निर्धार, इच्छाशक्ती, एकीतून निढळने हटविला दुष्काळ

पाणलोट विकास, उत्तम प्रतीचे क्षेत्रीय उपचार केल्यामुळे दुष्काळी निढळ सुजलाम झाले आहे. ऊस, कांदा, डाळिंब, आवळा, सिताफळ, केळी, आंबा यासारखी पिके गावशिवारात दिसू लागली आहेत. वनग्राम समिती करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून २२० हेक्टर क्षेत्रावर जंगल वाढविण्याचे काम सुरू आहे. सर्वांनी योगदान दिल्यास राज्यातील दुष्काळी भाग संपन्न होऊ शकतो. शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेस लोकसहभाग देऊन कामे केल्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. -चंद्रकांत दळवी, विभागीय आयुक्त, पुणे
पाणी पूजन करताना ग्रामस्थ
पाणी पूजन करताना ग्रामस्थ

एकेकाळी दुष्काळ पाचवीला पुजलेले गाव अशी निढळची (जि. सातारा) अोळख होती. शेतीपद्धती, पीकपद्धती, अर्थकारण, मुबलक पाणी असं काहीच विधायक घडत नव्हतं. मात्र सक्षम नेतृत्व, ग्रामस्थांचा निर्धार, इच्छाशक्ती, त्यांचे श्रमदान आदी सर्व बाबींमधून अखेर बदल घडला. एकेकाळाचे जिरायती निढळ गाव बागायती झाले. पाणलोटाची विविध कामे झाली. पीकपद्धती बदलू लागली. गावचे अर्थकारण सुधारू लागले. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या पुढाकाराने घडलेला हा विकास आदर्शव्रत असाच आहे.   सातारा जिल्ह्यातील निढळ (ता. खटाव) हे साडेतीन ते चार हजार लोकवस्तीचे गाव. दुष्काळ पाचवीला पुजलेला. त्यामुळे शेतीची झालेली दुरवस्था. ज्वारी, बाजरी आदी जिरायती पिके हीच काय ती शेतीतील संपत्ती. वीज नाही, पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे विकासाच्या निकषांमध्ये गाव कुठेच बसत नव्हते. गावाला बदलण्याचा निर्धार याच गावचे चंद्रकांत दळवी पहिल्यापासूनच बुद्धिमान. शैक्षणिक आलेख उंचावत ठेवणारे दळवी १९८३ मध्ये राज्य प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून दाखल झाले. सन १९९५ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. विकासापासून आपले गाव वंचित राहू नये असे त्यांना सतत वाटायचे. त्यादृष्टीने निश्‍चित दृष्टीकोन ठेऊन तसेच गावातील लोकांचा सहभाग मिळवत त्यांनी काम हाती घेतले. शिक्षणापासून विकासाचा श्रीगणेशा श्री. दळवी यांनी गावातील विद्यार्थी शिकले पाहिजेत, यासाठी प्रथम शाळेसाठी नवी इमारत बांधण्याचा संकल्प सोडला. या इमारतीसाठी नोकरवर्ग व व्यावसायिक संघटना (मुंबई) स्थापना करण्यात आली. गावातील पाच लाख रुपये किमतीची दहा एकर जमीन निर्मळ समाजाच्या ग्रामस्थांनी दान केली. स्थापन केलेली संस्था, लोकवर्गणी यातून जमा झालेल्या रकमेतून हनुमान विद्यालयाची १७ खोल्यांची इमारत तयार झाली. यात प्रयोगशाळा, सभागृह तसेच क्रीडांगणाचा समावेश आहे. ग्रामदैवत असलेल्या महादेव मंदिराचीही लोकवर्गणीतून पुनर्बांधणी केली. पाणलोट विकासात सुरवातीला अपयश सन १९९४ मध्ये गावाला पाणलोट विकास प्रकल्प मंजूर झाला. नाबार्डने दीडशे हेक्‍टरवर पथदर्शक प्रकल्प राबवून दाखविण्याचे उद्दिष्ट ग्रामस्थांना दिले. मात्र, काही कारणांमुळे अपेक्षित श्रमदान झाले नाही. त्यामुळे ‘इंडो-जर्मन वॉटरशेड प्रोग्राम’ बंद पडला. याच दरम्यान पाऊसही झाला. त्यामुळे ग्रामस्थांचे प्रकल्पाकडे फार लक्ष गेले नाही. तीन चे चार वर्षे अशीच वाया गेली. गावात १९९७ ते ९९ या काळात कोणतेही नवे काम झाले नाही. ग्रामस्वच्छता अभियान व पुन्हा पाणलोटाकडे या दरम्यान राज्य शासनाने लोकसहभागावर आधारित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. सर्वात स्वच्छ गावाला पंचवीस लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळणार होते. हा पुरस्कार मिळविण्याचा निर्धार नोकरवर्ग संघटना व ग्रामस्थांनी केला. अर्थात त्यामागे श्री. दळवी यांचे प्रोत्साहन होते. गावातील नोकरवर्ग, ग्रामस्थ, तरुण, वृद्ध, महिला यांनी श्री. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर स्वच्छतेसाठी काम केले. त्याचे फळ म्हणजे गावाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार व २५ लाख रुपयांची रक्कमही मिळाली. या पुरस्काराने निढळची ओळख राज्यात झाली. अन्य गावांतील लोक गावाला भेट देऊ लागले. यामुळे निढळमधील लोकांचा उत्साह अजून वाढला. यातून ग्रामसभेत बंद पडलेल्या पाणलोट प्रकल्पाचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. विकासाच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत श्री. दळवी यांचा सहभाग विशेष महत्त्वाचा होता. श्रमदानाने विकासाला गती लोकसहभागातून झालेल्या कामांचे सादरीकरण केल्याने नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी गावास प्रत्यक्ष भेट दिली. श्री. दळवी यांच्यासह ग्रामस्थांनी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात श्रमदान करीत एक लाख ३४ हजार रुपयांचे काम आठ दिवसांत पूर्ण केले. या मुळे नाबार्डकडून दीडशे एकरांसाठी नऊ लाख ८३ लाखांचा निधी मंजूर झाला. गावातील पाणलोट समितीचा सहभाग महत्त्वाचा ठरला. सन २००५ मध्ये सर्व कामांची पूर्तता केल्यावर २००६ मध्ये एक कोटी ४८ लाख रुपये निधी नाबार्डकडून मंजूर करण्यात आला. पाणलोट कामांची वैशिष्ट्ये

  • पाणलोट विकासाचा देशातील २००१ हेक्टरवरील सर्वांत मोठा प्रकल्प.
  • माथा ते पायथा सुत्रानूसार ४५ टक्क्यांपेक्षा अधिक डोंगरावर क्षेत्रीय उपचार.
  • पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत तसेच मंजूर किमतीपेक्षा कमी निधीत प्रकल्प राबविला.
  • डोंगरावर स्टोन बंडिग, सीसीटी व त्यावर वृक्षलागवड केल्याने बोडके डोंगर हिरवेगार झाले.
  • गावातील चार ओढ्यांवर सिमेंट बंधारे
  • जलयुक्त अभियानाच्या माध्यमातून ‘डीप सीसीटी’ २५ किलोमीटर परिघात
  • पीकपद्धतीत बदल झालेल्या कामांतून विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीच्या पाण्याची टंचाई संपली. बाजरी, मूग, हरभरा या पिकांची जागा कांदा, बटाटा, हळद, वाटाणा, ऊस, मिरची, वांगी, शेवगा या पिकांनी घेतली. काही ठिकाणी स्ट्राॅबेरी, केळी, आंबा, अंजीर, जांभूळ, सीताफळ, पपईच्या बागा फुलल्या. यातून शेतकऱ्यांना शाश्वत अर्थाजन होऊ लागले आहे. पाण्याची काटेकोरपणे वापर व्हावा यासाठी फळपिके तसेच नगदी पिकांत शंभर एकरांवर ठिबक करण्यात आले आहे. भविष्यात संपूर्ण शेती ठिबकखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतीपूरक व्यवसाय दुष्काळामुळे अडचणीत आलेला दुग्धव्यवसाय पाण्याच्या उपलब्धेतमुळे वाढला. घरटीत दोन म्हशी किंवा गायींचे संगोपन होऊन प्रतिदिन ४०० लिटर वरून गावात चार हजार लिटर दूध संकलित होऊ लागले. बंदिस्त शेळीपालन, पोल्ट्री, वराहपालनाबरोबर ट्रॅक्टर, मळणी मशीन, पॅावर टिलर आदींचेही जोडधंदे सुरू झाले आहेत. किराणा, कापड, हॅाटेल व्यवसायांसह पुसेगाव येथे ठिबक सिंचन, खते बियाणे व्यवसाय, शेती अवजारे निर्मिती, वाहतूक व्यवसाय तरुण करू लागले आहे. यामुळे तरुणांचे स्थलांतर बंद झाले असून व्यवसाय करण्याकडे कल वाढला आहे. अर्थकारण सुधारतेय

  • महिलांनी बचतीची सवय लागावी यासाठी ६५ महिला गटांची स्थापना
  • महिलांच्या बैठकीसाठी महिला भवन
  • निळकंठेश्र्वर सहकारी पतसंस्थेची स्थापना. संस्था चांगली वाढीस लागली असून मुंबई व सातारा येथे शाखा काढण्याचे नियोजन
  • ड वर्गात असलेली विकास सेवा सोसायटी श्री. दळवी यांच्या मार्गदर्शनातून
  • पुन्हा अ वर्गात आली. सोसायटीवर तरुण संचालकांची निवड करण्यात आली. कर्ज व अन्य कामांसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा सुरू करण्यात आली आहे.
  • घनकचरा व सांडपाण्याची विल्हेवाट

  • गावात जागोजागी कचरा कुंड्या. कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी
  • सांडपाणी रस्त्यावर येत होते. यासाठी घराशेजारी शोषखड्डा काढून त्यामध्ये पाणी सोडले जाते. त्यासाठी गावात गटारे. सर्व गटारांचे पाणी एका जागेवर आणले आहे.
  • गावातील रस्त्यांवरील अतिक्रमणे संत गाडगेबाबा अभियानातून निघाली आहेत. सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण, मुरूमीकरण.
  • तंटामुक्त गाव निढळ तंटामुक्त व्हावे हा मनोदय श्री. दळवी यांनी ग्रामसभेत मांडला. गावाने त्याची त्वरित अंमलबाजवणी सुरू केली. गावात तंटामुक्ती समितीची स्थापना केली. विविध न्यायालयात प्रलंबित दिवाणी, फौजदारी, महसुली आदी १२० तंट्याची माहिती घेण्यात आली. पक्षकारांमध्ये तडजोड करून १२० तंटे मिटविण्यात आले. यातून तंटामुक्त गावाचा पाच लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. सुसज्ज कार्यालये नवीन अद्ययावत ग्रामपंचायत कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या मजल्यावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालये आहेत. नागरिकांसाठी अभ्यागत कक्ष, अभिलेख कक्ष तसेच खालील मजल्यावर सभागृह आहे. विकास सेवा सोसायटीचीही दोन मजली इमारत उभारली पाणलोट इमारत व महिला भवनही बांधण्यात आले आहे. महिला गट बैठकांसाठी सभागृह, महिला बचत गट उत्पादीत मालाची विक्री करण्यासाठी दुकान गाळे अशा सुविधा करण्यात आली आहे. निढळ गावाला मिळालेले पुरस्कार

  • अस्पृश्यता निवारण कामांसाठी जिल्हा परिषदेकडून गौरव
  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पहिला पुरस्कार
  • महात्मा फुले जलंसधारण जिल्हास्तरीय पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार
  • सार्क व्हिलेजसाठी शिफारस, विमाग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, नॅशनल वॅाटर अॅवॅार्ड, भूमी जलसंवर्धन, इको व्हिलेज, कर्मवीर आदर्श विद्यालय आदी पुरस्कार  प्रतिक्रिया
  • विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील जलसंधारणाची कामे झाली आहेत. या कामांमुळे गावातील विहिरींच्या पाणीपातळी वाढ झाल्याने नगदी पिके शेतकरी घेऊ लागली आहेत. लोकसहभागामुळे गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे. - श्रीमंत निर्मळ - ९४२२०९१६३४ सरपंच

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com