स्वच्छतेकडून समृद्धीकडे रोपळे गावाची वाटचाल

स्वच्छतेकडून समृद्धीकडे रोपळे गावाची वाटचाल
स्वच्छतेकडून समृद्धीकडे रोपळे गावाची वाटचाल

सोलापूर जिल्ह्यातील रोपळे गावाने विकासाचा ध्यास घेतला अाहे. त्यातून अनेक कामे मार्गी लागली आहेत. तलावातील गाळउपसा ही चळवळ गावाने राबवली. त्याचा माती सुपीकतेला फायदा होत आहे. स्वच्छतागृहांची संख्या वाढून व जवळपास हागणदारीमुक्त झाले आहे. त्यातून गावाची वाटचाल स्वच्छतेकडून समृद्धीकडे झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात श्री क्षेत्र पंढरपूरपासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर रोपळे गाव वसले आहे. गावाची प्रगती व विविध सुविधा आणण्याच्या प्रयत्नांतून रोपळे विकास प्रतिष्ठानची स्थापना झाली. पिंपरी चिंचवड येथील नगर भूमापन अधिकारी शिवाजीराव भोसले हे या गावचे सुपुत्र. त्यांनीच गावातील तरुणांना एकत्र करून प्रतिष्ठान उभे केले. आज त्या माध्यमातून व लोकसहभागातून गावात विविध विकासकामे उभी राहिली आहेत. अशी झाली विकासकामे स्वच्छतागृहे  गाव स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी शासनाचा लाभ न मिळालेल्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुमारे १५० कुटुंबांना मोफत स्वच्छतागृहे बांधण्यात आली. याकामी रोपळेतील सकाळ तनिष्का व्यासपीठाचीही मोलाची साथ मिळाली. त्यामुळे गाव बघता बघता ९० टक्के हागणदारीमुक्त झाले. ग्रामस्थांनी स्वच्छतागृहांचा वापर करण्यावर भर दिल्याने गाव स्वच्छ व सुंदर बनले आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यामुळे साथीच्या रोगांना पूर्ण आळा बसला आहे. गाळउपसामुळे जमिनी होताहेत सुपीक ऊस हे पीक असलेल्या या गावाला दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या टॅंकरची वाट पाहावी लागते. अशा परिस्थितीत २०१५ मध्ये गावापासून जवळच्या आष्टी (ता. मोहोळ) येथील ऐतिहासिक तलावातील गाळाचा उपसा करण्यासाठी लोकचळवळ उभी केली. त्या वेळी साधारण दीड लाख ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला. जवळपासच्या पाचशे ते सहाशे एकर शेतीत त्याचा वापर झाला. त्याचा फायदा आजवर सुमारे दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला. गाळ वापरलेल्या जमिनींची जलधारण क्षमता व सुपीकताही वाढली आहे. उत्पादनातही वाढ होण्यास मदत झाली आहे. या उपक्रमाचा रोपळेसह जवळच्या खरातवाडी, बाभूळगाव व मेंढापूर या गावातील शेतकऱ्यांनीही लाभ घेतला. त्या काळी जिल्ह्यातील ही मोठी जलयुक्त शिवार योजना ठरली. या वेळी प्रतिष्ठानचे संचालक अर्जुन भोसले यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तलावातील गाळाचा लाभ मिळण्यासाठी समन्वय साधला. तलावातील गाळ काढलेल्या भागात पाण्याचा साठाही वाढला. सकाळ रिलीफ फंडाची मदत साधारण चार वर्षांपूर्वी ओढ्यातील गाळ काढण्यासाठी सकाळ रिलीफ फंडाची मोठी मदत झाली होती. आता ओढ्यात भरपूर पाणीसाठा आहे. त्याचा फायदा परिसरातील शेतीला होण्याबरोबर गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर व हातपंपाच्या पाण्याची पातळी वाढण्यास झाला आहे. अन्य ठळक कामे

  • रयत शिक्षण संस्थेच्या श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या जलशुद्धीकरण संयंत्राची सुविधा
  • विद्यार्थांना यंदा स्पर्धा परीक्षा, बुद्धिमत्ता मापन चाचणी विषयाचील पुस्तके उपलब्ध करून दिल्याने गुणवत्तावाढीसाठी फायदा. मराठी राजभाषा दिनानिमित्त अवांतर वाचनाची गोडी लागावी म्हणून सुमारे अडीचशे पुस्तके उपलब्ध केली.
  • गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागू नये म्हणून प्रतिष्ठानच्या पुढाकारातून दोन महिने पिण्याच्या पाण्याचा टॅंकर सुरू केला. ज्या भागात पाणीटंचाई आहे अशा भागात पाणी साठवण्यासाठी टाक्‍यांचे वाटपही केले.
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची गुणवत्ता वाढावी यासाठी वर्ग खोल्यांची रंगरंगोटी व सजावट.
  • शाळेला प्रोजेक्‍टर व तीस संगणक संच भेट. गेल्या वर्षीच्या गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर विज्ञानाची प्रतीकात्मक गुढी उभारली.
  • रितोंड वस्ती व अंबिकानगर या वस्तिशाळांनाही प्रत्येकी एक संगणक मोफत दिल्याने विद्यार्थांच्या संगणकसाक्षरतेच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली. हसत-खेळत शिक्षण मिळू लागल्यामुळे मुलांचे गैरहजेरीचे प्रमाण थांबले आहे. वार्षिक तपासणीत शाळेला उत्कृष्ट गुणवत्तेचा शेराही मिळाला आहे. आज शाळा गुणवत्तेच्या बाबतीत पंढरपूर तालुक्‍यात प्रथम क्रमांकावर राहिल्याचे केंद्रप्रमुख डॉ. एन. टी. भोसले व मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचे म्हणणे आहे.
  • प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शाळांचा विकास केल्याने त्यांची गुणवत्ता वाढली आहे. बाहेरगावचे विद्यार्थी येथील शाळांत शिक्षणासाठी येऊ लागले आहेत.
  • रोपळे गाव दृष्टिक्षेपात लोकसंख्या- ६, ३०९ कुटूंब संख्या - ९७३ स्वच्छतागृह असलेल्या कुटुंबांची संख्या -८०० प्रयोगशील शेतीकडे वाटचाल उजनी धरणाचे वरदान लाभल्या या गावातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. मुख्य पीक ऊस असले तरी बोर, चिकू, केळी, द्राक्षे आदी पिकांकडे शेतकरी वळले आहेत. भाजीपाला पिकांचे उत्पादनही घेत असल्याने दररोज ताजी भाजी मिळते. भाजीपाल्यासाठी दररोजची मंडई व रविवारी भरणारा आठवडे बाजार प्रसिद्ध आहे. जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायासही सुरवात केली आहे. गावात दररोज सुमारे पाच हजार लिटर दूधसंकलन होते. यातून दररोज सुमारे एक लाख रुपयांची उलाढाल होते. तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे.

    नोकरीत कार्यरत असताना अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींच्या भेटी झाल्या. त्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत झाली. गाव आता आधुनिकतेकडे वाटचाल करू लागले आहे. - शिवाजीराव भोसले, नगर भूमापन अधिकारी, पिंपरी चिंचवड (पुणे) स्वच्छतागृहांचे महत्त्व समजल्यामुळे ग्रामस्थांनी स्वतःहून शासकीय मदतीने स्वच्छतागृह बांधून त्यांचा वापर सुरू केला. त्यामुळे गाव स्वच्छ राहण्यास मदत झाली आहे. पेयजल योजनेचे कामही मार्गी लागण्यास मदत झाली आहे. - दिनकर कदम, सरपंच रोपळे बुद्रुक कोणत्याही कामात लोकांचा सहभाग महत्त्वाचा असते. त्यामुळेच गावाचा लौकिक वाढेल अशी कामे करता आली. - अर्जुन भोसले, संचालक, रोपळे विकास प्रतिष्ठान तळ्यातील गाळाचा वापर केल्याचा पिकांना फायदा झाल्याने व्यवस्थापनही सुधारले आहे. त्यामुळे पूर्वी एकरी २५ ते ३० टन मिळणारे उसाचे उत्पादन ७० टनांपर्यंत पोचले आहे. कांदा व केळीलाही तसाच फायदा होत आहे. - रामचंद्र आदमिले, ग्रामस्थ

    संपर्क - अर्जुन भोसले-९६६५१३४६५६ रामचंद्र आदमिले- ९९७५६९९५१०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com