ग्रामस्तरीय रचना सक्षम ल्यासच खरा विकास - पोपटराव पवार

सरपंच महापरिषदेत मार्गदर्शन करताना पोपटराव पवार
सरपंच महापरिषदेत मार्गदर्शन करताना पोपटराव पवार

अाळंदी : सरपंचांनी ग्रामस्तरीय रचना सक्षम केल्यास खऱ्या अर्थाने ग्रामविकास होऊ शकेल, असे मत आदर्श ग्रामविकास योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी येथे केले. ॲग्रोवनच्या वतीने सुरू असलेल्या सरपंच महापरिषदेत सहभागी झालेल्या सरपंचांसमोर ग्रामविकासाची सूत्रे उलघडताना श्री. पवार यांनी अनेक बाबी स्पष्ट केल्या. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार अध्यक्षस्थानी होते. पाेपटराव पवार म्हणाले की, अलीकडे गावातील राजकारण बदलत आहे. नवे विचार, शिक्षण घेतलेली पिढी गावाच्या राजकारणात येत आहे. ही चांगली गोष्ट असली तरी गावाच्या विकासाच्या बाबतीत मात्र अनेक अडचणी येतात. सरपंच शिकलेले जरूर आहेत, पण नेमके तपशील माहीत नसल्याने त्यांना अपेक्षित विकास साधता येत नाही. यामुळे ग्रामसभेमध्ये त्यांना योग्य मांडणी करता येत नाही. यासाठी प्रत्येक ग्रामसभेत निडर होऊन विषय मांडले पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही लोकांसमोर प्रभावीपणे सामोरे जात नाही तोपर्यंत गावातील अडचणी कळणार नाहीत. आज पाहायला गेलं तर प्रत्येक गावात वेगळी परिस्थिती आहे. काही गावांत ग्रामसेवक, काही ठिकाणी उपसरपंच तर काही गावांत सदस्य गाव चालवतात. अशा परिस्थितीमुळे गावचा विकास अगदी अशक्य होऊन जातो. कधी गटबाजी, हेवेदावे गावच्या विकासाला खोडा घालतात. राज्य शासन कोट्यवधी रुपये गावासाठी देते. मात्र नियोजन, एकदिलाने व गावच्या सहभागाने कामे होत नसल्याने गावे विकासबाबत मागे राहतात. खरे तर ७३ व्या घटनादुरुस्तीत पंचायत राज्य व्यवस्थेत ग्रामपंचायत केंद्रस्थानी आहे. या मध्ये ग्रामसभा व सरपंच यांना खूप अधिकार दिले आहेत. प्रत्येक सरपंचाने ‘बजेट’ मांडणे गरजेचे आहे. यातून विकास कामाची निश्चिती होऊ शकेल, असेही पोपटराव म्हणाले. सरपंचांसाठी परीक्षा हवीच ग्रामविकासाच्या दृष्टीने शिक्षित करण्यासाठी सरपंचांसाठी परीक्षा हवीच या मताचा मी आहे. परीक्षेत नापास झालो तर पद जाईल ही भीती अनाठायी आहे. परीक्षेचा हेतू सरपंच ज्ञानी होणे हाच आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामसेवकांना परीक्षा देऊनच यावे लागते. तर सरपंचांची परीक्षा घेणेही चुकीचे नाही. त्यातून त्यांचा फायदाच होणार आहे. ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी शासन पावले उचलते. मात्र स्थानिक इच्छाशक्ती, अनेक नियम, पोट नियमांचा अभ्यास हवा. या बाबी जमल्या की तुम्हाला कोणत्याही गोष्टी सहज शक्य होतात. मात्र यासाठी कष्ट घेण्याची प्रामाणिक पणे काम करण्याची तयारी हवी. याच बाबींची आम्ही आमच्या गावी अंमलबजावणी केली. यामुळे आमचे गाव देशभरात प्रसिद्ध झाले. टीका सहन करण्याची शक्ती हवी. आज अनेक दाखले, परवाने आमच्या गावात येऊन दिले जातात त्याला संघटित शक्ती आणि नियोजनच महत्त्वाचे आहे. श्री. पवार यांनी या वेळी विविध विषयांवर संवाद साधला. ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सरपंचांचा गराडा पोपटराव पवार यांचे मार्गदर्शनपर भाषण झाल्यानंतर राज्यभरातून आलेल्या सरपंचांनी त्यांना गराडा घातला. पवार यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि त्या राबवताना येत असलेले प्रशासकीय अडथळे याबाबत या वेळी महत्त्वपूर्ण चर्चा झाली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com