भाजीपाला उत्पादक भंडारा जिल्ह्यात खासगी मंडीचा आधार

भंडारा येथील खासगी भाजीपाला मंडी, बाजारात दाखल झालेला मुळा व टोमॅटो
भंडारा येथील खासगी भाजीपाला मंडी, बाजारात दाखल झालेला मुळा व टोमॅटो

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा धानाचे भांडार आहे. हवामान, दर, पाणी आदी अडचणींमुळे भागातील शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळले. भंडारा येथील खासगी बाजारपेठेचा त्यांना मोठा आधार मिळाला आहे. शेतमालाचे दर, वेळेवर पेमेंट व आवश्‍यक सुविधाही येथे वाढीस लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी या बाजारपेठेस आपली पसंती दिली आहे. नऊशे ते एकहजार मिमी पर्जन्यमान असलेल्या भंडारा जिल्ह्याचे भात हे प्रमुख पीक आहे. परंतु, अलीकडील काळात पावसाची अनिश्‍चितता वाढीस लागली आहे. काळाची गरज ओळखून येथील भात, भाजीपाला पिकांकडे वळला आहे. सुमारे १२ टन भेंडी बियाण्यांची विक्री जिल्ह्यात होते, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यावरून भागातील भाजीपाला क्षेत्र वाढीचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही. सामेवाडा गावातील शेतकरी साकोली या तालुक्‍याच्या ठिकाणी अवघ्या दोन रुपये प्रतिकिलो दराने १९९२- ९३ साली भेंडी विकायचे. बंडू बारापात्रे हे भंडारा येथे भाजीपाला व्यापारी आहेत. त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी भंडारा येथे भेंडी घेऊन येण्यास सांगितले. तिथे सात रुपये दर मिळाला. आज याच भंडाऱ्यातील खासगी बाजारपेठ शेतकऱ्यांचा आधार झाली आहे.

भाजीपाला उत्पादकांची झाली सोय

भंडारा शहरापासून १८ किलोमीटरवरील चिखली गावात वांगी, मिरचीचे उत्पादन घेण्यात येते. येथील भाजीपाला खासगी बाजारपेठेत येतो. त्यासाठी अनेकांनी छोटे मालवाहू वाहन खरेदी केले आहे. त्याद्वारे ताजा भाजीपाला ग्राहकांना व घाऊक व्यापाऱ्यांना उपलब्ध होतो. राष्ट्रीय महामार्गाच्या परिसरातच बाजार भरत असल्याने पार्किंग किंवा अतिक्रमणाच्या त्रासापासून मुक्‍तता झाल्याचे चिखली येथील शेतकरी राकेश गायधनी सांगतात.

सुविधा उभारल्या

पूर्वी स्वच्छतागृह, तसेच आवश्‍यक सुविधांचा अभाव होता. पूर्वी गोंदिया, साकोली, लाखनी, जबलपूरला भाजीपाला विकावा लागे. आता अनेक समस्यांचे निराकरण होऊन सुविधा उभारल्या आहेत. कमी वेळेत खरेदी-विक्रीची प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्याच्या हाती पैसे पडतात. त्याला गावी परतणे शक्‍य होते.

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पसंती

पारशिवणी (जि. नागपूर) येथील रामेश्‍वर गजभीये टोमॅटो, वांगी, मिरची आदी पिके घेतात. पूर्वी मध्य प्रदेशातील जबलपूर, बालाघाट येथे ते माल घेऊन जायचे. आता खासगी मंडीला त्यांनी पसंती दिली आहे. बेटाळा (ता. मोहाडी, जि. भंडारा) येथील अनिल राऊत यांच्यासाठी ही बाजारपेठ १८ किलोमीटरवर म्हणजे सोयीच्या अंतरावर आहे.

बाजारपेठेची व्यवस्था

  • सकाळी आठ वाजेपासून बाजारात मालाची आवक
  • दुपारी दोन वाजेपर्यंत व्यवहार. यात ५० व्यापाऱ्यांचा सहभाग. त्यांच्याकडे गुमास्ता परवाने.
  • भंडारा जिल्ह्यातील भेंडी व अन्य भाजीपाल्याला परराज्यांतील अंबीकापूर, सागर, कच्छवा, इंदूर, बनारस, अलाहाबाद, झांशी यांसारख्या मोठ्या शहरांतून मागणी
  • भात काढणीनंतर नोव्हेंबरमध्ये भेंडीचे उत्पादन. फेब्रुवारीअखेरीस ती बाजारात येण्यास सुरुवात.
  • दररोज एकूण ३५० ते ४०० टन भाजीपाला आवक
  • उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेशातील व्यापारी या ठिकाणी येऊन खरेदी करतात.
  • कमी कालावधीत शेतकऱ्यांना पेमेंटची सोय. त्यासाठी ‘कॅश काउंटर’ची व्यवस्था. संगणकीकृत प्रणालीवर व्यवहारांची नोंद. त्यामुळे फसवणुकीचा प्रश्‍न नाही. असा प्रसंग आजवर घडला नाही. मात्र, असे प्रकार रोखण्याची जबाबदारी व्यापारी असोसिएशनची.
  • तीन रुपये प्रतिपोत्याप्रमाणे हमाली. नगरपालिकेकडून बाजारचिठ्ठीपोटी नाममात्र शुल्क.
  • या व्यतिरिक्त अन्य अडत किंवा शुल्काची शेतकऱ्यांकडून आकारणी नाही.
  • शेतकरी प्रतिक्रिया

    पाचगाव (जि. नागपूर) येथून नागपूर बाजारपेठ २० किलोमीटरवर, तर भंडारा बाजारपेठ ७० किलोमीटरवर पडते. परंतु नागपूरच्या तुलनेत भंडाऱ्यातील बाजारात चांगले दर मिळतात. त्यामुळे माझ्यासह गावातील अन्य शेतकरी येथे माल घेऊन येतात. जितेंद्र हटवार- ९९२३३६८६७८ भातकाढणीनंतर थोड्या क्षेत्रात कारली, चवळी घेतो. पूर्वी नागपूर व अन्य बाजारांशिवाय पर्याय नव्हता. वाहतुकीवर मोठा खर्च व्हायचा. आता तो वाचला आहे. खरेदीप्रक्रिया सुलभ असून, विक्रीनंतर पैसेदेखील काही तासांतच मिळतात. दिलीप शेंडे- ९६२३३६२४०९ मुंडीपार सडक (ता. साकोली)

    पूर्वी शहरात भाजीपाला घेऊन आलेल्या वाहनाचा एखाद्याला धक्‍का जरी लागला तरी हाणामारी, तणावसदृश परिस्थिती निर्माण व्हायची. अतिक्रमणधारक शेतकऱ्यांवर मुजोरी करायचे. पार्किंगसाठी जागा नव्हती. रहिवासी आपल्या घरापुढे वाहन उभे करण्यास मज्जाव करीत. खासगी मंडीमुळे या समस्यांपासून सुटका झाली आहे. किशोर वाढई-९७६४५८०८५२ भोंडगाव, ता. लाखनी, भंडारा

    ठळक वैशिष्ट्ये

  • या बाजारात राज्याच्या अन्य भागांतून किंवा परराज्यांतून मागणी नोंदविली जात नाही. याच भागातील शेतकऱ्यांच्या मालाला चांगले दर मिळावे, असा उद्देश.
  • शेतकऱ्यांना थेट ग्राहकांनाही भाजी विकण्याची मुभा.
  • पाच केव्ही क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प. त्याद्वारे विजेची सोय. बाजाराचा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीखाली.
  • शेतकऱ्यांसाठी नाश्‍ता, उपाहारगृह
  • शेतकरी, मजूर, हमाल, व्यापारी कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी अवघ्या एक रुपयात लग्न लावून देण्याचा उपक्रम राबविण्याचे प्रस्तावीत. किमान चार किंवा पाच जोडपे आल्यास हा उपक्रम राबविला जाणार.
  • दिवाळी कालावधीत स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रयोगशील, तसेच दर्जेदार भाजीपाला घेणाऱ्यांचा गौरव.
  • एका व्यापाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयाला एक लाख रुपयांची, तर स्पर्धा परीक्षेसाठी एका विद्यार्थ्याला ५० हजार रुपयांची मदत दिली.
  • रोहित हटवार, ९७६४९४०१६८ भाजीपाला उत्पादक शेतकरी धनराज घावट-९६३७६०९६३१ चिखली, भंडारा अनिल राऊत- ९१५८७८२३९८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com