प्रयोगशीलता, चिकाटीतून शेतीची घडी सुस्थापित

चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो. पण, दर आपल्या हाती नाहीत. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती घेत पीकपद्धती बदलण्याचा मी प्रयत्न केला. फसलेल्या प्रयोगांमुळे कधीच खचलो नाही. -सतीश सोळंके
गंगामसला (ता. माजलगाव) येथे सतीश सोळंके यांनी एक एकरात उभारलेले शेडनेट. त्यात ढोबळी मिरचीची लागवड.
गंगामसला (ता. माजलगाव) येथे सतीश सोळंके यांनी एक एकरात उभारलेले शेडनेट. त्यात ढोबळी मिरचीची लागवड.

गंगामसला (जि. बीड) येथील सतीश सोळंके यांनी राजकारणात सक्रिय राहूनही शेतीकडे मात्र जराही दुर्लक्ष केलेले नाही. आपल्या ३५ एकर शेतीत विविध पिकांचे प्रयोग त्यांनी घडवले. काही फसले, थांबवावेही लागले; पण चिकाटी कधीच सोडली नाही. शेतीची आवड, नव्या तंत्राचा ध्यास, पूरक व्यवसायाची अोढ आदी बाबींमधून एकात्मिक शेतीची घडी सुस्थापित करण्यात त्यांना यश मिळाले आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील सिंदफणा नदीपात्राचा काठ म्हणजे सोने पिकणारी जमीन अशी ओळख. त्यातच माजलगावचा मध्यम प्रकल्पही तालुक्यासाठी वरदान आहे. पूर्वी ज्वारीचे पठार अशी ओळख असलेल्या या तालुक्यात अलीकडे ऊस आणि कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, पर्जन्यमानामुळे केवळ उसावर अवलंबून राहण्यापेक्षा अाधुनिकतेची कास धरत विविध पिकांमधून चांगले उत्पादन काढत गंगामसला (ता. माजलगाव) येथील सतीश सोळंके यांनी शेतीची आवड कायम जोपासली आहे. सोळंके यांची शेती सोळंके यांचा शेतीतील प्रवास तसा रंजकदार आहे. ते पूर्वी जम्मू-काश्मीर भागात केंद्रीय राखीव पोलिस दलात काही वर्षे कार्यरत होते. यानिमित्ताने काही राज्यांचा अनुभव त्यांनी घेतला. पुढे नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर ते गावी परतले. मात्र, त्यांना राजकीय क्षेत्राचीही अोढ होती. आज ते एका आघाडीच्या पक्षाचे तालुकाप्रमुख पदावर कार्यरत आहेत. मात्र, वेळेचे नियोजन करून शेतीतील प्रयोग मात्र थांबवलेले नाहीत. पिकांचे नियोजन सोळंके यांची सुमारे ३५ एकर शेती आहे. काळीभोर जमीन, जवळच काही अंतरावर गोदावरी नदी या शेतीसाठीच्या जमेच्या बाजू. त्यामुळे पूर्वापार ज्वारीच असे. पुढे सिंचन क्षेत्र वाढून ऊस कारखाने झाल्याने कल उसाकडे वळवला. सात वर्षांपूर्वीपर्यंत शेतात सुमारे २५ ते ३० एकरांवर ऊसच असे. मात्र, उत्पादनासाठी लागणारा वेळ, खर्च आणि येणारे उत्पन्न यांचा ताळेबंद लावला तर पदरी फारसे काही पडत नव्हते. मग फळबाग, हळद, भाजीपाला पिकांकडे कल वळवला. आज दोन एकरांवरच ऊस आहे. तीन एकर मका, २० एकर ज्वारी, चार एकर करडई, तीन एकरांवर विविध वाणांचा चाराही आहे. प्रयोग फसले तरी पुन्हा सुधारणा काही प्रयोगांमध्ये अपयश आले तरी न डगमगता चुका दुरुस्त करून पुन्हा चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. पूर्वी चार एकरांवर लिंबू बाग लावली; पण पडते भाव, लागवडीतील काही चुका यामुळे यश मिळाले नाही. पण न खचता दोन एकरांवर हळद लावली. सुरवातीला त्यातूनही चांगले यश मिळाले नाही. मात्र, सातत्य राखल्याने हे पीक स्थिर होऊ लागले आहे. मागील वर्षी एकरी ३० क्विंटलचा उतारा मिळाला. यंदा सात एकरांवर हळद आहे. एकरी सुमारे २० ते २२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. मध्यंतरी केळी घेतली, गुणवत्ताही अत्यंत चांगली मिळवली; पण व्यापाऱ्यांच्या हाती दर असल्याने हे पीकही फारसे यशस्वी झाले नाही, असे सोळंके म्हणाले. कलिंगडातही मिळवली अोळख सुमारे आठ वर्षांपूर्वी कलिंगडाची शेती केली. उत्तम गुणवत्ता व चकाकी मिळवून वाशी मार्केटला आपल्या मालाला अोळख तयार केल्याचे सोळंके म्हणाले. एकरी १८ टनांपर्यंत उत्पादनही घेतले; पण कमी कालावधीतील या पिकाकडे लक्ष मात्र फार द्यावे लागायचे. मग हे पीक घेणे थांबवले. शेडनेटमध्ये ढोबळीचा प्रयोग कमी कालावधीत चांगले उत्पादन घेण्याच्या दृष्टीने यंदा एक एकरात शेडनेट उभारून त्यात ढोबळी मिरचीची लागवड केली. सध्या सुमारे ६५ दिवसांचा प्लॉट आहे. दररोज दोन क्विंटल माल मिळत असून, किलोला ४० ते ४५ रुपये दर मिळत आहे. अजून काही महिने तरी प्लॉट सुरू राहील. पाथरी, मानवत व माजलगाव यांच्या मध्यावर आपले गाव असल्याने बाजारपेठ चांगली मिळत असल्याचे सोळंके म्हणाले. भरभरून पाणी; पण बचतीसाठी ठिबक माजलगाव तालुक्यात मोठा मध्यम प्रकल्प, बाजूलाच गोदावरी नदी, सिंदफणा नदी आदी पाण्याचे विविध स्रोत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी पाण्याबाबत नशीबवान समजला जातो. सोळंके यांच्या शेतापासून पाच किलोमीटर अंतरावरूनच गोदावरी वाहते. यावर अलीकडेच पाथरी (जि. परभणी) येथे मोठा बंधारा झाला आहे. त्यावरून पाइपलाइन केली आहे. दोन मोठ्या विहिरींसह एक विंधन विहीर आहे. मात्र, पाणीबचतीचा मंत्र जपत सर्वत्र ठिबक सिंचन केले आहे. नैसर्गिक शेतीकडे कल जमिनीचा पोत व मानवी आरोग्य या बाबींवर लक्ष ठेवून नैसर्गिक शेतीकडे कल ठेवला आहे. पिकांसाठी जास्तीत जास्त गोमूत्राचा (स्लरी टँकच्या माध्यमातून) वापर होतो. सध्या गीर, कंधारी देशी गायी व अन्य मिळून एकूण ६५ जनावरे आहेत. दररोज १५ ते २० लिटर दूध मिळते. शेणाचा शेतीसाठी वापर होतो. शेतगड्यांसाठी सुविधायुक्त घरे नियमित रोजंदारीवर काम करून घेण्यापेक्षा सुमारे पाच सालकरी कुटुंबांना कायम रोजगार दिला आहे. त्यांना शेतातच राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी सर्व सुविधाही दिल्या आहेत. शौचालयेदेखील घराला ‘ॲटॅच’ आहेत. ग्रामविकासातही आघाडी सोळंके माजी सरंपच आहेत. त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषदेच्या सभापतीही होत्या. त्या अनुषंगाने या दांपत्याने पाणंदमुक्ती व शेतरस्ते बांधणीसाठीही काम केले आहे. ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक सोळंके ‘ॲग्रोवन’चे विशेषतः त्यातील यशकथांचे, तंत्रज्ञानाचे वाचक आहेत. परिसरातील एखाद्या शेतकऱ्याची यशकथा प्रसिद्ध झाल्यास ते प्रत्यक्ष भेट देऊन प्रयोग समजावून घेतात. सतीश सोळंके - ९४२२१७८८५७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com