देशी गोसंगोपनासह दुधालाही मिळविले मार्केट

देशी गोसंगोपन ही चळवळ आज देशी गायींच्या जाती लुप्त होत चालल्या आहेत. त्यांचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. ही चळवळ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न आहे. देशी गायी व तिच्या दुधाचे महत्त्व यांचा सविस्तर अभ्यास करून संशोधन संदर्भ संकलित केले आहेत. -मंगेश काळभोर
पणदरे येथील मंगेश काळभोर यांनी उभालेला देशी गायींचा गोठा
पणदरे येथील मंगेश काळभोर यांनी उभालेला देशी गायींचा गोठा

बारामती(जि. पुणे)पासून जवळच पणदरे येथील मंगेश काळभोर या युवकाने काळाची गरज लक्षात घेऊन सुमारे ५० ते ६० देशी गायींचे संगोपन सुरू केले आहे. देशी दुधाला पुण्यात सुमारे दोनशे ग्राहक तयार केले आहेत. देशी गोसंवर्धन चळवळ वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून हा युवक आपल्या दोन मित्रांच्या भागीदारीत दुग्ध व्यवसायाला चालना देतो आहे. पुणे जिल्ह्यात बारामतीपासून जवळच असलेल्या निरा कालवा भागातील निगडे वस्तीजवळ मंगेश काळभोर हा युवक परिसरातील युवा शेतकऱ्यांसाठी आदर्श होऊ पाहतो आहे. या भागातील प्रयोगशील शेतकरी आणि शिक्षक वसंतराव काळभोर यांचा हा मुलगा मंगेश गावच्या शाळेत दहावीला पहिला आला. पुढे त्याने ‘मॅकेनिकल डिझाईन’ या विषयात इंजिनिअरिंगमधून मास्टर डिग्रीही (एमई) घेतली. त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात सुमारे दीड वर्षे ‘लेक्चरर’ म्हणूनही अनुभव घेतला. संशोधक वृत्ती बाळगत कालव्यावरील जलविद्युत निर्मितीमध्ये काही काळ संशोधनही केले. गावाकडची माती साद घालत होती उच्चशिक्षणानंतर चांगल्या नोकरीचीही संधी निश्चित होती. मात्र गावची माती मंगेशला साद घालत होती. त्यावर तो म्हणतो की, शेतकरी पुत्र असलो तरी उद्योजकाचा पिंड माझ्यात ठासून भरलेला आहे. त्यामुळे ‘अॅग्री-बिझनेस’ सुरू करावा असे सतत वाटत असे. बारामतीच्या लघुउद्योग भारतीच्या वर्तुळात काम करण्याची संधी मिळाली आणि तेथून व्यावसायिकतेची दृष्टी घेऊन शेतीकडे परतलो असे मंगेश सांगतो. देशी गोपालनात उडी 'लघुउद्योग भारती’चे प्रमुख रवी सोनवणे यांनी देशी गोपालन, देशी दूध ( ए २ मिल्क) यांचे महत्त्व समजावून दिले. त्यानंतर हाच व्यवसाय सुरू करण्याचे मंगेशने निश्चित केले. गावातील वर्गमित्र चेतन निगडे आणि विठ्ठल कोकरे यांच्यासमोर गोठा व डेअरी प्रकल्प उभारण्याचा विचार मांडला. दोघेही सिव्हिल इंजिनियर होते. त्यांनाही उद्योगाची आवड होतीच. मात्र शिकली सवरलेली इंजिनियर मुलं शेण-गोमूत्रात काम करणार असल्याचं कळताच आमच्यापैकी कोणाच्याही पालकांना गोठ्याचा ‘प्रोजेक्ट’ पसंत पडला नाही. परंतु आमचा निर्धार पक्का होता असे मंगेशने सांगितले. व्यवसायाची उभारणी

  • डेअरी व्यवसायात उतरण्याचा ठाम निर्णय झाल्यानंतर तिघा मित्रांनी कामे वाटून घेतली.
  • गोठ्याची उभारणी, जनावरांचे संगोपन ते दूध संकलन जबाबदारी- चेतन, विठ्ठल.
  • गायींची निवड, दुधाची विक्री वा मार्केटिंग- मंगेश.
  • दोन लाख रुपये भांडवल जमा करून 'अमरा गोसंवर्धन मिल्क अॅन्ड अॅग्रो प्रॉडक्टस् प्रायव्हेट लिमिटेड' अशी फर्म तयार केली. तिघेही फर्मचे संचालक बनले.
  • गायींची निवड- मंगेश म्हणाला की गोशाळा आणि डेअरी सुरू करण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी होती ती जातीवंत, मात्र चांगले दूध देणाऱ्या देशी गायींची. प्राणी पैदासशास्त्राचा अभ्यास असलेले पुण्यातील राजेश गुप्ते यांनी त्यासाठी मदत केली. पंजाब-राजस्थानच्या सीमेवरून राठी जातीच्या तीन गायी शेतकऱ्यांकडून घेण्यात आल्या.
  • आज लहान-मोठ्या मिळून सुमारे ५० ते ६० गायी.
  • दूधविक्रीचे ‘प्लॅनिंग’

  • देशी गायीचे दूध अत्यंत आरोग्यवर्धक असल्याने ग्राहकांकडून त्यास चांगली मागणी आहे हे अोळखले.
  • पुणे शहरात त्यादृष्टीने विक्रीचे प्लॅनिंग केले. पुण्यात अोळखीच्या लोकांकडे जाऊन त्यांना भेटणे, त्यांना देशी दुधाचे महत्त्व समजावून सांगणे, असे प्रयत्न केले. ‘डोअर टू डोअर’ ग्राहक भेटी घेतल्या. त्यातून ग्राहकांचे प्रबोधन झाले.
  • त्याचे झालेले रूपांतर

  • पुण्यात चार वितरक तयार झाले. तर ग्राहक सुमारे २०० पर्यंत (होम डिलिव्हरी)
  • दूध संकलन- मंगेश यांचा गोठा- सुमारे १६० लिटर
  • अन्य शेतकरी- (उदा. गावातील काळभोर आणि पानसरे)- ४० लिटर
  • दुधाचा ब्रॅंड- अमरा
  • दर- ८० रुपये प्रति लिटर
  • दूध शिल्लक राहिल्यास तुपाची निर्मिती
  • त्याचा दर- तीन हजार रुपये प्रति किलोने
  • दुधाची वैशिष्ट्ये

  • दूध दर्जेदार ठेवण्यासाठी गोठा व्यवस्थापन चांगले ठेवले जाते.
  • गोठा स्वच्छ, हवेशीर. तेथे दुर्गंधी, माशा, किडे अजिबात आढळून येत नाहीत.
  • दूध हाताने काढले जाते.
  • धारोष्ण दूधात बॅक्टेरियल काउंट (जिवाणूंची संख्या) वाढण्याच्या आधी पहिल्या दहा मिनिटात गोठ्याशेजारील बल्क मिल्क कुलरमध्ये दूध टाकले जाते.
  • प्रतिक्रिया देशी गायीचे गोठे उभारणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही हा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी निर्भेळ दुधाची व दुग्धजन्य पदार्थांची कष्टपूर्वक बाजारपेठ तयार करावी लागेल.आम्ही त्याच प्रयत्नात अाहोत. -विठ्ठल कोकरे, चेतन निगडे दहा गायींच्या मॉडेलचा ताळेबंद मंगेशने प्रति दहा गायींवर आधारीत मॉडेल तयार केले आहे. त्याचा ताळेबंद असा राहू शकतो.

  • प्रति गाय ७० हजार रुपये याप्रमाणे १० गायी खरेदी- सात लाख रु.
  • चाळीस बाय १५ फूट क्षेत्रावरील साधा गोठा उभारणी- दीड लाख रु.
  • खुराक खर्च- एक हजार रुपये प्रतिदिन
  • मजूर खर्च- ३०० रु. प्रतिदिन
  • गोठा देखभाल खर्च- ५० रु. प्रतिदिन
  • प्रस्तावित उत्पन्न

  • दूध विक्री- ८० रुपये प्रति लिटर दर- प्रतिदिन ७० लिटर- ५६०० रु.
  • शेण- सहा हजार रुपये प्रति ट्रॉली- प्रतिमहा- ९००० रु.
  • गोमूत्र- प्रतिलिटर दहा रुपये-प्रतिमहा- ३० हजार रु.
  • दहा लिटर दुधापासून एक किलो तुपाचे (दूध शिल्लक राहिल्यास) प्रतिकिलो तीन हजार रुपये.
  • संपर्क- मंगेश काळभोर- ९९२२४४६८६९  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com