सकारात्मकता, इच्छाशक्तीमुळेच शेतीची वाट झाली सोपी

स्टॉल लावून विक्री सुरू व्यापाऱ्यांकडून आलेले कटू अनुभव पाहाता पूनम यांनी थेट ग्राहक विक्रीही सुरू केली आहे. नागपूर महामार्गालगत शेत असल्याने त्यालगत छोटा स्टॉलही उभारला आहे. ताजी मिरची उपलब्ध होत असल्याने अनेक ग्राहक जोडले जात आहेत. शेतात काही प्रमाणात स्वीट कॉर्नही केले आहे. दोन्ही मालाची विक्री त्यामाध्यमातून होत आहे. मिरचीला ८० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.
 पूनम चौधरी यांनी पॉलिहाउसमध्ये फुलवलेली लाल व पिवळ्या रंगाची ढोबळी मिरची
पूनम चौधरी यांनी पॉलिहाउसमध्ये फुलवलेली लाल व पिवळ्या रंगाची ढोबळी मिरची

पाच एकरांत उल्लेखनीय घडवायचे हा हेतू ठेवून जळगाव शहरातील ग्राफीक डिझानयर पूनम चौधरी यांनी मागील वर्षी प्रयोग सुरू केले. पण पहिल्याच वर्षी झेंडूला दराने फटका दिला. पण यंदा जिद्द, धडाडी ठेवून ‘हायटेक’ शेतीला सुरवात करून रंगीत ढोबळी मिरची पिकवली. विक्रीत अनेक कटू अनुभव सोसावे लागले. पण हिमतीने साऱ्या प्रसंगांना तोंड देत आपल्या मालाची गुणवत्ता सिद्ध करीत चौधरी यांनी केवळ सकारात्मक दृष्टिकोन व इच्छाशक्ती यांच्या जोरावर शेतीत समर्थ वाटचाल सुरू केली आहे. जळगाव शहरातील जुन्या जळगाव भागात युवराज ज्ञानेश्‍वर चौधरी व पूनम युवराज चौधरी हे उच्चशिक्षित युवा दांपत्य राहते. नागपूर- जळगाव महामार्गालगतच जळगाव तालुक्‍यातील नशिराबाद गावाच्या शिवारात चौधरी दांपत्याची सुमारे पाच एकर शेती आहे. या भागात भूगर्भात हवे तसे पाणी मिळत नाही. कमी पाण्यातच येणारी पिके अनेक शेतकरी घेतात. तसे कपाशी हे या भागातील मुख्य पीक. पूनम या ग्राफिक डिझायनर आहेत. तर त्यांचे पती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व्यवसायात कार्यरत आहेत. युवराज यांचे वडील ज्ञानेश्‍वर तुकाराम चौधरी मुंबई येथे खासगी संस्थेत नोकरी करायचे. त्यांची जळगाव शहरानजीक निमखेडी येथे शेती होती. पण शेती पाहण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने ते ही शेती ‘लीज’वर द्यायचे. पण शेती लीजवर देणे थांबवून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून ती नफ्यात आणण्यासाठी चौधरी दांपत्याने पुढाकार घेतला. त्याचबरोबर आता त्यांची मुले मोठीही झाली होती. त्यामुळे शेतीकडे चांगल्या प्रकारे वेळ देणेही शक्य होते. कृषी विभागातील काही तज्ज्ञ व इतरांचा सल्लाही त्यांनी घेतला. झेंडू पिकाचा पहिला प्रयोग मागील वर्षी खरीपात झेंडू पिकातून पूनम यांनी शेतीचा श्रीगणेशा केला. पहिला अनुभव असतानाही अभ्यासातून केलेल्या शेतीतून उत्पादन चांगले मिळाले. पण त्या काळात झेंडूला इतके कमी दर सुरू होते की किलोला १० रूपये दराने सुध्दा कोणी व्यापारी विचारत नव्हते. आपण उत्पादन चांगले घेतो पण मनासारखे दर हाती पडतीलच, याची खात्री नाही असा अनुभव पूनम यांना आला. ढोबळी मिरचीचा प्रयोग यापुढे आर्थिकदृष्ट्या परवडू शकेल व केलेल्या कष्टांना किंमत मिळेल अशाच पिकांकडे वळायचे दांपत्याने नक्की केले. त्यानुसार रंगीत ढोबळी मिरचीचे पीक आश्वासक वाटले. झेंडूच्या संदर्भात जे कटू अनुभव आले ते विसरून नवीन वर्षात म्हणजेच यंदाच्या जानेवारीत पॉलिहाऊसच्या उभारणीला सुरवात केली. पुणे येथील खासगी कंपनीने त्यासाठी सहकार्य केले. सध्या २२ गुंठे क्षेत्रात त्याची उभारणी झाली आहे. त्यासाठी एकूण ३० लाख रुपये खर्च आला. नऊ लाख रुपये अनुदान कृषी विभागाने उपलब्ध करून दिले. मात्र बॅंकेचे कर्ज मात्र काढावे लागले. त्याचा भार मोठा असल्याने शेती यशस्वी करायचीच असाच पण केला होता. पॉलिहाउसमध्ये लाल व पिवळ्या अशा दोन रंगांमध्ये मिरची आहे. एकूण सात हजार रोपे अाहेत. पुणे येथील एका कंपनीकडून १२ रुपये प्रतिनग दरात ही रोपे आणली. साधारण २० मेच्या दरम्यान लागवड झाली. सिंचन व तापमान नियंत्रणासंसाठी ठिबक सिंचन, रेन बर्ड, फॉगर्स आदी साधने आहेत. जळगाव भागात उन्हाळ्यात तापमान ४० अंश सेल्सियसच्या वर जाते. त्या दृष्टीने थंडावा देण्याची सुविधा केली आहे. उत्पादन सुरू झाले; पण व्यापाऱ्यांकडून अडवणूक सध्या मिरचीचे उत्पादन सुरू आहे. तोडणी दर तीन दिवसाआड केली जाते. सध्या सात मजूर कार्यरत आहेत. मिरचीचे २० किलो वजनाच्या बॉक्‍समध्ये पॅकिंग केले जाते. खरे तर मिरचीची गुणवत्ता अत्यंत चांगली होती. पण व्यापाऱ्यांनी आपण शेतीत नवखे असल्याचा समज करून घेत अत्यंत कमी दर देण्यास सुरूवात केल्याचे पूनम यांनी सांगितले. सध्या ढोबळीला अत्यंत कमी दर सुरू आहे असे सांगून ते कमी दरात खरेदी करायला पाहायचे. मात्र आपल्या मिरचीची गुणवत्ता अत्यंत चांगली आहे. मुंबईचे दर चांगले असताना तिथल्या व तुमच्या दरांत एवढा फरक कसा असे व्यापाऱ्यांना विचारायला त्या कमी करीत नसत. मग व्यापाऱ्यांचा त्यांचा पुन्हा फोन यायचा व माल पाठवा असे ते म्हणायचे. चांगल्या दराने खरेदीही करायचे. व्यापाऱ्याला शिकवला धडा एकदा तर एका स्थानिक व्यापाऱ्याला सुमारे २०० किलो माल पाठवला. त्यानंतर पेमेंट करायच्या वेेळेस त्यातील काही माल खराब आहे असे सांगून तो टाळाटाळ करू लागला. पण आपल्या मालाच्या दर्जाबाबत पूनम यांना पूर्ण खात्री होती. त्यांनी असे होणे शक्य नाही असे व्यापाऱ्याला ठणकावून सांगितले. शिवाय माझा पूर्ण माल बॉक्स पॅकिंगसहीत मला परत करा असेही कळवले. अखेर व्यापाऱ्याने संपूर्ण माल खरेदी करण्याची तयारी दाखवलीच शिवाय त्याचे पूर्ण पेमेंटही केले. मार्केटसाठी प्रयत्न सध्या पूनम स्थानिक, तसेच मुंबई बाजारपेठेत माल पाठवत आहेत. सध्या तीन दिवसाआड २०० किलो मिरची पाठविली जाते. आत्तापर्यंत जवळपास साडेतीन हजार किलो मिरचीची विक्री झाली आहे. त्यास ४० रुपयांपासून ते ५० व कमाल ९० रुपयांपर्यंत प्रतिकिलोचा दर मिळाला आहे. अजून जानेवारीपर्यंत माल सुरू राहील. आठ सीसीटीव्हीद्वारे नजर रविवारी पॉलिहाउसचे कामकाज बंद राहते. येथील देखरेखीसाठी आठ सीसीटीव्ही बसविले आहेत. तसेच वीजभारनियमनावर उपाय म्हणून १५ केव्ही क्षमतेचे जनित्र देखील बसविले आहे. सिंचनासाठी कूपनलिका अाहे. त्यातील क्षारांचे प्रमाण मर्यादित राहून ठिबकमध्ये अडथळा येऊ नये तसेच मातीत क्षार वाढू नयेत यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणाही बसविली आहे. सीसीटीव्ही हे मोबाईलशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडले आहेत. त्यामुळे पॉलिहाउसमधील घडामोडी चौधरी यांना आपल्या मोबाईलवर कळून येतात. ढोबळी मिरचीनंतर काकडीचे पीक घेण्यात येणार आहे. पुढील काळात मिरचीची निर्यात करता यावी यासाठी लवकरच शासकीय यंत्रणांकडून परवाने घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतीत सकारात्मकता व इच्छाशक्ती ठेवली तर पुढची वाट निश्चित सोपी होते हेच पूनम यांच्या शेतीतून पाहण्यास मिळते. पूनम चौधरी-८२७५३३९८९३  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com