जैविक कीडनियंत्रण क्षेत्रातील भावी उद्योजिका

शेतकऱ्यांच्या मार्गदर्शक शेतकरीही जैविक घटकांचे उत्पादन घरच्याघरी करू शकतात. त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तयार आहोत. उद्योजिका होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे मार्गदर्शक ही भूमिकाही समर्थपणे बजावू, असा आत्मविश्वास शेतकऱ्यांच्या या मुली व्यक्त करतात. कार्यशाळा, एनसीएलसारख्या संस्थेत भेट आदींचा अनुभवही त्यांनी घेतला. त्यातून या विषयातील संशोधनास वाव, तंत्रज्ञान, जैविक कीडनाशकांच्या कायदेशीर नोंदणीकरणाबाबतही माहिती झाल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे कृषी महाविद्यालयात बीएस्सी ॲग्री अभ्यासक्रमात जैविक कीडनियंत्रक घटकांची निर्मिती करणाऱ्या विद्यार्थिनी व त्यांच्या मार्गदर्शिका.
पुणे कृषी महाविद्यालयात बीएस्सी ॲग्री अभ्यासक्रमात जैविक कीडनियंत्रक घटकांची निर्मिती करणाऱ्या विद्यार्थिनी व त्यांच्या मार्गदर्शिका.

पुणे कृषी महाविद्यालयातील जैविक कीडनियंत्रण प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना विविध मित्रकीटक व जैविक कीडनाशके निर्मितीचे धडे देत आहे. याच महाविद्यालयात शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून आधुनिक जैविक तंत्रज्ञान आणि त्याची विपणन कलाकुशलतेने आत्मसात करीत आहेत. जैविक घटकांच्या निर्मितीतील भावी उद्योजिका व त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मार्गदर्शिका अशा दुहेरी भूमिका समर्थपणे पार पाडण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.   बीएस्सी ॲग्री अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षी (आठवी सेमीस्टर) विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभव दिला जातो. पुणे कृषी महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागांतर्गत जैविक कीडनियंत्रण प्रयोगशाळा कार्यरत आहे. तेथे विविध मित्रकीटक व जैविक कीडनाशके उत्पादन व विक्री या विषयातील अभ्यासक्रमाचा कार्यानुभव महाविद्यालयातील ३१ विद्यार्थी घेत आहेत. त्यात ११ विद्यार्थिंनींचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या मुली सांभाळतात प्रयोगशाळा डॉ.इंदि्रा घोनमोडे व डॉ. रमेश नाकट हे या अभ्यासक्रमाचे समन्वयक व मार्गदर्शक आहेत. ते म्हणाले की, पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योग सुरू करता यावा, हा या कार्यानुभव अभ्यासक्रमाचा हेतू आहे. उत्पादननिर्मितीसोबत त्याच्या विक्रीचे तंत्रही आत्मसात करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो. त्यातून मिळणारे उत्पन्नही त्यांच्याच पदरात जमा केले जाते. या अभ्यासक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या मुलीदेखील मुलांच्या खांद्याला खांदा लावून विविध जैविक नियंत्रण घटकांच्या निर्मितीचा अनुभव घेत आहेत. होस्टेलला राहून शिक्षण घेत इथली प्रयोगशाळाही अत्यंत जबाबदारीने व कुशलतेने सांभाळत आहेत.   कीटकांसोबत अनोखी मैत्री पुणे जिल्ह्यात सासवडजवळील पिसर्वे गाव असलेली ज्योती वाईकर म्हणाली की, प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचे आमचे गट आहेत. प्रत्येक गटाकडे स्वतंत्र जैविक घटकाच्या उत्पादनाची जबाबदारी असते. उसावरील खोडकिडा, टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी यांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध ट्रायकोग्रामा या मित्रकीटकाचे उत्पादन (ट्रायकोकार्डस) आमचा गट करतो. त्यातून या कीटकांसोबत आम्ही मैत्री केली आहे. ट्रायकोग्रामाच्या विविध जाती वेगवेगळ्या पिकांसाठी वापरल्या जातात. त्यांचे कल्चर प्रयोगशाळेत उपलब्ध असते. तंत्रज्ञानाचा बांधावर विस्तार आम्ही ट्रायकोकार्डसच्या निर्मितीपुरते न थांबता त्यांचे महत्त्व, शेतात किती अंतरावर, कशी लावायची याचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना थेट शेतात देतो. ‘रावे’ या अभ्यासक्रमाद्वारे शेतकऱ्यांसोबत जिव्हाळ्याचे नाते तयार झालेले असते. त्याचा उपयोग तंत्रज्ञान विस्तारात होतो. शेतकऱ्यांना फोनवरूनही मित्रकीटकांची उपयुक्कता विशद करतो. शेतकरी आम्ही तयार केलेली ट्रायकोकार्डस विकत घेतात त्या वेळी केलेल्या अभ्यासाचे, कामाचे जे समाधान मिळते त्याची किंमत करणे अशक्य असते. या कार्डसना मागणीही मोठी आहे. एक कार्ड ५० रुपयांना देतो. कृषी प्रदर्शनातून स्टॉल घेऊनही मित्रकीटकांचा प्रसार करणार आहोत. मिलिबगच्या शत्रूचे उत्पादन पाथर्डी (जि. नगर) गावची वैष्णवी घुले व पुण्याची जोत्स्ना माने या आॅस्ट्रेलियन लेडी बर्ड बीटल या मित्रकिटकाचे उत्पादन घेण्यात ‘माहिर’ होत आहेत. त्या सांगतात की, हा मित्रकीटक द्राक्ष, सीताफळ, रोपवाटिकेतील मिलिबगचे नियंत्रण करतो. भोपळे विकत आणून ते लाकडी पिंजऱ्यांमध्ये ठेवून शास्त्रीयदृष्ट्या मिलिबग व त्यावर लेडी बर्ड बीटलची वाढ केली जाते. त्याची अळी दोन रुपयांना, तर बीटल (प्रौढ) चार रुपयांना विकला जातो. आत्तापर्यंत सुमारे सहा हजार लेडी बर्ड बीटलची विक्री करण्यात वैष्णवीचा गट यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे नाशिक येथील कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या मदतीने एका कंपनीने हे मित्रकीटक खरेदी केले आहेत. या निमित्ताने मार्केटिंगचे ‘स्किल डेव्हलपमेंट’ शिकायला मिळते. वेगळा शास्त्रीय दृष्टिकोनही विकसित होतो. प्रॅक्टिकलचा आनंद वेगळा खंडाळा (जि. सातारा) येथील शामली महांगरे पाटील म्हणाली की, जैविक नियंत्रणाच्या घटकांबाबत प्रबोधन करताना अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्यांचा वापर करावा, हा आमचा मुख्य उद्देश असतो. आम्हाला बीएस्सीच्या शिक्षणात ‘थेअरी’चे ज्ञान खूप मिळते. पण या अभ्यासक्रमातील ‘प्रॅक्टिकल’चा अनुभव ज्ञानाची इमारत अधिक भक्कम करतो. आमच्या गटातील जैविक घटकाच्या उत्पादनाव्यतिरिक्त अन्य गटांकडील घटकांचे उत्पादन शिकण्याची आसही आम्हाला असते. त्यातून या विषयात अधिकाधिक परिपूर्णता येते. स्वतःची प्रयोगशाळा उभारू संगमनेरची (जि. पुणे) शुभांगिनी वाळुंज मेटॅरायझिम अॅनीसोप्ली या बुरशीजन्य कीटकनाशक निर्मितीचा अनुभव घेत आहे. ती म्हणाली की, रासायनिक कीडनाशकांच्या अनियंत्रित वापराचे दुष्परिणाम, प्रदूषण पाहता शेतकऱ्यांना जैविक उपायांचे महत्त्व प्रकर्षाने सांगतो. त्यातूनच जैविक उत्पादनांच्या वापराला अधिक गती मिळेल. भविष्यात स्वतःची प्रयोगशाळा उभारून उद्योजिका म्हणून घडताना इतरांनाही रोजगार देण्याची क्षमता आम्ही निर्माण करू शकू. शिरवळ (जि. सातारा) येथील मोनिका पिसाळ विषाणूवर आधारित (एनपीव्ही) कीटकनाशक निर्मितीत ‘मास्टर’ होत आहे. ती म्हणाली की, घाटे अळी किंवा कपाशीवरील अमेरिकन बोंड अळीच्या नियंत्रणासाठी या विषाणूचा वापर होतो. त्याच्या उत्पादनाचे काम अत्यंत क्लिष्ट आहे. किडीच्या जीवनचक्राच्या अवस्था प्रयोगशाळेत तयार करून त्यावर विषाणू वाढवून कीटकनाशक तयार करतो. घरीच केले मार्केटिंग पुणे जिल्ह्यातील खांदोटा येथील तेजश्री ढवळे म्हणाली की, मावा किडीचे नियंत्रण क्रायसोपला मित्रकीटक करतो. त्याची अंडी वा अळ्यांची विक्री करून उत्पन्न मिळवता येते. याबाबतीतले मार्केटिंग मी सर्वप्रथम माझ्याच घरी केले. त्यातून गव्हावरील माव्याचे यशस्वी नियंत्रण करणे माझ्या वडिलांना व परिसरातील शेतकऱ्यांनाही शक्य झाले. गावात प्रबोधन करणार नारायणगाव (जि. पुणे) येथील धनश्री चासकर म्हणाली की, उसातील हुमणी सध्याची गंभीर कीड आहे. त्यावर मेटॅरायझियम हे आम्ही तयार करीत असलेले कीटकनाशक अत्यंत प्रभावी आहे.  काळवाडी (जि. पुणे) गावातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल आहे. या गावात जाऊन जैविक घटकांच्या प्रसाराचे कार्य करण्याचे आम्ही ठरवले आहे. गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी सज्ज अभ्यासक्रमाचे मार्गदर्शक डॉ. रमेश नाकट यांनी बंगळूर येथील मित्रकीटकांशी संबंधित राष्ट्रीय संस्थेतून दोन मित्रकिटकांच्या विशिष्ट जातींचे कल्चर आणले आहे. त्यातील ट्रायकोग्रामाची एक जात गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी उपयोगी मानली जाते. या मित्रकिटकाचे उत्पादन घेण्यासाठी या विद्यार्थिनी सज्ज झाल्या आहेत. गुजरातमधून एक लाख अंड्यांची आॅर्डर क्रायसोपर्ला मित्रकीटकाचे उत्पादन घेण्याबरोबर त्याच्या विक्रीतून पाचशे रुपयांचे उत्पन्न विद्यार्थिनींनी कमावलेच. त्याही पुढे जाऊन गुजरातमधून या कीटकाच्या एक लाख अंड्यांची आॅर्डर पुण्याच्या या जैविक कीडनियंत्रण विभागाला मिळाली आहे. या यशात या विद्यार्थिनींचा मोलाचा वाटा राहिला आहे. भावी उद्योजिका सांगतात... केवळ विक्री हाच उद्देश नाही. घरच्या शेतीतही वडिलांना जैविक घटकांचा वापर करण्यास उद्युक्त करणार. कमी खर्चात रासायनिक अवशेषमुक्त शेती करणार. आत्तापर्यंत किडी, मित्रकीटक यांचा जीवनक्रम केवळ पुस्तकातून शिकलो. पण प्रयोगशाळेत त्यांचा जीवनक्रम किंवा किडीच्या अंड्यांवर मित्रकीटक अंडी देताना प्रत्यक्ष पाहतो तो आनंद वेगळाच असतो. त्यातूनच ज्ञान अधिक परिपूर्ण होते.

संपर्क- जोत्स्ना माने-९४२०२८०९२४ (लेडी बर्ड बीटल मित्रकीटक) शुभांगिनी वाळुंज-८५५१०४११५० (बुरशीजन्य कीटकनाशक) ज्योती वाईकर- ८३८०८८८४८७ (ट्रायकोकार्डस)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com