पीकपद्धतींत बदल करून पांगरा शिंदे प्रगतीपथावर

सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी येत्या काळात गाव परिसरातील डोंगरावर पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाणारे पाणी अडविण्यात येणारर आहे. त्यासाठी शिवारात जलसंधारणाच्या कामांचे नियोजन आहे. विकास कामांमध्ये ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे. सांडपाण्यासाठी शोषखड्डे तसेच घनकचरा व्यवस्थापनाचा उपक्रम राबविणार आहोत. -भागवत शिंदे, सरपंच, पांगरा शिंदे
 पांगरा शिंदे येथील रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमवेत सरपंच भागवत शिंदे, ग्रामसेवक आदिनाथ पांचाळ
पांगरा शिंदे येथील रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमवेत सरपंच भागवत शिंदे, ग्रामसेवक आदिनाथ पांचाळ

हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथील तरुण कष्टाळू शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करीत प्रगतीकडे पाऊल टाकले आहे. भाजीपाला, झेंडू, रेशीम शेतीच्या माध्यमातून आश्वासक उत्पन्नाच्या दिशेने ग्रामस्थांची वाटचाल सुरू आहे. तरुण नेतृत्वाखाली लोकाभिमुख ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यात येत अाहेत. आदर्श गावाच्या वाटेवर गाव आहे. शिवारात केलेल्या जलसंधारणाच्या उपचारांमुळे भूजल पातळी वाढली आहे. हंगामी सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. घरोघरच्या नळांना पाणीमीटर बसविण्यात आल्यामुळे पाणीपट्टीची चोख वसुली होत आहे . वसमत-हिंगोली-अकोला या रेल्वमार्गावरील पांगरा शिंदे हे वसमत तालुक्यातील (जि. हिंगोली) टोकाचे गाव. कळमनुरी, औंढा नागनाथ या तालुक्यांच्या सिमेवर असलेले व डोंगराच्या कुशीत वसलेले गाव म्हणून त्याकडे पाहिले जाते. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यामध्ये या गावातील स्वातंत्र्य सेनानींचा सक्रिय सहभाग राहिला आहे. गावामध्ये रोकडेश्वर हे जागृत देवस्थान आहे. दर बारा वर्षांनी बेलवृक्षापासून तयार करण्यात आलेल्या रोकडेश्वर यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. या उत्सवामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. गावातील पीकपद्धती

  • गाव शिवारातील सुमारे ७० टक्के जमीन मुरमाड, बरड स्वरुपाची आहे
  • गावातील ९० टक्के शेतकरी अल्पभूधारक.
  • कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके घेतली जातात.
  • बागायती क्षेत्रात हळद, झेंडू, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाला पिके असतात.
  • कांदा तसेच दुधी भोपळा बीजोत्पादनाकडे काही शेतकरी वळले आहेत.
  • उसाच्या गावची अोळख आता भाजीपाला पिकांसाठी काही वर्षांपूर्वी ऊस हे गावचे नगदी पीक होते. गूळ तयार करून विक्री केली जात असे. त्याकाळी गावात अनेक गुऱ्हाळे होती. अलीकडील काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उसाला पाणी कमी पडू लागले. त्यामुळे शेतकरी भाजीपाला, झेंडू आदी पिकांकडे वळले. झेंडू उत्पादक गाव म्हणून देखील या गावाची ओळख होऊ लागली आहे. कमी पाण्यात शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे तरुण शेतकरी आकर्षित झाले आहेत. शेती हा गावचा प्रमुख व्यवसाय आहे. अनेकांनी शेतीला किराणा दुकान, कृषी निविष्ठा विक्री केंद्र, मशिनरी स्टोअर आदी व्यवसायांची जोड दिली आहे. अर्थात शेतीशी असलेली नाळ मात्र येथील शेतकऱ्यांनी कायम ठेवली आहे. तरुण शेतकऱ्यांना भावतेय रेशीम शेती गावातील सोपान शिंदे यांची दोघा भावांमध्ये चार एकर शेती आहे. खडकाळ जमिनीमुळे पाऊस कमी झाला. सोयाबीन, कापूस, तूर आदी पारंपरिक पिकांपासून खात्रीशीर उत्पादन मिळत नसे. त्यामुळे २०१४ मध्ये शिंदे यांनी गावात प्रथमच एक एकरवर तुती लागवड केली. रेशीम कोष उत्पादन सुरू केले. कर्नाटकातील रामनगर तसेच तेलंगणातील जंगम येथील बाजारपेठेत कोषांची विक्री केली जाते. आज या व्यवसायात ते कुशल झाले आहेत. दरवर्षी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळू लागले आहे. शिंदे यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील अनेक तरुण शेतकरी दर महिन्याला नोकरीच्या पगाराप्रमाणे खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे वळले आहेत. गावातील रेशीम शेती दृष्टिक्षेपात

  • जिल्हा रेशीम कार्यालयाच्या मदतीने गेल्यावर्षी ३७ शेतकऱ्यांकडून ४० एकरांवर तुती लागवड
  • पैकी २२ शेतकऱ्यांकडून रेशीम कोष उत्पादन सुरू
  • उर्वरित शेतकऱ्यांकडून कीटक संगोपनगृह उभारणीची कामे सुरू
  • झेंडूची शेती गावातील २५ ते ३० शेतकरी झेंडू फुलांचे उत्पादन घेतात. प्रत्येकाकडे किमान अर्धा एकर लागवड असते. दसरा, दिवाळी सणानिमित्त या फुलांना मागणी असते. यंदा सरासरी ४० ते ५० रुपये प्रति किलो दर मिळाल्याने चांगले उत्पन्न मिळाल्याचे शेतकरी सांगतात. जलसंधारणाच्या कामांमुळे संरक्षित पाणीसाठे जलसंधारणाच्या कामांतही गाव मागे नाही. या कामांचाच भाग म्हणून डोंगर उतारावर खोल सलग समतल चर खोदण्यात आले आहेत. सहा नवीन बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. वीस जुन्या बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला. पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात आली. उपचार करून तलावाचा पाझर बंद करुन साठवण तलावांमध्ये त्यांचे रूपांतर करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तसेच शिरपूर पॅटर्न नुसार नाला खोलीकरणाची कामे झाली. त्यामुळे पडलेल्या पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले. यंदा कमी पाऊस होऊनही सिंचनासाठी संरक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. घरोघरच्या नळांना पाणीमीटर आठ किलोमीटरवरील राजवाडी येथील पाझर तलावजवळ पांगरा शिंदे येथील नळपाणी पुरवठा योजनेची व विहिर खोदण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गंत हे काम झाले. जलवाहिन्यांद्वारे गावातील पाण्याच्या टाक्यांत पाणी आणले आहे. गावात ६८१ नळजोडण्या आहेत. प्रत्येक नळाला पाणीमीटर बसविण्यात आले आहे. एक पैसा प्रतिलिटर या प्रमाणे दररोज सकाळी सहा ते अकरा या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येतो. मीटरवरील ‘रीडिंग’ नुसार पाणीपट्टीची आकारणी करून वसुली करण्यात येते. ग्रामस्थ नियमित पाणी पट्टी भरतात. वसुलीच्या रकमेतून पाणीपुरवठा विहिरीचे बळकटीकरण करण्यात आले आहे. देखभाल दुरुस्ती, वीजबिल भरण्यासाठी निधी उपलब्ध होत आहे. वीज भारनियमनाचा अपवाद वगळता नियमित पाणीपुरवठा केला जातो. दिवाळी सणानिमित्त बोनस म्हणून प्रत्येक कुटूंबास तीन हजार लिटर पाणी मोफत दिले जाते. शैक्षणिक संस्था तसेच धार्मिक स्थळांना मोफत पाणीपुरवठा केला जातो. ग्राम सुधारणेतील ठळक बाबी

  • गावात जिल्हा परिषदेची सातव्या इयत्तेपर्यंत तर संस्थेची पाचवी ते बारावीपर्यंत शाळा आहे. चार पैकी एका अंगणवाडीला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. आरोग्य सुविधेसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र आहे. पशुवैद्यकीय उपचार केंद्रही आहे.
  •  सिमेंट बांधकामे तसेच पेव्हर ब्लाॅकच्या माध्यमातून गावातील प्रमुख रस्ते तसेच चौक पक्के करण्यात आले आहेत. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटारे बांधण्यात आली आहेत. सुमारे ५५ घरांचे सांडपाण्यासाठी शोषण खड्डे तयार करण्यात आले आहेत.
  • स्वच्छतागृहांचे बांधकाम करून त्याचा वापर सुरु केल्यामुळे गाव हागणदारीमुक्त झाले आहे.
  • सन २०१५ मध्ये गावाला महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार मिळाला. या पुरस्काराच्या तीन लाख रुपये रकमेतून रेल्वे स्टेशन ते गावातील बस थांब्यापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली आहे.
  •  विजेची बचत करण्यासाठी एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत.
  •  महिलांचे मतदान घेऊन गावातील दारूचे दुकान बंद करण्यात आले आहे.
  •  विद्यमान सरपंच भागवत शिंदे यांनी लोक सहभागातून ग्रामविकासाचे विविध उपक्रम राबविल्यामुळे गावाला वेगळी ओळख निर्माण करणे शक्य झाले.
  •     पांगरा शिंदे दृष्टिक्षेपात

  • लोकसंख्या - ४०६६ (२०११ नुसार)
  • कुटूंब संख्या- ९००  (२०११ नुसार)
  • स्वच्छतागृहे- ९००
  • भौगोलिक क्षेत्र- १,४९७ .७२ हेक्टर
  • लागवडीयोग्य क्षेत्र- १,३८५ हेक्टर
  • गायरान- ५६.३३ हेक्टर
  • गावठाण व सार्वजनिक सुविधा क्षेत्र- १५ हेक्टर
  • जिरायत क्षेत्र- १,३८५ हेक्टर
  • हंगामी सिंचन क्षेत्र-१५० हेक्टर.
  • प्रतिक्रिया ग्रामपंचायतीच्या कराचा भरणा ग्रामस्थ नियमित करतात. पाणीपट्टीच्या रकमेतून देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत आहे. -आदिनाथ पांचाळ, ग्रामसेवक - ७३५०३५०००३   गावामध्ये मी प्रथमच रेशीम शेतीस सुरवात केली. कृषी विभागातर्फे आयोजित अभ्यास सहलींमध्ये गावातील शेतकऱ्यांनी राज्यातील विविध रेशीम उत्पादकांच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी रेशीम शेतीत उतरले. दरवर्षी माझ्याकडे अर्धा एकर झेंडू असतो. शेताजवळील बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे विहिरीतील पाणीपातळी वाढली आहे. यंदा कमी पाणी पाऊस पडूनही सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. सोपान शिंदे, शेतकरी संपर्क- ९७६४१९८२१७   माझी साडेचार एकर शेती आहे. दोन वर्षांपूर्वी दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. दररोज २५ लिटर दूध संकलन होते. गेल्यावर्षी दीड एकरवर तुती लागवड केली. कोष उत्पादन सुरू केले आहे. ‘मिल्क आणि सिर्ल्क या संकल्पनेच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मिळाला आहे. -त्र्यंबक शिंदे - ९०४९८५०३०५ माझी २२ एकर शेती आहे. त्यापैकी चार एकरांवर तुती लागवड आहे. दीडशे अंडीपूंजांच्या पहिल्या बॅचपासून दीड क्विंटल कोष उत्पादन अपेक्षित आहे. वारंगा फाटा येथे माझे कृषी निविष्ठा केंद्र आहे. त्यातून पूरक उत्पन्न मिळते. उत्पन्नाची खात्री असल्यामुळे रेशीम शेतीकडे वळलो आहोत. सुशील शिंदे, शेतकरी  

    संपर्क- भागवत शिंदे :९६३७२६२६५१          सोपान शिंदे-९७६४१९८२१७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com