सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा शेतकऱ्यांसाठी ‘न्युट्रिशन अॅग्री माॅल

मॉलच्या रूपाने विक्री एकाच छताखाली होत असल्याने मार्केटचा मोठा प्रश्‍न सुटला आहे. अल्प कालावधीतच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आमच्या कंपनीकडून गुलाबजलचे उत्पादन होते. त्याच्या विक्रीचा अनुभव खूपच चांगला आहे. -परमेश्‍वर कुंभार, अध्यक्ष, खंडोबा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, वडजी
सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने उभारलेला न्यूट्रिशन अॅग्री मॉल
सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने उभारलेला न्यूट्रिशन अॅग्री मॉल

सेंद्रिय भाजीपाला, देशी गाईचे दूध, तूप, लाकडी घाण्यावर गाळलेले तेल आदी उत्पादनांच्या विविधतेने नटलेला `न्यूट्रिशन ॲग्री मॉल' उभारण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेची साखळी उभारण्याचे काम ग्रामीण पोलिसांनी केले आहे. सहा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपला माल सद्यस्थितीत येथे विक्रीस आणला आहे. शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन असा अभिनव उपक्रम राबवणारे सोलापूर ग्रामीण पोलिस दल राज्यातील पहिलेच पोलिस दल ठरले असावे. सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीला चालना मिळावी, रासायनिक विषमुक्त धान्य आणि भाजीपाला ग्राहकांना मिळावा, त्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी आत्मियता व्यक्त व्हावी, सामाजिक बांधिलकी जपली जावी अशा विविध हेतूंनी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. ‘न्यूट्रिशन ॲग्री मॉल' असे त्याचे नाव आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेची साखळी उभारण्याचे काम त्या माध्यमातून होत आहे. संकल्पना आली आकाराला पोलिस अधीक्षक डॉ. वीरेश प्रभू आणि पोलिस वेल्फेअर फंडाचे सहायक पोलिस निरीक्षक नाना कदम यांच्या संकल्पनेतून या मॉलचा उपकम आकारास आला. त्याला कारणही तसेच ठरले. भारतीय ऑईल कंपन्यांकडून महाराष्ट्रातील पोलिस वेल्फेअर फंडासाठी पेट्रोलपंपाची सुविधा देण्यात येणार होती. त्याच धर्तीवर पंप सोलापूर ग्रामीण पोलिस दलालाही मंजूर झाला. त्या माध्यमातून शुद्ध इंधनातून प्रदूषण रोखताना ग्राहकांची काळजी घेतली जाते. मग ग्राहकांना विषमुक्त, निरोगी शेतमालाचा पुरवठा करून त्यांच्या आरोग्याचीही काळजी आपण का घेऊ शकत नाही? या विचाराने सोलापुरातील नवीन पोलिस अधीक्षक कार्यलयाच्या आवारात हा मॉल पेट्रोल पंपाजवळ आकारास आला. माल विक्रीस आणण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणते शुल्क आकारले जात नाही. केवळ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १० टक्के सवलत दिली जाते.

स्वच्छ, ताजा माल एखाद्या ‘कॉर्पोरेट’ कंपनीच्या व्यवसायिक मॉलप्रमाणे त्याला ‘लूक’ देण्यात आला आहे. सुमारे एक हजार चौरस फूट क्षेत्रात त्याचे बांधकाम आहे. संपूर्ण वातानुकूलित असल्याने भाजीपाला, धान्ये, विविध फळे आदी माल ताजा राहतो. विस्ताराने सांगायचे तर ज्वारी, गहू, बाजरी, हरभरा, तूर डाळ, देशी गाईचे दूध, तूप, विविध प्रकारचे लाकडी घाण्यावर गाळलेले तेल, सेंद्रिय गूळाची काकवी, साखर, गुलाबजल आदी विविधता येथे पाहण्यास मिळते. शेतकरी कंपन्या, गटांचा सहभाग शेतकऱ्यांव्यतिरिक्त व्यापारी वा व्यावसायिकांना येथे विक्रीस परवानगी नाही. यासाठी पोलिस वेल्फेअर फंडाने वडजीच्या खंडोबा ऍग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीकडे इथल्या नियंत्रणाची जबाबदारी दिली आहे. सध्या या कंपनीसह यशस्विनी ॲग्रो कंपनी (बोरामणी), गोमाता ॲग्रो कंपनी (पंढरपूर), वसुंधरा ॲग्रो कंपनी (बेलाटी) आदी कंपन्या आपला माल याठिकाणी विक्रीस आणतात. महिला बचत गटाच्या वस्तू उदा. लोणची, उडीद, नाचणीचे पापड आदीही या ठिकाणी पाहण्यास मिळतात. अॅग्री एक्‍सप्रेस आणि न्युट्रिशन मॅजिक बॉक्‍स थेट ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी मोबाईल व्हॅनद्वारे ऍग्री एक्‍सप्रेस सुरू करून शहरातील विविध भागांतही मालाची विक्री करण्यात येत आहे. ‘न्यूट्रिशन मॅजिक बॉक्‍स’ ही संकल्पनाही अशीच आहे. त्यासाठी ‘व्हॉटस ॲप’चे ‘ग्रुप्स’ तयार करण्यात आले आहेत. त्याला २५० हून अधिक ग्राहक जोडले गेले आहेत. ग्राहकांनी मागणी त्यावर नोंदवायची. त्यानुसार घरपोच ‘बॉक्‍स’ पोहोच केला जाणार आहे. सोलापूरची ओळख सांगणाऱ्या `ज्वारी'चे पदार्थ सोलापूची ओळख असलेली कडक भाकरी आणि शेंगदाणा चटणीही मॉलमध्ये आहे. शिवाय केक, सांडगे, रवा, शेवया आदी खास ज्वारीपासून बनवलेल्या विविध पदार्थांची रेलचेलही येथे पाहण्यास मिळते. ग्राहकांकडून त्याला सर्वाधिक पसंती मिळते आहे. उलाढाल सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत मॉल सुरू असतो. भाजीपाला आणि सेंद्रिय उत्पादनांना ग्राहक सर्वाधिक पसंती देत असल्याचे दिसून येते. दिवसभरातील खरेदी-विक्रीची उलाढाल सुमारे दहा हजार रुपयांहून अधिक होते. समाधानी, स्वयंपूर्ण खेडे संकल्पना पोलिस वेल्फेअर फंडाच्या माध्यमातून समाधानी, स्वयंपूर्ण खेडेगाव ही नवी संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात येत आहे. त्या माध्यमातून शहराजवळची कोंडी आणि हिरज ही दोन गावे ग्रामीण पोलिस दलाने दत्तक घेतली आहेत. त्याठिकाणी गावांचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास करण्याचा उद्देश आहे. त्यादृष्टीने गावकऱ्यांशी संवाद साधणे, गावातील तरुणांना सैन्यदल भरतीसाठी मार्गदर्शन, शहीद जवानांच्या स्मारकातून स्फूर्तीस्थळ उभारणे यांसारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. प्रतिक्रिया शेतकऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकी म्हणून पोलिस दलाने हा उपक्रम राबवला. शाश्‍वत, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्यासह, धान्याची आपल्याला गरज आहे. देशी गाय हा उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. -नाना कदम, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस वेल्फेअर फंड    सेंद्रिय, विषमुक्त धान्य, भाजीपाला इथे मिळत असल्याचे समाधान आहे. शहरी ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. -ऋृषभ हरिया, ग्राहक, सोलापूर या मॉलमधून नियमित खरेदी करतो. सेंद्रिय साखर, गूळाला विशेष पसंती असते. त्यांची चव वेगळीच आहे. निरोगी आरोग्यासाठी विषमुक्त अन्न आवश्‍यक आहे. -जय बुगडे, ग्राहक, सोलापूर

संपर्क- नाना कदम-९९२३००२५६३ (सहा. पोलिस निरीक्षक)-9923002563 परमेश्‍वर कुंभार-८७८८३७३५०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com