शेती अन्‌ सहकाराला चालना देणारा ‘संगमनेर शेतकी सहकारी संघ`

शेती अन्‌ सहकाराला चालना देणारा  ‘संगमनेर शेतकी सहकारी संघ`
शेती अन्‌ सहकाराला चालना देणारा  ‘संगमनेर शेतकी सहकारी संघ`

राज्यातील तालुका सहकारी खरेदी-विक्री संघांना घरघर लागली असताना नगर जिल्ह्यातील ‘संगमनेर शेतकी सहकारी संघ लिमिटेड` हा संघ लक्षवेधी कामगिरी करत आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन या संघाने विविध उपक्रम राबविले आहेत. यामुळे शेती, पूरक व्यवसाय; तसेच ग्रामविकासाला चांगली चालना मिळाली आहे.

नगर जिल्ह्यात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी १९५९ मध्ये संगमनेर शेतकी सहकारी संघ लिमिटेड या संघाची पायाभरणी केली. स्व.भाऊसाहेबांनी संगमनेरभोवती सहकाराच्या माध्यमातून अमृतवाहिनी उद्योग समूहाचे शेतकरीकेंद्रित जाळं तयार करून संगमनेर सहकारी साखर कारखाना, राजहंस सहकारी दूध संघाची स्थापना केली. या सर्वांची मातृसंस्था म्हणजे संगमनेर शेतकी सहकारी संघ. भाऊसाहेबांचा हा वारसा पुढे चालविणारे बाळासाहेब थोरात यांनीदेखील याच शेतकरी संघातून सहकाराचं बाळकडू घेतले. राज्यातील ९० टक्के सहकारी तालुका खरेदी-विक्री संघ चुकीच्या व्यवस्थापनामुळे नुकसानीत गेले असताना संगमनेरचा संघ राज्यात अव्वल कसा, असा प्रश्न सहकार क्षेत्रात नेहमीच विचारला जातो. 

माल तारणावर कर्ज

राज्यात शेतमाल तारण योजना सुरू होण्यापूर्वीच संघाच्या अडतीत माल तारणावर कर्ज देण्याची पद्धत सुरू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मालतारण ठेवून गरजेपुरता पैसा वापरण्यास मिळतो. एका पोत्याला बाजारभावानुसार किमान ६० टक्के रक्कम शेतकऱ्यांला दिली जाते. संघ सुरू झाल्यापासून आम्ही रासायनिक खते विकत आहोत. त्यामुळे खतासाठी या तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचण येत नाही. प्रतिवर्षी बारा हजार टन खत विकले जाते. भाऊसाहेबांकडे धोरणात्मक दृष्टी होती. त्यांनी संघाने पेट्रोल, डिझेल का विकू नये, असा सवाल करीत संघासाठी इंडियन ऑइल कंपनीकडून पेट्रोल पंपाचा परवाना मिळवला. सध्या स्वमालकीचे दोन मोठे टॅंकर असलेला आणि नगर जिल्ह्यात सर्वात जास्त उलाढाल करणारा पेट्रोल पंप हा शेतकी संघाचा आहे, अशी माहिती संघाच्या व्यवस्थापन समितीने दिली. संघातर्फे खाद्यतेलाची विक्री केली जाते. याचबरोबरीने तांदूळ, गहू, ज्वारी; तसेच इतर अन्नधान्याची होलसेल आणि रिटेल विक्रीदेखील होते. यामुळे ग्राहक खुश आणि संघालादेखील पैसे मिळू लागले. राज्य शासनाच्या धान्य खरेदी योजनेतही संघाचा सहभाग आहे. हे करीत असताना संघाने सामाजिक बांधिलकीदेखील ठेवली. संगमनेर भागातील वृक्षारोपण अभियान; तसेच शाळांना वर्गखोल्या बांधून देण्याचे कामही संघाने केले, असे संघाचे उपाध्यक्ष संपतराव डोंगरे सांगतात. 

गुणवत्तापूर्ण उत्पादनांची विक्री 

शेतकी संघाने १९७७ मध्ये कीटकनाशके विक्री विभाग सुरू केला. सहकारात राहून शेतकऱ्यांना नामांकित कंपनीचा माल कमी दरात देण्याचा मंत्र भाऊसाहेबांनी दिला. त्यामुळे नामांकित कंपन्यांचा माल शेतकऱ्यांना एमआरपीपेक्षा कमी दरात मिळू लागला. याचबरोबरीने गुणवत्ता असलेल्या कंपनीच्या पाइपचा पुरवठा संघातर्फे केला जातो. यामुळे संघाचे ग्राहक वाढत गेले. गावपातळीवरील सोसायट्यांना आम्ही खताच्या विक्रीत रिबेट देतो. सोसायट्यांना प्रतिटन २०० रुपये रिबेट मिळते. १५ टक्के लाभांशसुद्धा सभासदांना दिला जातो. रिबेट देणारा राज्यातील हा एकमेव संघ आहे. १९८९ पासून आम्ही शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण स्टील आणि लोखंडी तारा विकण्यास सुरवात केली. यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी माल खरेदी करण्यासाठी आमच्या संघात येतात. संघाने स्वतःची सहा एकर जागा घेतली असून तेथेदेखील नवा पेट्रोल पंप उभारणीचे नियोजन आहे. अशी माहिती संघाचे व्यवस्थापक अनिल थोरात यांनी दिली. 

शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन 

संघाची सूत्रे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आल्यानंतर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची सामग्री देण्याच्या सूचना दिल्या. केवळ सामग्री विकू नका, तर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतदेखील करा, असा बाळासाहेबांचा सल्ला होता. त्यामुळे २०१५ पासून शेतकी संघाने योग्य गुणवत्तेच्या ठिबक संचाची विक्री सुरू केली. शेतकऱ्यांना ठिबक अनुदानाची फाइल तयार करून देणे, शेतावर जाऊन तांत्रिक माहिती देणे व मोजमापे घेऊन ठिबक बसविण्याच्या कामातदेखील संघाची मदत शेतकऱ्यांना मिळते. ठिबक बसविणे म्हणजेच पाण्याची बचत होत असल्याचे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संघामार्फत ठिबक बसविलेल्या शेतकऱ्यांना नामांकित खत कंपनीच्या माध्यमातून एकरी चार हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले गेले. आत्तापर्यंतच्या वाटचालीत संघाला शिवाजीराव थोरात (विद्यमान अध्यक्ष), प्रभाकर भोर, बाळासाहेब गुंजाळ पाटील यांनी वेळोवेळी दिशा दिली आहे.

पणनदूत म्हणून निवड 

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना संगमनेर शेतकी संघाची यशोगाथा माहिती आहे. त्यामुळेच अटल महापणन विकास अभियानात संघाची निवड पणनदूत म्हणून करण्यात आली. संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जाते. सर्वांना आरोग्यविमा मिळतो. दरमहा दोन तारखेला न चुकता पगार होतो. आम्ही कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतो. संघाला स्थापनेपासून लेखापरीक्षणात अ वर्ग मिळला आहे. सर्व खरेदी-विक्रीचा रोजचा अहवाल मला माझ्याकडे येतो. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे  लावण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आहे. संचालक मंडळात कधीही वादविवाद होत नाहीत. कोणत्याही बिलात एक रुपयाची दुरुस्ती करायची असली तरी कर्मचाऱ्याला मुख्यालयात यावे लागते. परस्पर कोणेतेही उद्योग होत नाहीत, असे संघ व्यवस्थापक अनिल थोरात सांगतात. 

असा आहे संगमनेर शेतकी संघ

  • संगमनेर तालुक्यातील १३५ विविध कार्यकारी सहकारी सेवा 
  • सोसायट्यांची मालकी. 
  • सोसायट्यांमधून ७० हजार शेतकऱ्यांना कर्जपुरवठा.
  • सोसायट्यांचे सभासद हेच संघाचे ग्राहक.
  • संघाकडून गुणवत्तापूर्ण खते, कीटकनाशके, बियाणे, अवजारे, धान्य, पाइपपासून ते सिमेंट, स्टील, पेट्रोल पुरवठा. 
  • शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून संघाने स्वतःच अडत्याचा परवाना घेऊन संगमनेर बाजार समितीत अडत टाकली. तेथे योग्य व्यवहार होतात. वजन आणि बिलात कोणतीही लूट नाही. त्यामुळे मार्केटला येणारा ७० टक्के भुसार शेतमाल संघांच्या अडतीत येतो. बिल होताच पेमेंट मिळते.
  • वर्षाला ७० कोटींची उलाढाल. पावणेतीन कोटींचा व्यापारी नफा.
  • संघाकडे असलेल्या जमिनीचे बाजारमूल्य १०० कोटी रुपयांचे, त्यावर उभारल्या गेलेल्या व्यवसायांचे मूल्य दीडशे कोटींच्या पुढे.
  • संघाचे स्वमालकीचे ५० लाखांचे गोदाम. ४३ गाळ्यांची उपलब्धता. 
  • शेतकरी संघाने गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना उदरनिर्वाहाचे साधन मिळावे 
  • म्हणून अवघ्या एक हजार रुपये मासिक भाड्यात गाळ्यांचे वाटप.
  •   संपकर् ः अनिल थोरात (व्यवस्थापक) ः ९८५०३१९५६८,  : ०२४२५-२२५१३७ (कार्यालय,संगमनेर शेतकी सहकारी संघ लिमिटेड)    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com