्य उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची स्थापना

जुनी मंदिरे व सोयीसुविधा
गावात १४३५ मध्ये विठ्ठल मंदिराची स्थापना झाल्याचे संदर्भ आहेत. एका महिलेने त्यासाठी जागा दिली होती. गावात नाथ, स्वामिनारायण, गणपती, दुर्गादेवी मंदिरे आहेत. यातील विठ्ठल मंदिरात टोलेजंग बंदिस्त सभागृह उभारले असून लग्न, साखरपुडा व अन्य कार्यक्रम घेतले जातात. दुर्गादेवी मंदिरात सभागृह उभारले जात आहे. खंडेराव देवस्थानानजीकही सभागृह आहे. वर्गणी संकलित करून ही सभागृहे बांधण्यात आली. गावात एकाच दिवसात चार लग्न समारंभ पार पडू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पोळा सणाच्या वेळी खांदामळणीच्या दिवशी गावात संत नारायण नाथ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी नजीकच्या फैजपूर, कळमोदा, चिनावल, हंबर्डी, बोरखेडा आदी गावांमधील भक्तगणही येतात. सुमारे तीस क्विंटल गव्हाचा वापर होऊन त्याच्या पिठापासून बनविलेले लोडगे विस्तवावर शेकले जातात. लोडगे, गंगाफळ, वरण असा महाप्रसाद भक्तांना दिला जातो.

अन्य सोयीसुविधा

 • गाव मोठे असल्याने पिण्याचे पाणी, रस्ते यासंबंधी कामेही कटाक्षाने झाली आहेत.
 • अनेक प्रमुख शेतरस्त्यांचे खडीकरण तर ९० टक्‍क्‍यांवर रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण झाले अाहे.
 • काही लहान गल्ल्यांमध्ये पेव्हर ब्लॉक्स बसविले आहेत.
 • पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामीण रुग्णालय आहे.
 • भाजीपाला विक्रीसाठी आठवडी बाजार भरतो. हिवाळ्यात प्रसिद्ध भरिताची वांगी या बाजारात मिळतात. पिण्याच्या पाण्यासाठी सुकी धरणावरून जलवाहिनी आणण्यात आली आहे.

सहकारी सोसायटीकडून संरक्षण
गावात १९८० मध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी पीक संरक्षण सोसायटीची स्थापना केली.
गाव सातपुडा पर्वतानजीक असल्याने शेतात चोऱ्या होतात. वन्यप्राण्यांकडून नुकसान होते. ही बाब लक्षात घेता पिके व विहिरींच्या संरक्षणासाठी सोसायटी स्थापन झाली. आठ कर्मचारी संस्थेत कार्यरत असून, त्यांचे वेतन सोसायटी अदा करते. सोसायटीचे १३ संचालक, तर सुमारे ५१८ सभासद आहेत. एकरी २३ रुपये याप्रमाणे कर त्यांच्याकडून आकारला जातो. विहिरींसाठी १६० रुपये घेतले जातात. चोरी करताना कुणी सापडले, तर गावातच तंटा मिटवून दोषींकडून दंड वसूल केला जातो. वाद सोडवण्यात सोसायटीचाच पुढाकार असतो. सोसायटीला दरवर्षी बऱ्यापैकी पैसा कर व अन्य बाबींमधून मिळतो. पूर्वी रस्त्यांचा अभाव व अन्य समस्या असल्याने सोसायटीकडे कर्मचाऱ्यांना शिवारात फिरण्यासाठी किंवा गस्त घालण्यासाठी घोड्यांची सुविधा होते. आता दुचाकी व अन्य वाहनांद्वारे कर्मचारी शिवारात सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत फिरतात.

करवसुली
गावातील शेतमाल गावात येऊन खरेदी करणारे व्यापारी, खरेदीदार यांच्याकडून कर वसूल केला जातो. कडधान्य व तृणधान्यांसाठी प्रतिक्विंटल १० रुपये, तर कपाशीसाठी १५ रुपये प्रतिक्विंटल कर द्यावा लागतो. ग्रामसुधारक मंडळ त्यासाठी कार्यवाही करते. सन १९७५ मध्ये या मंडळाची स्थापना झाली. दरवर्षी आठ संचालक ग्रामसभा घेऊन नियुक्त केले जातात. दरवर्षी जो कर गोळा होतो तो मंदिराच्या विकासासाठी दिला जातो.

दुग्ध व्यवसाय
गावात सहकारी दूध सोसायटी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. दररोज ८०० लिटर म्हशीचे, तर ४०० लिटर गायीचे दूध संकलित होते. नियमित व विक्रमी दूध पुरवठादार शेतकऱ्यांना सोसायटी दिवाळीला बोनस देते. सोसायटीचे ग्रामपंचायतीनजीक संकलन केंद्र, कार्यालय आहे. तसेच अन्य ठिकाणी पशुखाद्य व अन्य बाबींसाठी गोदाम आहे.

यशस्वी, दिग्गजांचे गाव म्हणून लौकिक
न्हावीमध्ये अनेक अधिकारी घडले. त्यात एल. झेड. पाटील (निवृत्त महिला व बालकल्याण सहआयुक्त), जे. टी. जंगले (निवृत्त, मुख्य अभियंता, पाटबंधारे विभाग, औरंगाबाद), कृषी व पशुसंवर्धन विभागातील लेखा अधिकारी कुमुदिनी भंगाळे आदींचा ग्रामस्थ आवर्जून उल्लेख करतात. इस्रो संस्थेने अवकाशात सोडलेल्या व पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय निर्मिती स्वयम्‌ या उपग्रहाची निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चमूचा प्रमुख धवल वाघुळदे मूळचा न्हावीचाच आहे. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री जे. टी. महाजन, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य विद्या महाजन हेदेखील न्हावी येथील आहेत. माजी राज्यमंत्री महाजन यांचे लहान बंधू ढेमा महाजन अभियंता असून, परदेशात स्थायिक आहेत.

प्रतिक्रिया 

न्हावी गावाचा इतिहास गौरवशाली आहे. तो मी एका पुस्तकातून मांडला आहे. केळी हे आमच्या गावाचे प्रमुख पीक आहे. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शिक्षण संस्था स्थापन केल्या व गावाचा शैक्षणिक विकास झाला.
- एल. झेड. पाटील

गाव विकासासाठी ग्रामस्थ एक विचाराने काम करतात. यातूनच अनेक सोसायट्यांची यशस्वी स्थापना झाली वन त्या समर्थपणे कार्यरत आहेत.
-शरद महाजन, अध्यक्ष, मधुकर सहकारी साखर कारखाना, न्हावी

शेती व शैक्षणिक विकासासाठी विविध संस्था स्थापन केल्या. त्यांनी प्रभावीपणे काम करून दाखविले. शेतीसह शिक्षणात आमचे गाव पुढे गेले.
- एल. ओ. चौधरी, ग्रामस्थ

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...