शेतकरी गड्या आता पुढं चालायचं हाय......

सर्वांच्या मदतीमुळेच शक्य आई, वडील तसेच मित्र परिवाराने मोठा हातभार लावल्याने शेती शक्य झाल्याचे किरण सांगतो. रमेश कदम, बाळू कदम, विशाल घाडगे, प्रवीण भगत, संजय जाधव, किरण जाधव, किरण पवार या मित्रांची मोठी मदत होते. आजपर्यंत तीन कविता संग्रह प्रसिद्ध झाले असून पुस्तकांचे लिखाण पूर्णत्वाकडे आहे.
अपंगत्वावर मात करून शेतीत बळ मिळवलेला तरूण किरण तोडकर
अपंगत्वावर मात करून शेतीत बळ मिळवलेला तरूण किरण तोडकर

शेतकरी गड्या आता पुढं चालायचं हाय...... काळ्या मातीत टिकाव रोवून तिला घामाने भिजावायची हाय काळी माती आपली आई हाय तिला हिरव्यागार माणिक मोत्यांनी फुलवायाची हाय

( किरण तोडकर यांच्या कवितेतील काही अोळी) संकटे आल्यावर धडधाकट माणसेही सगळं संपलंय म्हणून खचून जातात. पण नहरवाडी (रहिमतपूर), जि. सातारा येथील किरण लक्ष्मण तोडकर या तरुण शेतकऱ्याने मात्र अपघातातून आलेल्या अपंगत्वावर अत्यंत धैर्यातून मात करीत आपले जीवन शेती व साहित्य यांच्या व्यासंगातून सार्थकी लावले आहे. आपल्यातील प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता यांचा परिचय देत स्वतःबरोबर इतरानांही दिशा देण्याचे काम केले आहे.   सातारा जिल्ह्यातील नहरवाडी हा रहीमतपूर शहराचाच भाग आहे. सुमारे दोन हजार लोकसंख्येच्या या गावाला कृष्णा नदीचा काठ असल्याने मोठ्या प्रमाणात शेती बागायत आहे. ऊस, आले या नगदी पिकांबरोबरच हंगामनिहाय पिकेही घेतली जातात. गावातील किरण हा तरुण शेतकरी तोडकर कुटुंबातील एकुलता एक मुलगा. लष्करात जाण्याची प्रबळ इच्छा असल्याने दहावीच्या शिक्षणानंतर त्याने व्यायामावर लक्ष केंद्रीत करून शरीर कमावण्यास सुरवात केली. त्यासोबतच कुस्तीताही नाद जोपासला. दुर्दैवी आघात सन २००४ मध्ये एका कुस्ती स्पर्धेत किरण उतरला. त्या वेळी स्पर्धक पैलवान अपघाताने चुकून किरणच्या मानेवर पडला आणि त्याचवेळी मानेतील मज्जारज्जूवर मोठा आघात झाला. शरिराच्या उजव्या बाजूस त्याचा परिणाम होऊन उजवा हात आणि पाय किमान अर्ध्या प्रमाणात अधू झाला. या घटनेने घरच्यांसह मित्र परिवारही हळहळला. किरणने तब्बल एक वर्ष कोमा अवस्थेत काढले. त्या काळात आई वडिलांसह मित्रांनी शक्य ती सर्व सुऋषा व सेवा केली. सर्वांचे प्रयत्न, किरणची सकारात्मक इच्छाशक्ती यातून तो वॉकरचा आधार घेऊन पाऊले टाकू लागला. ‘मृत्यूंजय’, ॲग्रोवने दिले जगण्याचे बळ पंगत्व आल्याने घराबाहेर पडण्यावर मर्यादा आल्या. मग पुस्तके आणि रेडिओ हीच साधने किरणचा आधार झाली. जे काय हाती पडेल ते वाचून काढायचे हा दिनक्रम झाला. यात शिवाजी सावंत यांची मूत्यूंजय कांदबरी वाचनात आली. किरण सांगतो, की कांदबरी वाचल्यावर आलेल्या संकटावर मात करण्याचे धैर्य मिळाले. जीवन आनंदी करण्याचा उत्साह मिळाला. दैनिक अॅग्रोवन, रेडिअो यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या यशोगाथांनी शेती करण्याचा आशावाद पेरला. कवितेने संकटावर मात करायला शिकवले वाचनाच्या आवडीतून किरणला कविता करण्याचा छंद लागला. त्या वाचकांपुढे आणण्याचा निर्णय घेतला. सन २००६ मध्ये प्रेरणा हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला. संकटांना कशा पद्धतीने सामोरे जावे, इच्छाशक्ती असेल तर असाध्यही साध्य कसे करता येऊ शकते याची प्रेरणाच त्याला त्याच्या कवितेने दिली. पुढे अर्थ प्रेमाचा, संघर्षाच्या वाटेवर हे कवितासंग्रह प्रसिद्ध केले. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता निर्भिडपणे पुढे जात संकटांवर मात करायला शिकले पाहिजे असा संदेश त्याने कवितेतून दिलाच. पण हाच संदेश त्याने स्वतः शेतीत उतरून प्रत्यक्षातही आणला. शेतीचा व्यासंग आला उपयोगी किरणने शेतीला प्रारंभ तर केला. पण धड उभेही रहाता येत नव्हते अशी स्थिती होती. पण आता व्यथांपुढे नमून चालणार नव्हते. घरच्या शेतीत पांरपरिक पद्धतीत एकरी २० ते ३५ टन उत्पादन मिळायचे. आजारपणात किरणने अॅग्रोवन, कृषीविषयक मासिके, रेडिओ यांच्या माध्यमातून जो व्यासंग वाढवला होता त्याचा उपयोग शेतीत करायला सुरवात केली. शारीरिक कष्ट करता येणार नाहीत याची स्पष्ट कल्पना असल्याने मित्रांची मदत घेतली. उसाचे उत्पादन पारंपरिक पद्धतीत बदल करीत एक डोळा पद्धतीने चार फुटी सरीचा वापर करून ऊस लागवड सुरू केली. प्रगतशील शेतकरी नामदेव शेलार यांचे तांत्रिक मार्गदर्शन घेतले. व्यवस्थापनाच्या जोरावर एकरी ६० टन उत्पादनापर्यंत पोचण्यात किरण यशस्वी झाला. शेतीतला उत्साह वाढला. सन २०१२-१३ मध्ये आडसाली उस लावला. या वेळी पाचटाची कुट्टी करून ती सरीत अंथरली. खड्ड्यात तयार केलेल्या कंपोस्ट खताचा वापर केला. उसात हरभरा आंतरपीक घेतले. यात उसाचे एकरी शंभर टन उत्पादन मिळाल्याचे किरण सांगतो.

गहू पिकातील प्रयोग परिसरात गहू घेतला जायचा. मात्र अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. वाचन, शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्याविषयी किरणने प्रयोग करण्याचे ठरविले. लोकवन वाणाचा व रेशनिंगमध्ये मिळालेला गहू प्रत्येकी एक किलो घेऊन ते भिजवून घेतले. कडक उन्हात सुकवले. बीजप्रक्रिया करून ते डब्यात हवाबंद करून ठेवले. पुढे त्याची दोन गुंठ्यात लागवड केली. यात मिळालेल्या मोठ्या लोंब्यांतून पाच किलो गहू मिळाला. पाहुणे व मित्रांकडे वेगवेगळ्या ठिकाणी लागवड केली. मिळालेल्या मोठ्या लोंब्या बाजूला काढून बियाणे तयार केले. त्याची २०१५ मध्ये उसात आंतरपीक म्हणून एकाड एक सरीत पाच किलोप्रमाणे त्याची २० गुंठ्यात लागवड केली. यातून १० क्विंटल उत्पादन मिळाल्याचे किरण सांगतो. हे बियाणे सातारा येथील प्रदर्शनात ठेवले. निवड पद्धतीतून विकसित झालेल्या या गव्हाचे नाव किरणच्या मित्रांनी कवीराज ७१ असे नामकरण केले. व्यवस्थापनातील मुख्य बाबी

  • सेंद्रिय शेतीवर भर. उसातील पाचट न जाळता कुट्टी करून उसासह आले पिकातही वापर
  • कंपोस्ट खत तयार करताना त्यात कडूनिंबाचा पालाही वापरला. आले पिकाची वाढ त्यातून उत्तम झाली आहे.
  • दशपर्णी अर्क, जीवामृत यांचाही वापर होतो. यातून उत्पादन खर्चात बचत झाली अाहे.
  • कमी क्षेत्राचा योग्य वापर करण्यासाठी मुख्य पिकात आंतरपिके
  • रासायनिक खतांचा केवळ २० टक्के वापर
  • संपर्क- किरण तोडकर-९५४५६११९३३    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com