नैसर्गिक शेतीवर भर देत ऊस, केळी, गूळनिर्मिती

नैसर्गिक शेतीचे पाटील यांना झालेले फायदे जमिनीची सुपीकता वाढीस लागली. शेतीचा उत्पादन खर्च किमान ३० ते ४० टक्के कमी झाला. रासायनिक अंशमुक्त मालाचे उत्पादन करणे शक्य झाले.
दादासो पाटील यांनी उसाची नैसर्गिक शेती केली आहे. त्यात पाचटाचा मुख्य वापर होतो.
दादासो पाटील यांनी उसाची नैसर्गिक शेती केली आहे. त्यात पाचटाचा मुख्य वापर होतो.

सुमारे सात वर्षांपासून ९० टक्के प्रमाणात नैसर्गिक शेतीपद्धतीचा अवलंब करीत ग्राहकांना रासायनिक अंशमुक्त अन्न उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट सरूड (जि. कोल्हापूर) येथील दादासो पाटील यांनी ठेवले आहे. ऊस, त्यापासून गूळनिर्मिती, देशी केळी, शेतीतील खर्च व श्रम यांत बचत आणि यांत्रिकीकरण ही वैशिष्ट्ये जपत उत्पन्नवाढीसह जमिनीची सुपीकताही जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.    ऊसक्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याचे नाव पुढारलेले असले, तरी पश्‍चिम भागात मात्र ऊस क्षेत्र तुलनेने कमी आहे. शाहूवाडीसारखा दुर्गम तालुका त्यापैकीच एक म्हणावा लागेल. प्रामुख्याने तो भात, नाचणी पिकांसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्‍यांत त्याचा समावेश होतो. अशा या तालुक्यातील सरूड येथील दादासो मारुती पाटील यांची अोळख परिसरात प्रयोगशील शेतकरी अशीच झाली आहे. पाटील यांची वैशिष्ट्यपूर्ण शेती

  • एकूण शेती सुमारे साडेसात एकर
  • सुमारे ९० टक्के नैसर्गिक शेती
  • पिके - ऊस, मुख्यतः गुळासाठी
  • केळी - देशी वाण
  • थोडाफार भाजीपाला
  • त्यास पूरक दुग्धव्यवसाय
  • घरची १९ जनावरे, त्यांत दोन देशी गायी
  • यांत्रिकीकरण वडिलोपार्जित शेती असल्याने पारंपरिक पद्धतीने बैलांद्वारे शेती केली जायची. बारमाही पाणी नसल्याने भात व भुईमुगाशिवाय अन्य पिके फारशी नव्हती. गेल्या काही वर्षांत वारणा नदीवरून पाण्याची सोय झाल्याने शेतीपद्धतीत आमूलाग्र बदल केले. पाणी मुबलक असूनही ठिबकला प्राधान्य देऊन पाटील यांनी आपल्या भागातील ऊसशेतीत नवा पायंडा पाडला. त्यांच्याकडील एकूण क्षेत्रापैकी सुमारे ऐंशी टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे.

    प्रभावी पाचट व्यवस्थापन पाच फुटी सरी ठेवून ऊस लागवड होते. अपवाद वगळता शंभर टक्के यांत्रिकीकरण करता येईल या बेतानेच नियोजन केले. विशेष करून उसासाठी पाटील स्प्रिंकलरचा वापर करतात. उसाच्या उगवणीला त्यामुळे चांगली चालना मिळते. संपूर्ण शिवाराला एकसमान पाणी मिळते असे ते म्हणतात. पाचट जाळणे त्यांनी आठ वर्षांपासून बंद केले आहे. पॉवर टिलरचा वापर करून उसात मशागत केली जाते. तण फुलोऱ्याच्या स्थितीत येण्याअगोदर ते मातीआड गाडले जाते. त्याचा खत म्हणून उपयोग होतो. रसायनांचा वापर थांबवला रासायनिक शेती करताना गुंठ्याला एक टन इतकाच उतारा ऊसपिकात मिळत असे. आता नैसर्गिक पद्धतीच्या शेतीवर काही वर्षांपासून भर दिल्याने जमिनीची प्रत सुधारली आहे. गोमूत्र व शेणखताचा जास्तीत जास्त वापर ते करतात. देशी गोमूत्राच्या माध्यमातून जीवामृत तयार केले जाते. ते ठिबकमधून पिकाला दिले जाते. याशिवाय पीक संरक्षक म्हणून दशपर्णी अर्काचा वापर केला जातो. आश्वासक उत्पादन व विक्री लागवडीच्या उसाचे प्रतिगुंठा दोन टन, तर खोडवा उसाचे एक ते दीड टनापर्यंत उत्पादन मिळते. देशी केळीची १२ ते १४ किलोची रास मिळते. विक्रीचा प्रश्नही पाटील यांनी सोडवला आहे. अधिकाधिक नैसर्गिक गूळनिर्मितीवर भर देत कृषी महोत्सव, प्रदर्शने यांतूनच गुळाला मागणी मिळवली जाते. एका महोत्सवात अलीकडेच दोन टन गूळ विक्री केली. पाटील म्हणतात, की या गुळाचा दरही फार जास्त ठेवत नाही. ग्राहकाला परवडेल असाच किलोला ५० रुपये असतो. सरूडमध्येच पाटील कुटुंबीयांनी आपला छोटा मॉल उभारला आहे. तेथेच देशी केळीची प्रतिडझन ४०, ५० रुपये दराने हातविक्री केली जाते. दररोज साधारण ८ ते १० डझन मालाची विक्री होते. याव्यतिरिक्त काही भाजीपालाही ग्राहकांकडून घेतला जातो. पिकांची फेरपालट खोडवा काढल्यानंतर पुन्हा त्याच क्षेत्रात ऊस घेतला जात नाही. मूग, उडीद, चवळी, भुईमूग आदी द्विदल पिके घेण्याचा प्रयत्न असतो. यामुळे जमिनीची सुपीकता कायम राहते.

    यांत्रिकीकरणावर भर शेतीतील श्रम व मजूरबळ यांत बचत करण्यासाठी यांत्रिकीकरणाला अधिक महत्त्व दिले. स्प्रिंलकर, ठिबक या यंत्रणेचा प्रभावी वापर केला. मशागतीसाठी जड ट्रॅक्‍टर शेतात घालणे टाळले. त्याद्वारे मशागत केल्यास जमीन घट्ट होते असे पाटील सांगतात. अधिकाधिक कामे पॉवर टिलरद्वारेच केली जातात. त्याला अनुरूप पट्टा पद्धतीचा वापर होतो. मुक्त पद्धतीचा गोठा जनावरांचे मुक्त गोठा पद्धतीने संगोपन केले जाते. त्यामुळे आरोग्यदायी वातावरणात त्यांना ठेवले जाते. संकरित गायींपासून दररोज सुमारे ७० ते ७५ लिटर दूध मिळते. ते दूध संघाला दिले जाते. कुटुंबातील केवळ दोन व्यक्ती हा व्यवसाय सांभाळतात. यांत्रिक पद्धतीने दूध काढले जाते.गोमूत्र मात्र जिल्ह्यातील एका गोशाळेतून आणले जाते. ते जितके जुने तितके चांगले, असे पाटील म्हणतात. वर्षाला सुमारे ३० ट्रॉली एवढे शेण घरच्या जनावरांपासून मिळते.

    संपर्क- दादासो पाटील - ९४२३२८६७०५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com