पंचवीस एकरांत ‘ठिबक’मधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

कोणत्या ‘प्लॉट’ला पाणी सोडले आहे याचा तपशील मोबाईलद्वारे पाहता येतो. पाणीपुरवठा नियोजनबद्ध होण्यासाठी शेतात बसविलेले व्हॉल्व्हज.
कोणत्या ‘प्लॉट’ला पाणी सोडले आहे याचा तपशील मोबाईलद्वारे पाहता येतो. पाणीपुरवठा नियोजनबद्ध होण्यासाठी शेतात बसविलेले व्हॉल्व्हज.

कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील प्रकाश बाळासाहेब पाटील यांनी ठिबक सिंचनातील नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार केला आहे. सुमारे २५ एकरांतील १७ एकरांतील उसाला व आठ एकर सोयाबीनसाठी शंभर टक्के ‘ड्रीप ॲटोमेशन’ तंत्राचा वापर केला आहे. त्यातून मजूर खर्च, वेळ आणि श्रम यात मोठी बचत साधली.   कोल्हापूर जिल्ह्यात पट्टणकोडोली गावापासून एक किलोमीटर अंतरावर रणजित पाटील कुटुंबीयांची सुमारे पंचवीस एकर शेती आहे. त्यामध्ये ऊस, सोयाबीन, भात, गहू, भुुईमूग अशी पिके ते घेतात. ऊस सुमारे १७ एकरांवर असतो. सोयाबीन साधारण सात ते आठ एकरांत असते. फेरपालट पद्धतीने पिकांचे नियोजन केले जाते. ‘ॲटोमेशन’ यंत्रणा अलीकडील काळात मजूरबळ मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. मजूर खर्चही वाढला आहे. पाटील यांनी ‘ड्रीप ॲटोमेशन’ तंत्राचा वापर करून त्यावर उपाय शोधला आहे. त्यांनी आपल्या पंचवीस एकरांत या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पाटील यांचे ठिबक सिंचन पूर्वी होतेच. मात्र तंत्रज्ञानात ज्याप्रमाणे बदल होत जातात त्याचा अंगीकार आपल्या गरजेप्रमाणे त्यांनी केला आहे. असे आहे आधुनिक तंत्रज्ञान ऊस व सोयाबीनसाठी ‘ॲटोमेशन’ तंत्राचा वापर केला जातो. विहिरीपासून सहाशे फूट अंतरावर स्वंतत्र शेडमध्ये स्वयंचलित ठिबक यंत्रणेचे युनिट बसविले आहे. विहिरीतून साडेबारा अश्‍वशक्तीच्या दोन विद्युत उपसा मोटरीद्वारे पाणी चार इंची पाईपलाईने या युनिटकडे आणले जाते. पाणी सिंचन यंत्रणेत प्रवेश करण्याअाधी युनिट प्रारंभीच फिल्टर बसविला आहे. तो पाण्याच्या दाबावर म्हणजे (हायड्राॅलिक्स) पद्धतीवर चालणारा आहे. नव्या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये

  • पूर्वीच्या सॅंड फिल्टर पद्धतीत नदीचे येणारे पाणी स्वच्छ करण्यासाठी प्रति प्लश पाच हजार लिटर पाण्याची गरज लागायची. पाटील सांगतात की हे पाणी किमान तीन ते साडेतीन एकर क्षेत्राला पुरेल एवढे होते. आता नव्या तंत्राद्वारे केवळ २० लिटर पाण्यात हे काम होते. याचाच अर्थ पाण्याची मोठी बचत होते. पाणी फिल्टर होताना बारीक रेतीसह शेवाळ, अन्य लहान मोठे घटकही वेगळे केले जातात. फ्लशचे पाणी अन्य झाडांना सोडले जाते.
  • फिल्टरमधून पुढे आलेले स्वच्छ पाणी पुढील टप्प्यात प्रति तास प्रत्येकी साडेतीनशे लिटर क्षमतेच्या तीन टाक्यांमध्ये सोडले जाते. यातील चौथी टाकी १२० लिटर प्रति तास क्षमतेची आहे.
  • यातील तीन टाक्यांमध्ये विद्राव्य खते सोडली जातात. विजेवर चालणाऱ्या ब्लोअरद्वारे खते व पाणी यांचे मिश्रण योग्यरीत्या ढवळले जाते. खते पूर्णपणे विरघळल्यानंतर हे पाणी पुढील टप्प्यात इसी, ‘पीएच’ कंट्रोल यंत्रणेत येते. येथे पाण्याचा इसी व पीएच आपल्याला योग्य हवा त्या प्रमाणात करण्याची सोय आहे.
  • पाटील यांनी हा इसी १ ते १.५ तर पीएच ७ ते ७.५ पर्यंत ठेवला आहे.
  • कंट्रोलर यंत्रणा

  • सर्व बाबींचे नियंत्रण ‘कंट्रोलर’द्वारे केले जाते. विहिरीवरील मोटर सुरू करणे, शेतातील व्हॉल्व्ह सुरू करणे, इसी, पीएच यंत्रणा नियंत्रित करणे, ‘वॉटर मीटर’ला पाणी सोडण्याचे प्रमाण सांगणे आदी कामे त्याद्वारे केली जातात. त्याची ‘कमांड’ म्हणजेच सूचना संगणक व मोबाईलद्वारे देता येते.
  • शेतात ठराविक जागी व्हॉल्व्ह बसविले आहेत. नियोजनाप्रमाणे त्यांच्या माध्यमातून ठिबकच्या नळ्यांद्वारे शेतीला पाणी दिले जाते.
  • हेड युनिटमध्ये शेतातील कोणत्या भागात पाणी सुरू आहे याची माहिती ‘इलेक्‍ट्राॅनिक बोर्ड’द्वारे दिली जाते. या यंत्रणेद्वारे पिकांना आवश्‍यक अन्नद्रव्ये व पाणी दिले जाते.
  • पाणी किती हप्त्यातून व किती द्यायचे हे आपण ठरवून त्यानुसार प्रोगॅमिंग करू शकतो.
  • पिकाची वाढ, हवामानातील बदल, बाष्पीभवनाचा कालावधी यानुसार या कार्यक्रमात बदल करता येतो.
  • तंत्रज्ञानाचे झालेले फायदे

  • मजूरबळाची बचत- पंचवीस एकर शेती म्हटल्यावर पाण्यासाठी वर्षभर तीन ते चार मजूर तरी लागायचे. त्यासाठीची मजुरी साडेतीन लाख रुपयांपर्यंत जायची. आता नव्या तंत्रानुसार केवळ एक मजूर पुरेसा ठरतो. यातून वर्षाला दोन ते अडीच लाख रुपयांची बचत होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
  • पाण्याचे काटेकोर नियोजन असल्याने तण येण्याचे प्रमाणही अत्यंत कमी अाहे. साहजिकच भांगलणीचा खर्चही अगदी नाममात्र येतो.
  • पाणी देताना वीजपुरवठा खंडित झाल्यास व पुन्हा सुरुरू झाल्यास ‘प्रोग्रॅमिंग’ केल्यानुसार पाण्याचा पुरवठा सुरू राहतो.
  • पिकाची वाढ व हवामान बदलानुसार पाण्याचे नियोजन करता येते.
  • मोबाईलद्वारे यंत्रणेचा वापर करता येतो. साहजिकच शेतापासून दूरच्या अंतरावर असाल तरी
  • सिंचन सुरू करता येते.
  • उत्पादनवाढीचे उद्दिष्ट पाटील यांनी दोन वर्षांपूवी पाच एकरांवर ठिबक सिंचन यंत्रणा बसविली. पाटपाण्याच्या हिशेबाने साडेपाच एकरात साधारणत: तीनशे टनांपर्यंत उत्पादन गृहीत धरले होते. परंतू ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत झालीच. शिवाय व्यवस्थापनात सुसूत्रता आल्याने उत्पादन ४१९ टनांपर्यत म्हणजे एकरी ७५ ते ७६ टनांपर्यंत पोचले. आता अत्याधुनिक तंत्राच्या वापरामुळे एकरी उत्पादनात अजून वाढ होईल अशी अपेक्षा आहे. या तंत्रासाठी एकरी किमान एक लाख रुपये खर्च आला आहे. सारे कुटुंब शेतीत पाटील कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत आहे. शेतातच घर बांधण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले आहे. प्रकाश यांच्यासहित पत्नी मीना, मुलगा रणजित (वय ४२), त्यांची पत्नी सौ. वंदना, मुली आम्रपाली व सुनयना असे कुटुंबातील सदस्य आहेत. कला शाखेचे पदवीधर असलेले रणजित यांनी शेतीतील कौशल्य आत्मसात करण्यासाठी विविध ठिकाणी दौरे केले आहेत. यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच पाडेगाव येथील ऊस संसोधन केंद्र येथे प्रशिक्षणे घेतली आहे. राहुरी, दापोली, अकोला येथील कृषी विद्यापीठांना तसेच तमिळनाडू आदी ठिकाणी भेटी देऊन नव्या तंत्राबाबत अधिक माहिती घेतली. त्यांची मुलगी आम्रपालीदेखील ही यंत्रणा चालविण्यात कुशल होण्याचा प्रयत्न करते आहे. भविष्यात ‘रेनगन सिस्टिम’ बसविण्याचे प्रयत्न उष्णतेचे प्रमाण जास्त झाल्यानंतर ठिबक यंत्रणेवर ताण येतो. काही वेळा पाटपाण्याद्वारे एखादे पाणी देऊन जमिनीतील गारवा वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. उन्हाळ्यात ‘रेनगन सिस्टिम’ वापरून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रणजित यांनी सांगितले. संपकर् ः रणजित पाटील, ९९२१११११९१  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com