agricultural success story in marathi, agrowon, pimplagaon, ambegaon, pune | Agrowon

दुग्धव्यवसायातून प्रगती साधलेले पिंपळगाव
डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

गावात पंचवीस वर्षांपूर्वी गावात सातशे लिटर दुधाचे संकलन होते. संकरित गायींसाठी मुबलक प्रमाणात मका, गवत आदी हिरवा चारा उपलब्ध झाल्याने दूध व्यवसाय भरभराटीस आला आहे.

पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी हे गाव ‘दुधाची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. तालुक्‍यातील पहिली असलेली श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्था १९६२ मध्ये स्थापन झाली. शेती व्यवसायाला जोड म्हणून दूध व्यवसायाची व्याप्ती वाढविली. आज गावाला याच दुग्धव्यवसायाने तारले आहे. दररोज सुमारे १५ हजार लिटर दुधाचे संकलन येथे होते. बीट, मका, भाजीपाला पीक उत्पादनातही गाव अग्रेसर आहे.
 
आंबेगाव तालुक्यात मंचरच्या पूर्वेला पाच किलोमीटर अंतरावर पिंपळगाव आहे. गावाची लोकसंख्या पाच हजार आहे. येथे सुमारे एक हजार कुटुंबे आहेत. दीड हजारांपर्यंत जमिनीचे क्षेत्र आहे. त्यापैकी अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांची संख्या ७०० आहे. सरासरी प्रत्येक कुटुंबाला दीड एकरपेक्षा अधिक जमीन नाही. बाजरी, भुईमूग, मटकी, हुलगा आदी पिके शेतकरी पूर्वी खरिपात घ्यायचे. रब्बी हंगामात पाण्याअभावी जमीन पडीक ठेवावी लागत होती. घोड नदीच्या काठावर गाव आहे; पण धरण उशाला अन् कोरड घशाला अशी या गावाची २५ वर्षांपूर्वी अवस्था होती. दिवाळीनंतर येथील गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. शेतीची अवस्था बिकट होती.

धरण ठरले जीवदान
हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) गावाला वरदान ठरले. घोड नदीवर सिमेंट बंधाऱ्याची मागणी गावकऱ्यांनी केली. पुढे नदीचे पाणी आटल्यानंतर पुन्हा पाण्याच्या समस्येला गावकऱ्यांना तोंड द्यावे लागत होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे डिंभे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पिंपळगावाचा कायापालट सुरू झाला. धरणातून घोड नदीत उन्हाळ्यात वेळोवेळी पाणी सोडले जाते. पाणी सिमेंट बंधाऱ्यामध्ये अडविले जाते. त्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना झाला. ओढ्या-नाल्यांवरही तीन सिमेंट बंधारे बांधले.

दुग्धव्यवसायाला चालना
शाश्‍वत पाणी मिळू लागल्यानंतर येथे घरोघरी गायींचे गोठे बांधण्यास सुरवात झाली. घरोघरी आज संकरित गायींचे गोठे आहेत. गायींचे दूध काढण्यासाठी यंत्रे बसविली आहेत. श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्था, श्री शंभू महादेव दूध संस्था येथे कार्यरत आहेत. दोन्ही संस्थांमार्फत दुधाचे संकलन केले जाते. पशुखाद्याचा पुरवठा गवळ्यांना केला जातो. सरासरी २७ रुपये प्रतिलिटर दुधाला दर मिळतो. दर महिन्याला दुधापासून सुमारे एक कोटी २१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. गायीचे प्रतिलिटर दूध उत्पादन वाढावे यासाठी गोवर्धन दूध प्रकल्पाने विशेष प्रयत्न केले. जय श्रीराम पतसंस्था, कमलजा देवी पतसंस्था व श्रीराम विविध कार्यकारी सोसायटी यांच्याकडून शेतकऱ्यांना तत्काळ दूध व्यवसाय, शेती विकसित करण्यासाठी व विविध पिकांसाठी कर्जपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे दिलेल्या कर्जाची शंभर टक्के वसुली होत असल्याने पतपुरवठा करणाऱ्या संस्थाही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत.

रोजगार वाढला
नगदी पैसे मिळून देणारे बीट, मका, गाजर व भाजीपाला पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. काही कंपन्यांतर्फे गरजू व गरीब महिलांना स्वीटकॉर्न कणसांचे दाणे वेगळे करून प्रतवारी करण्याचे काम दिले जाते. त्यामुळे सुमेर १७५ महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. सरासरी २०० रुपये दररोज त्यांना मिळतात. शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन बीट खरेदी केली जाते. येथून दररोज ४५ टन उत्पादित बीट दिल्ली, नागपूर येथे खाण्यासाठी व रंगांच्या कारखान्यांसाठी पाठविले जाते. बीट खरेदी व्यवसायात गावातील सात तरुण कार्यरत आहेत.

सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर
राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचा ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार’, हागणदारीमुक्त, महात्मा गांधी तंटामुक्ती योजना, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव योजना, आदर्श कृषी ग्राम आदी पुरस्कार गावाला मिळाले आहेत. मुक्तादेवी सामुदायिक विवाह मंडळामार्फत दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. आतापर्यंत ३१० जोडपी सामुदायिक सोहळ्यात विवाहबद्ध झाली आहेत. चराई, कुऱ्हाडबंदी, धूरबंदी, व्यसनमुक्तीसाठी गावकऱ्यांकडून जागृती केली जाते. त्यासाठी प्रवचन व कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावठाणात व वाड्यावस्त्यांवर एकूण १५ मंदिरे असून, येथे एकूण पाच अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी होतात. ज्येष्ठ नेते बाबूराव बांगर, टी. के. बांगर, मथाजी पोखरकर, सरपंच संगीता पोखरकर, उपसरपंच अंकुश मारुती पोखरकर, श्रीराम सोसायटीचे अध्यक्ष निवृत्ती बबन बांगर, माजी उपसरपंच प्रभाकर बांगर, माजी सरपंच रोहिदास शंकर पोखरकर, बल्कीस इनामदार, तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोक शिवराम बांगर, बाळासाहेब शंकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली गावाने प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. येथील महिलांचाही प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग असतो. ग्रामविकास अधिकारी जनार्दन नाइकडे यांनी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. गावात राजा शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालयाची सर्व सुविधांनी युक्त तीन मजली इमारत आहे. वाचनसंस्कृती टिकवून ठेवण्याचे काम होत आहे. लोकसहभाग व रयत शिक्षण संस्थेच्या अर्थसाह्यातून तीन कोटी रुपये खर्च करून श्रीराम विद्यालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गावात सहा लाख ५० हजार रुपये खर्च करून शुद्ध पाणीनिर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. नागरिकांना मागणीनुसार दररोज ५० पैसे प्रतिलिटर दराने पाण्याची विक्री केली जाते. श्रीराम विद्यालय व प्राथमिक शाळेतील एकूण सातशे विद्यार्थ्यांना मोफत पाणीपुरवठा केला जातो.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले
पाच ते सहा शेतकरी कुटुंबांनी एकत्र येऊन एक ते दोन किलोमीटर अंतराच्या सुमारे दीडशे शेती पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या. त्यामुळे कोरडवाहू जमिनीखालील क्षेत्र ओलिताखाली आले. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरचा वापर वाढविला आहे; तसेच सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढविण्यासाठी येथील महिला व युवकांचाही सहभाग चांगला आहे. सध्या अन्य गावांतील तीनशेहून अधिक मजूर येथे काम करतात. रोजगारनिर्मितीलाही गावाने हातभार लावला आहे, असे गावातील प्रगतशील शेतकरी मधुकर भागाजी बांगर यांनी सांगितले.

योजनांची प्रभावी अंमलबजावणी
सरपंच संगीता उत्तम पोखरकर म्हणाल्या, की शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावल्याने गावाने प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज डिजिटल आहे. वारकरी संप्रदायाचा गावावर पगडा आहे. लोकसहभाग व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली अाहे. संपूर्ण गावात रस्त्याच्या दुतर्फा नारळ व शोभिवंत वृक्षांची लागवड केली आहे. रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे आहेत. वाड्यावस्त्यांवरही सर्वत्र वृक्षांची गर्दी आहे. ओढ्यानाल्यांच्या दुतर्फाही वृक्ष लागवड केली आहे. जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी घर व बांधाच्या पसिरात वृक्ष लागवड केली आहे. गाव निसर्गाने नटलेले आहे. गावात सुमारे दोनशेपर्यंत बंगले उभे आहेत.

ग्रामस्वच्छतेचे महत्त्व पटले
वृक्ष लागवड व ग्रामस्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावात जनजागृती केली. त्याचा चांगला परिणाम झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली तेरा हेक्‍टर जमीन पडीक होती. गावकऱ्यांनी जमीन विकसित केली. त्यासाठी पर्यावरण संतुलित समृद्ध योजनेतून व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबागेसाठी साडेनऊ लाख रुपये खर्च करण्यात आला. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे. आंबा, नारळ व लिंबू अशी एकूण एक हजार ८४१ झाडे येथे आहेत. फळांचे उत्पादन सुरू झाल्यानंतर त्यापासून गावाला किमान दहा लाख रुपये उत्पन अपेक्षित आहे. या पैशांचा उपयोग गावविकासासाठी केला जाईल असे ग्रामविकास अधिकारी जनार्दन नाइकडे
यांनी सांगितले.

शाश्वत पाणी मिळाले
पूर्वी पाण्याअभावी दिवाळीनंतर जमिनी पडून राहत होत्या. रोजगारासाठी अनेक कुटुंबांतील तरुण मुंबईला स्थिरावले होते. दर महिन्याला येणाऱ्या मनीऑर्डरची वाट शेतकरी कुटुंबे पाहत होती. आज विकास योजनांच्या माध्यमातून गावाला शाश्‍वत पाणी मिळाले आहे. पाणी उपसा योजनांसाठी वीजजोड तत्परतेने मिळाले. त्यामुळे जवळपास सातशे हेक्‍टर जमीन ओलिताखाली आणण्याचे काम शेतकऱ्यांनी केले असल्याचे ज्येष्ठ नेते बाबूराव बांगर यांनी सांगितले.

दुग्धव्यवसाय भरभराटीस
गावात जवळपास प्रत्येक कुटुंबाकडे दोन ते तीन संकरित गाई आहेत. दर पंधरा दिवसांनी गवळ्यांच्या बॅंक खात्यात दुधाचे पैसे जमा होतात. या वर्षी प्रतिलिटरला एक रुपया ५० पैसेप्रमाणे सहा लाख रुपये रक्कम विभागून गवळ्यांना दिवाळीनिमित्त बोनस वाटप केले जाणार आहे.
 
संपर्क- संगीता पोखरकर- ९९६०२५१३६६

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
अवीट  गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...
महाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद  : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...
राज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे   : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...
सहकाराचा ऱ्हास घातकचसहकार क्षेत्राचे राजकीयीकरण झाल्याने सहकाराचा...
कांदा कोंडीवर उपाय काय?कांद्याचे कोठार असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या...
`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद  : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...
मुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई  : मुंबई बाजार समितीतील सेवा...
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई  : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...
राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई  : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...
राज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे   : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी...
कांदा अनुदानाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : या वर्षात कमी दराचा फटका बसलेल्या...
काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...
कृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
राजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...
थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...
इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...