सेंद्रिय पद्धतीने डाळिंब उत्पादनाचा प्रयोग

सेंद्रिय पद्धतीने डाळिंब उत्पादनाचा प्रयोग

निकम यांच्या शेतीतील ठळक बाबी संपूर्ण क्षेत्रात ठिबकची सोय. सुमारे १५ ते २० लाख लिटर क्षमतेचे शेततळे पाण्याची सुविधा चांगली. आंबेबहार हंगाम घेण्यावर भर. कृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांच्या गटात सहभाग .

अधिक गुणवत्ता मिळवण्यासाठी व शेतीतील खर्च कमी करण्यासाठी अनेक शेतकरी आता सेंद्रिय किंवा अवशेषमुक्त शेतीकडे वळले आहेत. सांगली जिल्ह्यातील रेठरेहरणाक्ष येथील दतात्रय व प्रशांत या निकम पिता-पुत्रांनी त्याच हेतूने सेंद्रिय पद्धतीने डाळिंब उत्पादनाची वाट चोखाळली आहे. डाळिंबासारख्या पिकात केवळ सेंद्रिय पद्धतीने नियोजन करणे तसे जिकिरीचे आहे. मात्र प्रयत्नपूर्वक व निश्चय या दोन गोष्टींनी निकम यांची वाट सुकर झाली आहे. सांगली जिल्ह्यात कऱ्हाड-तासगाव रस्त्यावर रेठरेहरणाक्ष गावाचे शिवार लागते. कृष्णेच्या पाण्याने समृद्ध झालेला हा परिसर उसाचा हुकमी पट्टा म्हणून परिचित आहे. येथील दतात्रय निकम यांची सुमारे १९ एकर शेती आहे. पूर्वी चार भावांचे त्यांचे एकत्रित कुटुंब होते. अन्य भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करीत होते. दतात्रय यांनीही १९७६ मध्ये कृषी विषयातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्या काळी नोकरीची संधी असताना दतात्रय यांनी शेतीलाच मुख्य महत्त्व दिले. त्या वेळी घरची शेतीही तशी जास्त नव्हती़, पण त्यातच काहीतरी भरीव करायची इच्छा मात्र होती. कुक्कुटपालन, भाडेतत्त्वावर ट्रॅक्‍टर देणे असे व्यवसाय सुरू केले. दरम्यान, कुटुंब विभक्त झाले. दरम्यान, दतात्रय यांनी मुलांना चांगले शिक्षणही दिले. त्यातील नितीन आज महाविद्यालयात प्राध्यापक आहे, तर प्रशांत वडिलांना शेतीत मदत करतात. शेतीचा विकास दतात्रय उसाचे चांगले उत्पादन पूर्वीपासूनच घेतात. एकरी १०० टनांपर्यंत आडसाली उसाचे उत्पादन घेण्यापर्यंत मजल त्यांनी मारली आहे. निकम यांनी गावातच जमीनखरेदीचा व्यवहार केला होता, परंतु काही तांत्रिक कारणास्तव तो शक्‍य झाला नाही. दिलेली रक्कम परत घ्यावी लागली. ती शेतीतच गुंतवायची, या उद्देशाने गावापासून सुमारे १५ किलोमीटरवर असलेल्या कडेगाव तालुक्यात चिंचणी गावालगत माळरानाची जमीन खरेदी केली. उताराच्या या जमिनीचे सपाटीकरण केले. पुढे त्या ठिकाणी सरकारी पाणी योजना झाल्याने या ठिकाणच्या जमिनीस महत्त्व प्राप्त झाले. डाळिंबाचा प्रयोग या भागात ऊस हेच मुख्य पीक होते. मात्र या भागात फारसे कुणी न घेणाऱ्या पिकाचा प्रयोग करण्याचा दत्तात्रय यांचा मानस होता. शेतीतील तांत्रिक ज्ञानही पाठीशी होते. सर्व अभ्यासाअंती डाळिंब या पिकावर घरच्यांचे एकमत झाले. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी भगवा वाणाची सहा एकरांवर लागवड केली.

सेंद्रिय शेतीवर भर डाळिंबासाठी निवडलेली जमीन पडीक होती. यापूर्वी त्यात कोणतीच पिके घेतलेली नव्हती. ती लागवडयोग्य करण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण केले. जवळच असलेल्या ओढ्यातील गाळ या जमिनीत पसरला. सुमारे शंभरहून अधिक ट्रॉली सेंद्रिय खत विस्कटले. बारा बाय १० फूट अंतरावर लागवड केली. वडिलांच्या बरोबरीने प्रशांत यांनी शेतीची जबाबदारी उचलली. सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करायचे हाच विचार पक्का होता. त्या दृष्टीने रासायनिक निविष्ठांचा जराही वापर केला नाही. दत्तात्रय यांच्यासाठी तसे हे व्यवस्थापन थोडे अवघड होते. परंतु जिद्द सोडली नाही. सुमारे २६०० झाडांचे संगोपन सुरू केले. जीवामृत, दशपर्णी अर्क, गांडूळखत आदींच्या वापरातून झाडे चांगल्या प्रकारे जोपासली. दर आठ दिवसाला प्रत्येक झाडाला एक लिटर जीवामृत देण्याचे सातत्य ठेवले. चांगला परिणाम जाणवू लागला. झाडे सशक्त व तजेलदार बनली. सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांचा सल्लाही घेणे सुरू ठेवले. उत्पादन, विक्री व मार्केट लागवडीनंतरचे पहिले उत्पादन सहा एकरांतून सुमारे २२ टन मिळाले. सेंद्रिय पद्धतीच्या या मालाची गुणवत्ता चांगली होती. बहुतांश मालाची खरेदी ९० रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यांनी केली. पुढील वर्षी तेवढ्याच क्षेत्रातून सुमारे ३२ टन उत्पादन मिळाले. पहिल्या वर्षी व्यापाऱ्यांमार्फत निर्यातीला डाळिंब पाठवणे शक्य झाले होते. मात्र त्या पुढील वर्षी नोटाबंदी, तसेच निर्यातीतील अडचणी यामुळे ही बाब साध्य झाली नाही. परिणामी दरही कमी म्हणजे किलोला ४० रुपये मिळाला. मात्र उत्पादनांच्या पहिल्या दोन अनुभवांमुळे निकम यांचा सेंद्रिय शेतीवरील आत्मविश्वास मात्र निश्चित वाढला आहे. सीताफळ लागवड डाळिंबाच्या जोडीला या वर्षी सीताफळाच्या सातशे रोपांची लाववड केली आहे. त्यात पावट्याचे आंतरपीक घेतले आहे. प्रतिकिलो ६० रुपये दराने पावट्याची विक्री होत आहे. त्यातून सीताफळ लागवडीचा उत्पादन खर्च काही प्रमाणात भागवला जातो. सेंद्रिय निविष्ठा १) देशी गायींची जोपासना सेंद्रिय पद्धतीचा अंगीकार केल्याने तशा निविष्ठांचा वापरही साहजिक करणे आले. गोमूत्र व शेणासाठी पंजाबहून पाच साहिवाल जातीच्या देशी गायी आणल्या आहेत. दररोज सुमारे १० लिटर गोमूत्र, तर २० ते २५ किलो शेण मिळते. २) गांडूळ खतनिर्मिती व विक्री निकम यांचे राहते घर रेठरेहरणाक्ष येथे आहे. घराशेजारी पूर्वी पडून असलेल्या कुक्कुटपालन शेडचे रूपांतर गांडूळ खत युनिटमध्ये केले आहे. कुजवलेले शेणखत विकत घेऊन त्याद्वारे खतनिर्मिती केली जाते. वर्षाला सुमारे शंभर टन खत एवढे उत्पादन होते. दर्जा चांगला जोपासल्यामुळे त्यास मागणी आहे. स्वतःच्या शेतात वापरून प्रतिटन पाच हजार रुपये या दराने विक्री केली जाते. त्यातून पूरक उत्पन्न मिळते.  

संपर्क- प्रशांत निकम- ९५९५४४९१९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com