agricultural success story in marathi, agrowon, shekharwadi, valva, sangli | Agrowon

ऊसपट्ट्यात गोडवा लालचुटूक स्ट्रॉबेरीचा
शामराव गावडे
शनिवार, 6 जानेवारी 2018

नंदकुमार यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

 •  जमीन हलकी माळरानाची
 • स्ट्रॉबेरी लागवडीत पाच वर्षांपासून सातत्य
 • गावातील इतर दोघांनी प्रेरणा घेऊन या पिकाची लागवड केली आहे.
 • दर्जेदार रोपे तयार करण्यावर भर
 • फळांचा उत्तम दर्जा जोपासला.
 • स्थानिक बाजारपेठ मिळवली

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका ऊस, भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, तालुक्यातील शेखरवाडी येथील युवा शेतकरी नंदकुमार शेखर यांनी इथल्या मातीत स्ट्रॉबेरी पीक यशस्वी केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून या पिकात हातखंडा तयार केला आहे. आपल्या लालचुटूक, दर्जेदार, गोड फळास कोल्हापूर व सांगलीची बाजारपेठही मिळवण्यास ते यशस्वी झाले आहेत.

सांगली जिल्ह्यात वाळवा तालुका ऊस, भाजीपाला या पिकांसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील शेखरवाडी गावच्या शिवारातील जमीन माळरानाची आहे. एखादी सार्वजनिक लिफ्ट इरिगेशन योजना वगळता स्वतःच्या विहिरी ही इथल्या शेतीच्या पाण्याची सोय असते. चांगला पाऊस पडला तर बरे, अन्यथा पाण्यासाठी संघर्ष वाट्यालाच आलेला असतो. कसेतरी मार्च, एप्रिलपर्यंत विहिरीला पाणी पुरते. येथील शेतकरी मात्र जिद्दी. हंगामानुसार छोटी पिके व खुल्या शेतात कांद्याची तरू करणे, आठवडी बाजारात विकणे अशी त्यांची शेतीची पद्धती असते.

शेखर यांची शेती
शेखरवाडीत दिलीप, नंदकुमार व संदीप असे तीन भावांचे शेखर कुटुंब. त्यातील दिलीप व संदीप हे बांधकाम कंत्राटी व अन्य व्यवसाय पाहतात. नंदकुमार पूर्णवेळ शेती पाहतात. वडिलोपार्जित सुमारे सहा एकर जमीन आहे. त्यात ऊस, ज्वारी, गहू, हरभरा अशी पिके पूर्वी असायची.

स्ट्रॉबेरीचा शोध
शेतीत हमखास किंवा नगदी उत्पन्न देऊ शकणाऱ्या पिकाकडे नंदकुमार यांचा अोढा होता. त्याचवेळी मोठे बंधू दिलीप यांनी ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध स्ट्रॉबेरी पिकाविषयीची माहिती वाचली. महाबळेश्वरचा परिसर ज्या पिकासाठी, ते पीक आपल्या भागात येईल का, तसेच त्यापासून चांगला उत्पन्नाचा मार्ग तयार होऊ शकेल का, याबाबतीत शेखर बंधू विचार करू लागले. कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांचे स्नेहीदेखील याच पिकाचा विचार त्या वेळी करीत होते. मग त्यांनी एकत्रपणे थेट महाबळेश्‍वर गाठले. भिलार परिसरातील काही स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्लॉटना भेटी दिल्या. लागवड, संगोपन, विक्रीव्यवस्था यांची सविस्तर माहिती घेतली. त्याचे अर्थकारण पटल्यानंतर लागवडीचा निर्णय घेतला. ते वर्ष होते २०१२ चे.

प्रयोगातील ठळक बाबी

 • पाच वर्षांपासून दीड एकरात प्रयोग.
 •  भिलार परिसरातूनच पिकाची मदर प्लॅंट आणली. एक रोप ३५ रुपयांना पडले.
 • त्यानंतर स्वतःच्या रोपवाटिकेत रोपे तयार केली.
 • रोपेनिर्मितीच्या पिशवीत काळी किंवा नदीकाठची माती भरली जाते. प्रति मदर प्लॅंटपासून साधारणपणे २५ रोपे तयार होतात. रोपे तयार करण्याचे काम मोठे जिकिरीचे असते.
 • साधारण १५ ऑगस्टनंतर ठिबकच्या दोन्ही बाजूंना झिगझॅग पद्धतीने प्रत्येकी सव्वा फूट अंतरावर लागवड केली जाते.
 • एकरी २२ ते २५ हजार रोपे बसतात.
 • सुरवातीच्या काळात पॉलिमल्चिंग केले होते. मात्र, आता ते नसल्याने दोन- तीन भांगलणी कराव्या लागतात.

प्रशिक्षण ठरले महत्त्वाचे
नंदकुमार सांगतात, स्ट्रॉबेरीचा प्रयोग आमच्या भागात नवा असल्याने तो परिसरात कौतुकाचा विषय ठरला. मी महाबळेश्‍वर भागातील शेतकऱ्यांकडून लागवड व्यवस्थापनासह तोडणी, पॅकिंग या सर्व बाबीही मनापासून शिकून घेतल्या. तेथील प्रत्येक भेटीत नजरेत बारकावे ठेवून या गोष्टी आत्मसात केल्या. त्यापद्धतीने येथील मजुरांनाही प्रशिक्षण दिले. आज गावातील अनेक मजूर या कामांत तरबेज झाले आहेत.

तोडणी व आकर्षक पॅकिंग

 • लागवडीनंतर साधारण ४५ दिवसांनंतर फळे येण्यास सुरवात
 • सुरवातीला पांढरट हिरवी दिसणारी ही फळे दोन ते तीन दिवसांत लालचुटूक होऊ लागतात.
 • एक दिवस आड या पद्धतीने होते तोडणी. त्यात ५०० किलो माल मिळतो.
 • विक्रीसाठी ट्रे पद्धत वापरली जाते. प्रति ट्रेमध्ये आठ प्लॅस्टिक पनेट असतात. दुपारपर्यंत तोडणी करून पॅकिंग केले जाते. सायंकाळी माल मार्केटला रवाना होतो.

स्थानिक मार्केट काबीज केले

 १)नंदकुमार म्हणाले की कोल्हापूर मार्केटला सुरवातीला महाबळेश्वर भागातील स्ट्रॉबेरी यायची. आवक कमीच असायची. मात्र, मी व्यापाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या फळाच्या गुणवत्तेची माहिती दिली.
२)स्थानिक भागातूनच दर्जेदार स्ट्रॉबेरी उपलब्ध होते आहे, हे उमगल्यावर व्यापारीही विक्रीला तयार झाले.
सांगलीचे मार्केटही मिळवले आहे.
३) बंधू दिलीप यांच्या नावाने माल कोल्हापूरला विक्रीसाठी पाठवतो. तेथे या नावाची वेगळी ओळख तयार झाली आहे. सांगली मार्केटला माझ्या नावाने विक्री करतो.

दर

 • प्रति ट्रे - हंगामाच्या सुरवातीस कमाल दर ४५० रुपयांपर्यंत, तर त्यानंतर १५० ते २०० रुपयांपर्यंत मिळतो. नंतरच्या काळात हाच दर १०० रुपये राहतो.
 • मार्चपर्यंतच मुख्य विक्री होते. दुय्यम ग्रेडची फळे महाबळेश्वर परिसरातील प्रक्रिया उद्योगाला दिली जातात, त्यास किलोला २७ रुपये दर मिळतो. अर्थात, हा दरही परवडतो. कारण प्रतवारी, पॅकेजिंग खर्च या विक्रीत कमी होतो.

उत्पादन- उत्पन्न
साधारण पंधरा आॅगस्ट ते मार्च या संपूर्ण कालावधीत उत्पादन खर्च वजा जाता दीड एकरात दोन ते
अडीच लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो. उत्पादन १४ ते १५ टनांपर्यंत मिळते.

प्रतिक्रिया
तरुणांनी नावीन्याचा ध्यास घेणे गरजेचे आहे. प्रयोगशील वृत्ती ठेवल्यास यशस्वी होण्यास अडचण येणार नाही.
- नंदकुमार शेखर

संपर्क- नंदकुमार शेखर - ९०९६८१७०४५

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...
प्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले...नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही...
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...